स्त्रीजीवन - तीर्थक्षेत्र

मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.


तीर्थक्षेत्र
पंढरीसी जाता
पंढरी पिवळी
आत मूर्त सावळी
विठ्ठलाची ॥१॥

पंढरपुरा जाऊ
भेटीला काय नेऊ
तुळशी बुक्क्याची
विठ्ठला प्रीत बहु ॥२॥

जाऊ गं पंढरी
उभी राहू ग भीवरी
तेणे मुक्ति चारी
येती हाती ॥३॥

पंढरीचा राणा
चला पाहायला जाऊ
संसारात होऊ
कृतकृत्य ॥४॥

पंढरपुरात
होतो नामाचा गजर
नादाने अंबर
कोंदतसे ॥५॥

पंढरपुरात
आषाढी कार्तिकी
सोहळा त्रिलोकी
असा नाही ॥६॥

पंढरपुरात
विण्याशी वीणा दाटे
साधूला संत भेटे
वाळवंटी ॥७॥

वीण्याला लागे वीणा
दिंडीला भेटे दिंडी
यात्रेला येती झुंडी
पंढरीस ॥८॥

टाळ - मृदुंगाचा
विठूच्या नामाचा
गजर पुण्याचा
पंढरीत ॥९॥

पंढरपुरीचा
घेऊन जाऊ बुक्का
संसारीच्या दुःखा
दूर करु ॥१०॥

पंढरपुरीच्या
घेऊन जाऊ लाह्या
येतील आया - बाया
त्यांना देऊ ॥११॥

पंढरपुरात
कसला गलबला
चंद्रभागे पूर आला
वाट नाही ॥१२॥

भरली चंद्रभागा
बुडाले हरिदास
पितांबराची घाली कास
पांडुरंग ॥१३॥

भरली चंद्रभागा
नाव निघाली बुडाया
नेला नारळ फोडाय
रखुमाईला ॥१४॥

भरली चंद्रभागा
लिंबू टाका उतार्‍याला
जाणे आहे सातार्‍याला
भाईरायाला ॥१५॥

भरली चंद्रभागा
उतार दे ग माये
पैलाड जाणे आहे
भाईरायाला ॥१६॥

भरली चंद्रभागा
पाणी करी सणासणा
भिजला टाळवीणा
विठ्ठलाचा ॥१७॥

भरली चंद्रभागा
पाणी लागले भिंतीला
चोळी वाळते खुंटीला
रखुमाईची ॥१८॥

पंढरपुरात
कसला गलबला
सत्यभामेने गोविंदाला
दान केले ॥१९॥

पंढरीसी जाता
पंढरी लाल लाल
पेरली मखमल
विठ्ठलाची ॥२०॥

पंढरीसी जाता
पंढरी हिरवीगार
तुळशीला आला भर
विठ्ठलाच्या ॥२१॥

पंढरीसी जाता
उभा राहील खांबाशी
चुडे मागेल देवाशी
विठठलाशी ॥२२॥

गुलाबाची फुले
रुपयाला बारा
हारतुरे गजरा करा
विठोबाला ॥२३॥

पंढरपुरात
माळिणी ठमा रमा
फुलांचा पायजमा
विठ्ठलाला ॥२४॥

पंढरपुरात
माळिणी उंच काठी
फुलांची चिंचपेटी
रखुमाईला ॥२५॥

माळ्याच्या मळ्यात
माळिणी गाणी गाती
पूजेला तुळशी नेती
विठ्ठलाच्या ॥२६॥

रुसली रखुमाई
बैसली वाळवंटी
धरिली मनगटी
विठ्ठलाने ॥२७॥

चला जाऊ पाहू
खिडकी उभ्या राहू
पालखी येते पाहू
विठ्ठलाची ॥२८॥

कोठे ग जातसा
जातसा लवलाही
विठ्ठल रखुमाई
पाहावया ॥२९॥

कोठे ग जातसा
जातसा लगबगा
भरली चंद्रभागा
बघावया ॥३०॥

पंढरपुरात
रखुमाई सुगरीण
पापड तिने केले
चंद्रासारखी घडावण ॥३१॥

पंढरपुरात
कशाचा वास येतो
कस्तुरीचे माप घेतो
भाईराया ॥३२॥

पंढरपुरात
काय मौज पाहायाची
हंडी फुटली दह्याची
गोकुळात ॥३३॥

पंढरपुरामध्ये
दुकाने गोळा केली
रथाला जागा दिली
विठ्ठालाच्या ॥३४॥

पंढरपुरात
काय बुक्क्याची धारण
पुसे बंगल्यावरुन
रखुमाबाई ॥३५॥

पंढरपूरची
होईन वेळणी
वाढीन साखरफेणी
विठठलाला ॥३६॥

पंढरपूरची
होईन परात
वाढीन साखरभात
विठ्ठलाला ॥३७॥

पंढरपुरीचा
होईन मी गडू
वाढीन ग लाडू
विठ्ठलाला ॥३८॥

पंढरपुरीची
होईन मी घार
तुपाची वाढीन धार
विठ्ठलाला ॥३९॥

पंढरपुरीचा
होईन कावळा
बैसेन राऊळास
विठ्ठलाच्या ॥४०॥

पंढरपुरीची
होईन पायरी
येता जाता हरी
पाय ठेवी ॥४१॥

पंढरपुरीचा
होईन खराटा
झाडीन चारी वाटा
विठ्ठलाच्या ॥४२॥

पंढरपुरीची
होईन पोफळी
सुपारी कोवळी
विठोबाला ॥४३॥

विठोबाला रात्र झाली
पंढरीच्या बाजारात
रुक्मिणी दरवाजात
वाट पाहे ॥४४॥

विठोबाला एकादशी
रखुमाई माडी चढे
तबका आणी पेढे
फराळाला ॥४५॥

विठोबा माझा बाप
रखुमाई माझी आई
मला पंढरीसी नेई
कृष्णाबाई ॥४६॥

विठोबा माझा बाप
रखुमाई माझी आई
बहीण चंद्रभागा
पुंडलीक माझा भाई ॥४७॥

मजला नाही कोणी
तुजला आहे रे माहीत
यावे गरुडासहित
पांडुरंगा ॥४८॥

माझ्या धावण्याला
कोण धावेल दूरचा
राजा पंढरपूरचा
पांडुरंग ॥४९॥

विठोबा माझा बाप
माहेर माझे करी
पिंजरेने ओटी भरी
रखुमाई ॥५०॥

विठोबा माझा बाप
रखुमाई माझी आई
त्या नगरीचे नाव काई
पंढरपूर ॥५१॥

पंढरीची वाट
कोण्या पाप्याने नांगरीली
गाडी बुक्क्यांची उधळली
विठ्ठलाची ॥५२॥

समुद्र आटला
मासा करपला
शेला झळकला
विठ्ठलाचा ॥५३॥

भाजी घ्या भाजी घ्या
भाजी घ्या माठाची
आली गवळण थाटाची
मथुरेची ॥५४॥

भाजी घ्या भाजी घ्या
भाजी घ्या मेथीची
आली गवळण प्रीतीची
द्वारकेची ॥५५॥

दही घ्या दही घ्या
दही घ्या गोड गोड
आली गवळण गोड
गोकुळीची ॥५६॥

चला जाऊ पाहू
कोल्हापुरी राहू
ओवियात गाऊ
अंबाबाई ॥५७॥

कोल्हापूर शहर
भोवती सोनार
घडवीत चंद्रहार
अंबाबाईचा ॥५८॥

कोल्हापूर शहर
भोवती तांबट
नवे घडवीत ताट
अंबाबाईला ॥५९॥

कोल्हापूर शहर
भोवती पटवेकरी
पटवीली गळेसरी
