अध्याय तेरावा - कळसाध्याय

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


‘म’ दाखवी विराम । ग्रंथासि आला पूर्ण विराम । मामा पावले विश्राम । स्वानंद भुवनीं ॥१॥
बिकट या संसारीं । येऊन सोय दाखविली खरी । असोन नसल्यापरी । आचरण दाखविले ॥२॥
बालपणा पासोनि । हरि भजनीं रंगले मन । देहासक्ति पूर्ण सोडोन । शरीर कष्टविलें ॥३॥
उग्रतप आचरिलें । गायत्री पुरश्चरण आरंभिलें । देहाचे लाड न केले । क्षणभरही ॥४॥
केवळ देहधारणापुरते । अन्न दयावे शरीरातें । आणि आचरांवें सन्मार्गाते । हा नित्यक्रम ॥५॥
कधीं न ढळला सन्मार्गापासूनि । लोक निंदेची पर्वा न मनीं । आदर एक संत वचनीं । ठेविला तुम्ही ॥६॥
म्हणोनि पाठीराखे श्रीज्ञानेश । दिला तुम्हास स्वयंप्रकाश । परमार्थी राहोन अहर्निश । संसार साधला ॥७॥
पितृआज्ञेस्तव विवाह केला । मातेसही आनंद दिला । राम पुत्र लाभला । आशीर्वाद श्रीज्ञानेशांचा ॥८॥
श्रीहनुमंत तात्यांच्या आज्ञेनें । अखंड केली कीर्तने । तोषविली भक्तजनांची मनें । सदोदित ॥९॥
समर्थ श्रीनारायण । सद्गुरु मिळाले पुण्यनिधान । अखंड ठेवोन अनुसंधान । सद्गुरु तोषविलें ॥१०॥
“थोर गुरुभक्त” म्हणोनि । गौरविले सद्गुरुंनी । यापेक्षां भाग्य या भुवनीं । काय असे ॥११॥
देहयातना अपरंपार । लोकनिंदेचे घाव कठोर । संसार संकटें अनिवार । सुखें झेलिली ॥१२॥
अशातही समाधानी । कैसे राहावे माणसांनीं । हें दाखविले आचरुनी । आयुष्यभर मामांनी ॥१३॥
मामा म्हणती रामाला । ऐक सांगतो मी तुला । जो जो या संसारीं आला । तो तो पस्तावला एकवेळ ॥१४॥
तूं आहेस मनाचा सरळ । परी अशांनाही बाधते संसार गरळ । म्हणोन वाटते एकवेळ । तुजसांठी कांहीं लिहावे ॥१५॥
संसाराचे कटु अनुभव । सोशिले मी सदैव । त्याची तुला जाणीव । सुखेनैव असो दे ॥१६॥
ठेंच पुढच्यास शाहणा मागचा । हाचि योग भाग्याचा । हाचि कित्ता आचरणाचा । तूं ठेवावा ॥१७॥
अलिप्त राहिल्याविण । न सोसवतील संसार घण । संसार यातना दारुण । सावधान वृत्ति सोसाव्य ॥१८॥
जे जे भेटतील जन । ते ते विवेकें घ्यावें पारखून । सोसून त्यांचे कठोर वचन । विनम्र भावें असावें ॥१९॥
डाग न लागू दयावा अंतरीं । मनें सोडावी विषयदरी । आघात जरी शरीरावरीं । आपण वेगळें असावें ॥२०॥
हें असोन नसणें-पण । हीच संसार यशाची खूण । जाणीव याची पूर्ण । मनीं असो दयावी ॥२१॥
वाटे आणिक एक ग्रंथ लिहावा । जो मोजक्याच शब्दांचा व्हावा । मतामतांतराचा गोवा । तेथें नसावा ॥२२॥
जेवढे साधकास पाहिजे ज्ञान । तेवढेंच सांगावे विस्तारुन । साधनावरी भर देऊन । विकल्प सगळें निवारावे ॥२३॥
श्रवणें होत जावी निवृत्ति । तेवढीच श्रवणाची फलश्रुती । मग धरावे चित्ती । गुरुवाक्य प्रमाण ॥२४॥
अति पांडित्य अंगी भरता । भलताच ये ताठा । एतदर्थी गोष्ट तत्वता । परिसावी सज्जनहो ॥२५॥
मामा लहानपणापासून । करीत होते कीर्तन । दिगवडयास असतां वर्तमान । घडलें तें ऐका ॥२६॥
पंडित बैसलें कीर्तनाला । तों ज्ञानेश्वरीचा विषय निघाला । तोंच पंडितांनीं रस्ता धरिला । स्वगृहाचा ॥२७॥
कीर्तन झाल्यावरी । पंडित आले मंदिरीं । नम्र भाव ठेवोन अंतरीं । मामा विचारती ॥२८॥
सांगाजी कारण । आपण गेलात निघून । तवं ते पंडित निर्भत्सून । बोलले ज्ञानेश्वरी विषयीं ॥२९॥
प्राकृतांत वेदांत बोलणें । हे अवघेंचि लाजिरवाणें । अश्यक्य अशक्य साहणें । म्हणोन आम्ही गेलो ॥३०॥
तंव मामा बोलती नम्र वचन । पाहावा जी ग्रंथ वाचून । मग करावे दोष निवेदन । मी ही ऐकेन आदरें ॥३१॥
मामा निष्ठावंत उपासक । श्री ज्ञानेशांचें सेवक । पंडित म्हणती वेळ एक । पाहूं ग्रंथ वाचून ॥३२॥
पालटली वृत्ति त्यांची । इच्छा झाली नियमित वाचनाची । मामांच्या कीर्तनाची । त्यांना कळली थोरवी ॥३३॥
तसेच एकदां गणेशोत्सवांत । एक कीर्तनकार पंडित । दिगवडे यांचे घरांत । आले, किर्तनाला ॥३४॥
त्यांचा गणपति उजव्या सोंडेचा । दिगवडे यांचा डाव्या सोंडेचा । हें पाहून त्यांचा । विचार बदलला ॥३५॥
माझा गणपति कोपर्‍यांत मांडून । मी करीन उत्सवांत कीर्तन । तेंच तुम्ही आपले मानून । संतोषावें ॥३६॥
दिगवडे म्हणती बापुराव । तुम्ही साजरा करावा उत्सव । दोन कीर्तनें एक जमाव । हा थाट झाला उत्सवाचा ॥३७॥
विकल्पांचा कोलाहाल । त्यानें निर्मिले हलाहल । विवेकांचें संपले बळ । तेणें द्वैत उरलें ॥३८॥
ऐसा पांडित्याचा अभिमान । तो दयावा समूळ सोडून । नामी गुंतवोन मन । राहावें निश्चळ ॥३९॥
निर्मळ चरित्र मामांचें । देईल समाधान मोलांचे । दिव्य आदर्श वागणुकीचें । धडे येथेंचि मिळतील ॥४०॥
लोकापवादास न देईन कान । जीवनरेखा स्पष्ट आखून । वाट गुरुकृपें शोधून । मामांनीं जीवन सफल केलें ॥४१॥
श्रवण केलें सदग्रंथाचें । त्यांचेच मामा कीर्तनी साचें । श्रवणाधारें आचरणाचे । मार्ग शोधले ॥४२॥
वृत्ति रंगली अंतरीं । तेणे अर्चनभक्ति झाली पुरी । सर्वांभूतीं नम्रता खरी । वंदन भक्ति ॥४३॥
सेवा संत सज्जनांची । ही मामांना आवड मनापासूनची । दास्यभक्ति महत्वाची । मामांना वाटे ॥४४॥
एकदां श्रीगुरुसिध्दाप्पा । पहुडले होते जेथें सोपा । नेत्र झाकले अपापा । दुपारचे वेळीं ॥४५॥
मामा उठोनी हळूहळूं । म्हणती आतां कोणी नका बोलूं । आपण अति कष्टाळूं । वारा घालती श्रीगुरुसिध्दाप्पांना ॥४६॥
हळूंच उघडून डोळे । श्रीगुरुसिध्दांपांनी पाहिलें । मामांना बोललें । सुहास्य वदनें ॥४७॥
मामा कृपा करुन । तुम्ही वारा घालून । मोडू नका अनुसंधान । माझें या वेळें ॥४८॥
नाईलाजें मामा थांबले । परी सेवेचें वेड त्यांना भलें । संधी मिळतांच लागले । सेवेसाठीं ॥४९॥
विनीत भाव मामांचा । होता पराकोटीचा । आपण कोण आहोत याचा । मागमूस लागूं न देति ॥५०॥
सर्वांभूती नम्र भाव । हा होता त्यांचा स्वभाव । लहान थोर हा भेद भाव । तेथें नव्हता ॥५१॥
गुरु गृहींची मोलकरीण । तिलाही करिती सद्भावें वंदन । मनीं अत्यादरें आठवून । चरण सद्गुरुंचे ॥५२॥
नामस्मरणीं अतिप्रीती । अखंड रमती एकांती । कीर्तनाचा विषयही घेती । नामस्मरण ॥५३॥
त्यांचा एक शिष्य गोपाळ । त्यासि म्हणती अरे बाळ । ये आज होता संध्याकाळ । आमचे घरीं ॥५४॥
आज माझें पहिलें कीर्तन । तूं हो पहिला श्रोता म्हणून । करुं दोन घटका भजन । ईश्वराचें ॥५५॥
ऐसा खेळीमेळीचा व्यवहार । नाहीं कोठें सापडणार । म्हणोन वारंवार । स्मरण होते मामांचे ॥५६॥
म्हणती नाना रुपें ईश्वर । आपली परीक्षा पाहणार । म्हणून सदैव खबर्दार । आपण असावें नम्रभावें ॥५७॥
मृदु आणि कठोर । निंदक आणि स्तुतिपाठक थोर । ऐसे देवाचेच अवतार । मनुष्यरुपें ॥५८॥
कधी विंचू कधीं साप । कधीं संसाराची कचकच उमाप । हेहि ईश्वराचेच रुप । परीक्षेसाठीं ॥५९॥
नरदेह ही परीक्षेची खोली । तेथे जगदीश परिक्षक माऊली । जीवनभर परीक्षेची घालमेली । सुरूं असे ॥६०॥
जें असे दासबोधीं । जे श्रीकृष्ण गीतेमाजीं बोधी । जे बोल श्रीज्ञानेशांचें गीतेसंबंधीं । तो विषय परीक्षेचा ॥६१॥
तों अंगी किती बाणला । प्रयत्न कसा कीती झाला ? । हें पाहून दे निकालाला । तो जगन्नायक ॥६२॥
म्हणून वृत्ति न होऊं देतां अनावर । समत्वें पहावें चराचर । ऐसा मामांचा विचार । थोर परीक्षार्थी मामा ॥६३॥
मामांना गुण किती मिळाले । हें वाचकांच्या अंतरीं असती लिहिलेले । मामाही आत्मविश्वासें बोललें । ते ऐका त्यांच्या शब्दांत ॥६४॥
हा अभंग मामांचा । मला वाटे अतिमोलाचा । साधनाच्या परिणतीचा । बोल विश्वासाचा त्यात असे ॥६५॥

- अभंग -
ज्याच्या प्रकाशें दिनमणि हा प्रकाशे ।
स्वयंप्रकाशित देहींच वसे ॥
तो म्यां पाहिलासे नयनाच्या नयनें ।
ज्याच्या विरहित सर्वही उणे ॥
ज्याच्या प्रकाशाने शशिबिंब विलसे ।
ज्याच्या प्रकाशानें विदयुत भासे ॥
गोविंदाचें हें मन गुंगूनियां गेले ।
रामनामीं ठेंलें, स्वयंप्रकाशीं ॥

श्रीराम आपला सखा । हा मामांचा भाव निका । म्हणती आपण सेवका । माजी कनिष्ठ सेवक ॥६६॥
