अध्याय सातवा - जीवन प्रसंग वर्णन
भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.
महद्भाग्ये लाभ झाला । मामांच्या किर्तनाला ज्याला । त्याचे शिर मामांच्या चरणाला । लवे आपोआप ॥१॥
पाहतां प्रसन्नरुप मामांचे । सात्विक भाव जागे होती श्रोत्यांचे । म्हणती नवल या सुखाचे । संत दर्शन आनंदमय ॥२॥
शांत आणि उदात्त । अबोल आणि प्रसन्न चित्त । अंतर्मुख सतत । ऐसे मामा ॥३॥
अखंड घोष कीर्तनाचा । झेंडा फडकला कीर्तीचा । लोकांच्या वाणीचा । झाला एकचि विषय ॥४॥
कीर्ति हा सुगंध सत्कृत्यांचा । तो लपून न राहायचा । वास जसा कस्तुरीचा । कोंडतां न ये ॥५॥
प्रांतोप्रांतीचे जन । करुं लागले कीर्तन गुणगान । म्हणती सांगलीस जाऊन । सूखवूं कर्ण आणि नेत्र ॥६॥
नरसिंह चिंतामण केळकर । महाराष्ट्राचे साहित्याचार्य थोर । कीर्ती गेली त्यांच्याही कानांवर । मामांच्या कीर्तनाचीं ॥७॥
सहज मामा एकदां गेले । साहित्याचार्य तवं म्हणती । सहज आठवले चित्तीं । सांगलीस केळकर नामें कोणी करिती । हरिभक्ति आणि नित्य-कीर्तन ॥९॥
जरीं त्यांची तुम्हांसी । माहिती असेल कांहींशीं । तरी ती ऐकण्यासी । मी आहे उत्सुक ॥१०॥
मामा म्हणती मीच तो । हौस म्हणूनि कीर्तन करितो । होईल तैशी भक्ति करितो । ईश्वराचि ॥११॥
तंव ते कौतुकें विचारती । रोज नवे विषय कैसे निघती । हेंच गूढ माझ्या चित्तीं । उकलेना ॥१२॥
एक देवाचें नामस्मरण । यांच विषयावर माझें कीर्तन । चालले आहे अनुदिन । आजवरी ॥१३॥
साहित्याचार्य चकित झालें । म्हणति हेंनवल ऐकिलें । जें एका विषयांत रमले । अपवादात्मक ॥१४॥
नित्यनवें आणि वेगळेंपण । हें आजच्या युगाचें महिमान । तेथें तुमचें कीर्तन । अजब वाटें ॥१५॥
तवं बोलती गोविंद । जो ज्याचा असे छंद । त्यास नित्य नवा आनंद । तेथेंच असे ॥१६॥
अखंड वाचें नामजप । अंतर्माळा फिरे आपोआप । सरे पाप नुरे ताप । ऐसें नाम संकीर्तन ॥१७॥
असेच एकदां पंढरींत । मामा गेले विठूरायाच्या नगरांत । तेथेंही एक नवल वर्तत । ऐकाजी श्रोते ॥१८॥
तेथें एका मंदिरांत । मामा बैसलें होते निवांत । कीर्तनाची वेळ होता मागत । परवानगी विश्वस्ताकडे ॥१९॥
तवं ते म्हणती माळधारी । तोचि येथें कीर्तनाधिकारी । सोय कीर्तनाची तरी । पहा दुसरीकडे ॥२०॥
तवं मामा म्हणती विनवून । करीन ईश गुणगान । एखादें होईल जरी प्रवचन । तरी नेम साधेल ॥२१॥
तवं ते विश्वस्त द्रवलें । म्हणती हे गृहस्थ दिसती भले । करा एखादें चांगले । प्रवचन ॥२२॥
रघुनाथप्रिय गुरुवर । मनीं नमन करोन सविस्तर । केलें प्रवचन सुंदर । डोलती श्रोते ॥२३॥
मामा म्हणति करा विचार । माळेचे असति दोन प्रकार । एक आंत एक बाहेर । निष्ठा फिरवीं दोन्हीही ॥२४॥
त्यांत एक गौण एक प्रधान । ऐसे न करावे अनुमान । अंतर्माळेचेही दर्शन । प्रसंगे होतसे ॥२५॥
ऐसे बोलूनिमामा । गेले विठूराया पुण्य धामा । उफाळूनि अंतरी प्रेमा । चरणीं मस्तक ठेविती ॥२६॥
म्हणतीं हे घनश्यामा पूर्णकामा । लोकाभिरामा पूर्णविरामा । धन्य झालो येऊनि जन्मा । तंव दर्शनें ॥२७॥
युगानुयुगें अवतार । घेऊन मर्दिले असूर । आतां कटिवरि कर । ठेवोनी उभे ॥२८॥
प्रेमळ भक्तासाठीं आतुर । सदा उभा येथे निरंतर । भक्त लोटती अपार । वैकुंठ नगर भूवर ॥२९॥
मूर्ति सांवळी सुकुमार । ठेविले कटिवरीं कर । राधा रुक्मिणींचा वर । करुणाकर शोभसी ॥३०॥
युगानुयुगें भक्तासांठी । दयावया अलिंगन भेटीं । दोन्ही कर मोकळे त्यासाठीं । ठेवोनी जगजेठी उभा तूं ॥३१॥
ज्ञानेश्वरादि संत । येथेंचि मस्तक नमवीत । किती येवोन गेले असंख्यात । गणित नसे ॥३२॥
श्रीराम तू समर्थांचा । भोळा शंकर नरहरी सोनाराचा । गोपालकृष्ण केशव स्वामींचा । सर्वांसाठी विठ्ठल ॥३३॥
कधीं कोणासीं न विन्मुख । सदा देशी भक्तासी सुख । एकत्वीं अनेकत्वाचा हरिख । पुन्हा दाविसी ॥३४॥
तूंचि देव तूंचि संत । रुपे तुझी अगणित । भक्ति प्रेमाचा वर्षाव जगांत । तुझ्यामुंळें ॥३५॥
तुझें प्रेम हृदयांतरीं । हीच तुझीं कृपा खरी । तेंचि वाढो उत्तरोत्तरीं । देवाधिदेवा विठ्ठला ॥३६॥
तूं नामें अनंत । परि निश्चल राहिलासी येथ । जयजय श्रीपंढरीनाथ । काय महिमा वर्णु तूझा ॥३७॥
वेद शिणले वर्णिता । तेथें माझी काय कथा । परी प्रेम करी विकल चित्ता । करावें वाटे स्तवन ॥३८॥
राधा आणि रुक्मिणी । भक्ति शक्ति दोन्ही । तुझ्या सेवेस अनुदिनीं । तिष्ठत राहती ॥३९॥
नामगंगा भागीरथी । तीच येथें भीमरथी । असंख्य भक्त स्नानार्थी । नित्य येथें जमती ॥४०॥
जो नामगंगेत न्हाला । अंतर्बांह्य शुध्द झाला । तोच एक अधिकारी भला । तुझ्या दर्शना ॥४१॥
शिवकरी तुझे ध्यान । तुझ्या मनीं शिव पूर्ण । हीच दाखवावया खूण । शिरीं शिवलिंग धरिलें ॥४२॥
भक्त करिती तुझें ध्यान । तुज अंतरीं त्यांचे स्मरण । ऐसे अनेकत्वीं एकपण । पंढरीराया ॥४३॥
ऐसे करोनि पुण्य स्मरण । मामां पाहती प्रसन्नवदन । पांडुरंग आनंदघन । चिरंतन सुखदायीं ॥४४॥
पुंडलिकाचे शब्दासाठीं । अखंड उभा तूं जगजेठी । भक्ता तारिसी संकटीं । थोर उपकार तुझे देवा ॥४५॥
