पूर्वेला स्पर्शुनि शशि अस्तंगत झाला,
उदरस्थ बिंब तदनंतर ये उदयाला.
पाहता पुत्रमुख अश्रु तिचे ओघळले.
हिम होउनि होते ते सृष्टीवर पडले.
व्योमस्थ दृश्यसाम्य ते तदा महिवरले
पाहिले; नष्ट शैशवस्मरण टवटवले.
निष्कलंक मुख, विस्तीर्ण भाळ तेजाळ,
तनुवर्ण धवल, करुणालय नयन रसाळ.
ती मातृदेवता उंच समोर करात
शिशु धरूनि होती तन्मुखदृक्सुख पीत.
या निखळ सुखाचा सहकारी प्रेमाचा
तो होता तिजला अंतरला जन्माचा.
दामिनीदामसम दारुणतर ते स्मरण
हदरवी स्फुरुनिया तदीय अंतःकरण.
ह्रदयाच्या दिसला खोल कपारी आत
शून्याचा अंधुक देश अपार अनंत;
दुःखाचा अन्तःप्रवाह वाहत होता,
ओलावा त्याचा स्फोट मुखी हो करिता.
पूर्णस्थ बिंदु म्रुदु गंधवाह हलवोनी
दो बिंदूंचे करि एकजीव मिळवोनी;
या विश्वकदंबी तेवि मातृबिंदूते
शिशुबिंदु मिळे जगदंबदयामृतवाते
आरक्तरेणुरविहास्य उधळले तिकडे,
ते उदित बालसुमहास्यपरागहि इकडे.
ते बालभानुपदलास्य नभावर चाले,
ते मातृह्रदावर चंचल शिशुपदचाळे.
पाहता प्रभाती बालजगा वर खाली
कृष्णस्मृति संपुनि मातृमुखी ये लाली,
सद्गदित ह्रदय तद्गात्रांसह थरथरले,
नेत्रातुनि अविरत वात्सल्याश्रु गळाले;
वात्सल्य दिसे ते बहुविध विश्वविकासी,
ते विश्वात्म्याचे विमल हास्य अविनाशी,
ते स्वार्थसमर्पण धन्य परार्थासाठी
प्रत्यक्ष निर्मिते स्वर्ग धरेच्या पाठी.