अध्याय पाचवा - कीर्तन अंतरंग परीक्षण

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


राम-नाम संकीर्तन । जें चुकवी जन्ममरण । जेथें मामांचे जडलें मन । अहर्निश ॥१॥
देव भक्त आणि नाम । ऐसा हा त्रिवेणी संगम । जेथें स्नान उत्तम । अनुदिन ॥२॥
जय जयश्री किर्तन गंगे । अखंड वरदायिनी शुभगे । सुखविसी अंतरंगे । पावन करी सर्वांसी ॥३॥
जेथें जाशी तेथें काशी । आळशी खरे तुझे प्रवाशी । म्हणोन तूंच प्रवास करिसी । आळशावरी गंगा आणायां ॥४॥
धन्य तुझें अपत्यप्रेम । जीवा घडविसी नित्य नेम । मार्ग दाखवोनी सुगम । सुखमय करिसी जीवन ॥५॥
ज्ञान गंगेचा अभिषेक । भक्तावरी करिसी नि:शंक । विसरविसी तहानभूक । कीर्तनरंगी रंगतां ॥६॥
तूंच आमुची खरी माता । चुकविसी जन्ममृत्युच्या वार्ता । देसी देख तुझ्या भक्ता । जे दुर्लभ अमरासी ॥७॥
धरोनी आसरा संतांचा । मार्ग आक्रमिसी भूवरचा । उबगल्या जीवांचा । मार्ग शोधत ॥८॥
किती एक आजवरी । पावन झालें तुझ्यां तीरीं । संपली त्यांची येरझारीं । गेले स्वानंद भुवनीं ॥९॥
तूं जीवनाविण जगविसी । अमृताविण अमर करिसी । साधन ऐसे हातीं देशी । जेणे अखंडसुख ॥१०॥
ज्यांनी एकदां अंतरंग भिजविलें । ते कधीं न कोरडें झालें । सदा सुखवीत राहीलें । जडजीवासी ॥११॥
संत वचन धारा । शीतल करितील अंतरा । विषयांचा ढिगारा । जाय वाहात प्रवांहांत ॥१२॥
मामांचे कीर्तन । चालले सुखवीत सुजन । नाम महात्म्य समजावून । नित्यनेमें सांगती ॥१३॥
त्या किर्तनाचा ठसा । हृदयावरी उमटो ऐसा । जो काळ म्हणेल पुसा । तरीही अशक्य होवो ॥१४॥
एक एक भक्त मामांचें । ज्यांनी पाश तोडले भवाचे । ज्यांनी महत्व ओळखले कीर्तनाचें । मामांच्या ॥१५॥
कंठी धरिली नाम माळा । ज्यांनी धरिला काळाचा गळा । पोटी भक्तिचा उमाळा । धरुनिया ॥१६॥
त्यांत एक अप्पाजी पवार । ज्यांची नामीं निष्ठा थोर । नाम जप करोनी अपार । स्वात्मानुभव मिळविला ॥१७॥
स्वयें अंध असति । परी कीर्तन न चुकविती । नामस्मरणीं रंगली वृत्ति । धन्य झाले ॥१८॥
नाहीं लौकिक अनुग्रह दिला । नांही वरदहस्त ठेविला । तरीही रामराम म्हणत गेला । प्राण अप्पाजींचा ॥१९॥
आले सद्गुरुंच्या मना । तेथें लौकिकाची कसली विवंचना । अज्ञानांच्या नुसत्या वल्गना । संत समर्थ हें खरें ॥२०॥
संत जें जें मनीं योजिति । तें तें करुन मोकळे होती । अज्ञानी लोक बडबडती । वाऊगेच ॥२१॥
‘गोविंद किर्तन गुणगान ।’ अप्पाजींचे अभंग निरुपण । ग्रंथ प्रसिध्द अति लहान । गुण थोर अभंगाचे ॥२२॥
अभंग गेले होते वार्‍यावरतीं । गणपतरावांना आली स्फूर्ति । जीर्ण पर्ण घेऊन हातीं । अक्षरें जुळवितीं ॥२३॥