जें जें प्रिय ईश्वराला । तें तें या साधूरायाला । मग आतां सख्यत्वाला । काय उणें ॥६७॥
देह भाव ठेवोन दुरीं । आपन विचरती अंतरीं । हें समजे त्यांच्या नेत्रांतरीं । पाहणार्‍यांना ॥६८॥
जो भाव हृदयीं वसे । तोच नेत्रीं प्रकाशें । येथें नेत्रांत विलक्षण दिसे । पाहणारांना ॥६९॥
शरीर देहदू:खे तापे । परी हा न कधीं संतापे । अंतरी रामनाम जपे । समाधान वृत्तीं ॥७०॥
लक्ष असे अलक्षीं । मग कोण ब्रह्मोपचार लक्षी । देह ऊर्मिचा साक्षी । असे प्रारब्ध एक ॥७१॥
लोक म्हणती उठा मामा । अन्न मारिते हांका तुम्हां । चला राहुंदे या कामा । तवं मामा उठती सस्मित वदन ॥७२॥
अग्नीमध्यें आहुति देणें । तैसे मामांचे जेवणें । पदार्थ उत्तम म्हणणें । हा दिसे लौकिक ॥७३॥
ऐसें हे विदेहपण । सशरीरीं अशरीरपण । आत्मस्वरुपीं पूर्णपण । असे झालेलें ॥७४॥
अंतकाळी यातना । दुर्धर रोग देती नाना । परी शरीराची हालचाल पाहाना । लवमात्र न दिसे ॥७५॥
लोक येती पाय चेपिती । औषध तोंडांत घालिती । कडू गोड याची क्षिती । नसे त्यांना ॥७६॥
भरत त्यांच्या मेहुण्यांचा मुलगा । त्याला मामांचे कोणतेही काम सांगा । तो सदा जागा । मामांच्या सेवेला ॥७७॥
तासन् तास पाय चेपावें । मामांनी वारंवार पुरे म्हणावें । परी त्याच्या स्वभावें । सेवा आवडीची ॥७८॥
सेवा करुन घ्यावी । हें कधींच नव्हते मामांच्या जीवीं । त्यांच्या मनीं सदा असावी । मूर्ति भगवंतांची ॥७९॥
म्हणोन जाणत्यांनीं ओळखले । या संतांचे महत्व भलें । नित्य नेमे कीर्तन ऐकिलें । उदाहरण खरे काकू ॥८०॥
ऐसे मामांचे आत्मसमर्पण । पहाणारासीं वाटें कठींण । म्हणोन त्याची श्रध्दा पूर्ण । वसे मामांच्या ठांयीं ॥८२॥
सोमवार सकाळपासून । मामांनी धरिलें मौन । नेत्र ठेविले झांकून । शुध्दिअसूनही ॥८३॥
तेथें आपला ना परावा । माया मोहाचा तटका तोडावा । शेवटचा आणि सुधारावा । मार्ग आपुला ॥८४॥
तरीही अंतकाळीं । पुन:परतून हृदयकमळीं । देती त्रयोदशाक्षरीं मंत्राची आरोळी । संदेश बहु मोलाचा ॥८५॥
तो शेवटच्या कीर्तनाचा । सारांश होता महत्वाचा । ती बाकी चुकती करण्याचा । प्रसंग साधला ॥८६॥
काय ही तत्परता । मामा तुमची भक्ताकरतां । काय आमची पात्रता । आणि तुमचे थोरपण ॥८७॥
वेळोंवेळीं करावी आठवण । तों अंत:करण येतें भरुन । संत दयाघन । हें त्रिवार पटलें ॥८८॥
मामा तुम्हीं दया सागर । आणि पूर्वावतार । मी काय चरित्र लिहीणार । हें माझें मी जाणें ॥८९॥
एकामागून एक आठवणीं । मनांत राहिल्या घरकरुनी । न जाणो जाईन विसरुनी । म्हणोन अक्षरीं मांडिल्या ॥९०॥
वाटले त्या जुळवाव्या । एका माळेसारख्या गुंफाव्या आणि तुमच्या चरणांवरी ठेवाव्या । ते हे तेरा अध्याय ॥९१॥
तुमचा आवडता मंत्र त्रयोदशाक्षरी । ज्यानें पवित्र केली तुम्ही आपुली वैखरी । त्याच मंत्र्यांच्या एक एक अक्षरीं । हे तेरा अध्याय गुंफले ॥९२॥
स्मरण करुन सप्रेम । श्रीराम जयराम जयजयराम । तुमचें चरित्र पावन परम । अत्यादरे लिहिलें ॥९३॥
जैशी सेवा तुम्ही करविली । तैशी असे ही केली । तुम्ही मानाल ही राहीली । आशा मनामध्यें ॥९४॥
रामाच्या स्वप्नांत येऊन । म्हणाला चरित्र ऐकिलें म्हणून । मज झालें समाधान । तें मज वर्णितां नये ॥९५॥

- अभंग -
एकदां माझीयें स्वप्नी मामा आले ।
बहुपरी झाले बोलणे त्यांचे ॥१॥
अण्णानी चरित्र लिहिले हे कथिले ।
तव ते म्हणाले ऐकीलें की ॥२॥
‘नरहरीचे तसे आहेच’ म्हणोनि ।
रंगले कीर्तनी हनुमंत सेवे ॥३॥
बालरामा नाही वाटले ते स्वप्न ।
मागुते कळोन आले त्यासी ॥४॥

चरित्र तुमचे आघवे । वाटले एकदा लिहावे । स्वत:च्या मनास रीझवावे । आणि तुमच्या भक्तांच्याही ॥९६॥
राम तुमचा प्रेमळ पुत्र । त्याने चालविले कीर्तन सत्र । न पाही दिवस रात्र । प्रकृती स्वास्थ्य नसताहि ॥९७॥
मी गेलो त्याच्याकडे । तो प्रेमभरे पाही माझ्याकडे । मी माझे साकडे । केले निवेदन त्यासी ॥९८॥
जन्मापासून आजपर्यंत । मी आहे सान्निध्यात । व्यावहारीक निकट संगत । येजा बहुत होती ॥९९॥
होतो बिर्‍हाडानें त्यांचे वाडयात । तो लोभ जडला अतोनात । मामा मामी हे आप्त सबंध सतत । बालपणापासून रुजले ॥१००॥
राम करि कीर्तन । बालपणापासून । मी हीं होतसें तल्लीन । कधी करि साथ त्याची ॥१०१॥
परान्न न घेण्याचा । मामांचा नियम बहु दिवसाचा । हें कळुनही मी त्यांच्या । एकदां घरीं गेलो ॥१०२॥
मामा तुम्हीं माझ्या घरीं । भोजनास यावे ही इच्छा अंतरी । मन माझे चलविचल करि । तुमच्या नियमानें ॥१०३॥
मामा अंतकरणाचे कोमल । त्यांनी ओळखिले माझ्या मनींचे बोल । म्हणती तू रहा खुशाल । मी येईन तुझ्याघरीं ॥१०४॥
तुझे आणि माझे घर । यात न मानी मी अंतर । माझ्या आनंदास पारावर । उरला नाही ॥१०५॥
तेच प्रेम सर्वांचे । म्हणोन महत्व अकृत्रिम नात्याचे । उल्लेख मामी आणि राम यांचे । झाले एकेरी शब्दानें ॥१०६॥
असंख्य मामांचे भक्त जन । त्यासी कैसे रुचेल हे एकेरीपण । म्हणोन केला बहुतप्रयत्न । परी जमेना ॥१०७॥
श्रोती न करावे खिन्न मन । म्हणोन केले स्पष्टीकरण । सुजनांनी क्षमा पूर्ण । मजलागी करावी ॥१०८॥
असो, कागदपत्र रामापाशी । तों माझ्यापुढें उभ्या करी राशीं । मामांच्या चरित्राची अहर्निशी । आम्ही चर्चा करीत असु ॥१०९॥
राम येई माझ्या घरीं । मी जाई त्याच्या मंदिरी । तो कधी न कंटाळा करी । उलटा आनंदे ॥११०॥
हा भ्रातृभाव जन्मांतरीचा । जैसा चंद्र आणि सागराचा । उसळे तो ठाव घेई नभीचा । ते वर्णन असंभव ॥१११॥
मामा राहिले अंतरी । राम बाहेरुन सहाय्य करी । गंगा यमुना आल्या घरीं । आता ऐका तीसरी ॥११२॥
श्रीगुरुसिध्दपानी माझें सदन । याचवेळीं केले पुण्यपावन । मी त्यांचे चरण वंदून । केली एक प्रार्थना ॥११३॥
राजाधिराज महाराज । माझे अल्पसे काज । आपल्या कुपेचा चढेल साज । तरीच पूर्ण होईल ॥११४॥
तुम्ही आम्हा श्रीनारायण । श्रीगुरुलिंगजंगम पूर्ण । येथें अभेद संपूर्ण । ही माझी श्रध्दा असे ॥११५॥
मामांचे चरित्र लिहावे । आणि ते यथायोग्य व्हावें । हे माझे लाड पुरवावे । सद्गुरुनी ॥११६॥
श्रीसद्गुरुनी आशिर्वचन दिले प्रसादपूर्ण । त्याचे मी वर्णन । करु कोणत्या शब्दे ॥११७॥
त्यांचा शुभाशिर्वाद ही सरस्वती । वाहतसे गुप्त रिती । या संगमी माझी स्नानापुरती । इच्छा असे ॥११८॥
जय यमुने जय भागीरथी । जय जय जय सरस्वती । बुडया मारीन होईतो तृप्ति । जय त्रिवेणी जय त्रिवेणी ॥११९॥
ऐसें हें मामांचे चरित्र । त्यास मी एक निमित्तमात्र । सद्गुरुंचे हाती सुत्र । तेची चालक विश्वाचे ॥१२०॥
मी एक संसारिक । कधी न झालो त्यांचा सेवक । तरीही त्यांनीं मारोन हाक । मज जवळ केले ॥१२१॥
लोभ वाटला मनी । तो वाढला त्यांच्या प्रेमळ शब्दानीं । जन्म जन्मांतरीचे कल्याण त्यांनी । साधिले माझे ॥१२२॥
तो प्रेमाचा उमाळा । तो पोटीचा कळवळा । त्यांनी केला लळा । तो अलौकिक ॥१२३॥
मामांची प्रतिवर्षी कीर्तने । होत होती ती अनेक ठिकाणें । धन्य होती लोक श्रवणें । आणि दर्शने मामांच्या ॥१२४॥
माझ्याही मनीं आले । आपुल्या घरी पाहिजेत आले । मामांचे कीर्तन झाले । पाहिजे येथे ॥१२५॥
परी जागा अडचणीचीं । कैशी सोय होईल कीर्तनाची । परी मी गोष्ट मनीची । बोललो मामांच्या जवळ ॥१२६॥
म्हणती एकटाच येऊन । करीन तुझ्या घरी कीर्तन । तू करु नको खिन्न मन । किंचितही ॥१२७॥
आणि तसा प्रसंग आला । आनंद झाला माझ्या मनाला । श्रीगुरुसिध्दाप्पाहि त्या संधिला । होते माझ्या घरीं ॥१२८॥
तो अपूर्व सोहळा । मन आठवते वेळोवेळा । मामांचा कळवळा । वर्णन करता नये ॥१२९॥
तो देहाचा आसरा सुटला । आत्मा जगदांतरी राहिला । विश्वास असूनही डोळा । अश्रू येती ॥१३०॥
वडील माझे हरिसेवक । गंगेचे निष्ठावंत उपासक । कीर्तन करीत देश अनेक । फिरले भारतामध्ये ॥१३१॥
काशीपासून रामेश्वरापर्यंत । कावडी वाहील्या चालत । यदृच्छा लाभे संतोष मानित । जीवन कंठिले ॥१३२॥
माता श्रीहनुमंतात्यांची अनुगृहीत । नित्य नेमे कीर्तनास जात । मला ही अनिच्छेनें जावें लागत । झोंपमोड करुनी ॥१३३॥
वय लहान न लागे गोडी । न उलगडे परमार्थाची घडी । तरीही डोई घडोघडी । पडे तात्यांच्या चरणावरी ॥१३४॥
गेलो निंबरगीच्या यात्रेला । तो अवघड प्रवास आठवतो मला । परत येता चमत्कार झाला । मिरज स्टेशनवरी ॥१३५॥
वेळ होती सकाळची । थंडी पडली कडाक्याची । तात्यांनी उन्हाशी सकाळची । बैठक केली ॥१३६॥
तों तेथील स्टेशन मास्तर । भाविक फार । आणिती चहा कपभर । तात्यांच्यासाठीं ॥१३७॥
मी उभा होतो दूर समोर । अधोमूख तात्या निरंतर । विचार करिती वाटे फार । कसला तरीं ॥१३८॥
माझ्या मनीं एक आले । संत होणे फार चांगले । लोक कौतुक करिती भले । मान सन्मान करीती ॥१३९॥
तोच तात्यांनी मज बोलाविले । जवळी बैसवून घेतले । प्रसाददपेय पुढें केले । घे म्हणोनी ॥१४०॥
प्रेम आणि भीती । मर्यादा आणि आदर चित्तीं । ते थोर मी लहान किर्ती । हे मनीं येऊन बुजलो ॥१४१॥
चहा घेवोन चरणावर । मस्तक ठेवून सत्वर । परतलो तो पालटला विचार । क्षण न लागता ॥१४२॥
संत होता सामान्य लोका गौरविती अनेक । भक्त होता मारोनि हांक । संत प्रसाद देती ॥१४३॥
आता यांत समयोचित । काय तें आणावे मनांत । संतप्रसादाचा लोभ जास्त । मज वाटला ॥१४४॥
संतचि असो देत थोर । तेचि आपुले हित करणार । सुखद त्यांचा आधार व्हावे नम्र सेवक आपण ॥१४५॥
संतांचा प्रसाद मिळता । काय उणे या जगतीं आता । या लाभा परता । लाभ न अन्य ॥१४६॥
एतदर्थी कथा । तुम्हांस सांगेन आता । तेणे नवल चित्ता । वाटेल तुमच्या ॥१४७॥
मामींच्या स्वप्नांत । मामा आले अकस्मात । बैसले होते लिहीत । कांही ते समजेना ॥१४८॥
मामी म्हणे त्यांना । मज सांगाना । काय इतकी विवंचना । आपणासी आता ॥१४९॥
याद करितो लोकांची । कोण कोण येती त्यांची । आणि हित संबधियांची । एकत्र आता ॥१५०॥
मनीं एक इच्छा राहिली । मी नमस्कारिली नाहीत मंडळी । काय जाण्याची गडबड झाली । राहून गेले ॥१५१॥
हा खडीसाखरेचा पुडा । देवापुढें ठेवतो एवढा । दयावा एक एक खडा । प्रत्येकाला ॥१५२॥
सांगावा माझा नमस्कार । प्रेमाचा पडो न दयावा विसर । हेचि वाटो निरंतर ही । विनंती ॥१५३॥
मामा तुमचा प्रसाद अंतरीं । राहिला ही गोष्ट खरी । नमस्कारु आम्ही मंडळी सारी । तो तुम्ही स्वीकारावा ॥१५४॥
शरीरानें दूर गेला । तरी अंतरी पाहिजे राहिला । हाचि आशिर्वाद भला । दयावा आम्हांसी ॥१५५॥
तुमचे दिव्य आचरण । सदा राहो त्याचे स्मरण । त्याचेच होवो अनुकरण । यथानुशक्त्या ॥१५६॥
तुमचे अभंग वाड्मय । जेथ साधकाची खरी सोय । सुचवूनि नाना उपाय । हित केले भक्तांचे ॥१५७॥
तेच तुमचे मधुर बोल । अंतरी रुजू देत खोल । भक्तिभावाची ओल । उपजो अंतरी ॥१५८॥
ऐसे हे चरित्र रसाळ । ऐसे मामा प्रेमळ । थोर त्यांचे तपोबल । आणि प्रसन्न वदन ॥१५९॥
दर्शन त्यांचे अंतरीं घ्यावें । चरित्र त्यांचें मनी ठसवावे । नाममार्गे रहावे । निरंतर ॥१६०॥
हीच पंढरीची वाट । चोखाळावी नीट । उन्मनीचा चढता घाट । दिसे पांडुरंग ॥१६१॥
जे सदाचे प्रयत्नशील । त्यांची सोपी कराया वाटचाल । कटीवर कर घेऊन गोपाळ । उभा असे ॥१६२॥
अंतरीचा कळवळा । कळे या गोपाळा । धरा गुरुनाममाळा अंतरीच ॥१६३॥
तेथेचि दर्शन देईल गोविंद । अंतरी होता सद्गद । उसळेल आनंदी आनंद । गोविंद गोपाळ एके ठायीं ॥१६४॥
शके आठराशें त्र्यायशीं । फाल्गुन शुध्द दशमीसी । गुरुवार या दिवशीं । मामांच्या पादुका स्थापिल्या ॥१६५॥
तात्या आणि मामा । एका खालीं एक दिसती आम्हा । वंदू अंतरीं धरुन प्रेमा । या दोघांना ॥१६६॥
हे चरित्र लिहून । मामीस दाखविले वाचून । रामही आनंदून । ऐकत होता ॥१६७॥
मामांनी चरितस्वप्नीं ऐकले । हे मागेच मी लिहले । बहुतानी ऐकले । हे चरित्र ॥१६८॥
संतोष झाला मनाला । मन दे टाळी त्यावेळा । यापेक्षा सुख सोहळा दुसरा नाही ॥१६९॥
केला प्रयत्न सफल झाला । श्रेय श्रीगुरुसिध्दप्पांच्या आशिर्वादाला । आनंदी आनंद झाला । तो ठेवा सुखाचा ॥१७०॥
आता वंदीन श्रोतेजन । जेथ जेथ मामांचे अधिष्ठान । कारण ते पुण्यवान । मामांच्या स्मृतीनें ॥१७१॥
खेळीमेळीनें जमावे । मामांचे गुण गावे । यासाठी हे लिहिले स्वभावें । चरित्र मामांचे ॥१७२॥
असेल ते माझे । अधिक ते मामांचे । कोण श्रोता कोण वक्ता याचे । स्मरण न ठेवावे ॥१७३॥
जरी झाला असेल प्रमाद । तरी न मानावा खेद । सच्चित्राचा प्रसाद । घेऊ आपण सर्वजण ॥१७४॥
क्षमा गुण समर्थांचा । प्रसाद हा स्वभाव संतांचा । म्हणोन हे धारिष्ट करण्याचा मोह झाला ॥१७५॥
तुम्ही संतजन कौतुक करणार । म्हणोनि केला ग्रंथविस्तार । नातरी मी काय पामर । योग्य या कार्या ॥१७६॥
सर्वांतर्यामी गोविंद । तोचि रंगविणार सुखसंवाद । वंदू त्यांचे पदारविंद । आणि म्हणू गोविंद सर्वकाळ ॥१७७॥
आषाढी एकादशी । शके आठराशे चौर्‍यांयशी । पुण्यपावन या दिवशीं । चरित्र ग्रंथ संपविला ॥१७८॥

गोविंद चरणी ग्रंथ । ठेऊनी नमितो पदीं ।
पुण्य स्मरण राहो ही । प्रार्थना एक अंतरी

गुरुर्बम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरसाक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरुवेनम: ॥

इति श्रीगोविंदचरितमानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथे अखंड उसळेल भक्तिरस । कळसाध्याय गोड हा ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP