मयुरानंद सरस्वती - चरित्रगाथा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ऋणनिर्देश
ॐ दत्त पूज्य ठाकूर महाराज परिवारातील सद्भक्त

माझ्या गिरनारच्या तिसर्‍या आवृत्तीचे संपादन प्रा. सौ. नम्रता भट यांनी केले असून त्यांनीच पुस्तकाचे प्रकाशन २००३ च्या दत्तजयंतीला उरण येथे ठाकूर महाराजांचे स्थानी केले. त्याचवेळी डाँ. अनुप वामन देव यांनी गिरनारची एक प्रत घेऊन लगोलग वाचून काढली त्यानंतर डाँ.देव हे सहकुटुंब माझ्या घरी आले. गिरनार पुस्तकाविषयी समाधान व्यक्त केले. त्यांच्या पत्नी सौ. सुनिता मुलगी चि. नभा, चि.वैभवी अशा या सर्व कुटुंबियांनी गिरनार पादुकांचे दर्शन घेतले. डाँ. अनुप देव यांच्या घराण्यात गेल्या पाच पिढ्यात सदुगुरु सेवा चालत आलेली असून स्वत: डाँ. अनुप्देव ॐ दत्त दरबार ठाकूर महाराज यांच्या सेवेत कार्यमग्न असतात. पूज्य ठाक्रूर महाराजांनी आपल्या भक्तांसाठी ॐ दत्ताई नावाचा मठ गाणगापूर येथे स्थापन केलेला आहे.
डाँ. अनुप देव असेच एकदा घरी आल्यावर मला म्हणाले, `तुम्हा दोघांना घेऊन मी डाँ. सौ. अरुणा भावे यांची ओळख करुन देतो त्यांचे पती श्री. प्रदीप भाव सुध्दा उत्तम डाँक्टर असून घरी गेल्यानंतर डाँ. सौ. अरुणा भावे यांनी कुटुंबियांचा परिचय करुन दिला. सासुबाई श्रीमती सुलभा हरीहर भावे, यजमान डाँ. प्रदीप हरिहर भावे, दोन मुली कुमारी श्रुता व कु. नेहा असे हे पाचजणांचे कुटुंब, सतत दत्तसेवेत लीन असते. डाँ.सौ. अरुणा भावे यांना दैवयोगाने ॐ दत्त ठाकूर महाराजांचा दत्तभक्तीचा मार्गदर्शनाचा लाभ लहानपणापासून मिळालेला आहे. आजही घरातील सर्वजण पूज्य ठाकूर महाराजांचे म्हणजेच नृसिंह सरस्वती स्वामींचे नि:स्स्मी भक्त आहेत.
श्री. दिनेश कुदळे व मी गेली तीन वर्षे हे पुस्तक प्रकाशित करावे अशी योजना आखीतो होतो. पण योग येत नव्हता. ही सर्व हकीगत प्रा.सौ. नम्रता भट यांच्या कानावर घालताच, त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्याचे मान्य केले. अथक प्रयत्न करुन पुस्तकाची मांडणी जोडणी, कव्हर तयार केले. ही गोष्ट श्री. देव व श्री. भावे यांना समजल्यावर त्यांनीय या सत्कार्याला मनापासून हातभार लावला. श्री. कुदळे, श्री. भावे, श्री.देव व सौ. नम्रता भट असा हा संगम होऊन, आज हे छोटेसे पण अप्रतिम रंगीत फोटोसहित सुंदर पुस्तक साकार झाले आहे. कितीतरी वर्षे हे पवित्र स्थान जरा अज्ञातच राहिले होते. परंतु परब्रह्म स्वरुप श्री. स्वामी समर्थांचे हे स्थान त्यांच्याच कृपेने उघड झाले हे मी माझे भाग्य समजतो.  डाँ. अनुप वामन देव व डाँ. सौ. अरुणा प्रदीप भावे यांनी निक्षून सांगितले की, आमची नावे छापू नका. पण त्यांच्या सद्भावना सदिच्छा, श्रध्दा यामुळे माझ्या मनाला ते पटले नाही म्हणून त्यांच्या सहकार्याचा हा ओझरता उल्लेख केला आहे. त्याबद्दल ते मला माफ करतील अशी आशा करतो. सरते शेवटी प्रा.सौ. नम्रता भट यांचेही मन:पूर्वक आभार. कारण कमीतकमी अवधीत जास्तीत जास्त सुंदर प्रकाशित करण्याचा हातखंडा आहे. त्यांनी प्रकाशित केलेले स्वप्निल प्रकाशनाचे हे चौपन्नावे पुष्प स्वामी भक्तांना प्रकाश देईल यात शंका नाही.

श्री. हरी नामदेव दहातोंडे

आद्य श्री परशुराम क्षेत्र
निर्मळ सुरपूर

श्री ब्रह्मदेवाने विश्वाची व्यवस्था लालन-पालन व्यवस्थित व्हावे यासाठी दशावतार धारण केले. भगवान परशुराम हे दशावतारातील सहावे अवतार मानले जातात. तसेच संपूर्ण मानवरुप असलेले ते पहिले अवतार होत. त्यांचा काळ फार प्राचीन असून पुराणातही त्यांच्याविषयी बेताचीच माहिती मिळते. परशुरामांना तीन भाऊ होते. तो अत्यंत निष्ठावान मातृ-पितृ भक्त होता. अत्यंत आज्ञाधारक होता. आपल्या पित्याचा वध करणार्‍या व जनतेला अतोनात छळणार्‍या उन्मत्त क्षत्रियांचा त्याने एकवीस वेळा पराभव केला. जिंकलेल्या पृथ्वीवर रहायचे नाही अशी प्रतिज्ञा करुन (जिंकलेली पृथ्वी कश्यपांना दान करुन टाकली आणि) तो महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करु लागला. भगवान परशुराम थोर शिवभक्त होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी आपला परशु साधूंच्या संरक्षणार्थ त्यांना भेट दिला म्हणून त्यांना `परशुराम' असे म्हटले जाते.
महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असता, खवळलेल्या समुद्राने आपली मर्यादा सोडली. ऋषी मुनी बहुजन समाजाचे संरक्षणासाठी परशुरामानी तात्काळ धनुष्याला बाण लावला आणि आपल्या शस्त्र व मंत्रसामर्थ्याने पुढे पुढे सरकणार्‍या सागराला शूर्पारक बंदरापर्यंत हटविले. हेच शुर्पारक म्हणजे हल्लीचे वसई-जवळचे `सोपारा बंदर' होय. ह्या परशुराम निर्मित नवभूमीला नवकोकण असे नाव पडले. ही भूमी लागवडीखाली आणून नववसाहत निर्माण करण्याच्या कामी परशुरामांनी त्यांनी आपले सर्व सामर्थ्य पणाला लावले व ही भूमी सुजलाम सुफलाम होताच हातातील शस्त्र खाली ठेवले. त्यांचे हे कार्य अपूर्व असून, त्यांचे हेच खरे चिरंजीवित्व. भगवान परशुराम निर्मित ही नवभूमी `सूरपूर'. ह्याचे पुढे `शुर्पारक' झाले. बौध्दकालीन शीलालेखात `सुपरक्क' असे आढळते. सुर म्हणजे देव व पक्क म्हणजे नगर. अशा अर्थाने ही देवनगरी अनेक ऋषिमुनींनी तप:साधना करुन पावन केलेली अनेक पवित्र तीर्थे असलेली ही देवभूमी, धर्मक्षेत्र म्हणून विख्यात आहे, हे एक व्यापारी बंदर परदेशांशी व्यापार करुन ही सुवर्णभूमी ठरली. श्री चक्रेश्वर मंदिर, चक्रेश्वर तलाव व बुरुड राजाचा कोट ही सुरपूर शहरातील प्रसिध्द स्थळे. निर्मळ सुरपूर नजिकची गावे प्रसिध्द तीर्थक्षेत्रे समजली जात असून एकट्या गासगावात सुमारे २४ तीर्थे आहेत. तिथे इतका मोठा एक तीर्थतलाव आहे की, संपूर्ण जिल्ह्यात तेवढ्या क्षेत्रफळाएवढा तलाव दुसरा नाही. तीर्थात अनेक देवदेवतांच्या मूर्ती, शिल्पे, असून मूर्तीभंजकांनी फेकून दिलेल्या भग्नावस्थेतील मूर्तीही अनेक ठिकाणी सापडतात.
आद्य शंकराचार्यांचे पट्टशिष्य बौध्द पंडित मंडनमिश्र उर्फ श्रीसुरेश्वराचार्य यांचे शाखेतील आठवे पुरुष जगत्गुरु विद्याशंकरभारती यांनी आपले धर्मप्रसाराचे कार्य संपल्यावर मन:शांतीसाठी तीर्थयात्रा सुरु केली. अनेक ठिकाणे हिंडून शेवटी ते इथे आले. ह्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या दर्शनाने त्यांना ब्रह्मानंद झाला. चारी बाजूच्या पवित्र तीर्थ दर्शनाने तृप्त झाले. आद्य शंकराचार्यांनी, मंडनमिश्रांचा वादविवादात पराभव केला म्हणून शरण येऊन त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. आद्यशंकराचार्यांनी त्यांना `सुरेश्वचारार्य' हे नाव देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांचे परंपरेतील विद्याशंकरभारती हे आठवे सत्पुरुष हे मूळचे मल्याळ देशाचे. त्यांचा जन्म शके ४२१ (सन ४९९). त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरु व आईचे नाव गिरिजादेवी. त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शृंगेरीला जाऊन नऊ वर्षे अध्ययन केले व पुढे पृथ्वीप्रदक्षिणा केली. करवीर क्षेत्रात त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. धर्मप्रचारकार्य करीत असता त्यांनी `संक्षेप शारीरिक भाषा' व `प्रबोध सुधारक' हे ग्रंथ लिहिले व ते आज अजरामर ठरले आहेत. `भास्कर' व `देही' नामक पंडितांशी त्यांनी वादविवाद केला, व विजय मिळवला तो प्रख्यात आहे. विजयनगर राज्याचे मंत्री श्री विद्यारण्य व त्यांचे बंधूप्रख्यात वेदभाष्यकार श्री सायणाचार्य ह्यांचे ते गुरु होते. वयाच्या सत्तर वर्षापर्यंत त्यांनी धर्मप्रसाराचा झेंडा फडकत ठेवला होता. अखेरीस ते समुद्रस्नानास निघाले. सुरपुर (शूर्पारक) ची कीर्ती ऐकून ते या क्षेत्री आले असता हे स्थान त्यांना खूपच आवडले. त्यांचे हे समाधीस्थळ निर्मळक्षेत्रात कोठेतरी आहे एवढेच लोकांना माहीत होते. त्यांचे नाव शंकर. शंकराचार्यपदावर होते म्हणून ह्या समाधीला लोक गैरसमजुतीने आद्य शंकराचार्य समाधी समजू लागले. परंतु ही समाधी आद्य श्री शंकराचार्यांची नाही. त्याचेपासूनचे आठवे पुरुष श्रीजगद्गुरु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती ह्यांची आहे. पोर्तुगीज व मुसलमान काळात ह्यासंबंधी माहिती नष्ट झाली होती. परंतु वसईच्या महाधर्मसंग्रामानंतर त्याचे शिष्य यतीमहाराज ह्यांचे कृपेमुळे हे स्थान उघडकीस येऊन आजचे स्वरुपात समाधी मंदिर झाले.
ह्या भागातील मुख्य तीर्थक्षेत्र निर्मळ. येथील निर्मळेश्वर व विमलेश्वर महादेव जगत्गुरु आठवे शंकराचार्य विद्याशंकरभारती ह्यांचे समाधिमंदिर विठ्ठलमंदिर तसेच या भागाचा निर्माता भगवान परशुराम, काळ, काम, जमदग्नी व रेणुका ह्यांची छोटी मंदिरे आहेत. तेथेच सतीचा पार असून ह्या विमल तीर्थक्षेत्री शिवभक्त परंतू दुष्ट असलेल्या विमलासुराचे निर्दालन घडले म्हणून याला `विमलतीर्थ' म्हणतात. परशुरामाने ह्या तीर्थक्षेत्रात आपली सहासष्टकुळे आणून वसाहत केली. ऋषिमुनी तपस्वी देवदेवता ह्यांना निवासास दैत्य उन्मत्त होऊन धर्मकृत्यात तपस्येत यज्ञयागात व्यत्यय आणू लागला तेव्हा परशुरामानी आपल्या बाणाने त्याचे मस्तक उडवले व शरीराचे जागी विमलतीर्थ निर्माण केले. या स्थळाचे माहितीसंबंधी शंकराचार्य संमत एक हजार ओव्यांची प्राकृत धार्मिक पोथी `निर्मळ माहात्म्य' या नावे एका हरिदास कविने लिहिली. ती प्रथम १९०० साली प्रसिध्द झाली. तिचा शोध घेऊन व अन्य स्थळांचे, या संपूर्ण भूमीचे परिश्रमपूर्वक निरीक्षण करुन सर्व तीर्थे पाहून विवेकानंद गोडबोले यांनी आद्य श्री परशुराम क्षेत्र - निर्मळ सुरपूर या नावे एक पुस्तक लिहिले. आणि इतिहास संशोधन मंडळ कल्याण यांनी ते प्रसिध्द केले. हे पुस्तकही आता दुर्मिळ असून त्याची एक प्रत आमचे हाती लागली. त्यातून हा लेखनप्रपंच केला आहे.

