१
अहेव मरनाची मला हाई आवड
म्होरं पतीपुत्रं मागं कुकवाची कावड
२
अहेव मरनाची सयानु मोठी मौज
म्होरं चाले कंथ, माग गोताची फौज
३
अहेव मरन येवं असलपनांत
घ्याईला जागा तुळशीच्या बनामंदी
४
अहेव मरन, सोमवारी सवापारी
कंथ चांदवा देतो दारी
५
सरगाच्या वाटे हळदकुकवाचा सडा झाला
अहेव नारींचा गाडा गेला
६
अहेव मरन अंगनला देई शोभा
कृष्णाकडेला कंथ उभा
७
अहेव मरन भाग्याच्या नारी तुला
सोन्यारूपाची फुलं कंथ उधळीत गेला
८
अहेव मरन सोमवारी रातीयेचं
पानी कंथाच्या हातीयेचं
९
अहेव मरन येवं, पित्याच्या दारापुढे
बंधुला सांगते, सरलं माह्यार तुझ्याकडे
१०
अहेव मरणाची चिता जळे साउलीला
दु:ख आगळं माऊलीला