एकदा एक शेतकरी रानात फिरत असता त्याला काट्यांच्या झुडपात अडकलेला एक गरुड दिसला. त्या पक्ष्यांचे सौंदर्य पाहून त्याला त्याची दया आली व त्याने त्याला त्या काटेरी झाडापासून सोडवून मोकळे केले. मोकळा होताच गरुड आकाशात उडून गेला. इकडे तो शेतकरी उन्हाचा त्रास नको म्हणून एका पडक्या भिंतीजवळ बसला. काही वेळाने तो गरुड खाली आला व त्या शेतकर्याचे पागोटे चोचीत घेऊन पळत सुटला व काही अंतरावर ते टाकून दिले. हा प्रकार पाहून गरुडाच्या कृतघ्नतेबद्दल शेतकर्याला फार राग आला. तो बसल्या जागेवरून उठला व आपले पागोटे घेऊन पुन्हा त्या पडक्या भिंतीजवळ आला. पण ती भिंत त्याला सगळीच पडलेली दिसली. तेथे फक्त मातीचा ढिग होता. ते पाहून गरुडाने आपला जीव वाचवला ही गोष्ट त्याच्या लक्षात आली व त्या मुक्या प्राण्याच्या परोपकाराचे कौतुक करून तो घरी गेला.
तात्पर्य - सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय रहात नाही.