चांदरात पसरिते पांढरी माया धरणीवरी;
लागली ओढ कशी अन्तरीं !
हा तालतरू गंभीर शांतता धरी ;
लेवुनी सुधेचे वल्कल अंगी शिरीं,
कुणि शुचिर्भुत मुनि तपा जणूं आचरी !
केंस पिंजुनी उभी निश्चला कोणी वेडीपिशी,
भासते छाया काळी तशी !
जलवलयांचे तरल रूपेरी नूपुर पदि बांधुनी,
खळखळ्त गुंग झरा नर्तनी .
पाण्ढरा पारवा हूं हूं कोठें करी,
क्षण मंद वायुनें लता हले कांपरी,
जणु शांतताच ही नि:श्व्सनाते करी,
लपत छपत विधुकरण खेळ्ती हिरव्या पानांवरी;
लागली ओढ कशी अन्तरीं !
निळ्या , तांबड्या , हिरवट,पिवळ्या तेजाची सांडणी,
करितसे व्याधाची चांद्णी .
बेफाम पसरितें पंख हृदय-पाखंरू,
उडुनिया पाहते अनंत अंबर भरू !
या इवल्या देहीं कसें तया आवरू !
चैन पडेना काय करू - ही आग लागली उरीं'
लागली ओढ कशी अन्तरी !