सात हजार वर्षापूर्वीचे स्थान
ह्या भागात आजही सुमारे १०८ तीर्थे आहेत. प्रत्येक खेड्यात एक दोन तरी तलाव आहेत. `गासगाव' हे तेथील लोकांच्या समजूतीप्रमाणे मूळ शूर्पारक म्हणजे परशुराम कालीन क्षेत्र आहे. व्यापारवृध्दीनंतर जे झाले ते हल्लीचे सोपारे. श्री मध्वाचार्यांनी शृंगेरीपीठाचे श्री शंकराचार्य श्री विद्याशंकर भारतींचा वादात पराभव केला. त्या विद्याशंकर भारतींनी ह्याच क्षेत्रात सध्या असलेल्या निर्मळ टेकडीवर विमल सरोवरासमोर समाधी घेतली. सुमारे सात हजार वर्षापासून हे स्थान प्रसिध्द आहे. पुढे उत्तरेकडून इस्लामी व पश्चिमेकडून फिरंगी मूर्तीभंजक धर्मप्रचारक व राजे ह्यांची आक्रमणे सुरु झाली आणि या देवनगरीतील मंदिरे धडाधड कोसळू लागली. असंख्य मूर्तींचा विध्वंस सुरु झाला. अशा वेळी भाविक जनतेने संरक्षणाच्या दृष्टीने देवांच्या मूर्ती विहीरीत तळ्यात स्वत:च्या हातांनी फेकल्या किंवा शेतात आवारात खड्यात पुरुन ठेवल्या.

श्रीनिर्मळेश्वर - विमलेश्वर महादेव
अशाप्रकारे विश्वाच्या इतिहासात अखंड ६६५० वर्षे धर्मक्षेत्र तीर्थक्षेत्र, व्यापारक्षेत्र, राजधानीचे शहर व भारताचे प्रवेशद्वार म्हणून अखंड गाजत राहलेली भगवान परशुराम निर्मित ही अतिप्राचीन नगरी. श्रीनिर्मळ हे क्षेत्र सिध्दपीठ असून त्याचे माहात्म्य काशी-वाराणशी क्षेत्रापेक्षाही श्रेष्ठ आहे असे ऋषीमुनींनी वर्णन करुन ठेवलेले आहे. असे हे पवित्र स्थान वेस्टर्न रेल्वेवरील वसई रोड स्टेशनपासून सुमारे चार मैलावर आहे. तर वसईरोड पुढील स्टेशन नाला सोपारा, येथून अवघे दोन अडीच मैलावर आहे. दोन्ही ठिकाणांहून येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस सुटतात. नाला सोपारा, येथून अवघे दोन अडीच मैलावर आहे. दोन्ही ठिकाणांहून येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस सुटतात. नाला सोपारा स्टेशनवरुन आपण बसने निघालो म्हणजे बस प्रथम सोपार (सुरपूर) हद्दीतून जाते व वाघोली निर्मळ सीमेवर येऊन थांबते. हाच रस्ता सरळ पुढे निर्मळ गावांतून जातो. दोन्ही बाजूला छोटी छोटी घरे लागतात. थोडे पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला दोन तलाव लागतात. उजव्या बाजूचा विमल तीर्थ व डाव्या बाजूचा निर्मळ तलाव. विमल तलावाचे बाजूला रस्त्यावर छोटी तीन देवळे लागतात. एक हनुमान मंदिर आहे. एक श्रीदुर्गामाता मंदिर आहे व तिसरे श्रीगजाननाचे आहे. ही मंदिरे पेशवेकालात, वसईच्या विजयानंतर जीर्णोध्दार केला तेव्हा बांधलेली आहेत. थोडे पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक टेकाड सुमारे १०० ते १५० फूट उंचीचे लागते. त्यावर श्रीविमलेश्वर महादेव व श्रीनिर्मळेश्वर महादेवाची प्रसिध्द मंदिरे आहेत. रस्त्याचे उजव्या बाजूला विमल तलाव विस्तृत पसरलेला दिसतो.
खालून वर विमलेश्वर मंदिराकडे पाहिले असता मंदिराचा पार्श्वभाग आपणास दिसतो. वर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. काही पायर्‍या चढून वर आले म्हणजे दोन्ही बाजूला दोन उंच तुळशी वृंदावने व दोन छोट्या दीपमाळाही दिसतात. पायर्‍या चढून वर आलो म्हणजे मंदिराचा कोट लागतो. उजवे बाजूला मंदिराचे प्रांगणांत शिरण्यासाठी रस्ता असून उजवे बाजूला विश्रांतीसाठी दगडी बैठका केलेल्या आहेत. तेथून पाठीमागे वळून पाहिले असता श्रीविमलतीर्थाचा मनोरम देखावा दिसतो. तिथून पुढे गेले असता मंदिराची भिंत संपल्यावर डाव्या बाजूस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दिसते. समोर एक प्रचंड काळ्याभोर पाषाणाची दीपमाळ दिसते. त्याचेजवळ एक अति-प्राचीन वटवृक्ष दिसतो. त्याला प्रशस्त पार बांधलेला असून त्याचे मागे जरा डाव्या बाजूला एक छोटेसे शिवमंदिर दिसते. गाभारा फक्त १०X१० फुटाचा आहे. हेत ते आद्य श्रीनिर्मळेश्वर मंदिर. शिवलिंगावर अभिषेक पात्रही नाही. त्याला कोणी पुजारी असल्याचे जाणवत नाही. हे शिवलिंग परशुराम स्थापितच आहे. हा आद्य निर्मळेश्वर महादेव. भगवान परशुरामाने निर्मळ तीर्थ निर्माण केले तेव्हाच ह्याची स्थापना केली व त्याचे नाव ठेवले, श्रीनिर्मळेश्वर. ह्या मंदिराचे मागे उतार नसून श्रीनिर्मळ तीर्थाचा प्रवाह आहे, त्याला निर्मळमाहात्म्यांत `कर्दमाळी तीर्थ' म्हटले जाते.
ह्या निर्मळेश्वर महादेवाने हजारो वर्षाच्या काळात ह्या परिसरातील अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. ह्या रम्य ठिकाणी अनेक विद्वान पंडित, बुध्द संन्यासी, प्राचीन ऋषीमुनी आकर्षित होऊन त्यांचा निवास ह्या स्थानी घडला असेल; अनेक राजांच्या राजवटी त्याने पाहिल्या असतील. सातवाहनसारख्या धर्मनिष्ठ राजांच्या हातून निर्माण झालेली अनेक दिव्य मंदिरे पाहिली असतील. शिलाहार राजांच्या काळातील ही धर्मकृत्ये, मंदिरनिर्मिती ह्या निर्मळेश्वराने पाहिली असेल. समोरील विमलतीर्थातील श्रीविमलेश्वर महादेवाचे प्रचंड मंदिरही पाहिले असेल. ब्रह्मटेकडी ह्याचे पाठीमागील बाजूसच आहे. त्यावरील श्रीब्रह्मदेवाचे प्रचंड मंदिराचा सहवास ह्या श्रीनिर्मळेश्वर महादेवाला लाभला असेल. श्रीचक्रेश्वर महादेवाची संगत अजूनही लाभत आहे. पायथ्याशी असलेल्या श्रीसांबसिध्देश्वराशी व विमळतीर्थाचे पलीकडे असलेल्या श्रीसुरेश्वराशी अजुनही मौनहितगुज चालू असेल. आद्य शंकराचार्याचे पट्टशिष्य मंडनमिथ उर्फ श्रीसुरेश्वराचार्य ह्यांचे शाखेतील आठवे पुरुष श्रीजगद्गुरु विद्याशंकरभारती यांनी आपले धर्मप्रसाराचे कार्य संपल्यावर मन:शांतीसाठी तीर्थयात्रा सुरु केली आणि ह्या रम्य ठिकाणी येऊन श्रीनिर्मळेश्वर महादेवाचे सान्निध्यात समोरील विमळतीर्थातील मध्यभागी असलेले, श्रीभगवान परशुरामाने स्थापन केलेले प्रचंड, भव्य श्रीविमळेश्वर मंदिर पाहिले असेल. पलीकडील काठावर असलेले श्रीसुरेश्वराचे शिवमंदिर पाहून त्यांना आपल्या शाखापुरुष श्रीसुरेश्वराचार्यांची आठवण झाली असेल. पायथ्याशी असलेल्या श्रीसांबसिध्देश्वर मंदिराचे दर्शन घेताच भगवान श्री अत्रि ऋषी, श्रीदत्तात्रेय ह्यांचे स्मरण झाले असेल; श्रीचक्रेश्वर महादेव व श्रीचक्रतीर्थ पाहून त्यांना प्रसन्न वाटले असेल आणि श्रीनिर्मळेश्वराचे मागील प्रचंड, भव्य, उदात्त श्रीभगवान ब्रह्मदेवाचे दर्शनाने त्यांना ब्रह्मानंद झाला असेल. चारी बाजूच्या पवित्र तीर्थदर्शनाने त्यांना परम संतोष वाटला असेल आणि ह्या रम्य ठिकाणी साक्षात्‍ देवनगरीमध्ये तत्काल समाधि घेऊन परमेश्वरस्वरुप श्रीनिर्मलेश्वरस्वरुप व्हावे असे वाटून समाधी घेतली. हे दृश्यही श्रीनिर्मळेश्वर महादेवाने पाहिले असेल आणि ह्या रम्य ठिकाणी साक्षात्‍ देवनगरीमध्ये तत्काल समाधि घेऊन परमेश्वरस्वरुप श्रीनिर्मलेश्वरस्वरुप व्हावे असे वाटून समाधी घेतली. हे दृश्यही श्रीनिर्मळेश्वर महादेवाने पाहिले असेल. त्याचबरोबर धर्मेश्वर राजे व धर्मनिष्ठा नष्ट होऊन उत्तरेकडून इस्लामी व पश्चिमेकडून फिरंगी मूर्तीभंजक धर्मप्रचारक व राजे ह्यांची आक्रमण सुरु होऊन ह्या नयनरम्य देवनगरीतील मंदिरे धडाधडा कोसळताना श्री निर्मळेश्वराने पाहिली असतील. मूर्तीभंजकांनी असंख्य देवमूर्तीवर केलेले घणाघात पाहिले असतील; त्यांची छिन्नविच्छिन्न झालेली रुपेही पाहिली असतील. श्रीविमलेश्वर महादेव मंदिर भुईसपाट होऊन असंख्य मूर्ती फिरंग्यांच्या किल्ले-कोटाच्या पायांत चिणलेल्याही पाहिल्या असतील; तर लाचार, दीन झालेल्या भक्तांनी रक्षणाचा उपाय म्हणून आपल्या देवांच्या मूर्ती विहीरीत, तळ्यात स्वत:च्या हातांनी लोटताना किंवा शेतात, खड्ड्यात दफन करतानानाही पाहिली असेल; देवनगरीची स्मशाननगरी झालेली पाहिले असेल. ज्या ठिकाणी ऋषीमुनींनी यज्ञयाग केले, देव-देवतांना आवाहन केले, आहुती दिल्या, त्या यज्ञांच्या पवित्र धुराने भरलेले आकाश पाहिले असेल, त्याच ठिकाणी फिरंग्यांनी पेटवलेली अग्निकुंडेही पाहिली असतील. त्यांत धर्मशिक्षेच्या नावाखाली त्यांत फेकल्या जाणार्‍या निरपराध स्त्री-पुरुषांचे बळीही पाहिले असतील. ज्या ठिकाणी पवित्र वेदमंत्राच्या जयघोषाने आकाश दुमदुमून जात होते, त्याच ठिकाणी अग्निकुंडात फेकलेल्या मुला-माणसांच्या करुन किंकाळ्यांनी आकाश कोंदून गेलेले पाहिले असेल. ह्या निर्मळश्वराने काय पाहिले नाही ? कालचक्राचा फेरा कुणालाही सोडीत नाही. उदयास्त सर्वांना असतात हेही पाहिले असेल.
त्याच संभ्रात काळात धर्मवीर श्री. अणजूरकर व धर्मवीर श्री. अंताजीपंत कावळ ह्यासारख्यांनी येथील वाटून ख्रिस्ती झालेल्या आपल्या धर्मबांधवांना ह्या निर्मळ तीर्थाने शुध्द करुन परत धर्मात घेतलेलेही पाहिले असेल. ह्या धर्मवीरांनी भगवान परशुरामवंशीय पेशवे सरकारला वेळोवेळी साकडे घालण्यात यश मिळवून, श्रीमंत चिमाजी अप्पासाहेब पेशवे ह्यांनी सुमारे एक लक्ष फौजेनिशी ह्या फिरंगी व्याप्त भागावर चालून येऊन फिरंग्यांचा नायनाट करण्यास भाग पाडलेलेही ह्या श्रीनिर्मळेश्वर महादेवाने पाहिले असेल. भगवान परशुरामाने स्वत:प्रमाणेच धर्मरक्षणाचे कार्य करण्याची ह्या मराठे सरदारांना प्रेरणा देऊन या देवनगरीचा जीर्णोध्दार करण्यास प्रेरणा दिली असेल. पेशवे सरकारने वसईतून फिरंग्यांचे उच्चाटन केल्यावर पाडून टाकलेली मंदिरे, वास्तू इत्यादींचा जीर्णोध्दार करण्याची मोहीम सुरु केली व अनेक मंदिरे ह्या भागात त्यांचे ह्या भागाचे सुभेदार श्री. शंकराजी केशव फडके ह्यांचे हस्ते जीर्णोध्दारित केली. अशाच एका प्रसंगी श्री. शंकराजी केशव फडके ह्यांजकडे एक यती आला व सुभेदा श्री फडके ह्यांना सांगू लागला की त्यांचे गुरु व आठवे जगद्गुरु श्री शंकराचार्य ह्यांची समाधी निर्मळ टेकडीवर आहे. त्यांचा निर्णोध्दार करावा व एक मंदिर बांधावे. श्री शंकरजी केशव फडके ह्यांनी त्या यतीचा योग्य पाहुणचार केला, राहण्यास एक खोली दिली व सांगितले, `महाराज, मी पेशवे सरकारचा नोकर आहे. मंदिर बांधण्यास व समाधीचा जीर्णोध्दार करण्यास पेशवे सरकारचा हुकुम पाहिजे. (त्याशिवाय हे काम सुरु करता येणार नाही. क्षमा असावी. आज एकादशी आहे. आपण फलाहार करावा आणि विश्रांती घ्यावी.')
कारभार्‍याने यतीमहाराजांना स्नानाची जागा दाखवली. यती महाराजांनी स्नान केले व नित्यकर्मासाठी आपल्या खोलीत येऊन दार लावून घेतले. हा यती कदाचित रागाने व न सांगता निघून जाईल म्हणून कारभार्‍याने बाहेरुन उद्योगात होता. सकाळ झाली. कार्तिक वद्य द्वादशी होती श्री. शंकराजी केशव फडके नित्य उद्योगात गुंग होते. त्यांनाही कालचा उपास होता. माध्यान्हकाळी उपोषणाचे पारणे फेडण्यासाठी भोजनाची पंगत मांडली; परंतु पंक्तीला यतीमहाराज दिसत नाहीत असे पाहून पंतांनी कारभार्‍याला हाक मारली व यती महाराजांना भोजनास बोलावण्यास सांगितले. यती महाराज अतिथीगृहात उतरले आहेत व आपण बाहेरुन कडी लावली आहे हे कारभारी तोपर्यंत साफ विसरुन गेले होते. घाबर्‍या घाबर्‍या ते अतिथीगृहात आले. पाहतात तो दाराला कडी तशीच. त्यांनी चटकन कडी काढली आणि हाक मारली, `महाराज, यजमान भोजनास बोलावत आहेत.' एकदा हाक मारली, उत्तर नाही. दोनदा हाक मारली, उत्तर नाही. कारभार्‍यांनी दार उघडले. खोली रिकामी ! यती महाराज नाहीत आणि त्यांची वस्त्रे वगैरे काहीच नाही. कारभारी घाबरत घाबरत पंतांकडे आले झाला प्रकार त्यांना सांगितला. यावर पंत भयंकर संतापले म्हणाले, `काय हा हलगर्जीपणा !' आणि पुढे कांही बोलणारतोच एक हुजर्‍या धावत धावत आला आणि सांगितले, `सरकार, बाहेर पुण्याहून बाजीरावसाहेब पेशव्यांकडून एक सांडणीस्वार महत्त्वाचा लखोटा घेऊन आला आहे व हुजूरची भेट मागतो आहे.' सांडणीस्वार शब्द ऐकताच पंत तातडीने देवडीवर आले. पंतांना बघताच पेशव्यांचा खास मांडणीस्वार लवून पुढे झाला आणि मुजरा करुन मोहोरबंद लखोटा पंतांचे हातात दिला. पंतांनी लखोटा हातात घेतला, मस्तकी लावला व कारभार्‍यांना ताबडतोब सांडणीस्वाराची भोजन-विश्रांतीची व्यवस्था करण्यास सांगितले.
पंतांनी लखोटा सर्वांसमक्ष उघडला आणि वाचावयास सुरुवात केली.. `कार्तिक वद्य एकादशीस ज्या यती महाराजांनी तुम्हास दर्शन दिले, त्यांनी आज प्रात:काळी कार्तिक वद्य द्वादशीस आम्हास येथे पुणे मुक्कामी दर्शनाचा लाभ दिला.' यती महाराजांनी सांगितले की निर्मळ तलावास लागून जी टेकडी आहे, तिचा जीर्णोध्दार त्या ठिकाणी देऊळ बांधावे अशी यती महाराजांची आज्ञा झाली आहे. तरी देखत हुकूम जीर्णोध्दार व देऊळ बांधणेस सुरुवात करावी. हे देऊळ बांधून झाल्यावर नेमणूक करुन देण्यात येईल.'
पंतांनी तो हुकूम पाहून तातडीने मंदिर व समाधी बांधावयास सुरुवात केली. विमल तलावात मध्यभागी असलेले विमलेश्वर मंदिर नष्ट झाले होते व तेथे पुन्हा बांधणे गैरसोईचे होते; म्हणून विमलेश्वर महादेवाचे शिवलिंगाचा शोध घेऊन प्रथम श्रीविमलेश्वर महादेवाचे मंदिर निर्मळेश्वर मंदिराचे अगदी समोर, सरळ रेषेत नव्याने बांधून काढले व मूळ विमलेश्वर लिंगाची तेथे स्थापना केली. गाभारा १०X१० फूट आहे; व शिवलिंग भव्य आहे. पाठीमागे एक पार्वती देवीची मूर्ती कोनाड्यात स्थापन केली. जवळच्या परिसरात सापडलेले एक शिवपार्वतीचे प्राचीन शिल्प मागील भिंतीजवळ ठेवून दिले. गाभारा जरा खोलगट आहे. बाहेर दर्शनी दरवाजाचे डावे बाजूला गणपती व उजवे बाजूला कार्तिकस्वामी व ब्रह्मदेव ह्यांच्या मूर्ती स्थापन केल्या. बाहेरील प्रांगणात श्री विमलेश्वर महादेव पुन्हा स्थानापन्न झाले. पेशव्यांचे आज्ञेप्रमाणे शेजारी श्रीमत्‍ जगद्गुरु श्री शंकराचार्य विद्याशंकर भारती ह्यांची समाधी होती; तिचे भव्य मंदिर उभारले. वच चांदीचा पत्रा जडवला. उत्तम छत लावले. दोन्ही मंदिरे उत्कृष्ट दगडी बांधकामाची करुन घेतली. आज त्याचे शेजारी एक विठ्ठल मंदिरही निर्माण झालेले आहे. तेही उत्कृष्ट आहे. ह्या तिन्ही मंदिरांतील मध्यभागी असलेल्या श्री शंकराचार्य समाधीसमोर सुमारे वीस फूट अंतरावर भव्य दिंडी दरवाजा व कोट बांधला. हा कोट चारही बाजूने असून आतील बाजूने १२ फूटाच्या ओवर्‍या आहेत. तेथे यात्रेकरुंना उतरण्याची सोय आहे. पाठीमागील दोन कोपर्‍यांत एक एक खोली आहे व पुढील दोन कोपर्‍यांत मंदिरे आहेत. श्री विमलेश्वर-श्रीनिर्मळेश्वर बाजूचे कोपर्‍यातील खोलीत श्री भगवान परशुराम, काळ, काम, जमदग्नी व रेणुका बाजूच्या आग्नेय कोपर्‍यात श्रीदत्त, अत्रीऋषी, अनसूया व मारुती ह्यांचे मंदिर आहे. ह्या चार मूर्ती फारच सुंदर आहेत. ह्याला लागून असलेल्या खोलीत अलीकडे स्थापन केलेल्या राम, सीता, लक्ष्मण व हनुमान मूर्ती आहेत. कोटाचे बाहेर उत्तर दिशेला मोकळी जागा आहे. श्री विमलेश्वराची निर्मळेश्वराची यात्रा कार्तिक वद्य एकादशीला भरते. यात्रा सुमारे पंधरा दिवस चालते. जवळपासचे परिसरातील सुमारे लाख ते दीड लाख यात्रेकरु येतात. भाविक लोक विमल तीर्थात स्नान, दान, क्रियाकर्म इत्यादी करताना अजूनही दिसतात. हे स्थान ह्या परिसरातील लोकांचे अत्यंत श्रध्दास्थान आहे. शंकराचार्य श्रीमत्‍ जगत्गुरु विद्याशंकर भारती ह्यांची समाधी यती महाराजांना ह्या दिवशी सापडली, तेव्हापासून इथे यात्रासोहळा सुरु झाला.
अशी ही प्राचीन परशुराम भूमी. येथील चक्रेश्वर तलावासमोरील श्री मयुरानंद सरस्वती संस्थापित श्रीराम मंदिर आणि पूज्य मयुरानंद सरस्वती यांचे चरित्र वाचून भाविकांनी योग्य तो लाभ घ्यावा यापेक्षा अधिक काय सांगावे...

