एका मुलाचे एक मांजर होते. त्याच्यावर त्याचे इतके प्रेम होते की त्या मांजराची जर स्त्री होईल तर तिच्याशी लग्न करू असे तो म्हणत असे. हे त्याचे बोलणे ऐकून देवाने त्या मांजराची एक सुंदर स्त्री केली व त्या मुलाने तिच्याशी लग्न केले. एकदा रात्री ती दोघे जेवायला बसली असता त्या स्त्रीने स्वैपाक घरात उंदराचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकताच ती आपले ताट बाजूला सरकावून स्वैपाकघरात गेली व त्या उंदराला तिने ठार मारले. हे पाहून तिचे रूप पालटले तरी मूळ स्वभावात काही फरक झाला नाही याचा देवाला फार राग आला. त्याने एका क्षणात तिला पूर्वीसारखे मांजराचे रूप देऊन टाकले.
तात्पर्य - वेषात बदल झाला तरी स्वभाव बदलणे शक्य नाही.