मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री गोविंदचरितमानस| पुण्यधाम दर्शन श्री गोविंदचरितमानस अणुक्रमणिका प्रस्तावोध्याय ज्ञानेश्वरदर्शन संसार स्थितिवर्णन साधन सिध्दता कीर्तन बहिरंग परीक्षण कीर्तन अंतरंग परीक्षण जीवन प्रसंग वर्णन रौप्य महोत्सव वर्णन त्रिताप महोत्सव वर्णन पुण्यधाम दर्शन संत दर्शन निर्याण प्रसंग कळसाध्याय पूर्णविराम आरती अध्याय दहावा - पुण्यधाम दर्शन भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र. Tags : govindacharit manasmarathiगोविंदचरित मानसमराठी पुण्यधाम दर्शन Translation - भाषांतर जय जय श्री रामेश्वर पावन । नमन करीन अनन्य होवोन । ज्याचे पावता अशिर्वचन । पूर्ण लाभ पडे पदरीं ॥१॥आता करु यात्रा वर्णन । या एकचि अध्यायी परिपूर्ण । ज्या यात्रा बालपणापासून । मामांनी केल्या ॥२॥त्यांच्या सवे घेऊ भेटी । हरिहरांच्या भक्तिसाठीं । करु देवाच्या गोष्टि । मामांच्याशी ॥३॥आचरें गांवी कोकणांत । मामांचे कुलदैवत । स्वयंभू आणि जागृत । शिवलिंग ॥४॥आहे मंदिर शिवाचे । परी कौतुक तेथें श्रीरामजन्मोत्सवाचे । अनिवार प्रेम रामभेटीचे । शिव शंकरासी ॥५॥राम आणि महेश्वर । म्हणोनि शोभे रामेश्वर । ऐसा अभिनव प्रकार । शिवराघवाचा ॥६॥श्रीराम करी शिवस्मरण । आणि शिवाचे अभ्यंतरी राम पूर्ण । ऐसे दोन असोनि एकपण । दोघांचे ॥७॥दोनही प्रेमसागर । भरती सदाची अपरंपार । “सुखसहिता दु:खरहिता” ही आरती सुंदर । चाले या देवालयी ॥८॥भोलानाथ शिवशंकर । अखिल विश्वाचें सद्गुरुवर । श्रीसमर्थ ही सादर । आरती रुपे ॥९॥असो, रामाचें लग्न झाल्यावर एकदा । गोविंद भेटती शिवपदा । जाती देव दर्शनाच्या आनंदा । साठीं कुटुंबियासह ॥१०॥चालले निश्चय करुनी । मार्ग कठिण आक्रमुनी । मज दरमजल करुनी । गाठिती टप्पे ॥११॥आला कणकवली गांव । जो प्लेगानें धुतला सर्व । तेथें न दिसे एकही मानव । मार्ग खुंटला ॥१२॥ना बैलगाडी ना टांगा । म कैशी मोटार सांगा । आता मामा म्हणती गा । नाम श्रीरामेश्वराचे ॥१३॥तोच आधार सकळासी । त्यापुढें संकटें कायासी । जो तेथें विश्वासी । त्याचा मार्ग सुलभ ॥१४॥एक इसम अज्ञात । आला विचारपूस करीत । कोण कोठील काय हेत । प्रवासाचा ॥१५॥श्रीरामेश्वर दर्शनाला । जावें ही आस मनांला ॥ म्हणोनि हा व्याप केला । म्हणती मामा ॥१६॥तव तो इसम वदला । नका करु खिन्न मनाला । मी जोडतो गाडीला । आलो इतक्यांत ॥१७॥जी योजना ईश्वराची । तीच तडीस जायाची । संकटे येती जाती त्याची । काळजी देवाला ॥१८॥गाडी चालली घाटांतून । अति अवघड चढण । तो अकस्मात जोखड सुटून । बैल झाले मोकळे ॥१९॥गाडी लागली उताराला । अतिवेगाने घसरगुंडीला । सर्वांचा धीर सुटला । कांहीं सुचेना ॥२०॥