श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय तिसरा

श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा


ॐ परमात्मने नम: । श्री सद्‍गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
श्री स्वामी समर्थ दत्त । आधी मायारंगी रंगवीत । मग करिती मायामुक्त । कृती विचित्र स्वामींची ॥२॥
मोरेश्वर जाहले गृहस्थ । गृहस्थाश्रम आचरीत । चक्रेश्वर मंदिरात । पठण करिती भगवद्‍गीता ॥३॥
शिवपूजा विधियुक्त । संगीत राहे स्फुरत । संगीतप्रेमी सदाशिव । श्री गुरुचरित्र प्रमाण ॥४॥
घरी माणसे तीन । आजोबा, पत्नी, आपण । करिती उदर निर्वाहण । नित्य कर्म आचरुनी ॥५॥
गायनाची आवड अती । मोरेश्वर संगीत गुरु शोधती । वसईत बाळाबुवा गोसावी । ग्वाल्हेर गायकी परंपरा ॥६॥
संगीत शिकविण्यास । मोरेश्वर विनविती तयांस । तयांनी देऊनी रुकार । शिकविले संगीत शास्त्रोक्त ॥७॥
राग रागिणी समस्त । ठुमरी, कव्वाली, तराणा आदिक । गायनाचे प्रकार । मोरेश्वर आत्मसात करी ॥८॥
वाद्यकला समस्त । प्रवीण झाले तयांत । मित्रांच्या इच्छेस्तव । कार्यक्रम करी संगीताचे ॥९॥
संगीताचे समवेत । अभिनया जागृती येत । बुर्‍हान साहेब अंगणांत । सोपार्‍यांत होता कार्यक्रम ॥१०॥
फकीराचा वेष केला । `दिया तो भला, न दिया तो भला' । मोरेश्वर फकीर रंगला । वदे अल्लाह हो अकबर ॥१२॥
चकित झाले मुसलमान । करी ईस्लाम धर्म उपदेश । हा अवलिया निश्चित । चरणी लागती तयांच्या ॥१३॥
मोरेश्वर मातूल लक्ष्मण । आले बैलगाडीतून । श्रवतां तयांचे गायन । जाहले आश्चर्य तयांसी ॥१४॥
क्षणी झाले आनंदरहित । जे वर्तरिले ज्योतिष । ते कैसे होय विपरीत । पूर्वेस दिसे पश्चिम ॥१५॥
मोरेश्वरा झाले ज्ञात । आले मामांच्या दर्शनास । पातले प्रेमाश्रू नेत्रांत । मामांनी जवळ घेतले ॥१६॥
आणि बोलती तयास । तुझा संगीताभिनय उत्कृष्ट । परी हा भ्रामक रंगसवंग । नसे येथे शाश्वतता ॥१७॥
अरे प्रपंच म्हणजे मयुर । विविध रंगांचे अपार । मयुर असे नपुंसक । तैसा जाण संसार ॥१८॥
प्रापंचिक रंगांचे अवडंबर । जाशी विरुन तात्काळ । ना पुष्प ना फळ । आयुस वांझ करी ॥१९॥
तरी मायीक टाकूनी रंग । हृदयी धरी श्रीरंग । प्रपंच मोरावर हो आरुढ । हंस आकळी सत्याचा ॥२०॥
अशाश्वत भ्रामिक मृगजळ । तेथे धांवे कुरंग । तैसीच तुझी गत । अखेरीस न व्हावी ॥२१॥
श्रवतां मामांचा उपदेश । वैराग्य आले मोरेश्वरांस । निथळला मायारंग । शोध घेऊ सद्‍गुरुंचा ॥२२॥
तयांसी जाहले ज्ञात । अक्कलकोटी स्वामी समर्थ । सगुण दत्तात्रेय साक्षात्‍ । आर्त पुरविती भक्तांची ॥२३॥
क्षुधा तृषा झाली नष्ट । स्मरे स्वामी अखंडित । श्री स्वामींचा ध्यास । ना सुचे अन्य काही ॥२४॥
एके रात्री स्वप्नांत । दिसती आजानुबाहू अवधूत । कोटी सूर्यतेज अमूप । अरुणवर्ण अंगकांती ॥२५॥
भाल, नासिक विशाल । नेसले लंगोटी काषाय । रुळते स्फटीक रुद्राक्ष माळ । कंठी रुद्राक्ष एकमुखी ॥२६॥
भाळी केशरी ऊर्ध्वपुंड । रामानंदी कस्तुरी तिळक । पदीं पादुका चंदनीकाष्ट । ऐसे अवधुत वंदिले ॥२७॥
आणि होता जागृत । आठविले स्वप्नीचे पुराणपुरुष । हेच स्वामी प्रत्यक्ष । सांगे तयांची मनोदेवता ॥२८॥
