श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय आठवा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री सद्‍गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
जय जय जगदाधारा निरंजना । श्री स्वामी समर्था पूर्णब्रह्मा । सिध्दांत अवधूत चिंतना । शिव दत्तात्रेय नमो नम: ॥२॥
मळ्यास लागली आग । स्वये विझवी पद्मनाभ । अति विषण्ण भावनावश । तुटे देहभाव मयुरानंदांचा ॥३॥
मानव असती जगांत । वर्तन त्यांचे चतुर्विध । अत्यानंद प्रपंचात । ते प्रपंचग्रस्त म्हणावे ॥४॥
जे चिंता, व्याधीने ग्रस्त । वा आप्तेष्टांपासून त्रस्त । ते जाणा प्रपंचत्रस्त । शांती समाधान तया नसे ॥५॥
बहिष्कृत आप्तांपासून । जमेत ना खर्ची जाण । नसतां खोळंबा, असता अडचण । ते प्रपंच त्रयस्थ ॥६॥
जगी वर्ते परी अलिप्त । सदा रमवी आकाशतत्त्वांत । जीवन जगती कमलपत्रवत । तो मुक्तात्मा प्रपंची ॥७॥
नाही भूतकाळाचे स्मरण । नसे भविष्य चिंतन । विरुन गेला वर्तमान । मयुरानंदांची ब्राह्मी अवस्था ॥८॥
जड समस्त भासमान । अजड तेही बंधन । सूक्ष्माचे जरी ज्ञान । तो ही अडसर जाणावा ॥९॥
नाही पुण्य, नाही पाप । नाही सुख नाही दु:ख । रुप, अरुप, स्वरुप । अवस्था तुर्येच्या ॥१०॥
जेव्हा सरे मीपण । अहंभावाचे निरसन । सगुण निर्गुण विसर्जन । सरती साकार निराकार ॥११॥
दिवस आणि रात्र । दोन्ही जाती संपुष्टात । स्वहित, परहित । सरे बंध, मोक्ष, मुक्तता ॥१२॥
ऐसी निरानंद स्थिती । मयुरानंद भोगिती । जव आरंभ तंव इति । उरले एक कर्तव्य ॥१३॥
रामनवमीचा दिवस । मयुरानंद उभे कीर्तनास । नसे पगडी नारदीय वेष । कंठी रुद्राक्ष स्फटीक माळ ॥१४॥
नेमले पंचा बंडी अंगात । आज्ञापिती गोविंदास । पाठीमागे रहाणे तुज । वाटे भाषा निर्वाणीची ॥१५॥
श्रीराम जन्माचे आख्यान । अतीव असे उत्तम । मग्न झाले श्रीतृजन । युग विश्वी जन्म सोहळा ॥१६॥
राम सर्वा रक्षीत । नंदन कौसल्या सर्व सिध्द । दर्शनांत परमानंद । मयुरानंद बसले आद्याक्षरी ॥१७॥
समस्तांसी बोधित । आलांत श्रीरामोत्सवास । सांगती कीर्तनी लीलाप्रभाव । रामदास हनुमंताचा ॥२०॥
जरी समाप्त रामावतार । तरी राहिला नामावतार । हनुमान कृपेविण रामदर्शन । कदा कोणासी होत नसे ॥२१॥
राम सेवितां एकमुख । लंका संगरी पंचमुख । पाताळनगरी एकादशमुख । ऐसी रुपे हनुमंताची ॥२२॥
असे चिरंजीव दैवत । स्मरणमात्रे प्रकटन । येन प्रकट मात्रेण । सर्व विद्या विनिर्युयु: ॥२३॥
श्री सप्तशृंग भगवती कृपा । झाला भक्तीमार्ग सोपा । प्रज्ञापुरीच्या परब्रह्मरुपा । मजसी रक्षिलेस ॥२४॥
नाही सेवा नाही नेम । प्रथम दर्शनी प्रसाद पूर्ण । लळीत सोडूनी कीर्तन । जन्म झाला कृतार्थ ॥२५॥
रंगती स्वामी स्मरणांत । निर्वाण अवस्था जागृत । निश्चल नि:स्तब्ध नि:शब्द । परी परा स्फुरतसे ॥२६॥
परा प्रकाश वैखरीत । उमटती ईश्वरी वच । पंचश्लोकी स्वामी तारक स्त्रोत्र । जाहले वदते ॥२७॥
आणि विनविती हनुमंतास । प्रथम कीर्तन तव साक्षीत । जेथ प्रथम तेथ अंतिम । सेवा वाहिली तव पदी ॥२८॥
हनुमंताचे पुजारी भट्ट । मयुरानंद श्रीफळ देत । निमंत्रण हे पुढील वर्षास । जाहले वदते ॥२९॥
श्रीफळ ते पुनश्च । घातले भट्ट पदरात । अखेरचे येणे येथ । जाणे असे अष्टमीसी ॥३०॥
सर्व भक्त समुदायास । स्वये सुंठवडा वाटीत । कदां न विसरा आम्हांस । वदता अश्रू ओघलले ॥३१॥
ज्ञात होता ऐसी मात । त्वरीत येती आप्त इष्ट । चैत्र वद्य अष्टमीस । हालचाल मंदावली ॥३२॥
सांगती गोविंदास । करणे भगवत्‍  गीता पाठ । सखाराम शास्त्री राजवैद्य । म्हणती पाठ राहील अपूर्त ॥३३॥
वदले मयुरानंद । आम्हा स्वामी अभयप्रद । काळ झाला स्तंभीत । श्री स्वामी आज्ञेने ॥३४॥
चालले गीता पठण । भक्तवृंद करी भजन । पाठ होतां पूर्ण । श्री स्वामी पुढे ठाकले ॥३५॥
स्वामीस करिती वंदन । घोषांत चालले भजन । क्षणी स्वानंदी झाले निमग्न । कळले ना कोणासी ॥३६॥
चैत्र वद्य अष्टमीस । अठराशे चौतीस शक । इसवी सन एकोणीसशे वारांत । अदृश्य रुपे स्थिरावले ॥३७॥
तये वेळी आला एक । छायाचित्रकार अचानक । मयुरानंदांची छबी सुरेख । घेतली त्यांनी ॥३८॥
स्वानंद यात्रारंभ प्रभातीस । विचरे सर्व ग्रामात । समस्तांसी चरणस्पर्श । आली सायं ते राममंदिरी ॥३९॥
राममंदीरा बाजूस । ब्रह्मानंद गुहेत । रक्षिला पंचभौतिक देह । प्रकाशमय उजळला ॥४०॥
स्वामींनी प्रथम भेटीत । दिधल्या होत्या अश्मपादुका । त्या मस्तकी ठेविल्या देखा । समाधीद्वार बंद केले ॥४१॥
समाधीनंतर साक्षीत्व । अनुभक्ती भक्त । विस्तार होईल ग्रंथ । म्हणून वर्जीतसे ॥४२॥
स्वामी जैसे आशिर्वच । कीर्तन परंपरा अद्याप । संगीत, ज्योतिष, वैद्यक । तया वंशजा प्राप्त असे ॥४३॥
स्वामी प्रसाद गणेश । पादुका बाण चंद्रशेखर । देवी तांदळा, नाणे लक्ष्मीप्रद । वंशजांच्या पूजेत अद्याप असे ॥४४॥
काढा जो कृमिघ्न । त्रैलोक्य चिंतामणी रसायन । बाहात्तर रोगा रामबाण । देती सद्यवंशज किशोरबुवा ॥४३॥
विशेषत: दमेकर्‍यांस । अति उत्तम औषध । जेथ स्वामी भेषज । गुणयुक्त औषध ॥४४॥
मयुरानंद प्रथम । दुसरी पिढी गोविंदराव । तीसरी पिढी बुवा श्रीकृष्ण । पिढी चवथी वसंतबुवा ॥४५॥
वसंतबुवांचे पुत्र । सद्य किशोरबुवा होत । तैसे हेमकांत । कीर्तन धुरा सांभाळिती ॥४६॥
इति श्री स्वामी कृपांकीत । श्री मयुरानंद धारामृत । श्री मयुरानंद समाधीर्नामो अष्टमोध्याय: ।
श्री स्वामी समर्थार्पणमस्तु । शुभम्‍ भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP