स्त्रीजीवन - संकीर्ण
मुलाला पाळण्यात हलवताना, जात्यावर दळण दळताना, झोपाळ्यावर झोके घेताना स्त्रियांना ओव्या, गाणी आपोआप स्फुरतात, त्यातीलच काही ओव्यांचा हा संग्रह.
मेहुण मला हवे
आवडीची दोघे
पुढे कंथ तू मागे
रखुमाई ॥१॥
मेहुण मला हवे
राधा - दामोदर
भवानी - शंकर
चौघे यावी ॥२॥
लांब लांब केस
विठोबा तेलंग्याचे
चारी खूर पलंगाचे
झाकीयेले ॥३॥
आम्ही सहा जणी
सहा गावीच्या खारका
मध्ये नांदते द्वारका
तुळसदेवी ॥४॥
आम्ही चौघी जणी
चार बाजूंचे कळस
मध्ये शोभते तुळस
मायबाई ॥५॥
अंगाईचे घरी
मंगाई राखण
सवंगाईचे दुकान
रस्त्यावरी ॥६॥
बोरीबंदरावर
मड्डम खाते पेरु
आगीनगाडी केली सुरु
इंग्रजांनी ॥७॥
बोरीबंदरावर
मड्डम खाते केळ
आगीनगाडीची झाली वेळ
रुळावरी ॥८॥
बोरीबंदरावर
मड्ड्म खाते संत्र
आगीनगाडीचे मोडले यंत्र
रुळावरी ॥९॥
बोरीबंदरावर
मड्डम खाते काकडी
आगीनगाडी झाली वाकडी
रुळावरी ॥१०॥
बोरीबंदरावर
मड्डम खाते बिस्कुट
आगीनगाडीचे फिरले मुस्कुट
रुळावरी ॥११॥
बोरीबंदरावर
मड्डम पीते चहा
आगीनगाडी आली पाहा
रुळावरी ॥१२॥
आगीनगाडी बिगीनगाडी
गाडीला डबे डबे
बैलावीण चाल निघे
रुळावरी ॥१३॥
तारु लागले बंदरा
भाईरायांना गं सांगा
वेलदोडे लवंगा
स्वस्त झाल्या ॥१४॥
सरळे दळण
उरला एक दाणा
गोकुळी कृष्णराणा
यश्वदेचा ॥१५॥
सरले दळण
राहिले सुपाकोनी
विठ्ठल - रखुमाई
गाइली रत्ने दोन्ही ॥१६॥
सरले दळण
सरले म्हणू नये
सासर माहेर
नांदते माझे सये ॥१७॥
सरले दळण
सरत्या पुरत्या गंगा
येथून नमस्कार
काशीच्या ज्योतिर्लिंगा ॥१८॥
सरले दळण
मी आणिक घेणार
बैल कोटीचे येणार
विठ्ठलाचे ॥१९॥
सरले दळण
पुन्हा घेतले पायली
लक्ष तुळस वाहिली
विठ्ठलाला ॥२०॥
सरले दळण
दळून दमलीस
सीतेलाही होई
संसारी वनवास ॥२१॥
सरले दळण
घालू शेवटचा घास
असाच हात लावी
शेजी तुझी मला आस ॥२२॥
सरले दळण
राहिला राइरा
विठ्ठल सोयरा
पंढरीचा ॥२३॥
दळण मी दळी
पीठ आले मोदकाचे
जेवण वैदिकांचे
पांडुरंग ॥२४॥
दळण दळत्ये
उरला चाराचुरा
मोत्याचा लावू तुरा
विठ्ठलाला ॥२५॥
दळळ दळत्ये
दळत्ये रवा पिठी
पाहुणे जगजेठी
पांडुरंग ॥२६॥
भुकेला ब्राह्मण
सांगते ऐक खूण
माडीवरी वृंदावन
तुळशीचे ॥२७॥
भुकेला ब्राह्मण
पोटाला हात लावी
दुरुन घर दावी
भाईरायाचे ॥२८॥
भुकेला ब्राह्मण
कोरण मागतो डाळीचे
घर लेकुरवाळीचे
उषाताईचे ॥२९॥
काशीस मी गेल्ये
काशीकर झाल्ये
कागद धाडीयेले
गावोगाव ॥३०॥
देवा मी दुबळी
नेसेन धाबळी
येईन राऊळी
तिन्ही सांजा ॥३१॥
देवा मी दुबळी
वारियाने जाते
आधार तुझा घेते
पांडुरंगा ॥३२॥
झोळाईला पातळ
सोमजाईला झुण्णा
या दोघी सास्वासुना
वावरती ॥३३॥
वाटवरला आंबा
मोहराने डुले
कौलाने बोले
जोगेश्वरी ॥३४॥
नणंदा वन्संबाई
आपुला मान घ्यावा
मला आशीर्वाद द्यावा
चुडेयांना ॥३५॥
चैत्र मासीच्या
रांगोळ्या प्रकारांच्या
नणंदा झणकार्याच्या
उषाताईच्या ॥३६॥
माझ्या धावण्याला
तुम्ही धावा जगजेठी
द्रौपदीबाई मोठी
मी तो बहीण धाकुटी ॥३७॥
माझ्या धावण्याला
तुम्ही धावा चक्रपाणी
तुमच्यावरुन
माझा देह ओवाळणी ॥३८॥
दुरुन दिसते
तातोबाची माडी लाल
सीताबाई बाळंतीण
शालीचे दिले पाल ॥३९॥
वाजंत्री वाजती
नदीच्या तीरावरी
देवा महादेवावरी
अभिषेक ॥४०॥
काळी कपिला गाय
दुधाला अधिक
त्याचा तुला अभिषेक
महादेवा ॥४१॥
गाव बिघडला
झाले सारे गुंड
कोपेल वक्रतुंड
गजानन ॥४२॥
गाव बिघडला
झाले सारे व्यभिचारी
कोपेल ब्रह्मचारी
मारुतीराय ॥४३॥
गाव बिघडला
सत्याची नाही चाड
कोपेल गोविंद
श्रीगीतेचा ॥४४॥
गाव बिघडला
सत्याला नाही मान
कोपेल भगवान
शेषशायी ॥४५॥
गाव बिघडला
जसे कावळे भांडती
कोपेल लक्ष्मीपती
नारायण ॥४६॥
गाव बिघडला
गावाची गेली शोभा
मोठमोठे लोक लोभा
गुंतताती ॥४७॥
गाव बिघडला
मानिना कोणी कोणा
जो तो म्हणे मी शहाणा
सभेमाजी ॥४८॥
माझ्या घरी गं पाहुणा
पाहुणा नव्हे बाई
नणंदा वन्संबाई
पती तुमचे ॥४९॥
पहाटेच्या प्रहररात्री
कोण राणी ओव्य गाते
पुत्राला निजविते
उषाताई ॥५०॥
पहाटेच्या प्रहररात्री
कोंबडा आरवला
गोसावी फेरी आला
दत्तात्रेय ॥५१॥
पहाटेच्या प्रहररात्री
कर्णा वाजतो काशाचा
महालक्ष्मी मातेचा
रथ फिरे ॥५२॥
पहाटेच्या प्रहररात्री
कर्णा वाजतो मंजुळ
दह्यादुधाची आंघोळ
विठ्ठलाची ॥५३॥
पहाटेच्या प्रहररात्री
कर्णा वाजतो झाईझाई
रामरायाच्या स्नानाला
जागे व्हावे गंगाबाई ॥५४॥
पहाटेच्या प्रहररात्री
कर्णा वाजतो काचेचा
महालक्ष्मी मातेचा
रथ फिरे ॥५५॥
तिन्हीसांजा झाल्या
उंबर्याला रक्षा
जोगिणीला भिक्षा
घालू नये ॥५६॥
तिन्हीसांजा झाल्या
उंबर्याला कणा
जोगिणीला दाणा
घालू नये ॥५७॥
तिन्हीसांजा झाल्या
उंबर्याला कणा
जोगिणीला दाणा
घालू नये ॥५८॥
लांबून दिसली
मला वाटे माझी आई
भेटायास आली
चुलत काकूबाई ॥५९॥
आपण गूज बोलू
डाळिंबीखालती
मी लेक तू चुलती
मायेपरी ॥६०॥
आपण गुज बोलू
कशाला हवी शेजी
गुजाजोगी आहे माझी
काकूबाई ॥६१॥
जाते कुरुंदाचे
खुंटा आवळीचा
गळा माझ्या सावळीचा
आहे गोड ॥६२॥
जाते कुरुंदाचे
खुंटा पाषाणाचा
वर हात कांकणाचा
उषाताईचा ॥६३॥
जातियाचे तोंड
जशी खोबर्याची वाटी
याचा कारागीर
नांदतो बालेघाटी ॥६४॥
वेदशाळेमध्ये
पाहिले कावळे