गाडी उलटी धडधडा । फोडीत चाललीं कडा । गाडीवान मामा धडाडा । उडया टाकिती ॥२१॥अधोगती गाडीची । थांबविली एकदाची । करुणा रामेश्वराची । भाकिती सर्व ॥२२॥पुन्हां दोर आवळून । गाडी निघे घाटातून । अंतरी देवाचे स्मरण । प्रत्येकाच्या ॥२३॥संकटें जीवावरची । ती देवाची हाक प्रेमाची । परीक्षा पाहून भक्ताची । नेतो निजपदीं ॥२४॥देव ज्यांचा साहाकारी । तेथे काळाची कैशी येईल फेरी । काळाची नजर चुकवून करी । फजीत काळाला ॥२५॥आले रामेश्वर मंदिर । मुखीं प्रत्येकाच्या नामगजर । हर्ष झाला सर्वांस थोर । प्रवेशले मंदिरी ॥२६॥श्रीरामेश्वराच्या मंदिरांत । मामा आले गाभार्यांत । मन झालें शांत । शिंवलिंग पाहोनी ॥२७॥हृदय आले उचंबळून । आनंदाने भरले अंत:करण । आपल्या कुलदैवताचे दर्शन । प्रिय वाटले मामांना ॥२८॥ती पहा मामांच्या नेत्रांत । शिव जटेंतील गंगा वहात । चालली अविरत पुन्हां करीत । आभिषेक शिवासी ॥२९॥जोडोनी उभयकरा । म्हणती जयजयरामेश्वरा । आहे तुमचा आसरा । म्हणोनि आम्ही सुखरुप ॥३०॥तुमच्या कृपा प्रसादावीण । आम्ही करु तों तों शीण । म्हणोन तुमचे स्मरण । असो आम्हासि सर्वदा ॥३१॥राहतो दूर देशाला । म्हणोन भेटीचा योग न आला । बहुत दिवसांनी जमला । हा योगायोग ॥३२॥हे सर्वव्यापी परमेश्वरा । वास तुमचा अंतरा । माजी असो दया हा खरा । आशिर्वाद दयावा आम्हासि ॥३३॥ऐसे विनवून देवासी । मामा आले सागर दर्शनासी । होती मंडळी बरीचशी । त्यांच्या समवेत ॥३४॥ओहोटची वेळ होती । तरीही एक लाट आली पुढती । मामांचे चरण धुवून पुरती । परतली ॥३५॥तटस्थ झाले सर्वजण । म्हणती हा आनंदाश्चर्याचा क्षण । सागराने ओळखले कोण । आले आपल्या किनारीं ॥३६॥मामा परतले मंदिरासी । तो भेटले तेथील रहिवासी । म्हणती आता ऐकू कीर्तनासी । ही आस पुरी करा ॥३७॥रंग भरे किर्तनाचा । तो ठाव घेई अंत:करणाचा । लोक म्हणती या सत्पुरुषाचा । वास येथेच असावा ॥३८॥नित्य ऐकता कीर्तन । होईल आमुचे समाधान । म्हणोनि मामांना विनवून । रहा म्हणती ॥३९॥मामा म्हणती लोकांना । तुम्ही विचार करुन पहाना । आम्हीं परस्थ अडचणीं नाना । सोसून आलो यात्रेसाठीं ॥४०॥आता आम्हासि आहे परतणे । प्रेमें तुम्ही निरोप देणे । अखंड देवाचें नामस्मरण करणें । हा बोध असो दे अंतरीं ॥४१॥प्रेमभाव मनीं उमटला । तो पाहिजे टिकवला । आता प्रेमभरे आम्हाला । निरोप दयावा ॥४२॥तपावरीं वर्षे लोटली । आतां ही दुसरी संधी आली । तुम्ही माझी सेवा गोड मानली । यांत मज समाधान ॥४३॥गांठी भेटी दैवयोगें । यांत न मानावे वाऊगे । ईश्वरी सूत्र आहे मागे । आपण त्यांचे पायिक ॥४४॥लोक म्हणती येथील एक । रिवाज असे वर्षे अनेक । कौल देवाचा आम्ही लोक । मानतो सदा ॥४५॥विचारिती श्रीरामेश्वराला । तो त्यानें दिला हवाला । म्हणे जा उदयाला । नको आज ॥