अध्याय तिसरा - संसार स्थितिवर्णन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


मन जडो गोविंदचरणीं । ही एक आस मनीं । त्यांच्या दिव्य जीवनी । रति असो ॥१॥
जयजय श्रीअनंत तनया । सन्मार्गदीप उजळाया । धरोनी अवतारकार्या । कष्टविलें देहासि ॥२॥
देहधारणेंसाठीं जेवणें । वस्त्र-प्रावरण घेणें । आसरा शोधणें । संसाराचा ॥३॥
परी कमी करोनिया व्याप । भरणें परमार्थाचें माप । त्यासाठीं प्रयत्न उमाप । हें धोरण गोविंदजींचे ॥४॥
न दुखवावे कोणासी । सेवाभाव मातापितयासी । नम्रता सर्वांसी । हें धोरण गोविंदजींचे ॥५॥
एकदां अनंतराव म्हैसकर । गोविंदजींचे मित्रवर । जमखिंडीहून सत्त्वर । पत्र पाठविलें सांगलीसी ॥६॥
तुमची श्रीराम उपासना । म्हणोनी आलें माझ्या मना । गोविंदजी, येथे एक घटना । घडली असे ॥७॥
येथें एका उपेक्षीत जागीं । श्रीराम-सीतेच्या सुंदर सर्वांगी । मूर्ती सापडल्यां योगायोगीं । अवचित ॥८॥
जरी मानेल तुम्हांसी । तरी त्या सत्वर न्याव्या सांगलीसी । काय विचार मानसीं । तो सत्वर कळवावा ॥९॥
धनार्थियासी धन । तृषार्थियासी धन । तृषार्थियासी जीवन । तैशा या मूर्ति सगुण । गोविंदजीसी ॥१०॥
आनंद पोटीं मावेना । वाटे श्रीरामचि येती सदना । आनंदाश्रुं नयना । ओघळती ॥११॥
म्हणती डोईवरुनी कोणी । आणील या मुर्ति दोन्ही । चालत येथवर तेथूनी । तरी विशेष होईल ॥१२॥
खाडीलकर नामें एक । होते बलवंताचें उपासक । म्हणती मूर्ति टाकोटाक । आणतो पदयात्रेनें ॥१३॥
डोईवर सीतारामांच्या मूर्ति । ठेवोनि खाडिलकर आनंदमूर्ति । निघाले करावया वचनमूर्ति । आले चालत ॥१४॥
आनंद झाला गोविंदजींना । म्हणती ही दैवी घटना । कसे योग जुळती पहाना । सत्कार्यी ॥१५॥
श्रीरामजयरामजयजयराम । स्मरण करोनी सप्रेम । मूर्ति स्थापिल्या मनोरम । श्रीरामाश्रमीं ॥१६॥
विनविती हात जोडोनी । पोटीं प्रेम आंसू नयनीं । हे सीताराम जनक जननी । भक्त जनांची ॥१७॥
आलाती आमुच्या सदना । आनंद झाला मना । आताम एकचि विवंचना । मनीं असे ॥१८॥
आतां अखंड उपासना । घ्या करवून हे जगज्जीवना । आपुल्या आशीर्वादाविना । आम्ही दीन रंक ॥१९॥
भक्त कैवारी आपण । म्हणती संतसज्जन । आपण आमुचे आशास्थान । हे गुणनिधान श्रीरामा ॥२०॥
ऐसे विनवून प्रभूला । मुहूर्त झाला सेवेला । भजन पूजन श्रवणाला । बहर चढे ॥२१॥
श्रीरामाश्रम, श्रीआनंदाश्रम ऐशा । दोन खोल्या नजीकशा । देव पूजा जपजप्य या विशेषा । अनुक्रमें उपयोजिती ॥२२॥
करावी देवपूजा उत्तम । जन्मोत्सव पुण्यातिथ्यादि निष्काम । पुरश्चरणेंहीं कठीणतम । आचरिली ॥२३॥
अभ्यासही चाले निरलस । स्कूल फायनलचे यश येतां हातास । मँट्रिकच्या परीक्षेचा ध्यास । लागला चित्ता ॥२४॥
तों आली प्लेगची धाड । काळाची लांडगेतोड । काळजाची धडधड । वाढो लागली ॥२५॥
नानांनीं कुटुंबियासह । मिरजेस केले वसत्तिगृह । तों काळही आला त्यांचेसह । गोविंदास झडपाया ॥२६॥
उठल्या प्लेगच्या तीन गांठी आनंद मावळला उठाउठीं । धांव पाव गा जगजेठी । विनविती नाना ॥२७॥
मनीं होवोनि चिंताक्रांत । पाहोनि घरीं आकांत । म्हणति शंकरा अंत । पाहो नका आतां ॥२८॥
ज्याच्यांसाठीं तनमनधन । आणि वेचावा तोही प्राण । असा माझा गुण-निधान । पुत्र गोविंद ॥२९॥
नाहीं मागत धन । नाहीं मागत जगीं मान । एवढया माझ्या पुण्यपावन । बापूला वांचवी ॥३०॥
शिवशंकरा सदाशिवा । आतां बापूला वांचवा । माझा हा प्राण ठेवा । हिरांवू नका ॥३१॥
जय जय जय श्रीशिवहरहर । तुज म्हणति करुणाकर । हे शिवशंभो गौरीहर । एवढें कृपादान मज दयावें ॥३२॥
तंव बापू घामेजला । दीर्घस्वरें बोलूं लागला । नाना तुमचा ‘बापू’ निघाला । दूर, अतिदूर ॥३३॥
शरीर झालें थंड । सुरुं झाली रडारड । हृदयाची धडधड । आकांत झाला ॥३४॥
रीघ चालली यम पुरीला । बापू लागला त्या मार्गाला । कोण पुसे कोणाला । ज्याचा तो चिंताक्रांत ॥३५॥
माई गोविंदाची प्रियमाता । देवापुढें नमवी माथा । प्रार्थना करी पुत्राकरितां । जो तिज प्रिय प्राणाहून ॥३६॥
हे करुणाकरा श्रीहरि । माझ्या बाळावरी कृपाकरी । माझें उरलें आयुष्य सत्वरीं । दे माझ्या बापूला ॥३७॥
पसरिते पदर । भीक घालावी सत्वर । जीव झाला बेजार । माझा आतां ॥३८॥
बापूवीण जिणें । तें अवघे उदासवाणें । अमृत गमावणें । करटीसाठीं ॥३९॥
बापूअ माझा देवगुणाचा । होईल आधार जगाचा । वर्षाव करील अमृताचा । जगावरी ॥४०॥
माझ्या जीवाच्या काय गोष्टी । बापू माझ्या भाग्याची पेटी । देवा माझा कंठ घोटी । बापूसांठी ॥४१॥
नको होऊं निष्ठूर । हे देवाधिदेव जगदीश्वर । काय करुं अधीर । जीव झाला ॥४२॥
हांक जातां भक्तिभावची । कृपा झाली देवाधिदेवाची । बापुरायाच्या हालचालीची । चाहूल लागली ॥४३॥
मंडळी झाली गोळा । आणि बापू उठून बसला । हर्षनिर्भरें बोलूं लागला । जो झाला वृत्तांत ॥४४॥
एक योगीराज्ज । सुर्या ऐसा सतेज । म्हणे तुझें काय काज । येथें असे ? ॥४५॥
जा माघारी भूवरीं । सोज्वळ भक्तिध्वजा उभारी । साकी बाकी चुकती करी । मग यावें कैवल्यधामीं ॥४६॥
योगीराज परम दयार्णव । माझा करोनी गौरव । मज दिला वाव । भक्तिसाठीं ॥४७॥
ऐकून पुत्राचें उत्तर । माता पित्यास आला गहिंवर । म्हणती हे रमावर । कृपा तुझी ॥४८॥
अल्पावधींत सावत्र माता । आपुलें आयुष्य बापूकरीतां । अर्पुन केली वचनपूर्तता । आणि गेली देवाघरीं ॥४९॥
जन्मदातीं गेली बालवयीं । सावत्रमाता छात्रवयीं ॥ सरली बापूची पुण्याई । मातृसुखाची ॥५०॥
नानांचा बापू लडिवाळ । माता पिता आणि सकळ । होवोनी अनुकूल सर्वकाळ । जपती पुत्रासी ॥५१॥
मातेची येतां आठवण । गोविंद होई सार्द्र-नयन । प्रसंगी अश्रुंचे अभिषेक-सिंचन । मातेसाठीं ॥५२॥
बापूचे झाले बापूराव । गोविंदाचे गोविंदराव । थोर संत म्हणे गांव । परि मातेपुढें बालक ॥५३॥
निर्व्याज आणखी निष्पाप । जरी वय वाढे आपोआप । निष्कपट बालभावाची छाप । दिसे मुखावरी गोविंदजींच्या ॥५४॥
रोग करी जर्जर काया । पुढील अभ्यास गेला वाया । नाना म्हणती पुरे करा या । शालेय शिक्षणा ॥५५॥
अशक्तपणा करी उपेक्षा । आतां कसली पुढें परीक्षा । उच्च शिक्षणाच्या आकांक्षा । विरल्या जागच्या जागीं ॥५६॥
ही मनीं राहिली तळमळ । म्हणूनि विदयाविभूषितांची त्यांना कळवळ । पदवीधरांनी एकवेळ । म्हणती यावें परमार्थी ॥५७॥
त्यांनीही पिटावा भक्तीचा डांगोरा । तरीच उघडतील सुशिक्षितांच्या नजरा । करुं लागतील एकसरा । भक्ती सर्वजण ॥५८॥
हाच गोविंदजींचा आनंद । हाचि त्यांचा सुखसंवाद । वाढवावया । रामराज्य सुखद । या भूमंडळी ॥५९॥
सुखी होतील सर्वजण । हेंचि गोविंदजीस भूषण । गीताभागवत पठण । होईल घरोंघरीं ॥६०॥
असो नाना म्हणती बापूला । आतां लागू नोकरीच्या शोधाला । हातभार संसाराला । लागेल जरा ॥६१॥
दिन कांही सरतां । ये नोकरीचा योग हातां । मिळे न्यायालयीं आतां । जीविकावृत्तीं गोविंदजींना ॥६२॥
आली नोकरी सुखाची । टिकली असती कायमची । या सुजाण नोकरास गुणांची । वाणच नव्हती ॥६३॥
होता सहवास तात्यांचा । तेथेच त्यांचा व्यवसाय वकिलीचा । हा योगच भाग्याचा । जमला होता ॥६४॥
गोविंदजींनी हेरलें । कीं सतश्रेष्ठ असती भले । मार्गदर्शक याहून भले । कोठें शोधावें ? ॥६५॥
बर्कसाहेब आयरिश । प्रशासक सांगलीचे खास । दरारा लोकांस । लौकिक तसाच ॥६६॥
एकदां एक जासूद आला । गोविंदजींच्या घराला । म्हणे आतांच्या आतां साहेबाला । एक दस्त ऐवज पाहिजे ॥६७॥
धुंडिता धुंडिता । इष्ट कागद न ये हातां । लागली चिंता । म्हणती आले अवघड ॥६८॥
विसरभोळा नोकर । हे न मला सोसवणार । अपकीर्तीची कांचणी अनिवार । लागे मना ॥६९॥
हनुमंत सद्गुरुंचे । स्मरण करुन सद्‍गदवाचे । विनविती या संकटाचे । दाढेतूनी सोडवा ॥७०॥
काळ हा कठिण आला । अपकीर्ती हा घाला । चुकलो जरी या वेळेला । क्षमा करावी ॥७१॥
तंव सुचविती सद्गुरुवर । शोध निकामी कागदांचा भार । दस्तऐवज सत्वर । सांपडला ॥७२॥
काहीं वर्षे लोटली । तो राष्ट्रप्रेमाची लाट उसळली । परदास्यशृंखला तोडण्याची झाली । घाई सर्वांना ॥७३॥
नवे मार्ग दिसूं लागले । नवे वारे वाहूं लागले । नव्या कल्पनांना बहर आले । सगळीकडे ॥७४॥
तरुणपिढी हाती घ्यावी । विचारांना योग्य दिशा लावावी । सामर्थ्यसंपन्न करावी । तरुण मंडळी ॥७५॥