आप्पांजींचे स्वानुभवोद्गार । श्रोत्यांस देतील समाधान थोर । म्हणोन केला विचार । कांहीं चरण देण्याचा ॥२४॥

बापूराव धन्य मज स्मरणासी लाविलें ।
अनुभवा दिलें, सर्व काहीं ॥
ऐकतो किर्तन गोविंदरायाचे ॥
आलें माझें वाचे नाम तेणें ॥

अप्पा पोवार म्हणे किती करुं गौरव ।
मजला अनुभव दाखविला ॥

ऐसे थोर मार्ग दर्शन । ऐसे प्रेमळ गोड वचन । ऐसे अतुट स्नेह बंधन । मामांचे ॥२५॥
तैशीच एक विठाई पवार । भक्ती मामांच्यावरी थोर । वेड लागले अनिवार । झाली बावरी ॥२६॥
स्वप्नांमध्यें संत हनुमंत । तिला तिचें हित सुचवित । हो मामांच्या सेवेसी रत । जाईल वेड ॥२७॥
सेवा करावी मनोभावें । मुखीं रामनाम गावें । हें तिनें घेतलें स्वभावें । आली शुध्दीवरी ॥२८॥
पडेल तें काम करावें । कधीं वाऊगें न बोलावें । नामस्मरण जीवीं धरावें । हा छंद तिचा ॥२९॥
पुढें खिळली अंथरुणाला । मरणाचा वेध लागला । डोई ठेवी तुळशीकटयाला । म्हणे “मामा, येते आतां” ॥३०॥
जो दीप मामांनी उजळला । तो घरोघरी गेला । ज्योत मिळे ज्योतीला । झालेक अनेक दिवे ॥३१॥
संत हें स्फूर्तिस्थान । संत भक्तांचे अधिष्ठान । म्हणोन नामानुसंधान । असंख्य जडजीवांना ॥३२॥
ऐसे मामांचे किर्तन । त्याच्या अंतरंगाचें वर्णन । करीन रहावाया अनुसंधान । पुढीलांचे ॥३३॥
मामा, तुमच्या कीर्तनाचें । सार शोधीन अंतरींचें । परी तुमच्या कृपेचें । बळ मागें पाहिजे ॥३४॥
बोलावें तरी तुमच्या कृपेनें । चालावें तरी तुमच्या आशिर्वादानें । नातरी फुकट अनुमानें । वाक् जाल ॥३५॥
रामभक्त गोविंदजी । खडतर किर्तनव्रत जगांमाजीं । आडतीस वर्षे आचरुन आजीं । जगदांतरी राहिला ॥३६॥
विषयांचे नाहीं जंजाळ । नाही मतामतांची खळखळ । एक नामस्मरणचि केवळ । विषय कीर्तनाचा ॥३७॥
तेंचि केलें आणि करविले । गायीले आणि गौरविले । साधनाभ्यासी चित्त नेलें । अभागियांचे ॥३८॥
अखंड प्रेम आम्हांवरी । करुनी राहिला आतां दूरी । म्हणोनि अश्रु नेत्रांतरी । सांवरतां न सांवरती ॥३९॥
तेंचि केलें आणि करविले । गायीले आणि गौरविले । साधनाभ्यासी चित्त नेलें । अभागियांचे ॥३८॥
अखंड प्रेम आम्हांवरी । करुनी राहिला आतां दूरी । म्हणोनि अश्रु नेत्रांतरी । सांवरतां न सांवरती ॥३९॥
भाग्य आले ते भोगतां येईना । गेले तें साहवेना । ऐसा हा करंटेपणा । उभयपक्षी ॥४०॥
संत येती आणि जाती । ही झाली किंवदंती । तें संत अखंडित असती । भक्ताकारणे ॥४१॥
हा तुम्हीच दिलासा । दिला श्री हनुमंत गुरुचरित्रीं स्पष्टसा । आता त्याचा अल्पसा । अनुभव येवो आम्हांसी ॥४२॥
तुम्ही आपुले महत्व लपविलें । आम्ही तुम्हांसी नांही ओळखिले । आतां चित्त हळूहळूं लागलें । पश्चातबुध्दि ॥४३॥
आम्ही जड आणि अज्ञानी । तरीही तुम्ही प्रेमवर्षाव करुनी । ठेविले आम्हांसी ऋणी करुनी । जन्मजन्मांतरींचें ॥४४॥
तेंच प्रेम आमुच्या हृदयीं वसो । तुमच्या सच्चरित्राची जोड असो । विस्मरण मरणान्तीही नसो । एवढा आशिर्वाद असो दया ॥४५॥
देव न भेटे तपावाचूनी । घेतो माप काठोकांठ भरुनी । उणें पडतां कर कटिवरीं ठेवुनीं । राहतो वाट पहात ॥४६॥
आम्ही तप नाहीं केलें । नाहीं पुण्यकर्म आचरिलें । तरीही तुम्ही जवळ केलें । आम्हासी सदा ॥४७॥
संत श्रेष्ठ देवाहुनी । हें पटलें अंत:करणी । म्हणोनी तुमच्या चरणीं । एक भावें विनटलों ॥४८॥
किर्तनानंद गोविंदजी । रमावया किर्तन रंगामाजी । बुद्धि दया आजीं । ऐसें विनवितसें ॥४९॥
जयजयाजी समर्था । दाखवा पदोंपदींच्या अर्था । जेणें आपुल्या निजस्वार्था । उजळूं आम्ही ॥५०॥
दु:खाची आत्यंतिक निवृत्ति । आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ति । हा हेतु धरोनी चित्तीं । अखिल मानव वर्तती ॥५१॥
व्यक्त्ति तितक्या प्रकृती । तितकें मार्गही भिन्न वाटती । ज्याची तैशी मती । तैसा तो धांवे ॥५२॥
एक द्वैतांत अडकलें । एकांनी द्वैतात फरक केले । एकांनीं सुख मानलें । संसारांत ॥५३॥
एक म्हणति देहदंड सोसा । एक म्हणती भजन करीत बैसा । एक म्हणती कर्मानुष्ठानाचा ठसा । असो आचरणावरी ॥५४॥
मतामतांच्या भ्रमावर्ति । सामान्य जनांची होय फजिती । नरजन्माची माती । सरतेशेवटीं ॥५५॥
बहुता जन्माचे शेवटीं । नर जन्माची होय भेटीं । तोही जाय उठाउठीं । अज्ञानानें ॥५६॥
म्हणोनि श्रीज्ञानदेवांनी । भागवत धर्माचा पाया भरुनी । मार्ग दिला सोपा करुनी । सामान्य जनासाठीं ॥५७॥
संत वचनावरी विश्वास । न ठेवितां गळा पडे फांस । भवसागराच्या तळास । बुडोन जाती ॥५८॥
ज्ञानाचा अभिमान । मार्ग दाखवी भिन्न । संतवचनीं दुर्लक्ष करुन । काढिती मार्ग आपुले ॥५९॥
जे ज्यास खडक सांपडले । ते तेथेंच फोडूं लागले । सुखाचे झरे रचिले । दुसरीकडे ॥६०॥
कलियुगीं काळाचा फांस । करी जीव कासावीस । बहुमताच्या भरीस । पडती लोक ॥६१॥
तेणें तें वाचतचि गेले । दु:खाचे पडती घाले । मेले ते पुन: आले । दु:ख भोगण्या ॥६॥
श्रीनारद गेले वैकुंठाला । विचारती श्रीहरिला । सुटका कैशी आतां बोला । या कराल कलियुगीं ॥६३॥

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ॥

तवं म्हणती देवाधिदेव । जों जों धरोनि भक्तिभाव । रामकृष्ण सदैव । जपत राहिला ॥६४॥