४६॥आनंदे अंत:करण भरुन । टाळ्या पिटिती सर्वजण । म्हणती आजही कीर्तन । आम्ही ऐकू तुमचे ॥४७॥बहुत सोपे करुन सांगतां । तेणे प्रसन्नता ये चित्ता । आम्हीही परमार्थाच्या वार्ता । आता मनीं आणू ॥४८॥कडू संसार मानोनी गोड । आम्ही त्याचेच घेतले वेड । नित्य सुखाचा मार्ग उघड । तुम्हीच दाखविला ॥४९॥दृष्टींत पडले अंजन । तेणे सत्य देखती नयन । जे जे गेले होते झाकोळून । संसार मदें ॥५०॥नामस्मरणीं रमवूं मना । होईल तेवढें करुं प्रयत्ना । आम्ही लागलो तुमच्या चरणा । आशिर्वाद दयावा जी ॥५१॥ऐसा हा प्रेमाचा सोहळा । भक्त झाले गोळा । नाम संकिर्तनी उमाळा । धरोनिया ॥५२॥दुसरें दिवशीं आनंदानें । आणि वियोग दु:खानें । भारावली अंत:करणे । निरोप देता ॥५३॥संत्संगाची महती ऐशी । मिळता लाभती सौख्याच्या राशी । वियोग घडता कंठाशी । प्राण येती ॥५४॥मामा परतले सांगलीला । वेशीपर्यंत लोक झाले गोळा । गाडीवान म्हणे बैलाला । चल आता ॥५५॥वाटेंत लोक बोलले । कीं काल वाघानें झडपिलें । लोकांच्या तोंडाचें पाणी पळाले । क्षणांर्धांत ॥५६॥मामा म्हणती मनांत । रामेश्वर दयावंत । तोचि पाठीराखा सतत । आम्हासी ॥५७॥म्हणोनि हे विघ्न टळले । सुख समाधान घरास आले । म्हणोन वंदू पाऊले । श्रीरामेश्वराची ॥५८॥स्मरण देण्या संकटें येती । हीच त्यांची असें महती । म्हणोनि स्वस्थ चित्ती । आपण असावें ॥५९॥सहज स्वभाव मामांचा । तीर्थयात्रा न करण्याचा । परी मोह कुलदैवताचा । न आवरे त्यांना ॥६०॥सर्व तीर्थे घरा येती । ऐशी जोडावी साधन संपत्ती । म्हणोनि मामा राहिले स्वस्थचित्तीं । आपुल्या राम मंदिरी ॥६१॥श्रवण मनन निदिध्यास । प्रवचन कीर्तनाचा सोस । अखंड ठेविती अनुसंधानास । हा नित्यक्रम मामांचा ॥६२॥तपानुंतपावरी । अव्याहत क्रम चालला घरीं । आतां झाली पुरी । छत्तीस वर्षे ॥६३॥दिन ढळला पश्चिमेला । जीवनाचा अस्त आला । संदेह भेटीचा योग साधला । पाहिजे आता ॥६४॥ऐसे देव आणि संत । श्रीसाधुमहाराजासहित । ठरविती मनांत । फिरली सूत्रें ॥६५॥मामा आपण होऊन । कधी न करितील तीर्थाटन । त्यातून देह झाला क्षीण । ईश्वरेच्छा बलीयसी ॥६६॥श्री. पंडितराव परचुरे यांसी । प्रेरणा झाली एकसरसी । आले मामांच्या घरासी । तो चर्चा सुरुं होती ॥६७॥उमदीहून प्रेमांचे । आले निमंत्रण तातडीचें । श्रीभाऊसाहेबांच्या पादुकांचे । दर्शन घ्यावया ॥६८॥दिवस पादुकांच्या स्थापनेचा । संतसज्जना महत्वाचा । परी मामांच्या प्रकृतीचा । विश्वास लागेना ॥६९॥तव परचुरे बोलती विश्वासानें । चला आता स्वतंत्र मोटारीनें । सर्व व्यवस्था जारींने । माझ्याकडे लागली ॥७०॥सोडोनि सर्व चिंता । करु आता वारीच्याच वार्ता । उमदी निंबाळ निंबरगी आता । झालेच पाहिजे ॥७१॥