प्रा. सौ. नम्रता भट.
एम.ए.डी.एच.इ.

मोरेश्वर रघुनाथ जोशी तथा
श्री मयुरानंद सरस्वती

सुमारे दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट. अक्कलकोट येथे साक्षात्‍ परब्रह्म श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी, गणपती आणि मोरेश्वर या नावाचे दोन जिद्दीचे जिज्ञासू तरुण एकाच वेळी परंतु दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते. पैकी गणपती होता. सातारा जिल्ह्यातील गोंदवल्याचा आणि मोरेश्वर होता ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा उमराळ्याचा. श्री स्वामी समर्थांनी दोघांवरही कृपामृताचा वर्षाव केला. पुढे गणपती झाला. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज झाला तर मोरेश्वर ब्रह्मस्वरुप श्री मयुरानंद सरस्वती ! त्यांचीच ही चरित्रगाथा...

वसईचा वेढा-मोहीम फत्ते :
धर्मरक्षणासाठी, बुध्दी देत जगजेठी, आणि मानवाकरवी, कार्य करुन घेतसे ॥१॥
त्यावेळी वसईवर पोर्तुगीजांचा अंमल होता. त्यामुळे हिंदूंचा छळ चालू होता. धर्माचा र्‍हास होत होता. धनाचे आमिष दाखवून हिंदूंना बाटविणे व स्वधर्म वाढविणे चालले होते. या कृत्याचा ऊबग येऊन अखेर गंगाजी नाईकांनी पेशव्यांना विनंती केली. सतरा-अठरा वर्षे ही वसईची मोहीम चालली होती, पण विजयाची चिन्हे काही दिसेनात. कित्येक शूरवीर रणांगणात पडले, त्यांत गंगाजी नाईकांचा एक भाऊही गमावला. कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला, पण मोहीम फत्ते होईना. थोरले बाजीराव पेशव्यांनी नाईकांची विनंती मान्य करुन वसई मोहीमेकरिता त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांना मोहिमेवर पाठविले. चिमाजी अप्पांनी अनेक देवतांना नवस केले. वज्रेश्वरी भगवतीचा कौल घेतला. वज्रेश्वरीला महाकाली, रेणुका व वज्रेश्वरी अशा तीन शक्ती एकवटल्या आहेत. पालीचा बल्लाळेश्वर व थेऊरचा चिंतामणी यांचेही कृपाशिर्वाद घेतले, तसेच अनेक विद्वान ज्योतिषांस पाचारण करुन जयमुहूर्ताची शुभवेळ काढण्यास सांगितले.
उमराळे गावचे भास्करे घराण पहिल्यापासून याज्ञिकी, वैद्यकी, गायन व ज्योतिष यामध्ये निष्णात. त्या घराण्यातल्या धोंडूबुवा भास्करे यांनी ब्रह्मवृंदासमोर एक शुभलक्षण मुहूर्त काढून दिला. हा मुहूर्त घेऊन गंगाजी नाईक, देशमुख व काझींसह पुणे दरबारी रवाना झाले. तो मुहूर्त साधताना चिमाजीअप्पा सैनिकांना उद्देशून म्हणाले, `एक तर वसई फत्ते करा किंवा माझे शीर तोफेच्या तोंडी द्या...' रणांगणावर कालीचे थैमान सुरु झाले. योध्यांत शक्ती संचार झाला आणि त्यांचे रक्त शत्रुत्वेषाने उसळले. `हर हर महादेव' गरज तीन वेळा झाला. एक बाजूचा तट पडला. तेथून सैनिक आंत घुसले व थेट बालेकिल्ल्यांकडे त्यांनी धाव घेतली. या युध्दात, धर्मरक्षणासाठी चार हजार मराठ्यांचे बळी घेतले. आणि अखेर वसईची मोहीम फत्ते झाली.
अत्यंत आनंदीत झालेले चिमाजी अप्पा सर्वांना बक्षिसे वाटीत होते. `वसई जिंकली हेच आमचे बक्षीस' असे म्हणून सर्वांनी बक्षिसे नाकारली. धोंडूबुवाही मानधन स्वीकारत नव्हते. तेव्हा चिमाजी अप्पा म्हणाले, `आपण मानधन स्वीकारीत नाही पण आम्ही आपले ऊपाख्य `भास्करे' ऐवजी `जोशी' करतो. हे मानचिन्ह आपणांस स्वीकारावेच लागेल. तेंव्हापासून भास्करेंचे जोशी झाले. या घराण्याची पाचवी पिढी सध्या उमराळ्यात घराण्याची प्रतिष्ठा टिकवून आहे.

