"मुशाफिर आम्ही,
आम्ही वनवासी, कशास्तव भुललिस आम्हांसी ?"
उभि महालीं ती,
ती रजपुत बाला तेथुनी बोले पांथाला
"तुमचि हो भरली,
भरली मूर्ति मनीं, असां का परदेशी कोणी !
ह्रदय हें दिधलें
दिधलें तुम्हाला, इतर जन बंधुबाप मजला !
"मुली, कुलशीला,
कुलशीला बघुनी करावा पति तो युवतींनीं."
"महाकुल दिसतां,
दिसतां रजपूत, जाहलें भाग्य जरी अस्त."
'वनफळें खातों
आम्ही वनवासी, राहतों किंवा उपवासी.
वनीं पक्वान्नें,
पक्वान्नें कुठुनी जशी तूं भोगिशि या भुवनीं?"
"तुम्हांविण अन्न
अन्न जरी अमृत विषाहुनि कडू इथे खचित."
"वनीं कोठोनी
कुठुनि कुसुमशय्या ? टाकितों दगडावर काया."
"तुम्हांविण शय्या,
शय्या कुसुमांची रुते मज कांट्यांहुनि साची."
"भटकणें अमुच्या
अमुच्या या भाळीं वणवण करु रानोमाळीं."
"तुम्हांविण भुवन,
भुवन मनोहर हें वनाहुनि भयंकरचि आहे."
"कोठली आई,
आई, दादा ते राहतों वनपशुंसह तेथे"
"तुम्हांविण आई,
आइबाप असुनी वाटतें शून्य मला सदनीं."
"जिवाला धोका,
धोका रानांत, नीट हें आणी ध्यानांत."
"तुम्हांविण जगणें,
जगणें मृत्युच कीं तयाहुनि दुस्सह या लोकीं !"
"कशाचें आम्हां,
आम्हां घरदार ? कशाचा अमुचा संसार ?"
चालला वारू,
वारू तेथोनी' धावली अबला मागोनी !