ऐसे स्तवून निघाले दूरी । एक कृष्ण हृदय पुण्यात्मा आपुले करी । माला घेवोनि त्वरा करी । मामांना घालण्याची ॥४६॥
मामा नको जरी म्हणती । परी त्याने येवोनी पुढतीं । कौशल्ये माळ घालोनी तृप्ति । केली स्वनयनांची ॥४७॥
मामांनी माळ काढिली । प्रसाद म्हणोन सांभाळली । पुष्पें वाळतां राहिली । एक तुळसी माळ ॥४८॥
अंतरीची माळ । बाहेर दाखवी गोपाळ । भक्तवचनांचा प्रतिपाळ । तोची एक करुं जाणें ॥४९॥
ऐसा प्रसाद पंढरीरायाचा । मामा म्हणती भाग्याचा । म्हणोनी दर द्वादशीस निरुपणाचा । मामांनी नियम केला ॥५०॥
मामा करिती कीर्तन । पुढें राम चालवी निरुपण । ऐसे विठ्ठलांचे महिमान । मराठीचिये नगरीं ॥५१॥
तसेच एकदां आळंदीसी । मामा आणि मामी गेले यात्रेसी । खेचाखेच पाहूनि गर्दीसी । विरमले ॥५२॥
स्त्री पुरुषांची वेगळी ओळ । परी मामा निघाले सरळ । कोठें न व्हावा गोंधळ । म्हणोन रक्षक ठायीं ठायीं ॥५३॥
कोणी न केला प्रतिकार । मामा मामींनीं गांठले देवद्वार । ज्ञानदेव चरणीं नमस्कार । उभयंता करिती ॥५४॥
जयजयाजी ज्ञानदेवा । आम्हांस तुमचा विसावा । ज्ञानेश्वरी हा प्रसादमेवा । असंख्य भक्तांना ॥५५॥
शोभतां तुम्ही प्रेमसागर । झेलिले दु:खाचे गिरीवर । तरीही अपरंपार । प्रेम आम्हांवरी ॥५६॥
वर्षे किती लोटली । तरी भक्तावरी प्रेमाची साऊली । दर्शनानें शांत केली । मनें किती एकांची ॥५७॥
तुमच्यामुळें हा संसार । भक्तीसुखें विनटला फार । नातरीं दु:खास पारावार । मुळींच नसे ॥५८॥
त्या भक्ति सुखाचा ठेवा । सदैव अंतरीं असावा । एवढा वर दयावा । इतर कांहीं मागणें नसे ॥५९॥
मन ठेवून चरणावर । अंतरी स्मरण वारंवार । आतां स्वामी करुणाकर । निरोप घेतो ॥६०॥
आलें देवजीच्या मना । म्हणोनी प्रतिबंध चालती ना । आलों आपुल्या दर्शना । विनांयासें ॥६१॥
नातरी आगांतुक । विघ्ने येती अनेक । आम्ही निर्विघ्न हें कौतुक । फळ आपुल्या कृपाप्रसादानें ॥६२॥
देव मामांचा सहाकारी । म्हणोनि त्यांचे तो लाड करी । कौतुकाच्या परीवरी परी । करुन दावी ॥६३॥
कोणी आणि संकट । तरी गुरुकृपें त्याचा शेवट । मार्ग दाविती नीट । परम दयाळू सद्गुरु ॥६४॥
मामा करिती नित्य कीर्तन । हें कोणा एकास न आवडून । आंत शेंदूर भरुन । करंज्या आणी मामांना ॥६५॥
विकल्परहित मन मामांचे । कौतुक करिती आणणार्यांचे । मुखीं घास करंज्यांचे । सुखें घालती ॥६६॥
उरली करंजी एक । ती सहज फोडती घरचे लोक । शेंदूर पाहून थक्क । चकित भयभीत होती ॥६७॥
झाला शेंदराचा परिणाम । बसला आवाज न दे काम । कैसा चाले कीर्तन नेम । म्हणती लोक ॥६८॥
आला प्रारब्धाचा घाला । मामांचा आवाज पुरा बसला । एक शब्द न ये तोंडाला । कीर्तन चालें मनांत ॥६९॥
खंड पडे प्रगट कीर्तनाला । ऐसा आजार नको मला । मी भीत नाही देह यातनेला । परी खंड कीर्तना न साहवे ॥७०॥
संत महंत देवाधिदेव । परी प्रारब्ध आडवे सदैव । त्यास न टाळून देव । माया करी भक्तावरी ॥७१॥
देव पावला प्रार्थनेला । मामांचा आवाज आला । परी इतर कष्ट जीवाला । सूरुं झाले ॥७२॥
एकदां मामा बसले देव पूजेला । तों अकस्मात झटका आला । देह अचेतन झाला । राम होंता मुंबईला ॥७३॥
श्री गुरुलिंगजंगम सद्गुरुवर । सुचविती कानडी चरण सत्वर । परी रामास अर्थ न कळे परी कागदावर । शब्द उतरवी राम ॥७४॥
जाणत्यास दाखविंता उमगलें । की घरीं रथाचे चाक अडलें । म्हणें आतां पाहिजे गेले । तातडीनें सांगलीला ॥७५॥
सत्वर उपचार मामांना झाले । गुरुकृपें यश आलें । परी शरीर विकल झाले । साथ देण्या नित्यकर्मा ॥७६॥
मामांचे अध्यात्मिक बळ । तेथें दैवाचा न चले खेळ । गुरुकृपा सोज्वळ । साक्ष देई क्षण क्षणां ॥७७॥
रोगांनी धरिलें शरीर । निंदकांचें ही सुरु झाले थेर । त्याही यातना अपार । मामा सोशिती शांतपणें ॥७८॥
एक अबला झाली सबल । करुं लागली शिवीगाळ । तोंडाची अति फटकळ । बोले अद्वातद्वा ॥७९॥
हा जिवंत ग्रह आला । एक वर्ष मामांच्या घराला । करी कीर्तनांत गलबला । सत्वपरीक्षा मामांची ॥८०॥
कीर्तनांत व्यत्यय । परी कर्णविष निर्दय । भलतेच घेई संशय । जे नावडती सज्जनासी ॥८१॥
मामा राहीले धीर गंभीर । म्हणती देव आपुली बाजू राखणार । अल्प धारिष्ट ईश्वर । पाहतो आपुलें ॥८२॥
वर्ष संपल्यावरी । शांत झाली ती नारी । मामा म्हणती श्रीहरी । पाठीराखा ॥८३॥
दुसरे गृहस्थ आणिक एक । बसती कथेस नि:शंक । लक्ष गोष्टीकडे हरएक । धावंत असे ॥८४॥
कोण कोण कीर्तनास येती । कैसे दिसती, कैसे चालती । कोण कोण श्रीमंत किती ? हे सदा पाहती ॥८५॥
स्नानसंध्या टिळे माळा । पोटीं मत्सराचा उमाळा । परी त्यांचा रंग वेगळा । आणि आचरण ॥८६॥
करिती कवनें अचाट । भाषा अचकट विचकट । संतनिंदेची हौस अफाट । ऐसे कवि ॥८७॥
संत निंदेचा अभंग रचून । मामांच्या कीर्तनीं आवर्जुन । नित्यनेमें म्हणून । अंत पाहती मामांचा ॥८८॥
प्रिय सद्गुरुंची निंदा । ही न सोसवे ऐशी आपदा । कैशी खीळ घालावी या अपछंदा । मामा मनीं विचारती ॥८९॥
पाचारोनी कविवर्यांना । मामा बोलती मधुर वचना । अपशब्दें संतसज्जना । नका छेडूं ॥९०॥