मोरेश्वरांचा जन्म / दैवी आघात
भगवान परशुरामांनी कोकणाची निर्मिती केली. क्षेत्र `शूर्पारक'. सध्या या क्षेत्रास `नाला-सोपारा' म्हणतात. ते वसई जवळ असून, ठाणे जिल्ह्यांत आहे. तेथे जवळच ऊमराळे गांव असून तेथे धोंडुबुवा जोशी (भास्करे) राहात होते. वृध्दापकाळी त्यांना मुलगा झाला. त्यांचे नांव रघुनाथ ठेविले. `रघुनाथ' मोठा झाल्यावर त्याचा विवाह नाळे गावांतील वेदशास्त्रसंपन्न लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे बहिणीशी झाला. प्रथम रघुनाथरावांना मुलगी झाली. नंतर ज्येष्ठ वद्य नवमी इ.स. १८३७ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नांव मोरेश्वर ठेवले. लक्ष्मणशास्त्री यांनी `मुलगा पुर्णायुषी व विलक्षण आहे', असे भविष्य वर्तविले. एखादा सत्पुरुष जन्माला येतांना संकटे व दु:खांची शिदोरी नियती त्यांना का देते हे समजत नाही. सत्पुरुषांच्या दैवाचा लेख मात्र असाच दिसतो. प्रापंचिक दु:खांच्या अग्नीनें होरपळल्याखेरीज त्यांना नश्वर जगाचा साक्षात्कार होत नसावा. मोरेश्वराचे तसेच घडले. मोरेश्वराच्या जन्माच्या सहावे दिवशी बहीण व बाराव्या दिवशी म्हणजे बारशाच्या दिवशीच पितृछत्र हरपले. पुढे पांचव्या वर्षी माता कालवश झाली. तेव्हा मामा लक्ष्मणशास्त्री यांनी त्यांची जबाबदारी सांभाळली. संस्कृत व ज्योतिषशास्त्र त्याला शिकविले. मामा देवी उपासक असल्याने ती उपासना त्याचकडून सिध्द केली. त्याचे प्रत्यंतर पुढे आलेच.

सिध्दांचा आशीर्वाद
काही दिवसांनी मोरेश्वराचे चुलत आजोबा बापू जोशी यांनी त्याला नाळ्याहून ऊमराळ्याला आणले. दोन काका व एक विधवा काकू, सर्वच विनापत्य. पण विभक्त राहात असत. एक दिवस बापू जोशींना निरोप आला की, चक्रेश्वर मंदिरात एक महंत आले असून बरेच शिष्य त्यांचे बरोबर आहेत व त्यांनी तुम्हाला बोलाविले आहे. म्हणून सर्वजण त्यांचे दर्शनास गेले. महंतांनी मोरेश्वरास विभूती लावली व आशीर्वाद देऊन म्हणाले, `पितृसुखाला पारखा झालेला हा बालक कीर्तिमान होईल व घराण्याचे नांव उज्जवल करील. याला प्रत्यक्ष परमेश्वरी अवताराचा अनुग्रह होईल.' आणि लगेचच त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले. हे महंत म्हणजे दुसरे कोणी नसून, मोरेश्वराचे एक चुलत आजोबा होते. ते अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी घरांतून निघून गेले होते. पुढे अनेक तीर्थे हिंडून तपश्चर्या करुन मयुरेश्वरांना आशीर्वाद देण्यासाठी उमराळ्यास आले होते.

मोरेश्वरांचा विवाह / संगीत विद्येचा अभ्यास
पूर्वी अल्पवयांत विवाह करण्याची पध्दती होती. पालघर तालुक्यातील एडवन गांवाचे राजवैद्य बाबाजी पुरोहित यांची कन्या गोपिका यांचे बरोबर मोरेश्वराचा विवाह झाला. गृहस्थाश्रम सुरु झाला. नित्याप्रमाणे ब्रह्मकर्मे, चक्रेश्वराची पूजा, मंदिरात गीतेचे पारायणही ते करीत असत. आजोबा, मोरेश्वर, गोपिका यांचा उदर निर्वाह उत्तम चालला होता. पण...

हरीण भुलले संगीतासी, मार्ग भ्रमवे तयासी, जखम होता हृदयासी, मार्ग तया सापडे ॥

मोरेश्वरांना संगीताची आवड. परंतु मार्गदर्शक मिळेना. वसईला वेदशास्त्रसंपन्न बाळाबुवा गोसावी नांवाचे एक उत्तम गायक होते. त्यांना शरण जाऊन, मोरेश्वरांनी संगीत विद्या आत्मसात केली. नंतर नालासोपारा येथील एका मित्राच्या सल्ल्याने त्यांनी संगीताचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. संगीतातून अभिनयाकडे वळले. मुस्लीम फकीराची नक्कल ते इतके उत्तम वठवीत की, असंख्य मुसलमान त्यांची वाहवा करु लागले. वादन कलेतही ते निष्णात झाले. गावोगावी त्यांना निमंत्रण येऊ लागली. संगीत, वादन, अभिनय तीन्ही एकवटून `ललीत' प्रकट झाले.

थनक थनक थै, थनक थनक थै, थनक थनक थै, ता ता, खेळ करी विधाता

एकदा नाला सोपारे येथे बुर्‍हान साहेब हँरिस यांचे पटांगणात असाच एक कार्यक्रम चालू होता. अचानक मामा लक्ष्मणशास्त्री व गुरु बाळाबुवा तेथे आले. पण दूर बैलगाडीतच बसून राहिले. मामांना आपले ज्योतिष खोटे होते की काय असा संशय होता. मोरेश्वरांची संगीत निपुणता पाहून ते खुष होते. पण नाराज होऊन त्याला भेटायला जाण्याऐवजी ते बैलगाडीतच बसून राहिले, कारण तोंड रंगविलेल्या पुरुषाचे तोंड पाहू नये तसेच...

स्त्रीचा वेष पुरुष घेता, पाहणारा जाई अध:पाता
आणि वेष घेणारा स्वत:, सप्तजन्म स्त्री होई

अशा सनातन विचारांचा पगडा त्यांच्यावर असल्यामुळे ते नाराज झाले. मोरेश्वरांना कोणी तरी त्यांचे मामा व गुरु आल्याचे सांगितले. त्यासरशी तडक मोरेश्वर तेथे आले व त्यांनी मामांना व गुरुंना नम्रतेने अभिवादन केले. मामा गहिवरले व गोड भाषेत त्याला समजाऊ लागले.
`गायन व संवादफेक यांत तू यश मिळविलेस हे खरे, पण हे ललीत किती दिवस चालणार ! रंगलेल्या जगांतले रंग कायम राहत नाहीत. मिळत असलेले पैसे व रंगेल लोकांच्या टाळ्या या क्षणभंगुर आहेत. यात शाश्वत सुखाचा लवलेशही नाही. आज डोक डोक्यावर घेतील व उद्या मडक्यासारखे खाली फेकतील. या असल्या अशाश्वत व भ्रामक आनंदापेक्षा शाश्वत आनंद कसा मिळवता येईल याचा विचार कर. सौंदर्य, आयुष्य व तारुण्य कायम टिकते नाही, जशी काकडी वेलावरुन केव्हा खाली पडेल याचा नेम नाही. वृध्दपणी देवधर्म करावा हे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण देहाला वृध्दत्व येईल किंवा नाही हे नियतीच ठरवीत असते. तेव्हा असले शृंगारीक जीवन सोडून, सत्य जीवनाचा मार्ग स्वीकारावा, त्यातच तुझे हित आहे. व्यतित आयुष्य, वेळ व संधी, पुन्हा परत मिळत नाही.'
मामांच्या या बोलण्याचा विलक्षण परिणाम झाला आणि ललीत आदि कलाविष्काराला तेथेच राम राम ठोकून, सत्य जीवनाच्या दिशेने त्याचे मार्गक्रमण सुरु झाले. ते अगदी अखेरपर्यंत...

स्वामी समर्थांचा दृष्टांत - अक्कलकोट यात्रा
पश्चात्तापाने शुध्द झालेल्या मोरेश्वरांच्या मनात आता प्रभु दर्शन कधी होईल, कोण मार्गदर्शक भेटेल, असे विचारांचे काहूर माजले. आणि एक दिवस मोरेश्वरांना स्वप्नात, आरक्त वर्ण, आजानुबाहू, लंबादर, शूर्पकर्णाकृती एक अतिवृद्ध, कौपिनधारी, ऊर्ध्वपुंड भव्य भाळावर रेखिलेली एक विभूती दिसली. अनेकांकडे चौकशी करता ते अक्कलकोटचे पूर्णावतारी श्रीस्वामी समर्थ आहेत असे त्यांना कळले व त्यांच्या दर्शनाचा त्यांना ध्यास लागला. त्यांची अनुमती मिळविली व `स्वामींचे दर्शन होईपर्यंत पाणीही पिणार नाही' अशी प्रतिज्ञा करुन प्रज्ञापूरच्या परब्रह्माचा मागोवा घेत घेत त्यांचे मार्गक्रमण सुरु झाले. पाचशे-सहाशे किलोमीटरचे अंतर तुडवित अखेर ते अक्कलकोटास पोहोचले. एका उंच डोंगरावर श्री स्वामी समर्थ बसले होते. कामार्थी, आर्त, जिज्ञासू त्यांचा भवंती गराडा होता. ज्याच्या त्याच्या पदरांत त्याच्या त्याच्या श्रध्दे-प्रमाणे माप पडत होते. इतक्यात नित्यावधूत देहभानावर येऊन म्हणाले, `या वेड्यास काय म्हणावे ? मी त्याला सोपार्‍याला दर्शन दिले तरी माझ्या दर्शनास पुन्हा इथे येतो.' हे शब्द मयुरेश्वरांना उद्देशून होते. पण उपस्थित लोकांना याचा उलगडा होत नव्हता. इतक्यात मोरेश्वर डोंगर चढून वर आले व स्वप्नीचे रुप प्रत्यक्ष पाहिल्यावर दृष्टांत या शब्दाची ओळख पटून त्यांनी स्वामींना -,

नमाम्यहम्‍ दिव्य रुपं जगतानंद दायकम्‍, महायोगेश्वरं वंदे ब्रह्मा विष्णू महेश्वरम्‍
असे म्हणत, साष्टांग दंडवत घातला. डोळ्यांतून उष्णगंगा वाहू लागली. `याच देही याच डोळा' सगुण ब्रह्माचे दर्शन झाले. देह अधांतरी तरंगत असल्याचा भास झाला. जगनियंत्या जगन्नाथाने त्यांना सनाथ केले.

मोरेश्वर जोशी आणि गणपती घुगरदरे
श्री स्वामी समर्थ म्हणाले, `तुला घरी दर्शन दिल्यावर, इतका त्रास घेऊन पुन्हा इथे कशाला आलास ? ताबडतोब निघ, तुझी पत्नी देवाजवळ अन्नपाणी वर्ज्य करुन बसली आहे. तू गेल्याशिवाय ती काही खाणार नाही... तू लवकर निघ...'
हे ऐकल्यावर मोरेश्वरांची स्थिती शिल्प कोसळल्यासारखी झाली. ज्या परब्रह्माचे दर्शन झाले, त्याची सेवा करण्याचे भाग्य आपल्या नशीबी नाही. इतका खडतर प्रवास करुन आल्यावर स्वामींच्या सहवासात काही काळ घालवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतू स्वामींच्या वक्तव्याने ते व्यथित झाले. मोरेश्वरांच्या मनीची अवस्था स्वामींनी ओळखली आणि एक स्वानंदेश मयुरेशाची एक मूर्ती मोरेश्वरांच्या हातात प्रसाद म्हणून ठेवून, `याची सेवा कर' असे त्यांना सांगितले. लगेच एक पितळी पादुकाही त्यांना दिल्या आणि मोठया दगडावर कोरलेल्या पादुका देऊन सांगितले. `तू मेल्यावर, या तुझ्या डोक्यावर ठेवण्यास सांग. राम मंदिराची स्थापना कर. तुझ्या वंशांत सात पिढ्या कीर्तन परंपरा चालेल. आमची ध्वजा उभी कर. जा सोपार्‍याला पुन्हा. माझे दर्शन तुला निर्मळच्या यात्रेत होईल.'
तेवढ्यात समोर आलेल्या एका १२-१३ वर्षाच्या मुलास श्री स्वामी मांडीवर घेऊन बसले. त्या मुलाचे नांव `गणपती.' ही गोष्ट १८५८-५९ सालची असावी. हाच मुलगा पुढे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून प्रसिध्द झाला. म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि मोरे-श्वर तथा मयुरानंद सरस्वती यांची भेट एकाच दिवशी अक्कलकोट येथे झाली होती, हे यावरुन सिध्द होते.