परचुरे पतिपत्नी । मामांच्यावरी भक्ति प्रेम म्हणुनी । हे कार्य आपुलेच मानुनी । तन मन धन वेचती ॥७२॥पुत्र जपे पित्याला । तैसा पंडितरावांचा भाव भला । उचलती फुलाला । तैसे मामांना जपती ॥७३॥भक्तांचा सुशब्दाला । मामानी नकार दिला । ऐसा दिवस न उगवला । मामांच्या आयुष्यांत ॥७४॥हां हां म्हणता तयारी झाली । इतरांचीही धांदल झाली । चाळीस एक माणसे तयार झाली । सहप्रवास कराया ॥७५॥आले कोल्हापुरहून । विजयसिंह सुर्वे आपणहून । स्वत:ची स्टेशन वँगन घेऊन । खडे प्रवासी ॥७६॥तव एक बातमी आली । कीं ही वेळ नसे चांगलीं । ओढयांनी मर्यादा उल्लंघिली । पावसामुळे ॥७७॥रस्ता न नीट कोणाला । माहीत होता चांगला । त्यांतच हा निसर्गाचा घाला । डळमळे निश्चये ॥७८॥मामा म्हणती जो ध्यास । एकदा घेतला त्याचीच कास । श्रीनारायणपदीं विश्वास । धरोनिया ॥७९॥सद्गुरुंचा करुन गजर । निघाली मंडळी सत्वर । जैसे वीर धुरंधर । रणासि जाती ॥८०॥कोणी न पाही पैशाकडे । प्राणाचीही न पर्वा ध्येयापुढें । ऐसे एक एक गाढे । वीर होते ॥८१॥मामांच्या सह प्रवास । हीच प्रत्येकाची आस । नेती शेवटास । संकटास न लेखता ॥८२॥मोटारी मागून मोटारी । करती पुण्यधामांची वारी । पाऊस चिखल यांचा न करी । कोणी विचार ॥८३॥मार्ग नीट सापडेना । लटपटती मोटारी जाताना । खाच खलगे नाना । वाटेंत लागती ॥८४॥जो रस्ता मिळाला । तो अडचणीचाच ठरला । घसरगुंडी आणि चढाला । जीव होई बेजार ॥८५॥मोटार ओढयांतून चालेना । तेव्हां बैल ओढती मोटारीना । परी परतावे ऐसे मना । येईना कोणाच्या ॥८६॥जेथें वाट धोक्याची । तेथें संधी पराक्रमाची । सुर्वे यांनी धैर्याची । कमाल केली ॥८७॥आपण पुढे जाती । कौशल्याने मार्ग शोधिती । किंवा तात्पुरता बनविती । नाना उपाय शोधुनी ॥८८॥इतक्या अडचणींतून मामांना । सुखरुप नेती त्या भक्तांना । कशा सुचती कल्पना । एक देवचि जाणे ॥८९॥अनंत संकटें परी सुखरुप । हीच देवाची दया अमूप । त्याच्या लीलेची साक्ष आपोआप । कळे अशा वेळीं ॥९०॥आले निंबरगी गांवाजवळ । तेथें ओढयास अति चिखल । निंबरगीचा मार्ग सरळ । दिसेना कोणा ॥९१॥परतले चडचाण गावांत । तळ दिला श्रीमारुतीच्या देवालयांत । उतरताच मामा सुरु करीत । कीर्तन आपुलें ॥९२॥ना श्रम ना दम । ऐसे कीर्तनाचे प्रेम । आहे की नाहीं जाजम । याचीही वार्ता नसे ॥९३॥नेमाची गांठ प्राणाशी । हेचि मनोमन अहर्निशी । हे कळावया लोकासीं । कीर्तन नेम मामांचा ॥९४॥अंतरीं अखंड नेम चालविला । तरी तो कळेना लोकाला । म्हणोन त्यांच्या मार्गदर्शनाला । प्रगट नियम कीर्तनाचा ॥९५॥करताल धरुन केले । ईश स्तवन पहिले । श्रीरघुनाथप्रिय उभे केले । मारुती रायापुढें ॥९६॥श्री मारुतीरायांचे मस्तकावर । येथे शिवलिंग असे सुंदर । इकडे मामांच्या कपाळावर । भस्माचे पट्टे दिसती ॥