अंबाबाईची ॥६०॥

कोल्हापूर शहर
भोवती विणकरी
विणीती पीतांबर
अंबाबाईचा ॥६१॥

कोल्हापूर शहर
पाण्याच्या डबक्यात
फुलांच्या झुबक्यात
अंबाबाई ॥६२॥

कोल्हापूर शहर
विंचवाचे तळे
वस्ती केली तुझ्यामुळे
अंबाबाई ॥६३॥

कोल्हापूर शहर
दुरुन दिसे मनोहर
पाच शिखरे लहानथोर
अंबाबाईची ॥६४॥

येथून नमस्कार
महादरवाजासन्मुख
माझी विनंती आईक
अंबाबाई ॥६५॥

येथून नमस्कार
महादरवाजापासून
आली रथात बैसून
अंबाबाई ॥६६॥

कोल्हापूर शहरी
बुरुजा बुरुजा भांडी
वेशील्या पहिल्या तोंडी
अंबाबाई ॥६७॥

येथून नमस्कार
पुण्याच्या पर्वतीला
दुष्टांच्या संगतीला
लागू नये ॥६८॥

पर्वती पर्वती
सार्‍या पुण्याच्या वरती
हिराबागेची शेवंती
फुलूनी गेली ॥६९॥

पर्वती पर्वती
सार्‍या पुण्याच्या वरती
तेथून कृपा करिती
देवदेव ॥७०॥

पर्वती पर्वती
सार्‍या पुण्याच्या वरती
धरण बांधिले खाती
इंग्रजांनी ॥७१॥

पर्वती पर्वती
पर्वतीचा रमणा
दक्षिणा विद्वानांना
वाटतात ॥७२॥

पर्वती पर्वती
तिला कळस सोन्याचे
प्रिय दैवत पेशव्यांचे
नवे झाले ॥७३॥

येथून नमावी
पुण्याची चतुःशृंगी
दुष्टांच्या गं संगी
लागू नये ॥७४॥

चला जाऊ पाहू
तुळशीबागेचा सावळा
नित्य पोषाख पिवळा
रामरायाचा ॥७५॥

चला जाऊ पाहू
तुळशीवागेतला राम
जिवाला आराम
संसारात ॥७६॥

पुणे झाले जुने
वाईला बारा पेठा
सवाई झेंडा मोठा
कृष्णामाईचा ॥७७॥

काय सांगू बाई
वाई देशाची बढाई
तटाखालून कृष्णाबाई
वाहतसे ॥७८॥

काय सांगू बाई
वाई देशाची रचना
हिरे जडले सिंहासना
कृष्णाबाईच्या ॥७९॥

पुणे झाले जुने
सातारा नित्य नवा
जलमंदिराची हवा
चला घेऊ ॥८०॥

जाईन सातार्‍या
पाहीन सज्जनगड
चढण नाही अवघड
माणसाला ॥८१॥

जाईन सातार्‍या
पाहीन सज्जनगड
पाहीन कावड
कल्याणस्वामींची ॥८२॥

जाईन सातार्‍या
पाहीन माहुली
तेथे वाहते माउली
कृष्णाबाई ॥८३॥

जाईन सातार्‍या
माउली पाहीन आधी
तेथे ग कुत्र्याची
आहे पवित्र समाधी ॥८४॥

जाईन सातार्‍या
माहुली पाहीन
संगमी न्हाईन
कृष्णाबाईच्या ॥८५॥

जाईन सातार्‍या
मी माहुली पाहीन
देवी अहिल्याबाईने
मंदिर ठेविले बांधून ॥८६॥

जाईन सातार्‍या
पाहीन सज्जनगड
समर्थांची ग समाधी
पाहून तरती दगड ॥८७॥

पुण्याची थोरवी
सातार नुरवी
सर्वांना हारवी
कोल्हापूर ॥८८॥

आळंदीला शोभा
इंद्रायणीच्या पुलाने
समाधी घेतली
बारा वर्षांच्या मुलाने ॥८९॥

आळंदीला आहे
भिंत सामक्षेला
सांगते सर्वाला
गर्व नको ॥९०॥

आळंदीला जावे
जीवे जीवन्मुक्त व्हावे
तेथे श्री ज्ञानदेवे
दिव्य केले ॥९१॥

देहूला जाऊन
देह विसरावा
अंतरी स्मरावा
तुकाराम ॥९२॥

देहूला जाऊन
देह विसरु या
ओविया गाऊ या
तुकाराम ॥९३॥

देहूला राखीले
पाण्यात अभंग
अभंग भक्तिरंग
तुकोबांचा ॥९४॥

देहूचा अणुरेणु
गर्जे विठ्ठल विठ्ठल
लोकां उद्धरील
क्षणामाजी ॥९५॥

चिंचवड क्षेत्री
मोरया गोसावी
त्याची ओवी ओवी
विसरु नये ॥९६॥

आधी नमन करु
चिंचवडीच्या मोरया
सुरुच्या समया
तेवताती ॥९७॥

सहज मी उभी होत्ये
मनात ये कल्पना
नित्य जावे दर्शना
मोरयाच्या ॥९८॥

भार्गवराम देवाजीची
पायठणी अवघड
येथून पाया पड
गोपूबाळा ॥९९॥

वाजंत्री वाजती
बाणगंगेच्या धक्क्यावरी
परशुराम सख्यावरी
अभिषेक ॥१००॥

दिंडी दरवाजाने
भार्गवराम येतो जातो
शुक्रवारी वाजा होतो
चौघड्याचा ॥१०१॥

दिंडी दरवाजाने
भार्गवराम येतो जातो
नळ सोडून पाणी घेतो
संध्येसाठी ॥१०२॥

रेणुकामाईचा
भार्गवराम तान्हा
सभामंडपी पाळणा
बांधियेला ॥१०३॥

तिन्ही दिवांमध्ये
भार्गवराम उंच
सव्वाखंडी चिंच
उत्सवाला ॥१०४॥

तिन्ही देवांमध्ये
भार्गवराम काळा
त्याच्या गळा माळा
रुद्राक्षांच्या ॥१०५॥

तिन्ही देवांमध्ये
भार्गवराम जुना
सव्वा खंडी चुना
देवळाला ॥१०६॥

भार्गवराम देव
उभे रेड्यावरी
निळ्या घोड्यावरी
स्वार झाले ॥१०७॥

अक्षय तृतीयेला
उदकुंभ द्यावा
मनात स्मरावा
भार्गवराम ॥१०८॥

अक्षय तृतीयेला
जन्मले परशुराम
मातेला मारुनी
पुरवीती पितृकाम ॥१०९॥

एकवीस वेळा
निःक्षत्री केली धरणी
अदभुत वाटे करणी
परशुरामाची ॥११०॥

केशर कस्तुरी
बारा रुपये तोळा
श्रीमंत लावी टिळा
भार्गवराम ॥१११॥

कस्तुरीचा वास
माझ्या ओच्याला कुठूनी
आले सख्याला भेटूनी
भार्गवरामा ॥११२॥

देवांमध्ये देव
रामेश्वर अति काळा
त्याच्या दोंदावर
रुद्राक्षांच्या रुळती माळा ॥११३॥

दिवसांची दिवटी
तेथे एवढा कोण राजा
कुळस्वामी देव माझा
पालखीत ॥११४॥

शेवंती फुलली
नऊशे पाकळी
शाळुंका झाकली
सोमेश्वराची ॥११५॥

आठा दिवसांच्या शनिवारी
वाडी गावाला चारी वाटा
श्रीपाद स्वामी माझा
वाडी गावचा वैद्य मोठा ॥११६॥