माझी निंदा खुशाल करा । मला न त्यांचे भय जरा । परी माझ्या समोर माझ्या सद्गुरुवरा । उणें मी न आणूं देई ॥९१॥
क्रोध आला कविवर्यांना । परि त्यांचे कांही चालेना । करोनि जरा तणाणा । गेले निघूनी ॥९२॥
दिवा तेथें काजळी । चंदन तेथें सर्पांची वेटोळी । तैशीच निंदकांची टवाळी । संतांच्या भोवती ॥९३॥
ऐसे कितीएक निंदक । बुध्दिमान आणि कल्पक । भ्रमें त्यांचे मस्तक । कीर्तन रंग ऐकतां ॥९४॥
नानापरी प्रयत्न करिती । कीर्तनास विघ्नें आणिती । श्रोत्यांना फितविती । परी अखंड चाले कीर्तन ॥९५॥
प्रचंड लाटेचा ओघ येतां । न आवरे निंदकांच्या हाता । अपयशापुरता । वाटा होता त्यांचा ॥९६॥
संत कीर्तिमंत होती । निंदकाची होते फजिती । तरीही निंदकांची मान वरती । पुन: चढे ॥९७॥
निंदक देवाहून थोर । करिती संतावरी उपकार । संतांच्या किर्तीचा टणत्कार । निंदकांच्यामुळें ॥९८॥
प्रसिध्दि पराड्मुख संत । निंदक आणिती उजेडात । यश देती सत्वपरीक्षेंत । आणि लौकिक ॥९९॥
निंदक निंदून कीर्ति वाढविती । भक्त अपार गुण गाती । तेंही मनोभावें इच्छिती । संतांची कीर्ति ॥१००॥
त्रिकाल ज्ञानी संत । जानोन मनीचे हेत । पुरविती हट्ट करिती शांत । मन भक्तांचे ॥१०१॥
ऐशा कितीतरी घटना । वर्णिता वाढेल ग्रंथरचना । परी कांहीं सांगितल्याविना । न राहवे मला ॥१०२॥
कुलकर्णी एक भाविक । भक्ती मामांच्यावरी अलौकिक । पांडुरंगाचे उपासक । नित्य ऐकती कीर्तन ॥१०३॥
संत मुखें नाम ऐकावें । हें घेतले त्यांच्या स्वभावे । म्हणोनि त्यांनी सद्भावे । पाय धरिले मामांचे ॥१०४॥
जे आपल्या येईल मुखांतून । तेच करीन मी नामस्मरण । इच्छा करावी परिपूर्ण । माझी ही ॥१०५॥
परी मनीं दचकले । म्हणति हे श्रीराम भक्त भले । आणि श्रीपांडूरंग दैवत आपुले । आता प्रभुइच्छा ॥१०६॥
क्षण एक मामा अडखळले । म्हणति विठ्ठल विठ्ठल म्हणा एक मेळे । जो भक्तांचे पुरवितो लळे । राहोन पंढरपुरीं ॥१०७॥
आनंद झाला भक्ताला । म्हणति पांडुरंग मज पावला । अगाध दिसे संतलीला । संत देव एक गमती ॥१०८॥
तैसेच एक प्रेमळ सज्जन । ऐकति मामांचे कीर्तन । पत्ते खेळता रमले मन । त्यांचे एके दिवशीं ॥१०९॥
वेळ झाली कीर्तनाची । परी बुध्दी न झाली उठण्याची । डाव संपता मामांच्या घरची । वाट धरिली ॥११०॥
नमस्कार करुन बैसले । तो मामा अवचित बोलले । पत्त्याचे खेळापुढें केले । किर्तन गौण ॥१११॥
हा नव्हे परमार्थ । कैसा साधेल निजस्वार्थ । मोहासाठी हा अनर्थ । बरा नव्हे ॥११२॥
ऐशा अंतरीच्या खुणा । जागविती सज्जना । लाविती परमार्थ चिंतना । अनेकांना ॥११३॥
संसारी खडतर आपत्ती । हैराण दीन दुबळ्याला करिती । आधार संतपदाच घेती । ते होती सुखसंपन्न ॥११४॥
तैसेच पटवर्धन एक निष्ठावंत । गेली नौकरी झाले दुश्चित । मामांच्या चरणीं नत । भक्तिभावे झाले ॥११५॥
मामा म्हणती त्यांना । खिन्न न करावे मना । ज्यांचा भाव प्रभुचरणा । त्यांना रक्षिता ईश्वर ॥११६॥
गेली नोकरी मिळाली । विवंचना दूर झाली । संतचरणी श्रध्दा बळावली । दु:खितांची ॥११७॥
एकदां एक खेडवळ । होता अतिप्रेमळ । येऊन धरिले चरण कमळ । मामांचे ॥११८॥
भोळा भाव पाहून त्याचा । ग्रंथ श्रीहनुमंतगुरुचरित्रसाराचा । बरोबरी प्रसाद प्रेमाचा । दिला त्याच्या हातीं ॥११९॥
तंव तो बोले सद्गदवचन । हा प्रसाद थोर आशीर्वचना । परी माझें अज्ञान । मज वाचतां न ये ॥१२०॥
मामा म्हणती पूजन । करांवे श्रध्दा ठेवून । तुम्ही वाचाल ऐसा दिन । उगवेल ॥१२१॥
अमोघ आशीर्वाद मामांचा । दिवस उगवला आनंदाचा । श्रीहनुमत्गुरुचरित्र वाचनाचा । आनंद मिळाला भाविकाला ॥१२२॥
जेथें श्रध्दा तेथे ज्ञान । ज्ञान तेथें समाधान । समाधानी जो सुखसंपन्न । या भूतलीं ॥१२३॥
चमत्कार जाण । नव्हें संतांचे मोठेपण । नव्हे त्यांच्या चारित्र्याची खूण । अंत:चरित्र सच्चरित्र ॥१२४॥
जो आम्हांस चमत्कार । तो त्यांना सहज प्रकार । म्हणोनि याचा विचार । योग्य तो घ्यावा ॥१२५॥
जादूगाराचें खेळणें । क्षणभरीं होय कौतुकाचें बोलणें । म्हणोनि तुच्छ लेखणें । केवळ चमत्कारासि ॥१२६॥
तैसे नव्हती संतांचे चमत्कार । परी निजभक्तास आणावया ताळ्यावर । जेव्हा सोम्य उपायाचा न चलें जोर । तेव्हा चमत्कार होती ॥१२७॥
नातरी निष्ठा वाढवावया । किंवा भक्ति रुजवावया । संसारातून परावृत्त करावाया । चमत्कार होती ॥१२८॥
सद्हेतुविणें संत । कधीं न होती कार्या प्रवृत्त । त्यांचे लक्ष असे संतत । आपुल्या भक्तावरी ॥१२९॥
नातरी त्याचें वागणें । कठोरव्रत आचरणें । विषयसुख तुच्छ लेखणें । हे काय चमत्कारास उणें असे ॥१३०॥
अडतीस वर्षे सतत । सोसून जनांचे आघात । प्रसन्न चित्तें किर्तनास उभें राहात । हा एक चमत्कार ॥१३१॥
एकही दिवस खंड न पाडतां । अखंड आचरती व्रता । सर्व चमत्कार होती वृथा । हें ऐकतां ॥१३२॥
लोकापवाद सोशीती । संसारसुखाच्या नकारघंटा वाजती । देहदु:ख अनिवार किती । सांगतां न ये ॥१३३॥
तरीही नियम चालविणें । शांतपणे कीर्तनास उभे राहणें । श्रवण मनन निदिध्यास ठेवणें । अखंडित ॥१३४॥
कीर्तनाची टिपणें ठेवती । कीर्तनासाठीं अभंग रचिती । साधन पूजा प्रवचन करिती । न चुकतां न कंटाळतां ॥१३५॥
