वदन मदनरंगसदन हें त्वदीय सुंदरी
नयन रंगभूमि तिथे नटत तो नटापरी.
पापण्याचि पट नटवर नर्तनपतु करुनि दुरी,
नवरस तो नर्ति तिथे थक्क तो मला करी !
विविध तो करी विलास भुषवोनि त्या करीं;
कधिं रुसेहि; कधिं हासे, स्तब्धता कधीं धरी,
मृदुल किरण सोडी कधिं बाण कधिं अम्हांवरी.
कधिं गुलाल तो झोकी, विनोद या परी करी,
अमृतधार कधिं वर्षी, अश्रुधार कधिं धरी.
होतां विधि-नभ घनयुत, तिमिर वर्षतां परी
वितरि विमल तेज; कळे योग्यता तदा खरी !