एक लांडगा मेंढीचे कातडे पांघरून एका मेंढ्यांच्या कळपात शिरला व त्याने बरेच दिवस मेंढरे मारून खाण्याचा सपाटा चालविला. त्याच्या अंगावर मेंढीचे कातडे असल्यामुळे तो लांडगा असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. पण एके दिवशी त्याचे ढोंग बाहेर पडले व धनगराने त्याला लगेच पकडून ठार मारले. मग त्याने मेंढीच्या वेषात असलेल्या त्या लांडग्याचे प्रेत इतर लांडग्यांनी धडा घ्यावा म्हणून एका झाडाला टांगून ठेवले. शेजारच्या धनगरांनी तो प्रकार पाहिला व मोठ्या आश्चर्याने त्यांनी विचारले, 'अरे मित्रा, तुझ्या स्वतःच्या मेंढ्यांपैकीच एक मेंढी तू अशी कां टांगून ठेवलीस ?' त्यावर तो म्हणाला, 'अरे तुम्ही नुसतं कातडं पाहून फसू नका कारण हे कातडं उचलून त्याच्या खाली काय आहे हे जर तुम्ही पहाल तर एका लांडग्याचे प्रेत तुम्हाला दिसेल.'
तात्पर्य - नुसत्या देखाव्यावरून किंवा पोशाखावरून माणसाच्या अंतःकरणाची परीक्षा होणे कठीण आहे.