हें अव्याहत करणें । तपानुतपें आचरणें । प्रपंच निर्वाह प्रारब्धावरी टाकणें । हाचि मोठा चमत्कार ॥१३६॥
जो अनन्य झाला देवासी । त्यांचे सांकडे भगवंतासी । याचा अनुभव सर्वांसी । मामांनी दिला ॥१३७॥
इतर चमत्कार यापुढें । काय शोभतील बापुडें । त्यांचे महत्व केवढें । सांगा मज ॥१३८॥
लक्षामध्यें एक । ऐसा निवडे भजक । सोपें म्हणती किती एक । परी आचरणारा दिसेना ॥१३९॥
यासी पाहिजे आत्मबळ । गुरुभक्ती सोज्वळ । आणि गुरुकृपाही उजळ । पाठींमागे ॥१४०॥
एकदां कीर्तन करतां करतां । मामा बेशुध्द पडलें अवचिंतां । सर्वासी लागली चिंता । धावूं लागले ॥१४१॥
निजविती अंथरुणावरी । तों त्यांची चालली दिसे वैखरी । कीर्तन चालूं होते अंतरी । तेंच शब्द उमटती ॥१४२॥
बेशुध्दावस्थेंत कीर्तन । हें कीर्तनप्रेमाचें उदाहरण । अनुपमेय अवर्णनीय कठीण । येरा गबाळाचे काम नोहे ॥१४३॥
याला म्हणावें निष्ठा । जेथें प्राणाचीही ना प्रतिष्ठा । नामाविण देहाच्या चेष्टा । चालूं न देती ॥१४४॥
एकांती नेम चालविणें । हे आत्महितापुरतें वागणें । जगदोध्दारार्थ आचरुन दाखविणें । हें संताचे कार्य ॥१४५॥
संत हे दिपस्तंभ । जळोनिजगा देती लाभ । दाखविती मार्ग सुलभ । इतरांसी ॥१४६॥
कधी द्वेष न कोणाचा । कधी न लोभ द्रव्याचा । माया आणि ममतेचा । ठावचि नसे ॥१४७॥
सदा बोलावें मधुर उत्तर । साहोनी कठोर वचन दुस्तर । कधीं न कोणावरी भार । स्वसुखासाठीं ॥१४८॥
दयाभाव सर्वांवरी । हित दुसर्याचें सदा अंतरी । अनन्य भजती त्यास तरी । सर्वस्व देती ॥१४९॥
काय देती तें कोणा न कळे । दु:खितासाठीं हृदय कळवळे । कितीं एकांचें मनवळे । परमार्थी ॥१५०॥
हें समग्र चरित्र वर्णावें । तरी मति कुंठित होई स्वभावें । वेंचिलें कण त्यावरुन घ्यावें । समजून वाचकानीं ॥१५१॥
जो जो येई दर्शनाला । चिमुटभर साखर मिळे त्याला । या पुण्यप्रसादाला । भक्त होती भुकेले ॥१५२॥
कोणी आणून देती । आपल्यासाठीं मामाची सोय करती । संसारी परमार्थ साधती । आणि अलभ्य लाभ ॥१५३॥
एकदां कीर्तन चालूं असतां । एक वृध्द स्त्री अवचितां । चरणावरीं ठेवोनि माथा । हात पसरी ॥१५४॥
किर्तनांत येईल व्यत्यय । म्हणोन मामा म्हणती हे माय । नंतर करीन सोय । तुमच्या प्रसादाची ॥१५५॥
तंव ती मनीं विचारीं । ऐसेंच घडो श्रीहरि । माझी घाई ही न बरी । झाली आज ॥१५६॥
इतक्यांत आली तीन मुंलें । त्यांनी मामांचे चरण वंदिले । वंदोन प्रसादासाठी थांबले । क्षणभर ॥१५७॥