संकटाच्या वेळे
कोणे गं पावला
नवसाला आला
दत्तात्रेय ॥११७॥

आठा दिशी आदितवार
नाही मजला कळला
देव भंडारा खेळला
जेजुरीचा ॥११८॥

खोबर्‍याच्या वाट्या
हळदी भरल्या
देव भंडारा खेळला
जेजुरीचा ॥११९॥

सिंहस्थी नाशिक
कन्यागती वाई
जो जो कोणी जाई
मुक्त होई ॥१२०॥

अलीकडे नाशिक
पलीकडे रामराजा
मधून ओघ तुझा
गोदाबाई ॥१२१॥

गंगाबाई आली
चौदा कुंडे ती वाहात
यात्रा येतसे धावत
राजापुरा ॥१२२॥

गंगाबाई आली
चौदा कुंडे ती भरुन
यात्रा येतसे दुरुन
राजापुरा ॥१२३॥

गंगाबाई आली
तळकातळ फोडून
राजापुराला वेढून
वस्ती झाली ॥१२४॥

आल्या गंगाबाई
वडाच्या बुंध्यातूनी
चौदाही कुंडांतूनी
प्रकटल्या ॥१२५॥

कोळथर्‍या कोळेश्वर
दाभोळे दाभोळेश्वर
पंचनदी सत्तेश्वर
ज्योतिर्लिंग ॥१२६॥

मुंबईची मुंबादेवी
तिची सोन्याची कंबर
निरी पडली शंभर
पैठणीची ॥१२७॥

मुंबईची मुंबाईदेवी
तिची सोन्याची पायरी
निरी पडली बाहेरी
पैठणीची ॥१२८॥

मुंबईची मुंबादेवी
तिची सोन्याची पाटली
सारी मुंबई बाटली
काय सांगू ! ॥१२९॥

मुंबईची मुंबादेवी
तिची सोन्याची पायरी
सव्वा लक्ष तारु
उभे कोटाच्या बाहेरी ॥१३०॥

मुंबई मुंबई
सारी मुंबई रांगडी
केरव्यावाचून
कोणी भरीना बांगडी ॥१३१॥

मुंबईच्या बायका
आहेत आळशी
नळ नेले चुलीपाशी
इंग्रजांनी ॥१३२॥

मुंबई शहरात
घरोघरी नळ
पाण्याचे केले खेळ
इंग्रजांनी ॥१३३॥

बडोदे शहरात
पाडिले जुने वाडे
मोठ्या गं रस्त्यांसाठी
नवे लोक झाले वेडे ॥१३४॥

राणीच्या हातींचा
राजा झाला गं पोपट
वाडे पाहून बडोद्या
रस्ते केले गं सपाट ॥१३५॥

बडोदे शहरात
वडांची थंड छाया
प्रजेवर करती माया
सयाजीराव ॥१३६॥

बडोदे शहरात
जो जो दिसे वाडा पडका
तो तो गं पाडून
केल्या लांब रुंद सडका ॥१३७॥

सयाजी महाराज
बडोद्याचे ग धनी
राज्यकर्ते अभिमानी
जनतेचे ॥१३८॥

बडोदे वाढले
रस्ते नि इमारती
डोळे दीपवीती
पाहणार्‍यांचे ॥१३९॥

पनस पाकळी
गुलाबाच्या फुला
लक्ष्मण झोला
पाहण्याजोगा ॥१४०॥

हरिद्वारची गंगा
अत्यंत पवित्र
तिने माझी गात्रं
शुद्ध केली ॥१४१॥

पवित्र गं स्नान
शरयूचे काठी
माकडांची दाटी
तेथे फार ॥१४२॥

भक्तजन जातो
मणिकर्णिकेचे काठी
देऊळात दाटी
विश्वनाथाच्या ॥१४३॥

विष्णुला आवडे
तुळशीचे पान
त्रिवेणी संगम
पाहियेला ॥१४४॥

गुलाबाचे फूल
गणपतीला आवडे
गंगेची कावड
रामेश्वराला ॥१४५॥

येथून नमस्कार
पुण्यापासून कलकत्त्याला
मोती तुमच्या अडकित्त्याला
मामाराय ॥१४६॥

समुद्राच्या काठी
कोकण वसले
सुखाने हासले
नारळीत ॥१४७॥

समुद्राच्या काठी
कोकण वसले
कृष्ण अर्जुन
बैसले रथावरी ॥१४८॥

कोकणपट्टीचा
रत्नागिरी जिल्हा
जळी स्थळी किल्ला
पहारा करी ॥१४९॥

पंढरीचा देव
अमळनेरा आला
भक्तीला लुब्ध झाला
पांडुरंग ॥१५०॥

कड्यावरचा गणपती
मूर्ती आहे मोठी
नित्ये चढे घाटी
मामाराया ॥१५१॥

सोमेश्वर देवाजीच्या
पाटांगणी चिरा
लोटांगण घेतो हिरा
गोपूबाळ ॥१५२॥

झोळाई मातेचा
आधी घ्यावा कौल
मग टाकावे पाऊल
प्रवासाला ॥१५३॥

पालगड गावाची
किती आहे लांबी रुंदी
स्वयंभू आहे पिंडी
शंकराची ॥१५४॥

देव देव्हार्‍यात
गणपती गाभार्‍यात
पालगड गावीचा
सोमेश्वर डोंगरात ॥१५५॥

पालगड गावाला
दूरवांचे बन
उत्तम देवस्थान
गणपतीचे ॥१५६॥

काय सांगू बाई
पालगडची हवा
गणपतीला मुकुट नवा
उत्सवात ॥१५७॥

हळदीची वाटी
झोळाईचे हाती
पालगड गावची घाटी
उतरली ॥१५८॥

काळकाई महामाई
या दोघी गं गावात
तिसरी डोंगरात
झोळाई माता ॥१५९॥

झोळाई मातेपुढे
फुलली तगर
पालगड नगर
शोभिवंत ॥१६०॥

माझे दारावरनं
कोण गेली सवाशीण
पालगड गावची मोकाशीण
झोळाई माता ॥१६१॥

रामटेक गडावरी
कर्णा वाजे झाईझाई
रामाला सिताबाई
विडा देई ॥१६२॥

खांदेरी उंदेरी
या दोघी जावा जावा
मध्ये ग कुलाबा
हवा घेई ॥१६३॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:31.4200000