भंगता दीप तेजाची मृत्तिकेत कलिका नमते.
देवेंद्रचापचारुश्री, विखरता मेघ, ओसरते.
विच्छिन्नतंतुवीणेची श्रुतिरम्यरवस्मृति नुरते.
प्रस्फुट प्रीति नंतर ती, उद्गारमाधुरी सरते.
नष्टता दीप वीणा ती
सुप्रभा न सुस्वर उरती,
निर्मिती न अंतःस्फुरणे, संपता प्रणय, गीताते !
रागोर्मिरक्तचित्ताचे मग मधुर काव्य ते कुठले ?
नैराश्यजन्य नादांचे चिर निलय ह्रदय ते बनले.
उध्वस्तसदनशालेच्या रंध्रांत वायु जणु बोले !
सागरी निमाले कोणी,
त्यावरी घोर घोषांनी
जणु आक्रंदन वीचींनी मांडिले विकलचित्ते ते
ह्रदयांचे मेलन होता पाखरू नव-प्रीतीचे
त्यागिते प्रथम त्यामधले कोटर प्रबलबंधांचे;
अबलांतरि वसते घाले सोसाया पूर्वस्मृतिचे.
बा प्रणया ! भंगुर सगळे
वस्तुजात म्हणसी इथले,
का क्षीण सदन मग रुचले स्वोद्भवस्थितिप्रलयाते ?
तुज विकार आता ह्रदया ! आंदोलन देतिल खासे,
शैलाग्रकोटरी गृध्रा हालवी प्रभंजन जैसे.
तुज हसेल तीव्र प्रज्ञा अभ्रांत जसा रवि हासे
तव तुंग नीड ते कुजता,
कोसळूनि आश्रय नुरता,
हिम पडता, पल्लव झडता, उपहासित होशिल पुरते !