धैर्य ते मावळे
बाप्पाजींचे ॥६५॥
गणपतीला नैवेद्य
बदामाचा शिरा
पालगडगावचा हिरा
पंढरीबाळ ॥६६॥
गोरी बाळंतीण
उन्हाळ्यात झाली
काचेची माडी केली
शंकरांनी ॥६७॥
बाळपट्टी खण
पट्टीला चवल
शिंपी करतो नवल
चोळीयेचे ॥६८॥
हल्लींच्या मुलींना
काम नको डोळ्यांपुढे
लक्ष सदा लिहिण्याकडे
उषाताईचे ॥६९॥
मला हौस मोठी
वाकड्या भांगाची
भाळी टिकली कुंकवाची
तिळाएवढी ॥७०॥
देव देवळात
कृष्ण कमळात
भानू आभाळात
चंद्रसूर्य ॥७१॥
दिवस गेला कामाखाली
रात्र झाली आनंदाची
पोथी वाचली गोविंदाची
दादारायांनी ॥७२॥
संकष्ट चतुर्थी
माझा आहे नेम
भाचा सांगेन ब्राह्मण
गोपूबाळ ॥७३॥
हल्लीच्या बायका
चकरे घालिती
वर फूल ते रोविती
शेवंतीचे ॥७४॥
शंकराला बेल
विष्णुला तुळस
दवडा आळस
सर्वजण ॥७५॥
सूर्योदयापूर्वी
करी प्रातःस्नान
जाईल सारा शीण
गोपूबाळा ॥७६॥
सूर्योदयापूर्वी
करी प्रातःस्नान
कर रामनाम
मंत्र जप ॥७७॥
समईत घाली
उषाताई तेलवात
करी सांजवात
देवापाशी ॥७८॥
चांदीचे ताटात
नैवेद्य आणिला
डोळे भरुन पाहिला
वनमाळी ॥७९॥
तांब्याच्या टोपात
उडदाचे वरण
एकादशीस मरण
मज यावे ॥८०॥
आठा दिशी सोमवार
शिवण झाले बंद
कशिद्याचा तुला छंद
उषाताई ॥८१॥
पहाटेच्या प्रहररात्री
घुमघुम डेरा वाजे
कृष्णा ने गं राधे
गोकुळात ॥८२॥
घड्याळ पाहता
वाजलेले तीन
वहिनी उठून
चहा करी ॥८३॥
वन्संबाईंना ती वेणी
जाऊबाईंना तो खण
हलव्याला दिली गोण
जावयाला ॥८४॥
भाऊ माझा एक
भावजया किती
सोळा सहस्र गोपी
भुलविल्या ॥८५॥
मामाराया घर बांधी
सुतारांना दिल्या मिरच्या
घरात आल्या टेबल खुर्च्या
मामारायांच्या ॥८६॥
माझ्या ओटीवर
कागदांचा केर झाला
लिहिणार कोठे गेला
गोपूबाळ ॥८७॥
माझ्या दारावरनं
दुर्वांच्या पाट्या जाती
आजोबांची भक्ती मोठी
गणपतीची ॥८८॥
माझ्या दारावरनं
बेलाच्या पाट्या जाती
शिवाची भक्ती मोठी
बाप्पाजींना ॥८९॥
कुंकू मी करीन
भरीन खिशात
धाडीन देशात
ताईबाईला ॥९०॥
कुंकू मी वाटीन
भरीन करंडा
धाडीन नणंदा
वन्संबाईना ॥९१॥
कुंकू मी वाटीन
भरीन कचोळा
धाडीन आजोळा
मामीबाईला ॥९२॥
कुंकू मी वाटीन
भरीन बोगणी
धाडीन बहिणी
अक्काबाईला ॥९३॥
जाईच्या फुलांचा
वास येतसे सुंदर
रामरायाचे मंदिर
वाटेवरी ॥९४॥
आधी नमन करु
चिंचेच्या पानावरी
विष्णुच्या कानावरी
गोष्टी गेल्या ॥९५॥
वर्हाडयात वर्हाडी
गोपूबाळ हा नटवा
मिरवी खांकेस बटवा
सुपारीचा ॥९६॥
वर्हाडयात वर्हाडी
गोपूबाळाची हुशारी
लग्नी अच्छेर सुपारी
पुरविली ॥९७॥
अत्तरदाणी गुलाबदाणी
या दोघी गं सवती
दोघींचा एक पती
चौफुला तो ॥९८॥
अत्तरदाणी गुलाबदाणी
काचेचा हिरवा पेला
पाण्यात बंगल केला
इंग्रजांनी ॥९९॥
अत्तरदाणी गुलाबदाणी
पाचूपेट्या पिंगारदाणी
आहे हौशी तुझी राणी
गोपूबाळ ॥१००॥
समुद्राचे काठी
दर्भांचे आसन
तेथे तुमचे संध्यास्नान
काकाराया ॥१०१॥
काय सांगू सखे
आंबा पिकलासे टिक्षी
येतील गरुडपक्षी
घेऊन जाती ॥१०२॥
काय सांगू सखे
आंबा पिकला डहाळी
नेतील गरुडमाळी
वेळ होता ॥१०३॥
समुद्राच्या काठी
कुवारल्यांची दाटी
परकर - चोळ्या वाटी
अक्काबाई ॥१०४॥
कुंकवाचा पुडा
अक्काबाईला सापडला
आयुष्याचा लाभ झाला
तिच्या कंथा ॥१०५॥
देवांचा देव्हारा
फुलांनी सजविला
मंत्रांनी पुजींला
बाप्पारायांनी ॥१०६॥
हरिश्चंद्र राजा
तारामती राणी
डोंबाघरी पाणी
भरताती ॥१०७॥
व्याह्यांच्या पंगतीला
केला साखरभात
मुदळ्याजोगा हात
वैनीबाईचा ॥१०८॥
वैनीबाई सुगरिणी
तुझा हिंग करपला
कचेरीस वास गेला
भाईरायाच्या ॥१०९॥
नाकीची गं नथ
पडली घंगाळात
मैना गुंतली संसारात
वैनीबाई ॥११०॥
दुपार संपली
झाली संध्याकाळ
हाती घेती जपमाळ
जपावया ॥१११॥
माझ्या घरी गं पाहुणे
दत्तात्रेयस्वामी आले
पादुका विसरले
पंचवटी ॥११२॥
माझ्या घरी ग पाहुणे
दत्तात्रेय दिगंबर
चंदने देवघर
सारविले ॥११३॥
पंचवटीमध्ये
पिवळे झाड केतकीचे
रामापरीस सीतेचे
गोरेपण ॥११४॥
ब्राह्मणाच्या मुली
तुला कामाचा कंटाळा
कुंकवाची चिरी
तुझ्या पारोशा कपाळा ॥११५॥
माझे अंगणात भात
भात मोजिला खंडी खंडी
लुगडे घेती रेवदंडी
काकाराया ॥११६॥
नागोबा माझी बाप
नागिन माझी आई
लांडे पुच्छ माझे भाई
सुखी राहो ॥११७॥
नागिन गं बाई
तुझा नागोबा कोठे गेला
गारुड्याने नेला
खेळावया ॥११८॥
देवाचा देव्हारा
त्याला आत्म्याचे कुलूप
हिंदुस्तानात मुलूख
भाईरायाचा ॥११९॥
मुंबई मद्रास
मागे पुढे तास
किती वाजले तपास
गोपूबाळा ॥१२०॥
झोपाळ्यावर बसू
म्हणू ओव्यापरी
गंमत खरोखरी
होई किती ॥१२१॥
झोपाळ्या रे दादा
तुला सदैव लांबवू
गोड गोड ओव्या गाऊ
तुझ्यावर ॥१२२॥
झोपाळ्या रे दादा
मुलांना आवडसी
मागेपुढे नाचतोसी
आनंदोनी ॥१२३॥
झोपाळ्या रे दादा
आम्हाला तुझा लळा
चैन पडेना बाळाला
तुझ्यावीण ॥१२४॥
झोपाळा बांधीला
ओसरी माजघरी
खेळती त्याच्यावर
मुलेबाळे ॥१२५॥
झोपाळ्यावर बसू
झोपाळ्याचा नाडा
चिरेबंदी वाडा
मामंजीचा ॥१२६॥
झोपाळा तुटला
आम्ही बसू कशावरती
दुसरा बांधा दारी
बाप्पाराया ॥१२७॥
झोपाळा चंदनाचा
त्याला पाचूचे दिले पाणी
गंजिफा खेळे राणी
गोपूबाळाची ॥१२८॥
झोपाळ्या रे दादा
हेलपट्टे खाशी
आम्हाला आज्ञापीशी
उठावया ॥१२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP