हे मुरड नेत्र रागांत किं अनुरागांत;
घे, पीळ, पाळ हें ह्रदय तुझ्या हातांत.
पिळतील तरी ते नवनीताचे गोळे,
पाळतिल तरिहि तेजाळ विशाळचि डोळे !
मउ फूल झोकिलें काय वाहिलें काय,
सुख सारखेंच; ये अधिक काय वा जाय ?
प्रेमांत तुझ्या गे अधिक उणें तें काय ?
संपूर्ण, त्यामधें नाहीं तरतमभाव.
सळ येणें, खुलणें नेत्रें वर वर भिन्न,
तरि रंग खरोखर एक लाल आंतून.
मन आंतलेंच तें आंत नीट बघणार,
वर दाव राग-अनुराग, काय होणार ?
जरि पिळणें रुचतें पीळ पीळ मुरडोन;
जरि करीन हूं चूं हराम तरि मज जाण.
पाळण्यास डोळे फिरव गरगरा प्रेमीं,
सुख तुला ज्यामधें सुखी तयांतच गे मी.
हे मुरड नेत्र रागांत किं अनुरागांत,
घे, पीळ, पाळ हें ह्रदय तुझ्या हातांत.