९७॥हे अनेकांनी पाहिले । श्रीशिवशंकराचे प्रसाद चिन्ह भले । साक्षात्काराचे बाह्य चिन्ह मानले । जाणत्यांनी ॥९८॥दुसरे दिवशी मंडळी । निघाली प्रात:काळीं । आली ओढयाजवळीं । तो गाळ दिसे अपार ॥९९॥विजयसिंहानी पुन्हां केली । पराक्रमाची शिकस्त यावेळीं । उत्तम वाट तयार केली । प्राप्त साधनोपाये ॥१००॥आपण स्वत: उत्तम । मार्ग शोधिला प्रथम । करोनि अपार श्रम । जीवाची पर्वा न करता ॥१०१॥एकचि मोटार येरझार्या करी । पोचविली मंडळी परतीरीं । ज्याची त्याची वदे वैखरी । हे अद्भुत अचाट ॥१०२॥म्हणती आता निंबरगीस । जाऊं श्रीनारायण दर्शनासी । तेथून करु निश्चयासी । पुढील मग ॥१०३॥निंबरगी जवळ पुन्हा ओढा । उतरुन जाणे लागेल पुढा । कमरे इतक्या पाण्यांतून तेवढा । मार्ग होता ॥१०४॥सगळे गेले मामा राहिले । ते एका मुसलमानाने पाहिले । तो म्हणे हे माझे काम पहिले । मी नेतो याना ॥१०५॥विष्णु जसा गरुडावरी । तैसे मामा त्याच्या पाठीवरी । तो निघाला परतीरी । लीला विनोदे ॥१०६॥येता परतीरावर । मोल ठेविती त्याच्या हातावर । तव तो चतूर । ते घेईना ॥१०७॥संत सेवा घडली । आणि मी ती मोले विकली । म्हणजे बुध्दीच चकली । हे बरे नव्हे ॥१०८॥कवडीसांठी विकावा परीस । तैसे हे वाटे माझ्या मतीस । नका करु आग्रहास । मोलासाठीं ॥१०९॥हा ठेवा माझ्या भाग्याचा । मला न विकावयाचा । मानू नका भार यावा । तुम्ही काहीं ॥११०॥चकित झाली मंडळी । ही भक्त्तीभावाची ज्योत आगळी । परधर्माची तुटली साखळी । संत राज्यांत ॥१११॥एक ईश्वर सर्वांठायी । हे कळले या समयीं । शुध्द सत्वाची तेवता समई । ईश्वर दिसे सगळींकडें ॥११२॥देव मानिती निराळे । परी एकभाव सगळीकडे खेळे । भावाचे बळचि आगळे । अनेकी दाखवीं एकत्व ॥११३॥मामा आले निंबरगीसी । भेटले पीठाधिपतीसी । मग आले समाधिमंदिरापाशी । श्रीगुरुलिंगजंगमांच्या ॥११४॥जे सांप्रदायाचे मूळपीठ । शाखोपशाखांना आधार श्रेष्ठ । ज्यांनी वरिष्ठाहून वरिष्ठ । संत आणले या सांप्रदायी ॥११५॥महावृक्ष गेला गगना । सुख समाधान लक्षावधींना । प्रणाम त्या श्रीगुरुलिंगजंगमांना । सप्रेम असो ॥११६॥जोवरी शाखा आणि उपशाखा । तोवरी आधार पशुपक्षा । म्हणोनि या कैवल्यवृक्षा । सांष्टांग नमन ॥११७॥जय जय जय श्रीमहेश्वर । श्रीरेवणसिध्दादि सद्गुरुवर । त्यांनी केला हा चमत्कार । वंदन त्या प्रभुपदी ॥११८॥जय जय जय श्रीनारायणा । येऊन आमुची करुणा । तुम्ही पाठविले या संताना । म्हणूनि आम्ही सुखरुप ॥११९॥जववरी अज्ञान । या भूतलीं घाली थैमान । तववरी तुमचे आशिर्वचन । असोदया या सांप्रदायावरी ॥१२०॥तोचि आम्हास आसरा । तोचि आम्हास निवारा । म्हणोनि हे करुणाकरा । कृपादृष्टी पहावे ॥१२१॥देखिले न तुमचे चरण । परी जाणतसो महिमान । अनंतरुपें अवतरोन । दीन जनासी सांभाळिले ॥