घटोत्कच-माया पसरली हिंददेशीं या
"जुनें जुनें तें सर्वहि द्या द्या,
नवें नवें तें पाहुनि घ्या घ्या,
आलें दुरुनी चालुनि बुद्ध्या
तुम्हां सुखवाया निरभिलाष झिजवी काया
जुनें जुनें तें सर्वहि द्या द्या,
द्या द्या कुजक्या गिर्द्या, गाद्या;
काढा कचरा, सार्या चिंध्या;
कागद घ्या, या तुळतुळित साफ पाहुनिया.
हाडें आणिक कातडिं द्या द्या,
चाकू, बटन, फण्या हीं घ्या घ्या !
जिनें, पाकिटें, बूटहि, वाद्या,
किती सुंदर या झकझकीत वस्तू सार्या !
कापुस, लोकर यांचे भारे
काढा देशांतुनिया सारे,
द्या द्या आणा हें पोतेरें,
तनू सजवाया शेले आणि शालु घ्या या.
वस्त्रें देशी जाडीं भरडीं
जैशी बुरडाघरची परडी,
रुतती कांट्यापरि अति हाडीं.
शिणवितां माया कां सुंदर कोमल काया ?
काठीला बांधोनी सोनें
काशीहुनि रामेश्वरिं जाणें,
शस्त्रें भार ! शिरीं कां घेणे ?
कां हो वाया धडपडतां तनु झिजवाया ?"
मंत्रे या साखर पेरोनी
नजरबंदिची करुनी करणी
गारुडिणी ही वेड लावुनी
नागवी सार्यां, राहुं दे न अन्नहि खाया.
घाली ऐसें मोहिनि-अस्त्र,
घोरूं दिवसां अम्हि सर्वत्र,
जाणुनि उमजुनि निजतों; चित्र
काय याहुनिया ? ये कोण जागृती द्याला ?
आलस्यीं अम्ही झालों चूर,
चढला डोळ्यांवरती धूर,
माजे देशभरी काहूर,
नेत्र फिरवुनिया कोणास सवड पाहाया ?
ऐशी वेतालिनिची स्वारी
माजविते थयथयाट भारी;
सह अक्काबाईची फेरी;
विकट करि हास्या निज अस्त्र विजयि पाहुनिया
लाभ कोणता येथे रडुनी ?
कोण ऐकतो कान देउनी ?
वाग्देवी गे, बसलित रुसुनी
कोणत्या ठायां ? धावुनि ये स्वगृहीं समया !