आपापली घरे बांधण्यात अधिक हुशार कोण याबद्दल मधमाशी व कोळी यांचे भांडण सुरू झाले. कोळी म्हणाला, 'निरनिराळ्या कोनाकृती, वर्तुळे वगैरे करण्यात माझ्यात जी हुशारी आहे त्याच्या निम्मीसुद्धा दुसर्या कोणातही नसेल. माझ्या जाळ्याच्या रचनेत जे कौशल्य मी दाखवितो ते अगदी वेगळं आहे. तशी हुशारी सार्या जगात कुठेही आढळायची नाही. विशेष म्हणजे जाळं बांधण्यासाठी मी कसलाच पदार्थ बाहेरून आणत नाही. मला लागणारं सर्व सामान माझ्या पोटातून निघतं पण तुझं पहा ! सगळ्या जातीच्या फुलझाडांपासून तुला तुझ्या वस्तु चोराव्या लागतात. अगदी घाणेरड्या वनस्पतिसुद्धा तू सोडत नाहीस.' मधमाशी त्यावर कोळ्याला म्हणाली, 'कोळीदादा, फुलातून नुसता मध काढण्यात जी हुशारी आहे, त्यात माझी बरोबरी कोण करणार ? मध काढून घेतला तरी फुलं थोडीसुद्धा दुखावत नाहीत की त्यांचा वास कमी होत नाही. आता तुझ्या कोनाकृति नि माझ्या कोनाकृति यात काही फरक आहे की काय हे कोणीही सांगेल. तसंच जमवलेला मध आणि मेण यांचा जगाला किती उपयोग होतो हे पाहिलं तर त्या दृष्टीनं तुझ्या कौशल्याची आणि माझ्या कौशल्याची नुसती तुलनादेखील करणं वेडेपणाचं आहे !'
तात्पर्य - ज्या भावनेने कोणत्याही वस्तूचा विचार करावा, त्याप्रमाणे ती बरी अथवा वाईट भासते.