शिक्षण प्रसारक मंडळी । करिती स्वार्थाची होळी । ज्ञानज्योती उजळली । ठायीं ठायीं ॥७६॥
सुबुध्द जन सांगलीचें । कार्य उचलती शिक्षण प्रसाराचें । लक्ष गोविंदजींचे । वेधले या कार्या ॥७७॥
हांक येतां संस्थापकांची । सांगली शिक्षण मंडळींची । नोकरी सोडून सुखाची । धांवले देशकार्या ॥७८॥
त्यागासाठीं जीवन । ही गोविंदजींच्या मनाची ठेवण । त्यांना मोह न पाडी सुवर्ण । सत्ता आणि ऐश्वर्य ॥७९॥
सुखाचा त्याग केला । कष्टाचा मार्ग पत्करिला । अभ्यासू विदयार्थ्यांचा झाला । भाग्योदय ॥८०॥
जेथें शिक्षक सच्छील । प्रज्ञावंत आणि कुशल । द्रष्टे आणि प्रेमळ । सव्यसाची ॥८१॥
त्यागी आणि निरलस । बहुश्रुत आणि सालस । तेथे आनंद छात्रगणांस । अंतरी दीप उजळती ॥८२॥
ऐसे गोविंदजी शोभती । नितीशास्त्र शिकविती । छात्रगण प्रमुदित होती । सत्वमूर्ति पाहतां ॥८३॥
वादविवाद सभा घेती । आठवडयाचा विषय नेमून देती । एकदां झाली फजिती । विषय राहिला देण्याचा ॥८४॥
तवं मुलें लिहिती फळ्यावर । आज बोला या विषयावर । कोण कोण बोलणार ? विषय “कांहीं नाहीं” ॥८५॥
गोविंदजी वर्गात शिरले । फळ्यावरचे वाक्य वाचले । तों त्यांच्या प्रतिभेस चढलें । भलतेंच स्फुरण ॥८६॥
पाचारिती छात्रगणांना । म्हणती आतां बोलाना । तवं सर्वांच्या ना ना । माना डोलल्या ॥८७॥
तों गोविंदजी बोलूं लागलें । मुलांनों तुमचें भाग्य भलें । म्हणोनी या विषयाचे झालें । स्फुरण तुम्हां ॥८८॥
“काहीं नाहीं” हा विषय गहन । परि तुम्ही घ्या तो समजून । चित्तीं ठेवा सांठवून । उजळेल पूर्ण भाग्य ॥८९॥
तें भाषण गोविंदजींचें । तासभर भोजन आनंदाचे । शांत स्तब्ध छात्रगणांचें । लक्ष वेधलें भाषणाकडे ॥९०॥
ही पहा शाळा तुमची । आज गर्दी बाळ गोपाळांची । पूर्वी जागा पाला पाचोळ्याची । म्हणजे “काही नाही” ॥९१॥
दिनमणी जातां अस्ताला । पहा तुम्ही निरभ्र आकाशाला । काय दिसते सांगा मला । “काही नाही” ॥९२॥
उगवती नक्षत्रमाला । रजनीनाथ दिसे डोळा । पुन: सुर्य येतां उदयाचला । नभीं “काही नाही” ॥९३॥
आकाशापासोन वायु झाला । तो “काही नाही” तून जन्मला । विश्वाचा विस्तार वाढला । त्यातुंन पुढे ॥९४॥
विश्वरचना झाली मावळली । पुन्हा “काही नाही” त लीन झाली । अदिअंत कथा राहिली । “काही नाही” ची ॥९५॥
एक कंगाल चालला रस्त्यातुनि । तों हत्ती माळ घाली नेऊनी । गळा पडतां बसला राजा होऊनी । परी पूर्वी “काही नाही” ॥९६॥
हा आपला वर्गनायक । यांचे वय सोळा आणि एक । सतरा वर्षापूर्वीचें त्यांचे कौतुक । सांगा, “काही नाही” ॥९७॥
शंभर वर्षे आयुष्य यासी । सरतां जाईल कोण्या देशीं । ठाऊक आहे कां कोणासी । सांगा “काही नाही” ॥९८॥
या “काही नाही” तून विश्व झालें । तें “काही नाही” त मावळलें । मावळतां ही राहिलें । कांहीं तरी ॥९९॥