१२२॥मामा समाधी पुढें बसून । सुरुं करिती कीर्तन । लोक आले मागाहून । आळस टाकुनी ॥१२३॥नित्याचा आपुला अनुभव । कीं साथीदार श्रोत्यांनी करावा गौरव । तेव्हां कीर्तनकारास चढे भाव । ये रंग निरुपणा ॥१२४॥विदयुद्दीप झळकती । मधुरवादयें वाजती । लोक ही माना डोलावती । तेंव्हा स्फूर्ती कीर्तनकारासी ॥१२५॥येथें सर्वाआधी । हा पुण्यपुरुष कीर्तन साधी । ही साधी परमावधी । कीर्तन प्रेमाची ॥१२६॥न मानिती प्रवासाचा शीण । प्रकृतीची साथ ही नसे पूर्ण । देह व्यथा दारुण । पीडा करिती ॥१२७॥तरी सोस कीर्तनाचा । सद्गुरुंची सेवा करण्याचा । उमाळा भाव भक्तीचा । अलोट आंत ॥१२८॥येता सद्गुरु सानिध्यांत । वार भरे अंगांत । हे सामर्थ्याचे अद्भुत । वाटे आम्हा ॥१२९॥आत्मशक्ती वेगळी । ती देहशक्तीहून निराळी । हे कळले गुरुपद कमळीं । येता आम्हां ॥१३०॥आत्मशक्तीचे सामर्थ्य अचाट । ते कार्ये करवी बिन बोभाट । जेथें न सापडे वाट । कळिकाळासी ॥१३१॥हेचि दाखवावया । मामा येती शरीरा या । दुर्धंर रोगासि सामना दयाया । परमार्थांसाठीं ॥१३२॥आश्चर्य चकित लोक होती । वैदय ही आश्चर्य करिती । धन्वंतरीचा धन्वंतरी म्हणती । मामांना ॥१३३॥नका सुई टोचू शक्तिसाठी । नको गोळी झोपेसांठी । जरी आले प्राण कंठी । तरी उभे कीर्तना ॥१३४॥नेहमीचा आपुला अनुभव पहाना । प्रवासांत दमलेल्या लोकांना । तहानभूक विश्रांतिची विवंचना । सदा असते ॥१३५॥म्हणती आधी कपभर । चहा आणा हो लवकर । मग आमच्या बोलण्यास भर । पहा कसा येईल तो ॥१३६॥मामा म्हणती करु कीर्तन । जेथे सगुण जाईल निर्गूणांत रंगून । मग कैची भूक आणि तहान । कीर्तन विसावा भागल्यासाठीं ॥१३७॥संत आणि सामान्यजन । यांचें ऐसे वेगळेपण । दोघांचे विश्रांतीस्थान । असे वेगळे ॥१३८॥ऐशी ही कीर्तनसेवा । लोक म्हणती वाहवा । देवही म्हणती वाऽवा । धन्य केला संसार ॥१३९॥सुरवर डोलाविती माना । ऐंसे कर्म करावे वाटे ज्यांना । त्यांनी संत चरित्राच्या अध्ययना । साठी रहावे तत्पर ॥१४०॥वाचोनि करावा विचार । विचारोनि करावा उच्चार । आणि त्या सरिसाच आचार । मग गोविंद रे गोविंद ॥१४१॥गुलिंगजंगम श्रीनारायण । मामांनी केले सुप्रसन्न । ऐसे प्रेमभरे कीर्तन । मामांचे झाले ॥१४२॥प्रेम घ्यावे प्रेम दयावे । जेणे संतसज्जनांनी डोलावे । आणि परमानंदाचे कोठार लुटावे । जे संपता न संपे ॥१४३॥ऐसा विचार मामांचा । ऐसा सुविचार मामांचा । ऐसा भक्ति भाव मामांचा । दिसे सर्वांना ॥१४४॥श्रीफल आणि आहेर । अर्पिला जेथें सद्गुरुवर । तीर्थप्रसाद सुमधुर । घेतला सर्वानी ॥१४५॥आकाशीं विजा चमकती । दाखविती पावसाची भीती । म्हणोनि आतां लोक सुचविती । चला परतू ॥१४६॥