एका चोराने एकदा बागेतली मधमाशांची पोळी चोरली. बागेच्या मालकाने येऊन पाहिले तो पोळी नाहीशी झालेली ! तेव्हा ती कोणी चोरून नेली असावीत याचा विचार करीत असतानाच बाहेर गेलेल्या मधमाशा, मध घेऊन तेथे आल्या व पोळी नाहीत असे पाहून यानेच आपली पोळी नेली असावीत. असे समजून त्यांनी एकदम त्या मालकावरच हल्ला चढवला.
तेव्हा तो मालक त्यांना म्हणाला, 'अरे, कृतघ्न प्राण्यांनो ज्याने तुमची पोळी चोरून नेलीत त्याला तुम्ही सोडलंत. अन् मी जो तुमचा मालक, तुमची पोळी चोरीला गेल्याने तुमची आता काय व्यवस्था करावी या काळजीत पडलोय. तर तुम्ही मलाच नांग्या मारून दुखावता ? वा रे वा !'
तात्पर्य - कधी कधी आपला खरा जो मित्र आहे त्यालाच शत्रू समजून आपण त्रास देतो. परंतु तसे करणे मूर्खपणाचे आहे.