तें ‘कांहीं तरी’ संत जाणती । त्यास इतर जन ‘काही नाही’ म्हणती । ‘नांही’ म्हणती त्यांचे तोंडून वदविती । होय म्हणूनी ॥१००॥
कांही नसोन डोळा दिसतें । कांही असोन कांहीं नाहींसे भासते । मग तुमच्या डोळ्यांचे काम काय ते । सांगा “काही नाही” ॥१०१॥
जो डोळा खरें दांखवितो । तो डोळा कोणास दिसतो । कां तो नयनाविण दाखवतो । कळते कां सांगा “काही नाही” ॥१०२॥
म्हणोनी जे संत सज्ज्न । त्यासीच पुसावें यांचें लक्षण । हे संत कांही नसोन । असती कांहीं तरी ॥१०३॥
“काही नाहीं” हा विषय गहन । जेथें द्वैतांचे उडे भान । आणि मनचि जाय मावळून । एकसरें ॥१०४॥
नंदगोपाळ धावूं लागला । यशोदा धरुं गेली त्याला । तवं तो दिसेनासा झाला । ती म्हणे माझी शक्ति । “काही नाही” ॥१०५॥
बैसली निराश होऊन । तवं तो भेटे कडकडून । पाही मातेचे वदन । लडिवाळपणें ॥१०६॥
जंव जंव “काही नाही” चे जाणपण । तंव तंव अंगी वाजो लागे देवपण । ऐसे “काही नाही” चे महीमान । बालमित्रहो, सांगावें तितुकें अपुरेंच ॥१०७॥
चुपचाप बैसली मुलें । एकेकाचे चेहरें फुलूं लागलें । काहीं नाहींचे झालें । कांहीं महत्त्वाचें ॥१०८॥
ऐसे गोविंदजी शिक्षक । प्रत्युत्पन्नमति आणि नेमक । प्रेमळ आणि सात्विक । म्हणोनि आवडते विदयार्थ्यांना ॥१०९॥
एकदां एक विदयार्थी आला । उशीरानें शाळेला । वर्ग होता सुरुं झाला । म्हणून गोंधळे मनांत ॥११०॥
‘आंत येऊं कां’ म्हणण्या ऐवजीं । म्हणे ॐ भवति भिक्षांदेही जी । हंशा पिकला वर्गामाजीं । तो अधिकच गोंधळला ॥१११॥
तवं शिक्षक समजाविती मुलांना । हसू नये गोंधळलेल्यांना । अजाणतां नाना । चुका होती ॥११२॥
ऐसे लोटले कांही दिवस । तों गोविंदजीस अवघड जागेस । करट झाले, उपाय बहूवस । परी कांहीं चालेना ॥११३॥
देह यातना अपार । गोविंदजी न सोडिती धीर । तों झाला चमत्कार । आली जन्मदात्री भेटण्या ॥११४॥
जात होते आकाशमार्गी । तुझी कणकण ऐकून आले वेगीं । तों तूं या जागीं । कष्टी दिसतोसी ॥११५॥
तंव बाळ म्हणे मातें । सोसवेना देह दु:खातें । करट अति ठणकतें । जीव होतसे घायाळ ॥११६॥
परी मज आनंद झाला । तुज पाहोन जीव निवाला ।मज दु:खाचा विसर पडला । आतां जाऊं नको ॥११७॥
तुझी सेवा नाहीं घडली । म्हणोन हुरहूर लागली । आतां बरि संधि आली । करीन सेवा मनोभावें ॥११८॥
आली तुला माझी करुणा । म्हणोन आलीस या क्षणा । देह दु:खाची गणना । मी न करी ॥११९॥
तंव माता झाली सद्गद । म्हणे ‘अरे बाळ गोविंद । नको मानूं तूं खेद । देवाधीन जीव असे ॥१२०॥
फार वेळ राहण्याची । आज्ञा न मला विधीची । झाली ही भेट सुखाची । घे मानुनी ॥१२१॥
तुझ्यासारखें पुत्ररत्न । लाभलें मज विनाप्रयत्न । मी आहे सुख-संपन्न । तुझ्या पुण्याईनें ॥१२२॥
तुझ्या मनींची प्रेमळ आठवण उत्तम म्हणोनी ॥१२३॥
तुझी माता झाले । हें भाग्य देवांनी पाहिलें । मन माझें संपूर्ण धालें । तुझ्या सत्कीर्तिनें ॥१२४॥
थांब तुझ्या करटावरुन । जाते हात फिरवून । यम यातना निघून । जातील क्षणार्धांत ॥१२५॥
मातेचा हात लागतां । दु:ख निमालें हां हां म्हणतां । कळली वार्ता समस्तां । आनंदी आनंद ॥१२६॥
तुटक संवाद सर्वांनी । ऐकला हें जाणोनी । गोविंदजी सांगती विस्तारुनी । जो घडला वृत्तांत ॥१२७॥
माता अदृश्य झाली । मातृ सेवेची आशा विरली । करटाची आग निमाली । क्षणामध्यें ॥१२८॥
दु:खामागोन सुखाचे । फेरे येती कौतुकाचें । तैसे नवल वर्तले साचें । आतां एक ॥१२९॥
कन्यारत्न गोविंदजीना । झाले तेव्हां म्हणती नाना । हिची पत्रिका पहाना । साक्षात लक्ष्मी असें ॥१३०॥
भाकित होते ज्योतिषांचे । नवल असे या कन्येचें । हें घर करील केळकरांचें । रत्नखचित ॥१३१॥
परी धगधगीत वैराग्य पाहून । म्हणें काय काम येथें राहून । जेथें संपत्तीची मनापासून । चाड नाहीं ॥१३२॥
जेथें इच्छा नाहीं वैभवाची । तेथें वस्तीं काय कामाची । म्हणोनी त्वरा केली जाण्याची । गेली निघोनी ॥१३३॥
खडतर व्रत विष्णुभक्ताचें । पाहोनी पारणें फेडलें नेत्रांचे । ठरविलें निजगृही जाण्याचें । कन्यारत्न हारपलें ॥१३४॥
लक्ष्मी गेली विष्णु आला । ऐसा सोहळा पुन: झाला । राम आला जन्माला । इंदिरा गोविंद तनय ॥१३५॥
इंदिरा गोविंदास भलें । पुत्र निधान लाभले । जेणें अखंडित राहिलें । भाग्य सांगलीचें ॥१३६॥
कुरुंदवाडी पुत्र जन्मोत्सव झाला । “तात्या” तेथें होते त्या वेळेला । हनुमंताचा वरदहस्त आला । रामाच्या शिरावरी ॥१३७॥
बाळ घेऊन मांडीवर । म्हणती हा होईल मान्यवर । करील भक्तीचा प्रसार । किर्तनरंग ॥१३८॥
श्रीहनुमंत तात्यांचा कृपाप्रसाद । सांगलीस झाला सुखद । नित्यकिर्तनाचा आनंद । लुटिती जन सांगलीचे ॥१३९॥
परंपरा टिकणें । हें संतसज्जनांचें देणें । म्हणोनी परमार्थाचे पेणें । सांगली नगर ॥१४०॥
परमार्थानें संसार । झाला सुखमय निरंतर । उघडिलें नवें द्वार । पूर सुखाचा आंत यावया ॥१४१॥
राम झाला पुत्र ऐसा । कीं जो परमार्थाचा पिसा । दशरथाचा राम जसा । प्रिय सर्वांसी ॥१४२॥
गोकुळ अष्टमीच्या आदलें दिवशीं । शके आठराशें बेचाळीसाशीं । राम जन्मला शूभ वेळेसी । साथ परमार्थाची करावया ॥१४३॥
माता पितयास एकुलता एक । वाढवी परमार्थ अलौकिक । दोन देह प्राण एक । ऐसे पिता-पुत्र ॥१४४॥
पितयाचें कोठे पडेल उणें । म्हणोन डोळ्यांत तेल घालून जपणें । आपल्या देहाची साउली धरणें । पित्याचें शिरीं ॥१४५॥
ऐसा छंद परमार्थाचा । ऐसा कळवळा वडिलांच्या कार्याचा । लोभ न धरी लक्ष्मीचा । तिळमात्र ॥१४६॥
गोविंदजीची एक बहीण । लक्ष्मणराव पटवर्धनांची पत्नी सुजाण । हरी आणि नारायण । दोन पुत्र त्यांचें ॥१४७॥
ते म्हणति गोविंदजीस मामा । लोकांचा याचनामीं प्रेमा । तेही म्हणति मामा मामा । तेंच नांव रुढ झालें ॥१४८॥
येथून पुढें याच नांवें । संबोधू गोविंदजीस प्रेमभावें । सुखवूं आपणांस गुण गौरवें । मामांच्या ॥१४९॥
मामांच्यावरी प्रेमवर्षाव । होत राहीला सदैव । मामांचाही प्रेमळ स्वभाव । तैसाची ॥१५०॥
वात्सल्य मातेचें । प्रेम भक्तांचे । आणि कठोरपण साधकाचें । ऐसें मामा ॥१५१॥
नाना पिता म्हणोन जपती । दोन मातांचे कृपा छत्र शिरावरतीं । प्रिय पत्नी इंदिरासती । करी सेवा मनोभावें ॥१५२॥
इष्टमित्र सुखे सोयरें । प्रेमळ मामांच्यासाठीं खरें । संतसज्जनांचेही फिरें । सुदर्शन सभोवतीं ॥१५३॥
ऐसे मामांचे वैभव । भाव भक्तीस भरती सदैव । शुद्धाचरण मूळ स्वभाव । हेंचि कारण याचें ॥१५४॥
स्फटिकासम शुध्दमन । भोवंती वैराग्याचें कुंपण । कैवल्याचें वृक्षारोपण । धरी मूळ सखोल ॥१५५॥
मामांचे संसारीं जीवन । विरक्ती आणि सौजन्य । सद्भाव मृदुवचन । हें सुत्र जीवनाचें ॥१५६॥
प्लेगांचे विघ्न टळलें । परी वाचा बंद करुन गेले । मामा मनीं म्हणाले । चला शरण ज्ञानेशासी ॥१५७॥
ज्ञानेश्वरीची पारायणें । अष्टोत्तरशत आचरणें । संत करितील तेचि मानणें । हित आपुलें ॥१५८॥
पूर्ण केला पण । श्री ज्ञानदेवें दिलें आशीर्वचन । आली वाचा गेले मौन । जो पाश होता काळाचा ॥१५९॥
कळिकाळावरी सत्ता । गाजविती त्या साधुसंता । शरण जातां भवव्यथा । उरेल कैशी ॥१६०॥
असेच एकदां आळंदीला । मामा असतां काळचा घाला । त्यानें जीव जर्जर केला । सुरुं झाले जुलाब ॥१६१॥
एकामागोन एक । लावीती जीवसी धाक । म्हणती काळ मारितो हांक । चला आतां ॥१६२॥
श्रीज्ञानदेवांच्या समाधीला । साष्टांग प्रणिपात घातला । आणि बोलती बोलाला । अंतरींच्या ॥१६३॥
आहे तुमच्या पायांशीं । हा आधार मनांशी । जरी काळाची झाली सरशी । मी आहे स्वस्थ ॥१६४॥
करावी भक्ति देवाची । ही आशा आहे मनाची । करणें वा न करणें ही तुमची । सत्ता आहे ॥१६५॥
श्रीज्ञानशाचे तीर्थ घेता । काळ पळाला क्षण न लागतां । श्रीज्ञानदेव म्हणती आतां । करी भक्ति सुखेनैव ॥१६६॥
परत येतां दिवगडयासी । आले पोचवाया मावशीसी । जी आली होती आळंदीसी । मामांच्यासह ॥१६७॥
ती म्हणें गोविंदास । रहा आतां आठ पंधरा दिवस । गुरुचरित्र ऐकावे ही आस । आहे मनामध्यें ॥१६८॥
मामा म्हणती नाहीं सवड । तरी पुरवीन तुझ्या मनींचें कोड । हें नाहीं मज अवघड । उदयां वाचतो ॥१६९॥
सूर्योदयापासून । केलें सुरूं वाचन । सायंकाळी संपवून । मग उठले ॥१७०॥
उत्कट भव्य तेंचि करावें । हें मामांच्या घेतलें स्वभावे । फुकट मरावें । हें त्यांना बरें वाटेना ॥१७१॥
संत कृपेनें मिळालें जीवन । तें ईशसेवेसाठी वेंचून । प्रसन्न केले संतसज्जन । ऐसे मामा ॥१७२॥
हाक येतां राष्ट्राची । ममता सोडली चहा काँफीची । आणि परदेशी साखरेची । आनंद त्यागाचा ॥१७३॥
जे जे त्यागी आणि विरागी । मामांची निष्ठा सर्वांगी । महात्मा गांधी अंतरंगी । शिरले मामांच्या ॥१७४॥
एकदां राष्ट्रीय सभेत । पक्षोपपक्ष झुंजले एकमेकांत । उडला गोंधळ आकांत । समुदाय आवरेना ॥१७५॥
व्यासपीठावर टेबल । त्यावरी खुर्ची ठेवून समतोल । त्यावरी बैसले महात्माजी तों कुतूहल । निर्माण झालें ॥१७६॥
एक हात उभारुन । पाचारिती संतसज्जन । म्हणति सुहास्यवदन । भाइयों और बहिनों ॥१७७॥
कृश मूर्ति महात्माजींची । जोड नव्हती खडया आवाजाची । तरीही लाट पसरली शांततेची । क्षणार्धात ॥१७८॥
हें फळ त्यागाचें । हे फळ सेवेचें । हे फळ रामनामाचें । महात्माजींच्या ॥१७९॥
मामा होते स्वयंसेवक । पाहतांची हें कौतुक । मनीं म्हणती हेचि एक । राष्ट्र-पिता शोभती ॥१८०॥
ही गोष्ट अनेकदां । किर्तनी श्रवण करिती लोक सदां । महात्माजींच्या शब्दांवरी संपदा । लोळे त्यांच्या चरणावरी ॥१८१॥
स्वत: जरी अकिंचन । अर्धनग्न फरीर पूर्ण । पाहोन अद्भुत महिमान । मामा थक्क झाले ॥१८२॥
तोचि ठेवा-त्यागाचा । तोच घोष रामनामाचा । तोच भाव भजनाचा । उचलला मामानी ॥१८३॥
मामा तुमचे तेजस्वी जीवन । यथार्थ वर्णु शकेल ऐसा विद्वान । सांपडणें कठिण । हेहिं मी जाणतो ॥१८४॥
मी जाणे माझे अज्ञान । वाग्विलासी मंदपण । कैसे सच्चरित्रांचें अवगाहन । होईल माझ्या हातें ॥१८५॥
तरीहीं ओढ लेखनाची । ही धांव अजाण प्रेमाची । घुंगरटयास नभीं चढण्याची । हांव जैशी ॥१८६॥
म्हणूनि हें धारिष्ट करितां । धीर खचे अवचिता । परी स्वस्थ बसो जातां । मन घेई ओढ पुन: ॥१८७॥
मामा, तुमचें चरित्र । जें स्वभावेंचि अति पवित्र । गंगा भागिरथीचें पात्र । जेथें स्नान उत्तम ॥१८८॥
लवमात्र कृपा तुमची । मिळतां येईल वेळ भाग्याची । अक्षरें अमृताची । होतील माझी ॥१८९॥
होईल तैसे वर्णन । करीन मनापासून । मजसारिखें तुमचें अन्य । भक्त गण आनंदवतील ॥१९०॥
मामा, तुम्ही निघोन गेला । हें साहवेना मनाला । म्हणोनी या वाड्मयमूर्तीला । सजीव करा ॥१९१॥
आठवूं तुमचे गुण । आठवूं तुमचें आचरण । तुमचेच लागो ध्यान । तुमच्या भक्तांना ॥१९२॥
घडो निर्मळ भक्ति । सच्चरित्री अतिप्रीति । ठाव मिळो तुमच्या चरणाप्रती । ही विनंती ॥१९३॥

इतिश्री गोविंदचरितमानस । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । संसारस्थिति वर्णन नाम तृतीय अध्याय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP