१
विमल या कलिका लतिकांवरी
उकलती नच भूवरि तोंवरी
गळुनिया माळति, मिळती धुळीं
जुळवितां तुज येतिल का मुळीं १
जुळवितां कधिं जें तुज येइना,
तळमळूं न तयास्तव दे मना;
अनय काय कधीं हरिही करी?
धरुनि भाव असा मन आवरीं. २
तव करीं हरिनें जरि ठेविली
परत ठेवचि ही बघ घेतली;
तुज दयाघन देइल तो पुन्हा
धरुनि भाव असा धरिं रे मना. ३
२.
सहज हें मज येथुनि सांगणें,
कठिण दुःख परी तुज सोसणें;
कळ तयासच ती कळते खरी
भिनत ज्या अति तीव्र सुरी उरीं. ४
कठीण रे कुसुमासहि टाकणें,
धुळिमधें रुळतां मग पाहणें,
कठिण रे किति बालक टाकणें
जड धुळींत करीं निज लोटणें ! ५
दगड बांधुनिया ह्रदयावरी
गिळुनिया निज दुःख कसें तरी,
कठिण मोह पळांतरिं सोडणें
कठिण, फार कठीणचि सोसणें ! ६
कठिण तो बघणें मग पाळणा
अति भयाण उदास अती सुना,
मधुर मंजुळ जो घुमला रवें
मग मुकाच मुकाच न पाहवे. ७
मधुर मंजुळ खासचि तो ध्वनी !
मधुर काय धरेवर त्याहुनी ?
मधुर वेणुनिनाद ? न त्यापुढें !
मधुर कोकिलकूजन ? छे, रडें ! ८
वसन तें बघणें मग दुःख दे,
छबकुलें खुललें बहु ज्यामधें;
स्मरण देतिल वस्तु अशा किती !
विसर होइल तो कवण्या रिती ! ९
नयन हे मिटतां शयनांतरीं
नयन ते खुलती कमलापरी;
चिमुकलेंच गुलाबमृदू मुख
उकलतां किति हो ह्रदया सुख ! १०
पसरतां कर आवळण्या तया,
उचलितां मुख चुंबन घ्यावया,
उघडतां इतक्यांतचि लोचन
तिमिर दाटचि दाटचि पाहुन. ११
उगिच चाचपतांच चहूंकडे
अगइ हा ! ह्रदयास कसें घडे ?
हळुच काय डसे ह्रदयास या ?
धगधगे उर तें मग कासया ? १२
भ्रम भरे ह्रदयांत जसें पिसें,
तनयदुःख न जों कळतें डसे
मग झराझर वाहति लोचन,
नयनि नीज शिरे मग कोठुन ? १३
चहुंकडे भरलें बघुनी तम
मन म्हणे, 'न शिर उरिं कां मम ?
स्मृति तमीं तरि पावुच मज्जन'
तरिहि जागति आंतर लोचन. १४
तमिंहि तेंच दिसे फिरुनी मुख;
तरि न दे ह्रदया फिरुनी सुख;
श्रवणिं तें हसणें रडणें पडे,
परि मना, तुजलागि कसें घडे ? १५
चपल तें कर हालविणें दिसे,
समयिं एकचि ये रडणें -हसें,
हळुहळू विसरे रडणें-हसें,
फिरुनिया ह्रदयांत भरे पिसें ! १६
तनयसौख्यचि तें मग भोगतां
दिननिशा विसरे मन हें स्वता;
विसरतां निज भान मुलासवें
कटुक कुक्कुट तो मग आरवे. १७
तडफडोनि उठे मग हें मन,
हलवितें शरिरा जड भेदुन;
ह्रदयिं भार धरोनि भयंकर
दिनकृतींत फिरे मग हा नर. १८
जरि हसे स्वजनात फिरोनिया
हळुच कांहिंतरी डसतें तया,
सकल हें अति दुस्सह दुस्तर,
कठिण, फार कठीण खरोखर ! १९
३
मृदुल फार सख्या, तव हें मन,
दिसति ते भरले तव लोचन;
बघुनिया तव रे मुख हें फिकें
ह्रदयिं कांहिं गमे ममही चुके. २०
न कळतां गळुनी नयनांतुनी
हळु उरीं वितळे जळ येउनी,
न कळतां ह्रदयांतुनि हें पहा
श्वसित ये, मिसळे पवनांत हा ! २१
अगइ ! काय तरी उरिं बोचलें ?
ममहि आठवती मजला मुलें !
खचित दुस्सह दुस्तर हें सख्या,
विसर केवि म्हणूं तुज तान्हुल्या ? २२
विसर बाळ कधीं न म्हणेन मी,
बुडव दुःखचि विस्मृतिचे तमीं;
प्रणयरत्न मळे चिखलीं तया
धुउनि निर्मळ दिव्य करीं सख्या. २३
खचित दुस्सह दुःख कळे मज,
चिरड दुःख तरी; प्रणयध्वज
फडकुं दे; सुविचार करीं जरा,
बघ अफाट विशाळ सख्या , धरा. २४
उगवला रवि का कधिं मावळे
नयनभूतजळें नच जो मळे ?
तनयहीन किती जनकां करी,
रडवितो किति भूवरी सुंदरी ! २५
हरिस जें रुचतें सखया, खरें
खचित नीटहि, योग्यहि तेंच रे;
विसर यास्तव शोक सख्या, परी
तनय तो स्मर तूं वरचेवरी. २६
४
भगिनि, मीं तुजला नच पाहिलें,
तरि तुला स्मरतां मन हें उले;
तुजशि शांतवुं सांग कसा तरी ?
हरि करोच दया तुझियेवरी. २७
५.
दिवस जातिल हेहि निघोनि गे ?
जगतिं काय असें नच जें निघे ?
ह्रदय होइल शांत तुझें जईं
निज मना म्हणशील असें तईः- २८
"अगइ ! आठवतें मन तान्हुलें,
हरिस तें रुचलें मम सोनुलें,
उचलिलें, पदरीं निज घेतलें
अतिदयानिधिनें हरिनें भलें. २९
कुटिल पातकपूर्ण धरा दिसे,
वदन निर्मळ का असतें तसें ?
उचलिलें हरिनें म्हणुनी तुला
मुख मळो न, अशा धरि हेतुला. ३०
सदन हें मम दुःखतमोन्वित,
सदन तें सुखशांतिविराजित;
हरि निजांकिं तुला रमवी वरी,
अति दयाघन तो नय आचरी." ३१
६
धगधगे उर-कुंडचि हें तुझें
अति पवित्रहि निर्मळ पुण्य जें,
कुसुम हें मम अपिं तयावरी
जरि जळे तरि तेथ जळो तरी. ३२