एक चिमुट साखर । पडे प्रत्येकाच्या हातावर । मूलें होऊन हर्षनिर्भर । गेली निघूनी ॥१५८॥
मामा विचारिती मनाला । त्या वृध्द स्त्रीने अपराध काय केला ? ती मुकली प्रसादाला । क्षणापूर्वी ॥१५९॥
एक वागणें सर्वांसी । हें धरिलें मी मनासी । मग प्रतारणा एकासी । अरेरे हें अनुंचित झालें ॥१६०॥
क्षणभर कीर्तन थांबवून । फिरविले चौफेर नयन । वृध्द मातेस बोलावून । प्रसाद दिला ॥१६१॥
कुसुमाहून कोमल । मामांचे मन निर्मल । समभावें पाहती सकळ । चुकतां होतीं बहु कष्टी ॥१६२॥
ऐशी कोंवळींक मनाची । आकर्षी मनें इतरांची । म्हणोनि निष्ठा लोकांची । जडे मामांच्या चरणीं ॥१६३॥
श्रीराम अयोध्येचा । जो भाव दाखवि मनाचा । तोच या श्रीरामउपासकाचा । दिसे सर्वांना ॥१६४॥
मृदुवचन सुहास्यवदन । पोटीं प्रेम, हातीं कृपादान । उसळें आनंद समाधान । सुखसंपन्न भक्तगण ॥१६५॥
जीवांचा कळवळा । म्हणोन कीर्तनाचा लळा । आळविती गोपाळा । मनोभांवे ॥१६६॥
श्रीराम जयराम जयजयराम । ऐसा घोष करुन सप्रेम । पचविंले संसारविष, परम । जराजर्जर जीवांसाठीं ॥१६७॥
मामा, आमुचें भाग्य थोर । म्हणोन पावलों प्रसाद मधुर । वाटे देवही ज्याचा अनिवार । करितील हेवा ॥१६८॥
जे प्रेम आम्हासी लाभलें । तें आतांही पाहिजे टिकलें । हृदयमंदिरीं पाहिजे राहीलें । सदैव आमुच्या ॥१६९॥
सन्मार्ग निष्कंटक केला । ज्ञानदिप उजळोन ठेविला । आचरणाचा कित्ता दिला । आमुच्या हातीं ॥१७०॥
याहून दया कोणती ? श्रेष्ठ असेल या जगतीं । याहून सत्संगति । श्रेष्ठ कोठे असेल ? ॥१७१॥
आम्ही हळहळतों अंतरीं । इच्छा जरीं हृदयांतरी । अल्प सामर्थ्य आमुंचे परी । थोर आदर्श तुमचा ॥१७२॥
देह ममता सुटेना । निश्चय अंतरीं शिरेना । घर पोंखरती कुकल्पना । वारंवार ॥१७३॥
दुर्बुध्दीचा वीट आला । परी सद्बुध्दि येईना घराला । निराशा घेरी मनाला । वारंवार ॥१७४॥
स्फूर्तिस्थान आमुचें । मामा चरण तुमचे । सुकाणूं आमच्या नौकेचें । तुमच्या हातीं ॥१७५॥
गोविंद गोविंद गोविंद । मना हाचि लागो छंद । हृदयीं तुमचें पदारविंद । पूजूं आम्ही ॥१७६॥
मस्तक ठेंवू चरणावरी । साठवूं तुमची सगुणमूर्ति अंतरी । अभंग कीर्तन वाचेंवरी । ठेवूं आमुच्या ॥१७७॥
संत अजरामर असति । ही आहे तुमची उक्ति । त्याची आम्हां प्रचिती । येवो ही प्रार्थना ॥१७८॥
इतिश्री गोविंद चरितमानस्स । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्ति रस । जीवन प्रसंगवर्णन नाम सप्तमोध्याय: ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2020
TOP