श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय दुसरा
श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा
ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरुवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
नमो श्री स्वामी समर्थाय । प्रत्यक्षं परब्रह्मणे । नमो परमहंसाय । शिवरुपिणे ते नम: ॥२॥
प्रथम अध्यायात । मयुरानंद वंशसंकेत । वेदशास्त्र, वैद्यकी ज्योतिष । अखंड वरदान वंशासी ॥३॥
ज्योतिर्विद्येचे ऋषी । झाले धोंडोपंत जोशी । तयांचे अपर वयासी । तयांसी झाला पुत्र ॥४॥
नाम तयाचे रघुनाथ । पित्यासम विद्यायुक्त । ब्रह्मचर्याश्रम होता पूर्त । विवाह योजिला पित्याने ॥५॥
उमराळे सन्निधान । नाळा नामक ग्राम । तेथे वेदशास्त्रसंपन्न । जोशी लक्ष्मणशास्त्री ॥६॥
लक्ष्मण शास्त्रींची बहीण । तियेचे रघुनाथाशी झाले लग्न । रघुनाथासी अपत्य प्रथम । कन्यारत्न लाभले ॥७॥
पुनश्च डोहाळे तियेसी । गायी अभंग रागेसी । बोले वेदांत शास्त्रासी । सात्त्विक डोहाळे सुलक्षण ॥८॥
ज्येष्ठ वद्य नवमीस । शके सत्राशे एकोणसाथ । इसवी सन अठराशे सदतीस । प्रसवे पुत्रासी ॥९॥
मामा लक्ष्मणशास्त्री । तयांची कुंडली मांडिती । आणि जातक पाहती । त्याच्या आयुष्याचे ॥१०॥
म्हणती दिव्य लक्षणी पुत्र । पूज्य होईल सर्वत्र । गुरुकृपा अक्षय छत्र । लाभेल तयासी ॥११॥
दैवयोग परी विचित्र । नसेल माता पित्यांचे सुख । जाणुनी पुढील संकेत । नाम `मोरेश्वर' ठेवा म्हणती ॥१२॥
सत्यव्रताचिया निकटी । सत्पुरुषांचे पाठी । विघ्ने आपदा येती । यास `नियती' म्हणावे ॥१३॥
मोरेश्वर जन्मतां सहावे दिवशी । ज्येष्ठ भगिनी परलोकवासी । आणि बारावे दिवशी । गेला पिता परधामा ॥१४॥
पांच वर्षे होता तयास । आंचवे मातृसुखास । दैवी कांती अमुप । पोरकेपण भाळा आले ॥१५॥
पांच वर्षांचे बाळ । मामा करिती सांभाळ । आपुले ज्ञान भांडार । तया देती लक्ष्मण शास्त्री ॥१६॥
लक्ष्मणशास्त्री देवी भक्त । वाचती `सप्तशती सार्थ' । मोरेश्वरा विधियुक्त । सप्तशती संथा देती ॥१७॥
सप्तशतीचे गूढरहस्य । मार्कंडेयांचे संकेत । बीजमंत्रांचे फल दातृत्व । सांगती मोरेश्वरा ॥१८॥
`इतिर्शब्द हरेर्लक्ष्मी । वध कुल विनाश कृत । अध्यायो हरती प्राणान । मार्कंडेय ब्रविद् इतिम् ॥१९॥
ज्योतिष, वैद्यकी शास्त्र । करी मोरेश्वर आत्मसात । लक्ष्मणशास्त्री कृतार्थ । झाले सिध्दप्रज्ञा पाहूनी ॥२०॥
निर्गुणी प्रज्ञापूर छत्र । सारेच असे अतर्क्य । महाकाली स्फुरण रुपा । सदा वसे सिध्दत्वे ॥२१॥
मोरेश्वराचे आजोबा चुलत । बापू जोशी नामक । आजोळाहून उमराळ्यास । आणिले तयांनी ॥२२॥
बापू जोशी आजोबा चुलत । दोन पुत्र तयांस । एक सून भोगी वैधव्य । ऐसी कर्मगती ॥२३॥
सारे घर अनापत्य । म्हणून आणिला वंशदीप । मोरेश्वरा अति प्रीत ॥ समस्त करिती ॥२४॥
चक्रेश्वर मंदिर । जागृत स्थान उमराळ्यांत । मोरेश्वर अर्चित । जोशी वंशाचा शिव शांभव ॥२५॥
मोरेश्वर असतां सान । घडले अतर्क्य महान । कोणी ब्राह्मण येऊन । सांगे बापूशास्त्रींशी ॥२६॥
कोणी महंत साशिष्य । अलि चक्रेश्वर मंदिरात । आपणां पाचारित । सपरिवार यावे दर्शना ॥२७।
त्यांनी वर्षे अठ्ठेचाळीस । उभे राहूनी आचारिल तप । पाठ ना लाविली धरणीस । हिमालयी वास असे ॥२८॥
समस्त आले दर्शनास । मोरेश्वरा घेतले अंकास । अवघ्राणूनी मस्तक मुख । भविष्य वदले तयाचे ॥२९॥
नसे मातृपितृ सुख । जन्मांतरीचा योगी ज्ञानयुक्त । कुलवंशा उध्दारक । राहील कीर्तिमान अक्षय ॥३०॥
तयासी विभूति लाऊन । सुखी विभूती प्रोक्षण । शारदा सरस्वती वरदान । जाहली गंधार धारणा ॥३१॥
आशिर्वचुनीसमस्तांसी । महंत गेले हिमाचलासी । ते पूर्वाश्रमीचे जोशीवंशी । क्रृपा केली वंशदीपा ॥३२॥
बापू जोशी इच्छित । पहावे सूनमुख । आणि विवाह निश्चित । मोरेश्वराचा करिती ॥३३॥
पालघर तालुक्यांत । एडवन असे ग्राम । तेथील राजवैद्य महान । बाबाजी पुरोहित ॥३४॥
तयांची कन्या गोपिकेस । वर शोधिला मोरेश्वर । बापू जोशी जाहले कृतार्थ । मोरेश्वर चतुर्भुज जाहला ॥३५॥
इतिश्री स्वामी कृपांकित, श्री मयुरानंद धारामृत ॥ सिध्दवंश संकेत नाम द्वितियोध्याय: ॥
श्री महासिध्दर्पणमस्तु ॥ शुभम् भवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP