श्री. मयुरानंद धारामृत - अध्याय सातवा
श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा
ॐ परमात्मने नम: । श्री सद्गुरवे नम: । श्री सरस्वत्यै नम: । ॐ नम: श्री स्वामी समर्थाय ॥१॥
आदिमाये आदिशक्ती, आदिभूते सनातनी । नमो नम: चैतन्यमाते आदिशक्त्यै नमोस्तुते ॥२॥
अध्याय सातवा शक्तीयुक्त । सप्तशतीचे सूक्ष्मरुप । श्री स्वामी समर्थ भगवती रुप । नि:संशय जाणिजे ॥३॥
मामांपासून मयुरानंदांस । ज्ञात सप्तशती रहस्य । अती आवड तयांस । जाती सप्तशृंगावरी ॥४॥
स्वामींचे दर्शन होण्यापूर्वी । जाती सप्तशृंग गडावरी । अष्टादश भुजा देवी । सहस्त्रभुजा सा सती ॥५॥
शिवालय तीर्थी करुनी स्नान । करिती देवी दर्शन । पुन्हां शिवालयी येऊन । देवी ध्यान औदुंबरा तळी ॥६॥
देवी होण्या प्रसन्न । असते कालमापन । बारा वर्ष लागती पूर्ण । कोल्हापूर महालक्ष्मी प्रसन्नेसी ॥७॥
प्रसन्न तुळजाभवानी । कालमान वर्षे तीन । श्री चंद्रला परमेश्वररीचे कालमापन । असे सहामास ॥८॥
माहूरगडी श्रीरेणुका । अति जाज्वल्य देवता । कालमापन नसे निश्चित । होण्या कृपाप्रदाती ॥९॥
सप्तशृंगवासिनी अद्भुत । प्रसन्न एक्केचाळीस दिवसांत । अर्धमात्रेचे स्वरुप । मार्कंडेय वरदायिनी ॥१०॥
येथे एक गूढ संकेत । कृपांकित होण्या श्रीदत्त । तयापूर्वी प्रसन्नता । असावी भगवतीची ॥११॥
आदिशक्ती कृपेविण । कदां नसे दत्तप्रसन्न । मयुरानंदा देवी वरदान । तेव्हा दर्शन स्वामींचे ॥१२॥
मयुरानंद औदुंबर तळी । आराधिती त्र्यंबका गौरी । मुळांत श्री सप्तशती । सहस्त्रावधी झाले पाठ ॥१३॥
सांगे भगवती दृष्टांत देऊन । माझे मंत्र कार्याकारण । त्वरित करतील फलप्रदान । स्मरण माझे करिता ॥१४॥
गडावरी जाता पुनरपी । आरधिती भगवती । दर्शन देऊनी तयांसी । देत आशिर्वच ॥१५॥
बालका तव सेवा पाहून । मी आहे प्रसन्न । अती कष्ट घेऊन येथे न यावे ॥१६॥
तुझ्या समवेत येईन तव घरास । जन्मोजन्मी तुझे वंशज । मजसी सेवीत राहतील ॥१७॥
शिवालय तीर्थावरी । शिवमंदिरा समोरी । उन्नत झुडपे निर्गुडी । तयातळी सम स्वरुप ॥१८॥
झुडुपा न लावावे शस्त्र । स्पर्शिजे औदुंबर काष्ट । तेच जाणिजे माझे रुप । लाभेल तुज तांदळा ॥१९॥
मयुरानंद उघडती नेत्र । प्रेमाश्रूंचा झरे स्त्रोत । स्नान करुनी शिवालयांत । दर्शनास जाती ॥२०॥
अंबा पदीचे घेती कुंकुम । एक वस्त्री स्नानाचरण । सचैल वस्त्र फेकून । नूतन वस्त्र परिधानिती ॥२१॥
भगवती प्रसाद कुंकुम । करिती निर्गुडी अर्चन । आणि औदुंबर काष्ट घेऊन । स्पर्शिती निर्गुडी मूळ ॥२२॥
आले परिमल दरवळून । जडमूली धरा स्पंदन । आणि धरणी भेदून । उद्भवे रुप अंबेचे ॥२३॥
देवी प्रपन्नाति हरे प्रसीद । आकळती अंबारुप । तांदळा, मंजीष्ट वर्णाकीत । सुटे गंध केतकीचा ॥२४॥
तांदळा लाविती नेत्री । भगवती स्थानी अर्चिती । पुनरपी कदापि । गेले नाहीत सप्तशृंगा ॥२५॥
प्रसाद भगवती तांदळारुप । अद्यापि तयांचे घरात । अर्चिती तयांचे वंशज । सप्तशती पठण ॥२६॥
कैसी भगवती प्रसन्न । केले अल्प निवेदन । ऐसा महिमा अगम्य । सप्तशृंग भगवती ॥२७॥
सप्तशृंग भगवती महिमा । असे ख्यात अनुपमा । पूर्ण होती कामना । श्री भगवती कृपे ॥२८॥
गडावरी देवता । वसती वनस्पती औषध रुपा । अठरा पानांचा काढा । शमन सर्व व्याधींचे ॥२९॥
उमराळा गावधनी भागात । असे उमादेवी मंदीर । वसे ओहळी वृक्षांत । विशेषता तियेची ॥३०॥
पंचक्रोशी भागांत । स्थान अती जागृत । श्रध्दा अती दृढ । असे भक्तांची ॥३१॥
एकदा सोपारे उमराळे भागांत । फेरा आला प्लेग । सैतानासम रोग । क्षणोक्षणी मृत्यु मानवा ॥३२॥
रोगाचा उपसर्ग । न स्पर्शो गावास । जनग्रामस्थ । आराधिती ईश्वरासी ॥३३॥
उंदीर पाहता मृत । पावे जना भयकंप । रक्तोल्हासीत कालचक्र । जणु नजीक पातले ॥३४॥
स्वामी मयुरानंद । ईश्वरा करुणा भाकीत । स्मरता भगवतीवच । आला धीर तयांसी ॥३५॥
भल्या पहाटे उठून । नित्य कर्म साधून । सप्तशृंगीचे ध्यान । असे करी जलपात्र ॥३६॥
मध्यमे उच्चारत । भगवतीचे मंत्र । करिती जलमंत्रयुक्त । ग्राम चतु:सीमे प्रोक्षिती ॥३७॥
गावांतील देशमुख । कुतूहल तयांस । कार्यकारण पुसती मयुरानंदास । कार्यरत ते असती ॥३८॥
एकदा दुपारी मयुरानंद गृहास । पुसती देशमुख । नित्य प्रोक्षिता उदक । कारण ज्ञात व्हावे ॥३९॥
तेव्हा वदती देशमुखांस । गावांत न यावे अरिष्ट । सप्तशतीने मंत्रुनी उदक । दिग्बंधन चतु:सीमे ॥४०॥
कदा न येणे अरिष्ट । सांगती उत्तम मार्ग । करावा चंडीयाग प्रति तीन वर्षे । उमा ग्राम देवतेसी ॥४१॥
अद्यापी ती प्रथा । ग्रामस्थ आचरित । स्वामींचे वच सत्य । अरिष्ट ना स्पर्शे ग्रामासी ॥४२॥
चंडीयाग अनुष्ठान । मंत्रांसवे तंत्र गहन । साक्षात् दुर्गेचे प्रकटन । कदां क्षमा नसे तेथ ॥४३॥
मंत्रांचे स्पष्ट उच्चारण । हेच त्याचे तंत्र जाण । आवाहन वदतां भूषवी स्थान । आव्हान वदतां खड्ग फेकी ॥४४॥
विधानात होता चूक । विपरीत होय त्वरित । अनुष्ठान कामनिक । भीती चहू बाजूंनी ॥४५॥
उमराळे नजीक । असे ग्राम गास । तेथील पोलीस पाटीलवार । आला वृथा आळ राजद्रोहाचा ॥४६॥
न्यायालयीं गेली मात । ब्रिटीश शासन दुष्ट । राजद्रोहांसी शिक्षा एक । मृत्युदंड द्यावा म्हणती ॥४७॥
मयुरानंदांचा बालमित्र । होता हास पाटील । जाऊनी त्यांचे घरास । धीर सोडू नको म्हणती ॥४८॥
भगवती होता कृपावंत । टळेल निश्चित मृत्युदंड । सांगतो मी तैसेच । आराधीजे अंबेसी ॥४९॥
गुडघ्यापर्यंत देह । करावा भूमीगत । अंकी घ्यावा कलश । सप्तधान्य तयाती ॥५०॥
प्रतिपदेपासून दसर्यापर्यंत । राहे दुर्गा आराधित । आणि तव घरात । पाठ करावेत सप्तशती ॥५१॥
दुर्गा दुर्गति हारिणी । पावेल तुज निश्चये करुनी । मृत्युदंड शिक्षा न्यायासनी । शिक्का मोर्तब नव्हते झाले ॥५२॥
निकालाचा आला दिनांक । पाटील भेटले मयुरानंदास । न्यायालयी जा नि:संकोच । केली कृपा दुर्गेने ॥५३॥
पाटील जाती न्यायालयांत । घोडेस्वार आला मार्गात । न्यायालयीन देत पत्र । आपण आहांत निर्दोष ॥५४॥
पाटील गेले आनंदून । प्रतिवर्षी धरिला नेम । नवरात्रांत चंडीयज्ञ । करिती दुर्गा मंदिरांत ॥५५॥
अद्यापी ही प्रथा । चालली अव्याहिता । अती जागृत स्थान दुर्गा । अनुभव असे ॥५६॥
नवरात्र उत्सवांत । कार्यक्रम सरता द्वार बंद । एका इसमाचा अडकीत्ता । राहिला मंदिरी ॥५७॥
रात्री त्वरे जाऊन । करी दार उद्घाटन । कंप पावे भये करुन । पाहिला वाघ मंदिरी ॥५८॥
त्या दुर्गा मंदिरात । नवरात्र उत्सवात । पाच दिवस कीर्तन करीत । मयुरानंद सरस्वती ॥५९॥
सप्तम अध्याय पवित्र । प्रकाशला शक्तिस्त्रोत । अध्याय नोहे प्रसाद । श्री सप्तशृंग भगवतीचा ॥६०॥
इतिश्री स्वामी कृपांकित । श्री मयुरानंद धारामृत । सप्तशृंगी प्रसाद प्राप्त, तथा व्याधी निर्मूलन, तथा
बंधनमुक्ती करणं नामी, सप्तमोध्याय: । श्रीसप्तशृंग भगवत्यार्पणमस्तु ॥ शुभम् भवतु ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP