श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय नववा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री सद्‍गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
नमाम्यहं दिव्यरुपं, जगतानंद दायकम्‍ । महायोगेश्वरं वंदे, ब्रह्मा, विष्णु, महेश्वरम्‍ ।
शक्तिं, गणपतीं चैव सर्वदैवं अहंमयम्‍  । अनन्यश्चिंत, तो माम्‍ योगक्षेमं वहाम्यहम्‍ ॥२॥
श्री मयुरानंदांचा वास । अद्यापी असे उमराळ्यात । तयांचे साक्षीत्व । संदर्भार्थ निवेदितो ॥३॥
गोविंदबुवा मयुरानंद पुत्र । रामनवमी करिती उत्सव । उत्सवानंतर । झाली चोरी उत्सवमूर्तीची ॥४॥
करीत राहिले तपास । परी न लागे ठाव । एक वर्ष जात । लाभ नसे मूर्तीचा ॥५॥
राममूर्तीविण । पालखीसेवा होणे कठीण । इतक्यांत ठाण्याहून । आली गाडी पोलिसांची ॥६॥
पोलीस सांगती गोविंदबुवास । पकडिले एका साधूस । मूर्ती जाहल्या प्राप्त । होत्या साधुजवळी ॥७॥
पोलीस गाडीतून । गोविंदबुवा आले मूर्ती घेऊन । एकोणीसशे पंचेचाळीस सन । घडली घटना प्रत्यक्ष ॥८॥
श्री स्वामी कृपेकरुन । जाहला ग्रंथ निर्माण । प्रत्येक अध्यायाचे अवतरण । सारांश निवेदी ॥९॥
प्रथम अध्यायांत । निवेदिला वंश संकेत । मोरेश्वर जन्मकथन । विवाहादी निरुपण । द्वितीयाध्यायी ॥१०॥
तिसर्‍या अध्ययात । श्रीस्वामीकृपा प्रसाद प्राप्त । मित्रवृष्ट निवारणं, प्राप्त चंद्रशेखर बाण । चवथ्या अध्यायी ॥११॥
पांचव्या अध्यायात । कृमिघ्न काढा राममंदीर निर्माण । तस्कर शासन, अग्नीशमन । सहाव्यांत वर्णिले ॥१२॥
सप्तशृंगी प्रसाद प्राप्त । व्याधीमूलन, बंधनमुक्त । सप्तशृंग माहात्म्य अद्भुत । सातव्यांत वर्णिले ॥१३॥
उपदेश समस्तांस । केले अंतिम कीर्तनास । श्री मयुरानंद समाधीस । वर्णिले अष्टम अध्यायीं ॥१४॥
ग्रंथ पारायण पध्दत । यथायोग्य निवेदन । एक, पांच, सात, नवम दिवस । संपूर्ण ग्रंथ वाचावा ॥१५॥
हे न घडे जयासी । एक अध्याय प्रति दिवशी । अष्टमी, नवमी, चतुर्दशीसी । पारायण पूर्ण ग्रंथ ॥१६॥
पारायण आदी अंती । मयुरानंदा प्रसाद प्राप्त । वाचावा स्वामी तारक मंत्र । विशेष असे फलदायी ॥१७॥
पारायणाचा अधिकार । असे स्त्रीपुरुषादी सर्वास । आणि विशेष कारणास । उमराळे मंदिरी पारायण करावे ॥१८॥
पारायणाची समाप्ती । करा यथाशक्ती । श्रीकृपेची महत । घ्यावी अनुभवून ॥१९॥
भाद्रपद शुध्द तृतीयेस । सतरा सप्टेंबर दोन हजार चार सनास । आरंभले ग्रंथ लेखनास । श्री स्वामी समर्थ इच्छेने ॥२०॥
वीस सप्टेंबर दोन हजार चार सनास । ग्रंथ झाला पूर्त । कालमान चार दिवस । हे कर्तृत्व स्वामींचे ॥२१॥
जया न घडे अक्कलकोट । त्याने जावे उमराळ्यास । श्री स्वामी प्रसाद प्रत्यक्ष । दर्शन करावे ॥२२।
श्री स्वामींचे पद । लागले मयुरानंद गृहास । ती वास्तू विशेष पवित्र । प्रत्यक्ष स्वामी वास असे ॥२३॥
पूर्वापार आमुचे वंशास । स्वामी सेवेत सकृप । जाणा प्रसाद सिध्द ग्रंथ । वंदिल्या श्री पादुका ॥२४॥
यशोदा नामे माता । हरि नामक पिता । करमरकर उपाख्य । चित्पावन ब्राह्मण ॥२५॥
वास पुण्य नगरीत । घरासमोर स्वामी मठ । श्रीगुरुपद प्राप्त । श्री स्वामी समर्थ कृपे ॥२६॥
जय जय श्री स्वामी समर्था । सिध्दांत चिंतन अवधूता । मागणे एक तत्त्वता । समस्त नांदोत सुखे ॥२७॥
ग्रंथ पठण कर्त्याची कामना । पूर्ण करावी दयाघना । अधिक आणि न्यून्या । स्वीकारावे कृपेसी ॥२८॥
जय जय वटवृक्षा निवासा । जय जय पुराण पुरुषा । जय जय मयुरानंद परमेशा । श्री स्वामी समर्था तुज नमो ॥२९॥
नव धारा नवरस । परिसोत सज्जन अखंड । सरो समस्तांचे द्वंद्व । रक्षावे पाठका ॥३०॥
इति श्री स्वामी कृपांकीत । श्री मयुरानंद धारामृत । कृपाप्रसादर्नामो नवमोध्याय: ।
श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु । शुभम्‍ भवतु ॥

एकूण ओवी संख्या ४०२
रचना : गो.ह. करमरकर
संतकृपा, १०३५, सदाशिव पेठ,
नागनाथ पाराजवळ, पुणे ३०.
रचनाकाल : २० सप्टेंबर, २००४

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP