पाडवा उगवला नवा पुन्हा सौख्याचा;
हा काळ कल्पिला कालोदधिभरतीचा.
हे कालसागरा कालरात्रिच्या उदरीं
जी जनन पावली लाट निघे बाहेरी.
नव लाट बघाया थाट भूमि ही करुनी
कशि उभी सजुनिया नव पल्लविं नव सुमनीं !
आव्हान कराया गान मुदित ही वाटे
शतपक्षिमुखांनीं स्वागत करि तुज लाटे !
किति मंद शीत सौगंध श्वास ही वितरी !
जणुं उरावरुनि कुणि ओझें हीच्या उतरी.
दुष्काळ, प्लेग विक्राळ नक्र घेवोनी
किति आल्या लाटेवरि लाटा आदळुनी !
नच दया स्पर्शली तयां, आजवरि बाळें
किति अनाथ गिळलीं ! ह्र्दय यामुळें पोळे.
गांजली, किती भाजली, साश्रु नयनांहीं
आशाळुपणानें दीनवाणि तुज पाही.
गतलाटजननिंही थाट यापरी केला,
परि नायनाट आशेचा शेवटिं झाला.
आंतला, कडाडुनि शिला, उकाळा फुटुनी
ये दावानलि कधिं आस तशी तव जननीं.
ही आस कीं स्वतनयांस सुखद तूं खास
होशील म्हणुनि हा ह्रदयिं पुन्हा उल्हास.
परि उरीं काय तूं तरी घेउनी येशी
हें सांग सांग या शीघ्र दीन भूमीशीं.
ग्रह नऊ काय गे खाउ धाडिती आम्हां
हें सांग शीघ्र आईस; गाउं तव नामा !
अति कष्टि तृषाकुल सृष्टि, वृष्टि देवोनी
धनधान्य धाडिलें काय सांग गे त्यांनीं ?
ग्रह शनी कुपित आजुनी अम्हांवरि काय ?
हें ऊर फाटतें, धाय मोकली माय !
सस्नेह बंधु तो होय अतां तरि काय ?
धाडिले गदार्तां काय अम्हां आरोग्य ?
गृहकलह टाळुनी स्नेह आणिला का गे ?
ही त्रस्त कारट्यांमुळें भूमि, तिज सांगें.
का दया बंधुह्रदयिं या दीन भगिनींना
आणिली काय गे सांगे भूमिला दीना.
कवि नवे अम्हांला हवे, आणिले काय ?
टेनिसन् आणिला ? अमर करिल तव नांव.