आजोबा पत्नीची अनुमती घेऊन । करिते झाले प्रयाण । प्रज्ञापुरींचे परब्रह्म स्मरण । व्यस्त पावे क्षुधातृषा ॥२९॥
पदांस नाठवे धरित्री । मनाची उन्मन स्थिती । विरले अंत:करण चतुष्टी । चालली पदयात्रा अक्कलकोटा ॥३०॥
अक्कलकोटी स्वामी समर्थ । बैसले टेकडीवर । आणि पाहता मोरेश्वरास । म्हणती `वेडा आला रे आला' ॥३१॥
दिधले तुज स्वप्नी दर्शन । कां घेतलासी शीण । अरे तू माझाच जाण । अससी जन्मोजन्मी' ॥३२॥
स्वप्नीचे पाहता रुप । मोरेश्वर चरणी लोळत । प्रेमाश्रु अभिषेक श्रीपदास । घट्ट धरी चरण ॥३३॥
स्वामी तया उठवित । होती स्फुंदघोष अधिक । नाही सरली दर्शन आस । रडत राहे तैसाची ॥३४॥
स्वामी सांगती तयास । त्वरित जाई घरास । तव पत्नी वर्जुनि अन्नोदक । बैसली देवापाशी॥३५॥
पाहते तुझी वाट । सतत होतसे अश्रुपात । भाक घाली आम्हांस । गृहासी पाठविणे म्हणुनी ॥३६॥
श्रवतां स्वामी वच । धरा ना आकळे पदास । मती म्हणे कैसे दैव । आल्या पावली स्वामी पाठविती ॥३७॥
सेवा नाही घडली । दर्शन तृपा न सरली । पुन्हा मागे लागली । माया प्रपंचाची ॥३८॥
जाणून तयाचे मनोगत । स्वामी हसून वदत । कां रे तुज पडली भ्रांत । जन्मोजन्मी तू जवळी असता ॥३९॥
मोरेश्वरा शांतविती । वरदकर ठेविला मस्तकी । पंचरसी गणेशमूर्ती प्रसाद दिधला तयास ॥४०॥
तैशा पितळी पादुका । चौरंगयुक्त असती देखा । निर्देश करिती शिलाखंडा । कोरीव पादुका तयावरी ॥४१॥
सांगती गणेशमूर्ती पादुका । आहेत माझे स्वरुप । तू ब्रह्मलीन झाल्याव्र । अश्म पादुका सांग ठेवण्या मस्तकी ॥४२॥
तुझ्या सात पिढ्यांत । घडेल कीर्तनसेवा निश्चित । पुत्र, पौत्र, प्रपौत्र । राहतील सुखे सौख्येसी ॥४३॥
श्री चक्रेश्वरा अर्चन । वंशोवंशी होतसे जाण । जाहलो आम्ही प्रसन्न । पावली सेवा आम्हांसी ॥४४॥
अतिथी अभ्यागतास । प्रेमभावे आदरित । ते आम्हीच प्रत्यक्ष । अनुभव तुम्हां येईल ॥४५॥
आणि आज्ञापितो तुम्हास । निर्माण करी राममंदिरास । रामसेवा अक्षय अखंड । तुमचे वंशी होईल ॥४६॥
वंदुनी स्वामी चरण । मोरेश्वर पुसती साद्रनयन । पुनरपी आपुले दर्शन । कदां आम्हां होईल ॥४७॥
हंसुनी स्वामी वदत । भेटेन निर्मळ यात्रेत । कदां तुमचे घरास । निश्चित येऊ आम्ही ॥४८॥
आमुचे वचन सत्य ।आहेच जाण यथार्थ । स्विकारुनी दत्तप्रसाद । मोरेश्वर गृहा प्रवर्तती ॥४९॥
याच वेळी स्वामींचे मांडीवर । होता एक युवक । जाणे येहेळ गांवास । गुरु तुझे तुकामाई ॥५०॥
गणपती नामक युवक । तेच पुढे जाहले ख्यात । श्रीरामकृपेने युक्त । श्री महाराज गोंदवलेकर ॥५१॥।
मोरेश्वर झाले मयुरानंद । स्वामी प्रसाद मयुरेश । गणपती, मोरेश्वर मयुरेश । कृपेश स्वामी समर्थ ॥५२॥
इसवीसन अठराशे अठ्ठावनांत । हे घडले प्रत्यक्ष । तेव्हा गोंदवलेकर महाराज । होते बारा तेरा वर्षांचे ॥५३॥
आज शुध चतुर्थी भाद्रपद । सन दोन हजार चार । अठरा दिनांक सप्टेंबर । अध्यायीं गणेशप्रसाद मोरेश्वर ॥५४॥
इतिश्री स्वामी कृपांकित श्री मयुरानंद धारामृत, श्री स्वामी कृपा प्रसाद प्राप्तर्नामो तृतियोध्याय:
॥ श्री स्वामी गणेशार्पणमस्तु ॥ शुभम्‍ भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP