१
आईच्या माघारी बाप न्हवं लेकराचा
तोडिला पानमळा, थारा उडाला पाखराचा
२
दोघांची एकशीण, तिथं प्रेमाला काय उणं
केवडयामंदी जाई लाविली हौशानं
३
सुरतेचं मोती, वेजांत बारीक
जातीच्या लेकराची करावी पारख
४
गर्वाच्या नारी, गर्वाचं घर खाली
लंकेच्या रावनाची वेवस्था काय झाली
५
कारलीचा वेल कडू लिंबर्यावर गेला
संगतीचा गुन झाला
६
धनसंपतेच्या नारी नको बोलूंस तोर्यानं
दिस येत्यात फेरान
७
जातीचा मोळक्या, त्यानं मोळीचं मोल केलं
चाफाचंदनाचं झाड ओळखू न्हाई आलं
८
जल्मा येऊनी फुका जल्म का जाळावा
लाविलेला ऊंस घान्यांत गाळावा
९
अस्तुरीपरायास राखेचा ढेबज्या !
तुळशीची सर काय करील सबज्या ?
१०
तरवड फुलली सोन्यापरीस सवाई
ल्येकाची ही सर काय करील जावाई ?
११
मायेच्यावांचून कशाचा मैत्रपणा
मिठाच्यावांचून रुचि न्हाई पकवाना
१२
संगत करूं नये पांगीर पळसाची
पाताळा जाते मुळी, मलयगिरी चंदनाची
१३
पोटीं न्हाई पुत्रफळ सुख न्हाई कामिनीला
पिकाच्यावांचून काय करावं जिमिनीला
१४
देन्याघेन्यानं न्हाई कुनाला सोडियेलं
चंदरासारख्याला ग्रहनानं वेढीयलं
१५
पडतो पाऊस पडतो टपाटपा
सुरूच्या झाडाखाली हुबं र्हाऊनी काय नफा
१६
माऊलीची माया शेजी कराया गेली
लटकी साखर शाळूच्या पाना आली !
१७
संपदेच्या नारी, नगं होऊंस उताणी
दुपारची सावली देखिली कितीकांनी
१८
जल्मामंदी जल्म केळीचा चांगला
आधी काप माझा गळा, मग हात लाव बाळा
१९
पिकला उंबर डोंगरी झाला मेवा
वांझे नारीला काय व्हावा ?
२०
मायबाप न्हाई तिनं माह्यारी जाऊं नये
उलगला बाजार, सुन्या पेठेला र्हाऊं नये
२१
चंदन बोलतो सहाणेबाई वेडी जाती
तुझीया संगतीनं देहाची झाली माती !
२२
वळीवाचा पाऊस कधी पडतो कधी न्हाई
सम्रताच्या मैत्रीची ही अशीच रीत बाई
२३
शेजीबाई नको लटकी माया लावूं
हिरव्या आंब्याचा रस काढूनी नको दाऊं
२४
संगत करावी, पाहून साहून
सोनं कसाला लावून
२५
भावाच्या राज्यावरी बहिणीची न्हाई सत्ता
अंबारीचा हत्ती भरल्या पेठेनं गेला रिता
२६
माउलीची माया सर्व्या बाळावरी
केळीबाईची साउली बत्तीस केळांवरी
२७
आईवांचून माया न्हाई, बहिणीवांचून जिव्हाळा
काय झुलव देतो, पान्यावाचून लव्हाळा ?
२८
पाऊसावांचून रान दिसंना हिरवं
माऊलीइतुकं कुनी बघेना बरवं