मोरेश्वर झाल मयुरानंद
श्री स्वामींची कृपा होऊन मोरेश्वर घरी परतले, ते मयुरानंद होऊनच. घरी त्यांची पत्नी देवाजवळ अन्न पाणी वर्ज्य करुन बसली होती. अक्कलकोटास झालेले श्री स्वामींचे दर्शन, त्यांनी दिलेला प्रसाद व आशीर्वाद वगैरे हकीगत त्यांनी आजोबा व पत्नी यांस सांगितली. आजोबांना वंश कृतार्थ झाल्याने आनंद झाला व अष्टभाव दाटून आले. मामांनाही आपले ज्योतिष सत्य असल्याची खात्री झाली आणि त्यांचेही नेत्र भरुन आले. जिकडे पहावे तिकडे श्री स्वामी समर्थच दिसून लागले. प्रत्यक्ष परब्रह्माची कृपा झाल्यावरही मयुरानंद मूर्तीपूजा करीत. परंतु सर्वसाधारण लोक आकारात्मक देवता मूर्ती पाहून वैकल्पिक पूजा करतात. प्रत्येक देवतेचे विग्रहाप्रमाणे स्वतंत्र उपचार करतात. त्यात मूळ तत्त्वापेक्षा अवडंबरच जास्त असते. परंतु मयूरानंदाजवळ प्रासादिक गणेशमूर्ती, पादुका व मामांकडून आलेली देवी उपासना अशा विविध उपासना होत्या व ते ब्रह्मभावाने सर्व देवतांचे अर्चन करीत असत. त्यामुळे तेथे वेगळेपणाचा भाव नसे. श्री स्वामी समर्थ पूर्णब्रह्म. विविध स्थानी त्यांनी आपला देवतात्मक आविष्कार अनेक भक्तांस त्यांच्या त्यांच्या उपास्याचें रुपानें दर्शविला आहे. म्हणजेच श्री स्वामी समर्थ हे निर्गुण ब्रह्माचे सगुण साकार रुप असून, श्री स्वामी समर्थांची कृपा झाल्यावर पूर्ण ब्रह्मानुभूती येऊन `ब्रह्मनिष्ठ' होतो. तसे ब्रह्मनिष्ठ होण्याचे भाग्य पूर्वपुण्याईने श्री मयूरानंदास लाभले. अशा ब्रह्मनिष्ठास मूर्तिपूजेची आवश्यकता नसते. `सर्वत्र ब्रह्म व्याप्त असता पूज्य व पूजक विभक्त कोठे रहातात?' सर्वत्र ब्रह्मतेजच विखुरलेले असते, मी व तू हा भेदच राहात नाही. परंतु ही अवस्था आत्मतल्लीनतेची असते. पुन्हा देहभानावर आल्यावर मायारुपाचा साक्षात्कार होत रहातो. ब्रह्मनिष्ठ असलेले लोक, इतरांना साधन करता यावे, यासाठीच मूर्तिपूजा, कीर्तन, प्रवचन, नामजपादी साधने करतांना दिसतात. मात्र या कर्मकांडापासून अंतस्थ ते पूर्ण अलिप्त असतात. ब्रह्मनिष्ठांची मायाजगतातील सर्व बंधने तुटलेली असून, तो अवधूत सदृश्य असतो. ऋ अक्षर, वृ वरेण्य, धृ धूतपापकल्मषा, तृ तत्वमसि. परंतु जगदृष्ट्या जगाप्रमाणे वागावे लागते. म्हणून मयुरानंद मूर्तिपूजार्चादी कर्मे करत असत. एखाद्यावर ईश्वरानुग्रह झाला किंवा त्याला त्याच्या अनुष्ठानाने सिध्दावस्था आली म्हणजे स्वार्थी लोकांची अशी समजूत होते की त्याची पुण्याई आपली कर्मलक्तरे धुण्यासाठीच आहे. पण खरा सत्पुरुष असल्या लोकांतात पडत नाही. तो एकांतात आपल्या साधनेत दंग असतो. ज्यांना लोकेपणा वा वित्तेपणा आहे, असले तथाकथित सत्पुरुष हरिद्राकणाने पिवळे होतात. पण त्यांची अधोगती उंबर्‍यात थांबलेली असते.

पापे तुमची, आम्ही का निस्तरायची?...
श्री मयुरानंदांचे बाळारामभाऊ नांवाचे आप्त होते. त्यांना महारोग झाला होता. तो आटोक्यांत न येणारा रोग कोणाच्या तरी पुण्याईने जाईल असा विचार करुन, मोरेश्वर हल्ली फार देवदेव करतो, तो निश्चित उपाय सांगेल म्हणून ते त्याचेकडे आले. मयुरानंदांना बाळारामभाऊंची कीव आली व त्यांच्या व्याधी निवारण्याकरिता त्यांना ते अक्कलकोटला घेऊन गेले. महारोग संसर्गजन्य असूनसुध्दा मयुरानंदांनी बाळारामभाऊंबरोबर अक्कलकोटपर्यंत प्रवास केला. वेळ रात्रीची. श्री स्वामी समर्थ एका शेकोटीजवळ शेकत बसले होते. मयुरानंदांनी बाळारामभाऊंस श्री स्वामींना शरण जाण्यास सांगितले. त्याला पाहताच श्री स्वामी उद्गारले, `तुम्ही पापे करायची व आम्ही ती का बरी करायची ?' असे म्हणून शेकोटीतला एक निवडुंगाचा फणा स्वामींनी त्यांच्याकडे फेकीत म्हटले, ` हा उगाळून लाव. मात्र यापुढे परान्न भक्षण करु नकोस.' यावरुन परान्नास किती दोष असतो हेही सिध्द होते. परान्नातून परप्रारब्ध भोगावह होते. मयुरानंदांना परपीडेचे दु:ख होते. वास्तविक मयुरानंद स्वत:च बाळारामभाऊस व्याधिमुक्त करु शकले असते, परंतु कर्तृत्व आपणाकडे न घेता ते श्रीगुरुस दिले आणि बाळारामभाऊ श्री स्वामींच्या कृपेने व्याधीमुक्त झाले.

धर्मग्रंथांचा अभ्यास / सत्याळा येथे कीर्तनारंभ
श्री स्वामी समर्थांनी सात पिढ्या कीर्तन परंपरा राहील असा आशीर्वाद मयुरानंदांना दिला होता. त्यानुसार कीर्तनाची गादी स्थापण्याचा विचार करुन त्यांनी धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी निर्मळ-भाईंदर भागात ढोलेबुवा व निपुणकर बुवा हे दोघे निष्णात किर्तनकार रहात होते. मयुरानंद त्यांना भेटले. कीर्तनासंबंधी त्यांनी त्यांच्याकडून प्राथमिक धडेही घेतले. अभ्यास केला. आणि सत्पाळा गांवी एका हनुमान जयंतीच्या प्रसंगी मयुरानंदांनी प्रथम कीर्तन केले. श्रोते इतके समरस व लुब्ध झाले की, त्यांनी मयुरानंदांना `मोरेश्वरबुवा' ही उपाधी लावली. येथेच प्रथम कीर्तनाचा श्रीगणेशा झाला.

उमराळे येथे श्री राममंदिर उभारणी (१८९०)
श्री स्वामींनी राममंदिर बांधण्याचा आदेश दिला होता. त्याला फार काळ लोटला होता. भिक्षुकी, पूजाअर्चा व कीर्तनविदागी यांतून अर्थसंचय करणे मयुरानंदांना अवघड होते. तरीही त्यांनी राममंदिर उभारण्याच्या कार्याला प्रारंभ केला. काळबादेवी येथे मूर्तीचा बाजार भरत असे. एकदा मयुरानंद मूर्ती खरेदी करण्याकरिता तेथे गेले. परंतु मनासारख्या मूर्ती नव्हत्या. म्हणून ते ग्रँट रोड स्टेशनवर येऊन बसले. त्यांना पानथरी हा गुल्माचा विकार होता. पोटदुखीने त्यांना वेदना होऊ लागल्या, म्हणून त्यांनी गांजा ओढण्यास सुरुवात केली. गांजा ओढल्याने वेदनाशमन होई. म्हणून ती सामुग्री ते नेहमी जवळ बाळगीत. ते पाहून, राजस्थानी पेहराव केलेला एक सुंदर तरुण मयुरानंदांना म्हणाला, `मुझे भी चिलीम दो.' मयुरानंद त्यांना चिलीम देत म्हणाले, `मेरे पास दो गोलियाँ है । मैं नशा नहीं करता, यह मेरे बिमारीका इलाज है ।' त्या तरुणाने गांजाच्या दोन्ही गोळ्या चिलीमीत घालून अशी चिलीम ओढली की मयुरानंदांची व्यथा नाहीशी झाली. तो तरुण कोण असावा ?

अक्कलकोटला शेजारतीनंतर एक पद म्हणण्याची पध्दत आहे.
लेना जी महाराज हुक्का भी लावो, दीनके दयाल स्वामी अर्ज सुनियो ॥

दोघांनी एकमेकांची विचारपूस केली आपली ओळख सांगून मूर्ति खरेदी करण्याकरिता इकडे आलो होतो असे मयुरानंद म्हणाले. त्यावर `आपण ब्राह्मण आहात. माझ्या पेटीत तीन मूर्ती आहेत. एकाने मला मूर्ती घडविण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी दुसरीकडून मूर्ती घेतल्या.' असे म्हणून तरुणाने आपल्या पेटीतील राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती मयुरानंदांना दाखविल्या. त्या मूर्ती पाहून मयुरानंदांचे मन प्रसन्न झाले. पण मूर्तीकार मोबदला घेईना व मयुरानंद विनामोबदला मूर्ती घेणे पटत नव्हते. कोणतीही तडजोड झाली नाही आणि गाडी आल्यावर मूर्तीकार निघून गेला. मूर्ती आवडल्या, पण व्यवहार जमला नाही, यांचे मयुरानंदाना खूप वाईट वाटले. मूर्तीचा ठसा पुसला जाईना. मात्र घडलेल्या गोष्टीची कुठेही वाच्यता न करता स्वस्थचित्त राहिले. कांही दिवसांनी मयुरानंदांना विरार स्टेशन नियंत्रकाने पाचारण केले. तेथे गेल्यावर नियंत्रकाने त्यांच्या हाती एक टपाल ठेवले व बाजूला ठेवलेले पार्सल दाखविले. मयुरानंदांनी टपाल फोडले. त्यांत मजकूर होता...

जय श्रीरामजीकी
मैं जो करने जा रहा हूँ, कदाचित्‍ ये बात आपको राज ना आए । मेरी इच्छा है की, श्री रामजी, लखनजी और सीतामैय्या की मूर्तियाँ आपकोही भेट दे दूँ ।
आपसे कीमत नही ले सकता । ये मूर्तियाँ अगर आपको सौंप दूँ तो, जिस मंदिरमें उन्हें आप प्रतिष्ठान करेंगे वहाँ ईश्वराधनका बहुत बडा केंद्र होगा, यह मेरा विश्वास हैं ।
आप मेरी विनती का सम्मान करें, यही अपेक्षा ।...
आपका, अपना

मयुरानंदांनी हे पत्र वाचून समग्र हकिगत स्टेशन नियंत्रकास सांगितली तेव्हा ते म्हणाले, `अर्पण केलेल्या श्री मूर्तींचा आपण स्वीकार करावा...'
मयुरानंदांनी मूर्तींचा स्वीकार केला पण पार्सलवरील पत्तानुसार मयुरानंदांनी मूर्तिकाराला पत्र पाठवून पत्र पाठवून कळविले की `आपली पूजा झाल्याखेरीज प्राणप्रतिष्ठा होणार नाही' `जय जय हे बजरंग कपिवर श्री हनुमंता' अशा रितीने चक्रेश्वर मंदिराजवळ राममंदिर बांधण्यास सुरुवात झाली. मयुरानंदांचे सन्मित्र त्यांना म्हणाले, `राममंदिर म्हटले की मारुतीराया हवेतच.' मयुरानंद शांतपणे म्हणाले, `जसे रामप्रभू आले, तसेच हनुमान ही येतील...' आणि मंदिराचा पाया खोदण्याचे काम चालू असतां मारुतीची मूर्ती सांपडली. झाले, रामपंचायत पूर्ण झाले. ज्यावेळी पोर्तुगीज हिंदू प्रजेचा छळ करीत होते, त्यावेळी सोपारावासींयांनी मूर्ती भग्न होतील या भीतीने मूर्ती जमिनीत पुरुन ठेवल्या असे इतिहास सांगतो. अशाच पैकी ही हनुमंताची मूर्ती असावी. प्रतिष्ठेच्या वेळी मूर्तिकारास पाचारले, त्याची `विश्वकर्मा' म्हणून पूजा केली व तो नाकारत असतांना दक्षिणा स्वरुपात त्याला धन दिले. याप्रमाणे श्रीराममंदिराची स्थापना झाली. मूर्ती व मंदिर निर्माण याबद्दल विचार करतां सर्वांच्या मनांत एकच कुतूहल निर्माण झाले व त्याचे निराकरण कोणलाही करता आले नाही. की हा मूर्तिकार कोण ? अद्यापी सर्व याबाबत साशंकच आहेत. असो. ईश्वरेच्छा बलियासी.

निर्मळची यात्रा / चंद्रशेखर बाणाची प्राप्ती
`निर्मळच्या यात्रेत भेटेन' असे पहिल्याच भेटीत श्री स्वामींनी मयुरानंदांना सूचित केले होते. त्याचे स्मरण होऊन हे निर्मलच्या यात्रेला गेले. `श्री स्वामींचे दर्शन होणार' या आनंदात संपूर्ण यात्रा धुंडाळली पण स्वामी भेटले नाहीत. फिरताना, धार्मिक वस्तूंची दुकाने होती, तेथे एका दुकानाजवळ ते थांबले. माळा, शंख, रुद्राक्ष, शाळीग्राम, बाणलींगे अशा वस्तु तेथे होत्या. साधुवेषातील दुकानदार तेथे धुनि लावून बसला होता.

बाणलींगे पाहता ना, एका बाणावर चंदन लावून त्यावर बेल वाहिलेला होता. दुकानदारास विचारता त्याने तो चंद्रशेखर असल्याचे सांगितले. मयुरानंदांनी त्याची किंमत विचारली.
साधुबुवा म्हणाले, `हा बाण अति दुर्मिळ असतो. नर्मदेत हा फार क्वचित मिळतो. हा माझे गळ्यातील ताईत आहे, माझा आत्मा आहे. मला हा विकायचा नाही, अन्य कोणताही बाण घ्या.' परंतु मयुरानंद त्याच बाणाकरिता हटून बसले. शेवटी साधुबुवा म्हणाले की, `तुझी परीक्षा घेतल्याशिवाय बाण देणार नाही. मी बाणलिंगावरचे बिल्वपत्र तुझ्या दिशेने फेकीन. ते जर तुझ्या उपरण्यात पडले तर मी हा बाण मी तुला देइन.' त्याप्रमाणे साधुबुवांनी बेलपत्र फेकताच ते मयुरानंदांच्या उपरण्यात पडले. साधुबुवांनी तो बाण धुनीत टाकला व म्हणाले, `बेटा, तेरा तकदीर अच्छा हो, तो बाण नहीं टूटेगा.'

थोडया वेळाने बाण धुनीतून काढला, तर तो लालबुंद झाला होता. मग साधुबुवांनी तो गार पाण्यांत टाकला, तरी तडकला नाही. साधुबुवांनी तो शुध्द चंद्रशेखर मयुरानंदांना देत आशीर्वाद देत म्हटले, `आता तुला भय नाही. तुझे व तुझ्या वंशजांचे भाग्य उज्जवल आहे. तुझ्या वंशाची कीर्ति वाढेल. या बाणाची नित्य पूजा करीत जा.' नर्मदेतील बाणलींगे किती महत्वाची व सिध्द असतात ते यावरुन समजून येते. चंद्रशेखर हातांत पडतांच मयुरानंद आनंदाने निघाले, थोडे पुढे गेल्यावर आपण त्या दुकानदाराला स्वामींसंबंधी विचारावे म्हणून परत फिरले व जेथे दुकान होते तेथे पोहोचले तर दुकान, दुकानदार व धुनी कांहीही नव्हते. शेजारील दुकानदारास विचारता तेथे दुकानच नसल्याचे त्याने सांगितले. आणि `मी निर्मळच्या यात्रेत भेटेन.' हे स्वामींचे वचन आठवले. परंतु मायेच्या आवरणामुळे आपण स्वामींना ओळखले नाही. स्वामींनी नुसते दर्शन न देता स्वत:चे आत्मलिंग दिले याचा त्यांना परमसंतोष झाला. मयुरानंदांसारखे महान भक्तही स्वामींना ओळखू शकले नाहीत. तर ज्यांच्याशी स्वामी रोज बोलतात व व्यावहारिक सल्ले देतात, ज्यांच्या हातांने जेवतात, त्या भक्तांचा महिमा व निष्ठा किती आहे याचे मोजमाप भगवंतच करु शकतात.

रामरसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपतीके दासा ॥

एकदा श्रीरामनवमीचे उत्सवांत मयुरानंदांचे कीर्तन सुरु होते. रामलीला-अमृतपान करण्याकरितां त्यांच्या घरातील सर्व मंडळी व गांवातले भक्त जमा झाले होते. ही संधी साधून शेजारील गांवातील दोन चोर मयुरानंदांच्या घरात घुसले. घरांतील सर्व मौल्यवान ऐवज घेऊन बाहेर पडत असतां त्यांना दोन तरुणांनी आडविले व रागाने त्यांना विचारले, `घरचा मालक आपले कर्तव्य पार पाडीत असतां, तुम्ही इकडे कशाला आलात ?' चोरांनी त्यांची क्षमायाचना केली. एवढ्यांत मयुरानंद घरी आले. चोरांना पाहताच ते घाबरुन गेले. परंतु चोरांनी त्यांचे पाय धरले. चोरांची योग्य संभावना व सत्कार करुन मयुरानंदानी त्यांची पाठवणी केली. `राम लक्ष्मण, जानकी, जय बोलो हनुमानकी.' देव भक्तांचे रक्षण करतो हेच सत्य.

गासगावची दुर्गादेवी
ऊमराळे गांवाजवळच्या गास गांवाचा हासा पाटील नांवाचा पोलीस पाटलाला राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्याच्यावर खटला चालू असतां तो मयुरानंदांना शरण आला. मयुरानंद म्हणाले, `या लोकांनी जरी ठरविले तरी तुम्हाला मृत्युदंडाची शिक्षा होणार नाही. मात्र गास गांवात दुर्गादेवी आहे. तेथे आश्विन नवरात्रांत सप्तशतीचे अनुष्ठान ठेवा. स्वत:ला गुडघ्यापर्यंत जमिनीत पुरुन घ्या. वर सप्तधान्ये टाकून मांडीवर कलश घ्या व सतत दुर्गेचे ध्यान करीत रहा.' इकडे पाटलाच्या मृत्युदंडाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होऊन, फाशीची तयारीही झाली होती. ज्यादिवशी खटल्याची अंतिम तारीख होती. त्यावेळी मयुरानंद पाटलाला म्हणाले, `दुर्गास्मरण करीत निर्भयपणे कोर्टात जा...' पाटील कोर्टात जात असतां एक घोडेस्वार समोरुन आला व पाटलांना नमस्कार करुन म्हणाला, `आपण निरपराध असल्याची सरकारची खात्री झाली असून, खटला रद्द केला आहे आणि पूर्वी बंद केलेले अश्वारोहण व दारांत सनईचौघडा वाजविण्यास आता परवानगी दिली आहे. `हे वृत्त ऐकताच पाटील स्तब्ध झाले व त्वरीत जाऊन त्यांनी मयुरानंदांचे पायास मिठी घातली.

`या देवी दुर्गती हारिणी, नमस्तस्यै नमो नम:'

ऊमराळे येथे ओहळीचे झाडांत ऊमादेवीचे मंदिर आहे. अनेक भक्तांचे ते श्रध्दास्थान आहे. एके वर्षी ऊमराळे परिसरांत प्लेगची साथ सुरु झाली. महामारीने गांव ग्रासला तर अतीव मनुष्यहानी होणार होती. ग्रामजन ईश्वराधन करीत होते. मयुरानंद भल्या पहाटे मंत्र पुटपुटत मंत्रोच्चारीत जलाचे सर्वत्र प्रोक्षण करीत असत. गांवातील सखाराम व मुकुंद देशमुख यांना या कृतीचे कुतुहल वाटले. एक दिवस दुपारी याबाबत विचारले असता, मयुरानंद उत्तरले, `साथ निवारण होण्याकरिता सप्तशृंगभगवतीचे ध्यान करुन सप्तशती मंत्रांनी सिध्द केलेले उदक प्रोक्षण करीत दिग्बंधन करीत असतो.' तेव्हा देशमुखांनी मयुरानंदांना विनंती केली की गावावर कधीही अरिष्ट न येण्याकरिता काय करावे ? तेव्हा मयुरानंद उद्गारले, `श्री ऊमादेवी या ग्रामदेवतेची यात्रा दरवर्षी भगवावी व तीन वर्षांनी एकदा चंडीयाग करावा.' मयुरानंदांचे सांगण्यावरुन, प्रथम याग मयुरानंदांचे पौरोहित्याखालीच संपन्न झाला. अजुनही ही प्रथा अव्याहतपणे चालू आहे.

मयुरानंद तथा `भाऊंचे' संन्यासग्रहण
मयुरानंदांना सर्वलोक `भाऊ' या नांवाने संबोधीत. त्यांचे पुत्र गोविंद घरची सर्व जबाबदारी सांभाळीत होते. एक दिवस स्वामींचे स्मरण करीत त्यांच्या पत्नीने इहलोकीची यात्रा संपवली. त्यानंतर लवकरच मयुरानंदांनी संन्यास ग्रहण केला. त्यांचे संन्यासोत्तर नाव `परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी मयुरानंद सरस्वती' झाले. त्यांचे संन्यासगुरु कोण होते हे अज्ञात आहे. पण संन्यासपदावरुन त्यांची दीक्षा शृंगेरी पीठाची असावी, कारण सरस्वती संन्यासपट शृंगेरीचा आहे. शंकराचार्यांच्या चारी मठांचे संन्यासपट ठरलेले असतात. परंतु त्याचे प्रयोजन नसल्याने अधिक लिहित नाही. शृंगेरी पिठाची अधिष्ठाती देवता शारदांबा आहे. प्रत्येक पिठास एक संन्यासी व एक ब्रह्मचार्‍याची परंपरा असते. मात्र हल्ली कोणत्याही पिठावर ब्रह्मचारी परंपरा नाही.  संन्यास दीक्षेनंतर मयुरानंद सरस्वती यांचे अधिक काळ वास्तव्य राममंदिरातच असून सदासर्वकाळ ते चिंतनात मग्न असत. बाहेरगांवचे कीर्तनादी कार्यक्रम, देवपूजा आदी त्यांचे पुत्र गोविंदराव करीत असत. एके वर्षी श्रीरामजन्मोत्सव कालात अष्टमीच्या दिवशी गोविंदराव कीर्तन करीत असत. एके वर्षी श्रीरामजन्मोत्सव कालात अष्टमीच्या दिवशी गोविंदराव कीर्तन करत होते. संत गोरा कुंभार आख्यान लावले होते. गोरा कुंभाराची भजन तल्लीनता ऐकता ऐकता श्रोतृवर्ग पांडुरंगी रंगला होता. मयुरानंद स्वामीही श्री स्वामीस्वरुप पांडुरंगाच्या लीला ऐकण्यात मग्न होते. पण अचानक रंगाचा बेरंग होऊ लागला. गीतांना सूर लागेना, तबल्याचा ठेका चुकू लागला. गोविंदरावही गोंधळल्यासारखे झाले. श्रोत्यांत अस्वस्थता वाढली. अचानक असे काय होते याचा मागोवा कोणासही घेता येईना. ईश्वरी संकेत कांही आहे कां ? हे जाणण्याकरिता मयुरानंद स्वामींचे लक्ष देव गाभार्‍याकडे गेले व आश्चर्याने ते पहातच बसले. कारण गर्भागारांत फक्त लक्ष्मण व सीता यांच्याच मूर्ती होत्या. `रामप्रभू नव्हते. त्यांची जागा रिक्त होती. हे मोठे गूढ होते.

कल्याण करी रामराया
मयुरानंद स्वामींनी गोविंदरावांना कीर्तन आटोपते सांगितले. कांहीतरी अघटित आहे याची जाणीव त्यांना झाली. कीर्तन लवकर कां संपविले याचे कारण कळले नाही, पण श्रोते आपापल्या घरी परतले. मयुरानंद स्वामी देवळातच निद्रा घेत. पण आज निद्रा येत नव्हती. श्रीराम कोठे असतात हे मारुतीरायांना माहीत असते म्हणून त्यांनी मारुतीरायाची आळवणी करण्यास सुरुवात केली. आणि उत्तररात्रीला मूर्ती आपल्या स्थानीं पुन्हा प्रकट झाली. श्रीराम अदृश्य होण्याचे कारण कोणाचा विचारणार ? पण त्याची व्यवस्थाही प्रभूंनीच केली होती. रामनवमीची पहाट. अचानक त्यांचे शेतातील राखण-दार धापा टाकत आला व मयुरानंद स्वामींना सांगू लागला, `काल शेतास अचानक आग लागली पण कोणी व कशी विझविली हे कळले नाही. मात्र पिकाचे कांहीही नुकसान झाले नाही. उभ्या आगीत पीके आहेत तशीच आहेत.' अश्रुपूर्ण नयनांनी मयुरानंदस्वामी रामाकडे पाहू लागले. मला यातले कांहीच माहीत नाही असे भाव श्रीरामाच्या मुखावर होते. कधीही असत्य न वदणार्‍य़ा रामाने चेहेर्‍यावरील भाव मात्र अनृततेचे दाखविले. आणि मयुरानंद स्वामींचे मुखातून कारुण्यस्वर बाहेर आले, `कल्याण करी रामराया' श्रीरघुनंदना आपल्या प्रेमापोटी व कायम आपले सान्निध्य लाभण्या-साठी प्रापंचिक सर्व पाश तोडून मुक्त झालो. पण आपण मात्र माझ्या पूर्वाश्रमीच्या आप्तांचे रक्षण करतां, आपली लीला अगाध आहे. पूर्वाश्रमीच्या आप्तांच्या स्मृती जागृत करुन आपण मला पूर्वप्रपंचात लोटता. संन्याशालासुध्दा आपण शांत बसून देत नाही, कदाचित हा खेळ आपल्या वामांगी असलेल्या मायेचा असावा. आपल्या अध्यक्षतेखाली हे तिचेच मायाजाल आहे. देवा, आतां एकच मागणे आहे कीं आपल्या चरणकमळी भ्रमर होऊन असावे.

नको हा प्रपंच, नको पूर्व स्मृती, तुझ्या पदीं रघुपती, राहीन सर्वदा
जेथे नाही भंग, अभंग तुझे जग, राहीन प्राशित सवंग, तुझे नामाचा
मायाधीशा तुचि, अससी मायामुक्त, तेथे तुझे सुख, अनुभवीन मी
जन्म माझा कृतार्थ, जाहलासे आज, नसें कांही काज, आतां चित्ती
नको जन्ममरण, तुटो हे रहाटण, करी सिध्द संकल्पना, चापपाणी हे
जाणे आतां रामनगरी -

रामनवमीचा दिवस, मयुरानंद सरस्वती कीर्तनास उभे राहिले व गोविंदबुवांना आपल्या मागे उभे राहण्यास सांगितले. गोविंदबुवा साध्या वेषातच उभे राहिले. कीर्तनात श्रोते इतके दंग झाले की, रामकथेच्या प्रसंगाचे सर्व त्यांच्या उघड्या डोळ्यांनी ते पहात होते. कीर्तन
रंग सरत आला व मयुरानंद स्वामींनी कोमल भैरवीचे स्वर आळविल.

जीवनांत माझ्या मी ही, राम गुंफीन,
सकल इंद्रियांनी माझ्या, राम सेवीन.
हृदयी राम मस्तकी राम, कणकणांत भरला राम,
रामरसे जीवन प्याला, भरुन राहीन,
आजानुबाहू भगवान, दुर्वांचा धरिला वर्ण,
पद्मासनी दिसतो मजला, चाप घेउन.
अंकावरी सीत बसली, तीन बंधु ढाळिती चवरी,
पदानिकटी बसे मारुती, वायु नंदन.

आणि सद्गतीत कंठाने श्रोत्यांस म्हणाले, `पुढच्या वर्षीही रामोत्सवास आपण अवश्य यावे. मात्र मी नसेन. पुढच्या अष्टमीस मी रामनगरी गमन करणार आहे. नियमीत आपण मंदिरात यावे. येथे श्री स्वामी समर्थच अनेक रुपाने अवतरले आहेत. गणपती, चंद्रशेखर, रामपंचायतन, श्रीचरण पादुका ही सर्व रुपे श्री सद्गुरु श्री स्वामी समर्थांचीच आहेत यांत संदेह नाही. मीच राम व मीच कृष्ण होतो हे प्रत्यक्ष स्वामी समर्थांचे मुखींचे वचन आहे.' साश्रुनयनें सर्वांस बोधून स्वहस्ते सुंठवडा वाटला. आणि वातावरण गंभीर झाले.

राग - भैरवी
स्वामी कृपेविण, असार जीवन, ब्रह्म हे सगुण, अवतरले की
स्वामीराम नाम, सदा स्मरा मुखे, त्रैलोक्याची सुखे, तुवां लाभतील
छेलीग्रामी अवतरे, प्रज्ञापुरी बैसले, तोषवित भक्तांना, आपुल्या कृपे
स्वामीनाम मंत्रमय, सरतसे दु:खभय, पांच अक्षरांचे काम, श्री स्वामीराम, श्री स्वामीराम

ब्रहात्तर रोग नाशी कृमिघ्न काढा / अपत्य प्राप्तीसाठी औषध
एकदा एक यती त्यांच्या दरवाजांत येऊन थांबले. वेळ सकाळची. सर्व नैमित्तिक कर्मे संपवून मयुरानंद स्वामी शांत बसले होते. यतींना पाहतांच उठून आनंदाने त्यांचे स्वागत केले. यती म्हणाले, `दौत टाक घेऊन या. व मी सांगतो ते लिहून घ्या.' यतींनी त्यांना कांही औषधे, त्यांची प्रमाणे व मात्रा सांगितली, त्याप्रमाणे मयुरानंदांनी ते सर्व लिहून घेतले. यती म्हणाले, `पोटात होणार्‍या जंतांचे हे कृमिघ्न औषध आहे. तसेच अपत्य होण्यास उपयुक्त पडतील अशीही औषधे आहेत. रुग्णास ही औषधे दे. माफक धनाचा स्वीकार कर.' मयुरानंदांना जाताना त्यांनी एक नाणे दिले व `तुला नित्य धन प्राप्त होईल. तुझा योगक्षेम आम्ही चालवू.' असा आशीर्वाद देऊन यती निघून गेले. मयुरानंद भानावर आल्यावर यतिंचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले परंतु ते सापडले नाहीत. साक्षात स्वामीच यतिरुपात मयुरानंदांच्या गृही आले आणि त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी उदरनिर्वाहाचे साधन देऊन अदृश्य झाले. स्वामींची लीला अगाध आहे हेच खरे.

अखेरचे किर्तन / निजानंदगमन
सत्पाळा गावी हनुमान जन्मास त्यांनी कीर्तन केले व श्रोत्यांस म्हणाले, `स्वामींची कृपाच अमोघ, लळितांतून त्यांनी नारदगादीवर उभे केले. मारुतीरायांच्या साक्षीने कीर्तनाचा श्रीगणेशा झाला. श्री स्वामी कृपेने माझे जीवन कृतार्थ झाले. त्या कीर्तनगादीच्या विश्वात्मकाला हे अखेरचे वंदन. `ऊमराळ्याप्रमाणे येथेही त्यांनी सुंठवडा वाटला. मारुतीच्या पुजार्‍यांनी पुन्हा पुढचे वर्षी यावे म्हणून श्रीफळ दिले. ते त्यांनी परत केले व म्हणाले, `आता पुन्हा येणे नाही. अष्टमीस श्रीराम ! ....' अष्टमीचे आधी सर्व भक्तजन ऊमराळ्याला आले. केव्हा काय घडेल याचा अंदाज घेता येत नव्हता. गोविंदबुवांना बोलावून सांगितले, गीतापठण करुन आपण नश्वर देहाचा त्याग करणार. हालचाल मंदावली होती. राजवैद्य सखारामशास्त्रींनी नाडी पाहून म्हटले, `भाऊ, आतांत नाडी बंद पडली आहे, गीतापठण होणार नाही....' त्यावर स्वामी प्रसन्नतेने हसत बोलले, श्री स्वामीं महाराजांचे आम्हास अभय आहे. श्री स्वामी इच्छे पुढे काळ काहीही करु शकत नाही. म्रृत्युंजयापुढे काळाची शक्ती क्षीण होते. आम्ही जायचे तेव्हाच जाऊ. या देहावर स्वामींखेरीज कोणाचीही सत्ता नाही. ज्याने आजवर आम्हाला मुलाप्रमाणे सांभाळिले व अखंड सतत जवळ राहिले. ते स्वामी समर्थच माझा संकल्प सिध्द करतील....'

`ज्यांस स्वामींचे अभय तया काळ करील काय, नृपाच्या सेवक आधिन असे'

श्री मयुरानंद स्वामींनी पद्मासन घातले व गीता पठणास सुरुवात केली. `सर्वधर्मान्‍ परित्यज्य, माम्‍ एकम्‍ शरणं व्रज' श्री स्वामीनामाचा गजर सुरु झाला. गीता पठण संपले मयुरानंद स्वामींचे प्राण केव्हांच स्वामी गजरांत विलीन झाले. सर्वत्र स्मशान शांतता पसरली. त्यांचे निश्चल दर्शन घेताच सर्वांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. स्वस्थ बसून राहण्यात अर्थ नवह्ता, मन घट्ट करुन भक्तजन पुढच्या तयारीस लागले. अचानक एक छायाचित्रकार आले आणि त्यांनी मयुरानंद स्वामींची छबी चितारली. दुसरे दिवशी मिरवणूक निघाली ती सायंकाळी श्रीराममंदिरा-जवळ आली. नाईलाजाने मयुरानंद स्वामींच्या पायाला स्पर्श करण्याची अनुज्ञा द्यावी लागली. वास्तविक संन्याशाचा देह प्रेतवत असतो म्हणून त्याला स्पर्श करु नये अशी शास्त्राज्ञा आहे. परंतु भक्तांच्या प्रेमामुळे शास्त्रालाही अपवाद करावा लागला. श्रीराममंदिराजवळ असलेल्या गुहेत पंचतात्विक देह ठेवून गुहा बंद करुन त्यावर मयुरानंदांना प्रथम भेटीत स्वामींनी जी पादुका रेखीत शिळा दिली होती ती समाधीबर भूषित केली. श्री स्वामीनामाचा घोष अखंड चालू होता. यतीनियमाप्रमाणे सर्व उपचार केले गेले. यास्थानी श्री स्वामी कृपेचा चिरवास आहे. भक्तांनी दर्शन घेऊन याचा अनुभव घ्यावा. मग तो कोणत्याही देवतेचा भक्त असो. श्री स्वामी कृपेने क्षोभित देवता शांत होतात हे पूर्ण सत्य आहे. ऊमराळा येथील श्री मयुरानंद समाधी, हे श्री स्वामी समर्थांचे जागृत स्थान आहे. वैशिष्ट्य म्हणजे मयुरानंदांचे घरी दोनदा स्वामी आले होते. स्वामींनी बर्‍याच लोकांवर कृपा केली पण `आपणासारखे करिती तात्काळ' हे काही भक्तांचे बाबतीतच घडले. विशेष म्हणजे प्रथम भेटीतच स्वामींनी गणेशमूर्ती व पादुकांचा प्रसाद मयुरानंदांना दिला. निर्मळच्या यात्रेत साधुरुपाने आपले आत्मलिंग, चंद्रशेखर बाण दिला. तसेच मूर्तिकार रुपाने त्यांनीच श्रीराममूर्ती दिल्या. आज इतक्या वर्षानंतरही त्या मूर्ती तेज तिळमात्र कमी झालेले नाही.

त्रैलोक्य चिंतामणी रसायन / स्वामींच्या काष्ट पादुका
यतिरुपात येऊन, कृमिघ्न काढा हे स्वत: स्वामींनी सांगितलेले रसायन आहे. `बहु औषधींचे सार काढून, त्रैलोक्य चिंतामणी रसायन' असे श्रीगुरुचरित्रांत सांगितले आहे, तेच हे रसायन असून ते सर्व रोगांवर औषध आहे. विशेषत: दम्यावर याचा उत्तम उपयोग होतो. आजही मयुरानंदांचे वंशज डाँ. किशोरबुवा, कोणी श्रद्दावानानी मागणी केल्यास हा काढा देतात. स्वामींनी सांगीतलेले संततीप्रदायक औषधही त्यांचेकडे आहे. आजही स्वामींचे मार्गदर्शन त्यांना होत असून स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी या स्थानची कधी प्रसिध्दी केली नाही. स्वामींची इच्छा असेल तोच या स्थानी आकर्षित होतो. त्यामुळे हे स्थान दुर्लक्षित राहिले. स्वामी, परगांवी भक्तांचे घरी गेल्याची मोजकीच उदाहरणे आहेत. त्यातील मयुरानंदांचे उदाहरण अपूर्व आहे. इसवी सन २००० ची गोष्ट. श्री जोशी यांचे अंगणांत एक व्यक्ती आली आणि `आज स्वामी येत आहेत,' असे म्हणून निघून गेली. सायंकाळी एक स्त्री आली आणि तिने काष्ट पादुका दिल्या. ती स्त्री म्हणाली, `मी बाळण्यांच्या वंशातील असून, या स्वामींच्या पादुका माझेकडे आहेत. स्वामींच्या दृष्टांतावरुन या पादुका देत आहे. स्वामी खेळत असलेल्या गोट्याही मजकडे आहेत.' श्री. जोशीकडे त्या पादुकांचे दर्शन होते. `ज्यांना अक्कलकोटला जाणे अशक्य असेल त्यांनी उमराळा मठात जावे,' असा संकेत आहे. `मी तुमचा योगक्षेम चालवीन,' असे मयुरानंदांना स्वामींनी दिलेले वचन सत्य आहे, असा श्री. जोशी कुटुंबियांचा आजवरचा अनुभव आहे.

श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र

नि:शंक हो, निर्भय हो मना रे, प्रचंड स्वामीबळ तुझ्या पाठीशी,
अतर्क्य अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्यही शक्य करतील स्वामी ॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळही ना नेई त्याला, परलोकीही ना भिती तयाला ॥
उगाची भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥
खरा होई जागा श्रध्देसहित, कसा होसी त्याविण तू स्वामीभक्त ?
आठव ! कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात ॥
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच ह्या पंचामृतात
हे तीर्थ घेई, आठवी रे प्रचीती, न सोडती तया, जया स्वामी घेती हाती ॥
॥ श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु ॥

श्री मयुरानंद सरस्वती यांना प्रसाद म्हणून लाभलेला `श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र' नित्यनेमाने सकाळी म्हणावा. तो म्हणताना पेल्यामध्ये पाणी घ्यावे, जळत्या उदबत्तीची राख पेल्यातील पाण्यात पडेल अशी ठेवावी. पाणी तीर्थ म्हणून घ्यावे. या फलदायी कृपातीर्थाचा प्रभाव आगळाच असून प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी.

उमराळ्याला जाण्याचा मार्ग : पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलने वसईच्या पुढील नालासोपारा येथे उतरावे. पश्चिमेला स्टेशन बाहेर राज्य परिवहनाची उमराळा गाडी प्रत्येकी अर्ध्या तासाने असते. त्या बसने चक्रेश्रर थांब्यावर उतरावे. चक्रेश्वराचे डावे बाजूस श्रीराममंदिर व मयुरानंद समाधी आहे. व तेथे जवळच मयुरानंदांचे पूर्वीचे घर असून, तेथे त्यांचे वंशज डाँ. किशोरबुवा जोशी राहतात. त्यांच्या देव्हार्‍यातच प्रासादिक देवतांचे दर्शन होते. मयुरानंद सुंदर मृण्मय गणेशमूर्ती करीत. त्यांच्या घरी पांच पिढ्यांची मृण्मय मूर्ती आहे. एक मूर्तीकार अक्कलकोट स्वामींची मूर्ती करीत असतां, दृष्टांतानुसार ती मूर्ती त्याने जोशी यांचेकडे दिली. ती मूर्ती स्वामींची न घडता मयुरानंदांची घडली.

किती एक ईश्वर आले आणि गेले, परी स्वामी ब्रह्म संचले जैसे तैसे

श्री मयुरानंदांच्या जीवनांतील विशेष प्रसंग

१२ व्या दिवशीच पित्याचे निधन
मयुरानंदांचा जन्म ज्येष्ठ वद्य नवमीचा आहे. अष्टमीचा चंद्र नवमीला असता जर पुत्र जन्माला आला, तर पित्याला मृत्युमूळ ठरतो. याचाच अर्थ नवमीच्या पहाटे मयुरानंदांचा जन्म झाला असावा व म्हणून १२ व्या दिवशीच पितृछत्र हरपले.

श्री स्वामींचे स्वप्नांत दर्शन
`माझे लोक शेकडो कोस दूर असले तरी ते नेहमी माझे जवळ असतात,' असे स्वामी म्हणत. मयुरानंदांची पूर्व जन्मी गाणगापुरांत सेवा घडली असावी व त्यावेळी स्वामींनी कृपा केली असावी. म्हणूनच स्वामींनी स्वप्नांत दर्शन दिले.

गणेशमूर्ती व पादुकाप्रसाद व राममंदिर बांधण्याचा आदेश दिला.
श्री स्वामी समर्थ स्वत:च पूर्ण ब्रह्माचे सगुण रुप आहेत. त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्ती होती. स्वामींनी ज्यांच्यावर कृपा केली. त्यांचे वंशांत गणेशोपासना होती असे पुष्कळांच्या बाबतीतही दिसते. तसेच छेली खेडेगावी श्री स्वामी जमिनीतून प्रथम प्रकट झाले. पादुका ही गुरुप्रसादाची खुण आहे. एखाद्याची पूर्वजन्मी एखाद्या देवतेची उपासना खंडित झाली असेल, तर श्रीगुरु या जन्मांत ती पुरी करुन घेतात. या न्यायाने श्री स्वामींनी मयुरानंदांना श्रीराममंदिर बांधण्याची आज्ञा करुन उपासना करवून घेतली. मंदिराचे बांधकाम सुरु असतांना श्री स्वामींनी मूर्तीचीही व्यवस्था केली.

श्री स्वामींनी बाळारामभाऊंस व्याधीमुक्त केले.
श्री स्वामींनी बाळारामभाऊंस महारोगशमनास निवडुंगाचा फणा दिला व परान्न न सेवन करण्याबाबत सांगितले. यावरुन दुषित परान्नांतून बाळारामभाऊंस महारोग झाला. परान्न सेवनांतून आगांतुक परप्रारब्ध भोगावह होते. सद्य परिस्थितीत सर्वांना परान्न वर्ज करणे अशक्य आहे. तरी जर प्रसन्न सेवन करण्याचे धर्मसंकट आले तर अवधुतमंत्राने विभूती मंत्रून ती अन्नावर प्रोक्षण करुन मग अन्न सेवन करावे किंवा तीन हजार गायत्री जप करावा. ज्यांना गायत्रीचा अधिकार नाही त्यांनी `अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' या नाममंत्राचा तीन हजार जप करावा. जर श्राध्दान्नादी भक्षण केले तर मंत्राचा पांच हजार जप प्रायश्चित्तादाखल करावा विशेष म्हणजे अमावास्या पौर्णिमेनंतर चार दिवस हाँटेलमधील किंवा बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. पुण्यात काही वर्षापूर्वी एका हाँटेलातील पदार्थ ज्यांनी खाल्ले ते हाँटेलबाहेर आल्यावर त्यांना वांत्या सुरु झाल्या. अन्नाची चांचणी करता ते पदार्थ चांगले होते, मात्र कांही मुलांनी हाँटेल मालकास नारळ अती स्वल्प दरात विकले होते. चौकशीअंती असे कळले की नदीत विसर्जन केलेल नारळ मुलांनी स्वस्तात विकले. उतार्‍याचे नारळ पदार्थात असल्याने ते दोष काही रुपाने आले. औषध गुण देईना. अखेर मीरा दनार दर्ग्यातील विभूती सेवनाने दोष शमन झाले.

चंद्रशेखर बाण
श्री स्वामींनी साधुचे रुप घेऊन निर्मळचे यात्रेत मयुरानंदांची परीक्षा घेऊन त्यांना चंद्रशेखर बाण दिला व ते माझेच आत्मरुप आहे असे सांगितले व या बाणाच्या पूजेने कल्याण होईल असा आशीर्वाद दिला. नर्मदेतील बाणलींग हे निर्गुण परब्रह्माचे सगुण रुप आहे. कारण त्याला आदी अंत नाही. विशेष म्हणजे चंद्रशेखर बाण हे क्वचित मिळतात, म्हणून त्याला आत्मलिंग म्हणतात. एका गरीब गृहस्थास एका साधुने चंद्रशेखर दिला व तुझा वंश कोट्याधीश होईल असा आशीर्वाद दिला. त्यांचाच नातु ज्याची शाळेची फी इतरांनी द्यावी व कपडे शिक्षकांनी द्यावेत असा मुलगा आज पुण्यात मोठा उद्योगपती असून चंद्रशेखराचे पूजनाचे कोट्याधीश झाला आहे.

मूर्तित चैतन्य येते
सगुण उपासनेने उपास्य मूर्तीत चैतन्याचा अविर्भाव होतो. मयुरानंद कीर्तन करीत असता त्यांचे घरात चोर गेले असता त्यांना दोन तरुणांनी अडवले. तसेच कीर्तनाचे वेळी मंदिरातील राममूर्ती अदृष्य होऊन शेताला लागलेली आग विझवली. यावरुन जड दिसणारी मूर्ती भक्तकार्याला धांवून जाते वेळोवेळी रक्षण करते याची खात्री पटते.

शक्तीक्रीडा जगत्सर्वंम्‍
सप्तशतीच्या अनुष्ठानाने गास पाटलाचा मृत्युदंड टळला व सप्तशतीमंत्रयुक्त उदक प्रोक्षणाने प्लेगचा झपाटा फिरविला. यावरुन मयुरानंदांनी सप्तशतीची मंत्रसिध्दी झाली होती. गुरुकृपेशिवाय मंत्रसिध्दी होत नाही. वास्तविक सप्तशती एकाच बैठकीत पठण करायची असते. परंतु मयुरानंद मंत्र म्हणत गावाचे बाजूस फिरत उदक प्रोक्षण करीत होते. यावरुन गुरुकृपेमुळे अनुष्ठान बंधने शिथिल होतात, हे कळून येते.

संकल्प, अनुष्ठान, श्रीगुरु ईच्छा
देहत्यागापूर्वी मयुरानंदांनी गीतापठणाचा संकल्प केला व नाडी लागत नसतानाही गीतापठण पूर्ण झाले. यावरुन त्यांचा पंचभौतिक देहाचा संबंध केव्हाच संपला होता. परंतु आत्मसिध्दीच्या धारणे करुन अनुष्ठान पूर्ण झाले. श्रीगुरुकृपा याचा अर्थ श्रीगुरुच पाठीशी राहून स्वत:च सर्व करीत असतात.

सहस्त्ररुपे अवतरते ब्रह्म आपण भक्तासी मिळतसे इष्ट दर्शन
श्री स्वामी समर्थ निर्गुण ब्रह्माचा सगुण पूर्णावतार आहेत. म्हणून त्यांनी त्यांचेच दर्शन विविध रुपांत भक्तांच्या उपास्याचे रुपांत दाखविले.
१) श्री गणेश - दृश्य सृष्टी ही गणपती रुप आहे, असे शास्त्र सांगते. त्यामुळे आरक्तवर्ण, लंबोदर, शूर्पकर्ण, आजानूबाहू, लाल फुलांची आवड, हे स्वामींचे दृश्य रुप आहे.
२) श्रीनृसिंह सरस्वती - `आम्ही कर्दली वनातून आलो. या स्वामींच्या वचनाप्रमाणे भक्त त्यांना श्रीनृसिंह सरस्वती म्हणतात, गाणगापुरास कित्येक भक्तांस `मी अक्कलकोटात आहे.' असे दृष्टांत झाले. तसेच गाणगापुराचे पुजारी अक्कलकोटला आले. तेव्हा `आमचे पुजारी आले.' असे स्वामी म्हणाले. तसेच बाळप्पांस गाणगापुराचे गाभार्‍यांत स्वामी प्रातर्पूजा घेताना दर्शन झाले.
३) दत्तात्रेय - हिमालयात एका साधूस व गिरनारवर एका पांगळ्यास श्री दत्तात्रेय दर्शन देऊन त्यांचे पंगुत्व घालविले व पुढे आमचे दर्शनास अक्कलकोटला ये अशी अनुज्ञा दिली.
४) श्री महेश्वर - सोलापूरला ख्रिश्चन अधिकार्‍यास पंचमुख महेश्वरुपांत दर्शन दिले. तसेत तात महाराजांना वटवृक्षाजवळ दर्शन दिले.
५) श्री भवानी - नगरचे नाना रेखी यांचे घरात तुळजाभवानी रुपांत दर्शन दिले. म्हणून अहमदनगर मठांत भवानीरुपांत स्वामींचे तैलचित्र आहे.
६) श्री विष्णू - देव मामलेदारांना श्री विष्णूरुपात दर्शन दिले.
७) श्री कार्तिकस्वामी - बडोद्याचे रामशास्त्रींस कार्तिक स्वामीरुपात दर्शन दिले.
८) श्री व्यंकटेश - शेषाचल पर्वतावर एका भक्तास व्यंकटेश दर्शन झाले. अक्कलकोटास आल्यावर त्याने ही हकीगत सांगितली होती.
९) श्री पांडुरंग - मंगळवेढे येथे जनाबाईस विठ्ठलरुपात दर्शन दिले.
१०) श्री कृष्ण - वामनराव वांबोरीकरांना कृष्णरुपात दर्शन दिले.
११) श्री सप्तशृंगी - `सप्तशृंगीस जाऊन बोंब ठोकलीस. अखेर विडा आम्हीच दिला.' वामनरावांस टोमणा.

संपूर्ण शक्तीसहित श्री स्वामी रुपाने ब्रह्म अवतरले म्हणजेच ते पूर्णावतार आहेत. पूर्णावतार दुसर्‍याचे दैवात बदल करु शकतात. ते सामर्थ्य इतर सिध्दांत किंवा अंशावतारात नसते. आधी फळ देऊन नंतर उपासना करवून घेणे हे पूर्णावतारच करतात, म्हणून अनंतकोटी ब्रह्मांडनायक ही उपाधी फक्त पूर्ण अवतारास असते. भक्त आपले नेमस्थ गुरुस  प्रेमापोटी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज, महाराज, सर्वज्ञ वगैरे उपाधी प्रेमापोटी लावतात. परंतु त्यात तितकेसे तथ्य नसते. शेवटी एवढेच म्हणावे लागते.

किती एक ईश्वर आले आणि गेले,
परी स्वामी ब्रह्म संचले जैसे तैसे

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP