विडा घेई नरहरिराया ।
धरूनी मानवाची काया ।
यतिवेष घेउनीयां वससी दीनांसी ताराया ॥ धृ. ॥
ज्ञान हें पूगीफळ ।
भक्त नागावल्लींदळ ॥
वैराग्य चूर्ण विमळ ।
लवंगा सत्क्रिया सकळ ॥ विडा. ॥ १ ॥
प्रेम रंगीत कात ।
वेला अष्टभावसहीत ॥
जायफळ क्रोधरहीत ।
पत्री सर्व भूतहीत ॥ विडा. ॥ २ ॥
खोबरें हेचि क्षमा ।
फोडुनि द्वैताच्या बदामा ।
मनोजय वर्ख हेमा ।
कापूर हे शांतिनामा ॥ विडा. ॥ ३ ॥
कस्तुरी निरहंकार ।
न मिळती हे उपचार ॥
भीमापौत्र यास्तव फार ।
सत्वर देई वारंवार ॥ विडा घेई. ॥ ४ ॥