सर्वजण परतले विजापूरला । तो दुसरा मार्ग सांगलीला । मामा थेट गेले निंबाळला । श्रीगुरुदेवांचे आश्रमीं ॥१४७॥श्रीगुरुदेव आणि मामा । यांचा अलौकिक प्रेमा । पुढील अध्यांयी महिमा । वर्णूं सावकाश ॥१४८॥श्रीगुरुदेवांच्या आश्रमीं । जाता उसळल्या आनंदऊर्मी । तेथें मामा आणि मामी । वंदन करिती प्रेमभरे ॥१४९॥तेथेही भक्तिगीतें म्हणून । मनोभावे सेवा करुन । श्रीगुरुदेवपदीं नमून । मामा मामी परतले ॥१५०॥वर्ष नसेल लोटले परचुरें पुन्हां बोलले । आता चिमड उमदीला गेले । पाहिजे आपण ॥१५१॥धन्य परचुरे यांच्या उत्साहाची । हौस जबाबदारी पेलण्याची । आवडी सत्संगाची । अंतरीं म्हणोनी ॥१५२॥पर्वा न करिती पैशाची । वाट पाहती संधीची । मामांच्या रुकाराची । तो मिळताचि आनंदले ॥१५३॥ही निघाली छोटी यात्रा । आली चिमड क्षेत्रा । तापनाशी तीर्था पवित्रा । भेट देण्या ॥१५४॥सद्गुरु श्रीनारायण । मामा करिती चरणवंदन । गुरुशिष्यांच्या आनंदाचे वर्णन । शब्दानें न करवे ॥१५५॥शिष्य पावे कृतार्थता । तें गुरुसी ही धन्यता । समाधान उभयंताच्या चित्ता । सार्थकता जीवाची ॥१५६॥वेळ होता नित्याची । कीर्तन सेवा करण्याची । मामांच्या तत्परतेची । साक्ष येथेही आली ॥१५७॥करताल धरुन । सुरुं केले कीर्तन । मंडळी जमली नाद ऐकून । हरिकीर्तनाचा ॥१५८॥श्रीसाधुमहाराजांच्या चरणापाशी । सेवा अर्पून भक्तीभावेसी । मामा निघाले हिंचगिरीसी । श्रीभाऊसाहेबांचे दर्शना ॥१५९॥सहज मामांना आठवले । पूर्वी प्रवासांत एकवेळे । श्रीभाऊसाहेब महाराजांचे दर्शन झाले । अपूर्व योगायोगे ॥१६०॥श्रीभाऊसाहेबांच्या समाधीचे । विश्वस्त विश्वासाचे । थोर साधक निष्ठेचे । श्रीबाबुराव गोखले ॥१६१॥उराऊरीं भेटले मामांना । आनंदून पुन:पुन्हां । त्या भेटीच्या वर्णना । काव्य शक्ति कमी पडे ॥१६२॥भक्तिप्रेमाचे सागर । उसळती अपरंपार । प्रेम लोटे प्रेमांत अनिवार । शांत अथांग दिसती पुन्हा ॥१६३॥तेथील थाट अपूर्व । संतोषली मंडळी सर्व । वाटोनी आश्चर्य । आदरातिथ्यांचे ॥१६४॥एका मागोन एक । प्रवासाचे पिकले पीक । आण्णा देवधर भावीक । म्हणती मामांना ॥१६५॥चला जाऊ श्रीकाडसिध्दाला । कोल्हापूरच्या वाटेला । सांप्रदाय प्रभुवराला । भेट देऊ ॥१६६॥चढण डोंगरावरची । कसोटी लागली जीपची । देवधरानीं कौशल्याची । चुणुक दाखविली ॥१६७॥अति अशक्त मामांची प्रकृति । परी सर्वजण मनाभावे जपती । आपुल्या जीवीताची क्षिती । न बाळगता ॥१६८॥महाराज श्रीकाडसिध्द । जे महाराष्ट्रांत अतिप्रसिध्द । परमार्थी प्रबुधध्द । भक्त्ति प्रसार करिती ॥१६९॥मामांच्या भेटीची आवड । म्हनोनि काढिती सवड । प्रेम भेटीसाठीं उदंड । व्यवस्था करिती ॥१७०॥हार घालती मामांना । तो त्यांना आवडेना । करोनि हरप्रयत्ना । गळा हार घालिती ॥१७१॥