एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'
तात्पर्य - लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?