दोघे वाटसरू प्रवास करत असता वाटेने सरड्याच्या रंगाविषयी त्यांचा वाद सुरू झाला. त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, 'सरड्याचा रंग निळा आहे. नि तो मी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे.' यावर दुसरा वाटसरू जोराने म्हणाला, 'सरड्याच्या रंग हिरवा असून तो मी अगदी जवळून पाहिला आहे.' आपल्या मताविषयी दोघांचीही खात्री असल्यामुळे वाद वाढता वाढता शेवटी भांडणावर मजल गेली. इतक्यात एक तिसरा वाटसरू त्या ठिकाणी आला व त्याच्याकडे त्या दोघांनी आपला वाद मिटविण्याचे काम सोपविले. त्यामुळे तो तिसरा वाटसरू आनंदीत होऊन थोडेसे हसून म्हणाला, 'मित्रांनो, ज्या अर्थी काल रात्री मी स्वतः एक सरडा पकडून ठेवला आहे, त्या अर्थी तुम्ही आपला वाद माझ्याकडे आणला हे फार चांगलं झालं, पण खरं विचाराल तर दोघेही चुकताहात, कारण त्या प्राण्याचा रंग अगदी कोळश्यासारखा काळा आहे.' हे ऐकताच दोघंही आश्चर्यचकीत होऊन म्हणाले, 'काय म्हणता ! त्याचा रंग काळा ? शक्यच नाही.' त्यावर तो तिसरा वाटसरू म्हणाला, 'उगाच वाद कशाला, प्रत्यक्षच पहा ना. माझ्याकडच्या डब्यात एक सरडा आहे.' त्याने खिशातून डबा काढला व उघडला. पाहतात तो ह्या सरड्याचा रंग अगदी पांढराशुभ्र आहे असे त्यांना दिसले. तो प्रकार पाहून तिघेही आश्चर्यचकीत होऊन मोठे घोट्याळात पडले. तेव्हा तो डब्यातला सरडा मोठ्या शहाण्या माणसाचा आव आणून म्हणाला, 'अरे माणसांनो, कोणत्याही गोष्टीविषयी नक्की मत देण्याचं धाडस कधीही करू नका. हे खरं की, चालू असलेल्या वादात तुमचं तिघांचही मत अगदी बरोबर आहे. तुम्ही तिघांनीही निरनिराळ्या वेळी माझा रंग पाहिला, पण मी तुम्हाला विनंती करतो की, यापुढे तुम्ही स्वतःच्या अभिप्रायाला किंवा अनुभवाला जितकी किंमत द्याल तितकीच किंमत दुसर्याच्या अभिप्रायाला आणि अनुभवाला देत चला !'