हार घेऊनि हातात । मामा सांष्टांग घालती दंडवत । महाराज सद्गदीत । होत मनीं ॥१७२॥ईश्वर असे सर्व ठिकाणीं । नाना रुपें घेऊनि । हे प्रत्यया ये अलिंगनी । संत सज्जनांच्या ॥१७३॥ना मराठा ना ब्राह्मण । ना लिंगायत ना मुसलमान । जेथे भक्तिभावाचे राज्य संपूर्ण । तेथे एक ईश्वर ॥१७४॥तेथे दिसे बंधुभाव । प्रेमाचा होई वर्षाव । रामराज्याचा प्रभाव । तेथेचि दिसे ॥१७५॥संत तेथे रामराज्य । रामराज्य तेथें स्वराज्य । स्वराज्य तेथें सुख अविभाज्य । हा क्रम अव्याहत दिसे ॥१७६॥आतां परचुरे म्हणती मामांना । चला भेटू श्रीरेवणसिध्दांना । श्रीगोंदवलेकर महाराजांच्या निवासस्थानांना । पूर्ण करु यात्रागमन ॥१७७॥मामा पुन्हा तयार । कधीं प्रकृतीची तक्रार । सत्कार्यी अर्पिण्यास शरीर । सदा सज्ज असती ॥१७८॥श्रीरेवणसिध्दा समोर । उजळोन तेरा रुपयांचा कापूर । मामा उभे राहिले ईश्वरासमोर । प्रकाशांत कर्पुरगौराच्या ॥१७९॥धवल शिवलिंग सुंदर । धवल मामांचा मुखचंद्र । हृदय झाले प्रेमार्द्र । नयनीं नीर लोटती ॥१८०॥मामा राहिले निवांत । शब्द न फुटे मुखांत । म्हणती झालो कृतकृत्य । श्रीरेवणसिध्दराया ॥१८१॥श्रीरामें केला आराम । आतां जिवनाचा आला विराम । श्रीरेवणसिध्दपदीं प्रणाम । असो माझा ॥१८२॥सहा तपावरी आयुष्य सरले । आपल्या कृपे सफल झाले । जें जें मनीं धरिलें । तें पूर्ण केले सिध्दराया ॥१८३॥आता निश्चिंत मानसी । देह आर्पिला चरणासी । जी आज्ञा कराल मजसी । ती मानेन सुखेनैव ॥१८४॥मी हा असा दीन दुबळा । दुर्धर रोगांचा फास गळा । तरीहि आणिले भेटीला । ही सत्ता असो तुमची ॥१८५॥धन्य झालो संसारी । आतां आस न दुसरी । स्मरण तुमचें असो अंतरी । सर्वकाळ ॥१८६॥करवून घेतली सेवा । तैशी केली सदाशिवा । आता आशिर्वाद दयावा । जाताना ॥१८७॥कंठ दाटला अश्रूनी । परी प्रसन्नता दिसे वदनीं । समाधान श्री रेवणसिध्द दर्शनी । म्हणोनिया ॥१८८॥झाले सांप्रदाय पुण्यधाम वर्णन । जेथ भाविकांना पूर्ण समाधान । आतां संत दर्शन । असे पुढील अध्यायीं ॥१८९॥ईश्वराची सुसूत्र रचना । न कळे सामान्य जना । म्हणोनि सच्चरित्राच्या अवलोकना । अपार महत्व असें ॥१९०॥अनंत देहाच्या यातना । शरीर जागचे हलवेना । परीं देहाच्या सारुन विवंचना । देव बोलवी भेटीला ॥१९१॥माना अथवा न माना । परी ही अघटीत घटना । निमित्त मात्र करुन जना । ईश्वर सूत्र चालवितो ॥१९२॥देवाच्या इच्छेने वर्तावे । देव करील ते मानावे । हेचि मामांच्या मनीं स्वभावें । म्हणोन पुण्यधाम दर्शन ॥१९३॥इतिश्री गोविंदचरितमानस । जे स्वभावेचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । पुण्यधाम वर्णन दशमोध्याय ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 29, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP