रम्य संध्येसम बालपल्लवांनी
मधुस्यंदी माकंदमंजरीम्नी
गुंफिलेल्या एकान्त निकुंजात
कूजनप्रिय रमतात खगव्रात !
मंद विचरे मधुमत्त गंधवात,
शान्ति विश्रमली ज्या स्थली नितान्त,
चाल कुंजी त्या; गूढ इंगिताला
कथिन तुज मी अव्यंग शुभांगीला.
दिशा उत्कंठित अंबर प्रसन्न,
उदय पावे शशिबिंब रसक्लिन्न;
रूप पाहुनि हे सृष्टिसूंदरीचे
स्तब्ध झाले चांचल्य निसर्गाचे
दिव्यगंगातीरस्थ वल्लरीला
मुकुल आले त्या एक निर्मलेला;
वाहुनी ते मद्भाग्यगंधवाहे.
दिले येथे आणून वाटताहे.
अपार्थिव जे संगूढ भाव चित्ती
व्यक्त संज्ञेने मात्र करू येती;
स्पष्ट करिता ते बळे, सर्व जाते-
कान्ति, मार्दव, सौरस्य त्यातले ते !
ओढ तत्रापि स्तब्ध बसू दे ना,
समुत्सुक मन संकल्प करी नाना,
भ्रमति ऐक्या विशयीच ते क्रमाने
रत्नसानु-ग्रहमालिकांप्रमाणे !
होय खळबळ जी अंतरी मदीय,
भ्रमणवेगाची तीव्रता तदीय
स्पंद ह्रदयाचे स्तब्ध निकुंजात,
काहिबाही करितील तुला ज्ञात !
कुंज आधी सम्मोहनीय भारी,
वरी रमणीसहवास मनोहारी !
भ्रान्त होउनि बरळेन जरी काही
दोष माझा तिळमात्र त्यात नाही !
नभी दोषाकर हा पहा उदेला,
भ्रंश मनुजाच्या पाडितो मनाला;
गोड इंदूचा आणि पिसाटाचा
सिद्ध आहे संबंध अनादीचा !