तो मरेल भवार्णवीं । वृथा नको गाथा गोवीं । या सुगम मार्गाची नवी । नवलाई नित्य असे ॥६५॥
परी हा मंत्र कैसा म्हणावा । कोठें जाऊन जपावा । रामकृष्ण हरीचा लावावा । अर्थ कैसा ? ॥६६॥
हें सुखाचें साधन कैसे ? हाती येईल विनाप्रयासें । हे ज्यास लागलें पिसें । तों बैसे मामांच्या कीर्तनी ॥६७॥
जवळी असोन चिंतामणी । लोक फिरती दैन्यवाणी । चित्त नसे सद्गुरुचरणीं । म्हणोनियां ॥६८॥
खंड सुख गुरु देती । अखंड सुख सद्गुरुंच्या हांतीं । त्याची व्हावया प्राप्ति । करांवे लागती प्रयत्न ॥६९॥
मोह मायेला भुलून । जीवाचें झाले अधोगमन । मृगजळास जीवन कल्पोन । धावो लागे ॥७०॥
जीव शिव परम मित्र । हृदयांतरी राहती स्वतंत्र । शिवसांगे सुखाचा मूलमंत्र । परी जीव ऐकेना ॥७१॥
विसरला आपआपणां । झाला सदाचा दैन्यवाणा । फिरे वणवणा । सुखासाठीं ॥७२॥
अधोमुखें चालला संसार । जीव तेथें गुंतला अनिवार । युगानुयुगें करी येरझार । तरी आशा सुटेना ॥७३॥
रडे पडे आक्रांदें । म्हणे देवा हें दे तें दे । न मिळता बहु खेदे । होय कष्टी ॥७४॥
होती एक राजकन्या । दैवयोगें झाली तीची दैना । भिकार्‍यासवें वणवणा । फिरे दारोंदारी ॥७५॥
भ्रमली बुध्दि फिरला काळ । पोटासाठीं करी हळहळ । उष्टयासाठीं जीवाची तळमळ । दारोदारीं तिष्ठतसे ॥७६॥
तवं चिपळ्या आणि वीणा । घेऊन फिरे एक संतराणा । अरे म्हणे ही कोणा । राजाची कन्या असे ॥७७॥
समजावूनि तिसी । नेले राजगृहासि । निवारिले तिच्या दैन्यासी । झाली सुखसंपन्न ॥७८॥
तैशी अवस्था जीवाची । भूल पडोन पूर्वस्थितीची । भ्रांती जडली मी-पणाची । आले वेगळेपण ॥७९॥
अडतीसवर्षे सतत । किर्तन करिती गोविंदसंत । जीवाची सोडवणूक निश्चित । साधण्यासाठी ॥८०॥
कीर्तन पाठ नाम मंत्राचा । त्रयोदश अक्षरांचा । अष्टोत्तरशतसाचा । म्हणविती श्रीराम जयराम जयजयराम ॥८१॥
नित्य नेमें हाचि जप । संचिताचें भस्म आपोआप । वरी संतवचनाचा लेप । विकल्प तण जाळण्यासाठीं ॥८२॥
जीवा संतशाळेमाजीं आणती । सत्यज्ञान हातीं देती । अज्ञान तिमीराची शांति । एकसरें होई ॥८३॥
म्हणती अरे अवघ्या संसारीं । एक देवाचीं सत्ता खरी । सूत्रें हालवितो तुझी सारी । मी मी उगाच म्हणतोसी ॥८४॥
वृथा धरोनी अहंकार । कां होसी असा बेजार । जो भक्तिचा भुकेला फार । धरी चरण त्याचे ॥८५॥
ती चरणगति अंतरांत । समजोनि घेई तूं त्वरित । जोंवरी देह आहे हातांत । जा शरण सद्गुरुला ॥८६॥
संजीवनी मंत्र त्यांचा । मार्ग दाखवील समत्वधारणेचा । शीण सरेल संसाराचा । होशील पूर्ण काम ॥८७॥
विश्रांतीची स्थिती । येईल आपोआप हातीं । जीवभाव नुरेल चित्तीं । रामनाम कळ साधतां ॥८८॥
अरे हे निर्गुण पुरींचे संत । हाती ऐसे देतींल नामामृत । जेणें क्षुधे तृषेची मात । कांहींच नुरे ॥८९॥
नरदेह हीच बाग सोज्वळ । तेथें नाम हेच मधुर फळ । अमर घोटिती लाळ । यासाठीं ॥९०॥
म्हणोनि नरदेहींचे वय । अमोलिक घरी सोय । शोधी अखंड जपाचा उपाय । सद्गुरुकृपें ॥९१॥
देह जावो अथवा राहो । गुरुपदीं न ढळावा भावों । करोनी विकल्पाचा अभावों । स्थिर राही नाम स्मरणीं ॥९२॥
भावबळें देव पाही । आपुलासा करुन घेई । भाव बळाहून श्रेष्ठ नाहीं । आणिक या जगीं ॥९३॥
भाव असावा सद्गुरुचरणी । तैसाच ईश्वराचें ठिकाणी । तरी त्या भावाचीच आळणी । ईश्वररुपें होईल ॥९४॥
भावेंविण भक्ती । कांहिच नसें त्याची शक्ति । नाहीं कळवळा चित्तीं । म्हणोनिया ॥९५॥
भाव असेल निर्मळ । तरी देव भेटीस नलगें वेळ । विदुरपत्नी खाई केळ । साल देई कृष्णाला ॥९६॥
देव भावाचा भुकेला । कोण विचारी उपचाराला । रामकृष्ण परमहंस स्वत:ला । अर्पिती फुलें ॥९७॥
विदुरपत्नी आणि रामकृष्ण परमहंस । देवाचे भक्त झाले खास । तोची धरुनी हव्यास । जीव आपुला सोडवावा ॥९८॥
करितां देवपूजन । ज्याचे विसरे देहभान । तेथें देवभक्त हें दुजेपण । उरेल कैसे ? ॥९९॥
हे कळे सत्संगतिनें । मुरे साधुबोधाने । परी सत्संगति दैवयोगानें । लाभते जगीं ॥१००॥
म्हणोन श्रोतीं न व्हावें उदास । यासांठी मामा विस्तारिती अर्थास । जेंणें प्रसन्नता मनास । ये तात्काळ ॥१०१॥
संत्संगति म्हणजे समगति जाणें । जैसे संतांचे विचारणें वागणें । तेचि आपुलें होणें । या नांव सत्संगति ॥१०२॥
जेथ विवेक आणि वैराग्य वसे । जेथ चाणाक्ष दृष्टि असे । तेथें सत्संगतीस नसे । वाण कांहीं ॥१०३॥
संत संगती रांहणें । त्यांचेसह जेवणेखाणें । त्यांची देहसेवा करणें । हा झाला लौकिक ॥१०४॥
याचा लाभपडे पदरीं । जरी तत्व शोधाल अंतरी । सेवामिषे बोध हृदयांतरीं । प्रकाशेल तेव्हां ॥१०५॥
व्याख्या सेवाशब्दाची । मामा करिती तत्वशोधाची । जेणें शंका मनाची । जाय फिरोन ॥१०६॥
‘से’ म्हणजे आठवण । ‘वा’ म्हणजे उत्तम । सेवा म्हणजे स्मरण । सद्गुरुवचनाचें ॥१०७॥
वर्म आहे आपणाच पाशीं । वृथा कां फिरावें दिगंतरासी । अंतर्मुख होऊन स्वत:शी । विचारावें ॥११२॥
एक राजा विचारी ऋषीला । देव कैसा भेटेल मला । तो म्हणे जा गंगातीराला । एक मांसा सांगेल ॥११३॥
तो तुला समजावील । संदेह तुझा निवारील । तुज मार्ग सांपडेल । निश्चितसा ॥११४॥
राजा आला गंगातीराला । तो मासा तोंड बाहेर काढून त्याला । मासा म्हणू लागला । तहान मला लागली ॥११५॥
राजा म्हणे हो उलटा । पाणी पी गटागटा । अरे हा पहा मासा करंटा । पाण्यामध्यें पाण्याविण ॥११६॥
तंव मासा वदे राजाशीं । अरे हेंच उत्तर तुजशीं । देव खाशी देव पिशीं । हो उलटा म्हणजे कळेल ॥११७॥
तंव राजा विरमला । म्हणे ठीक उत्तर आले मला । माझेंच शब्द परतून झाला । मज साक्षात्कार ॥११८॥
बाह्यांतरीं परमार्थ करणें । अंतरीं उठेना विषयांचें ठाणें । हे जिणेंचि लाजिरवाणें । ना संसार ना परमार्थ ॥११९॥
प्रपंचाचें पडतां मौन । सत्संगति समाधान । जें मामांनी मिळविंलें पूर्ण । आपुल्या रामाश्रमामध्यें ॥१२०॥
भंडाराच्या डोंगरात । श्रीतुकाराम एकांतात । सत्संगति साधत । तींच श्रीसमर्थ गुहेमध्ये ॥१२१॥
म्हणोनि साधणें तें साधी पाही । जें अखंडित या देहीं । सत् म्हणजे शाश्वत राही । जें देहांतीत ॥१२२॥
संग त्या शाश्वताचा असावा । जेणे साधेल तो मार्ग शोधावा । नातरी संतास पुसावा । म्हणजें बरें ॥१२३॥
विवेक हरि जागृत ठेवून । साध्यासाठीं शोधावें साधन । जेणें साधन जाय विरोन । साध्यामध्यें ॥१२४॥
अखंडित वांचे रामनाम वदती । अष्ट सात्विक भाव जमा होती । संसाराची होय विस्मृति । मग नाम कोण देव कोण ॥१२५॥
नाम हाचि देव । तोचि नामदेव । अखंडानंद सदैव । ब्रम्हरस ॥१२६॥
ऐशी संतसेवा घडतां निष्ठेची । जोड मिळे त्यांच्या आशीर्वादाची । जोडी असे सदाची । सच्छिष्य आणि शुभाशिर्वाद ॥१२७॥
सत्संग तोंचि सदाचार । जेथें नामाविण नाहीं विचार । देह देवांचे मंदिर्र । आंत राम उभा सदा ॥१२८॥
सत्याचा होता संकल्प । पळे क्षण न लागतां विकल्प । संकल्प विकल्प नुरतां अल्प । निर्विकल्प मन ॥१२९॥
संकल्प विकल्प हेचि मन । ते नुरतां मन होय उन्मन । अहंकार सोडी ठाण । मग राज्य रामाचें ॥१३०॥
यासाठी नित्यनेमें । रामाचि गावा सप्रेमें । इतर करीत असतांही कामें । राम अखंड स्मरावा ॥१३१॥
राम कृष्ण हरि । उघडा मंत्र भूतलावरी । धोके शून्य लाभाची थोरी । वर्णिता नये ॥१३२॥
परि सद्गुरुमुखें समजोनि घ्यावें । सबीज मंत्र उच्चारावें । तरीच सुखोपायें । पावावें । अखंड सौभाग्य ॥१३३॥
नाम आहे श्वासोच्छ्‍वासी । तें सांपडे गुरुच्या चेल्यासी । ज्यांचे चित्त रमे अभ्यासी । तो भोगी परमानंद ॥१३४॥
घडीनें घडी साधावी । हळुं हळुं प्राप्ती मिळवावी । अधिरतेस नसावी । वाट तेथें ॥१३५॥
गुरुवचनांचें अभ्यासांत । साधेल तेचिं हित । ऐसा विश्वास ज्याचें मनांत । तो श्रीगुरुचा अंकिला ॥१३६॥
सर्व प्रायश्चित्तांचे प्रायश्चित्त । सर्व नेमांचा नेम नित्य । एक रामनाम उचित । सर्वभावें सर्वार्थे ॥१३७॥
रामनामीं चित्त जडतां । आत्मारामीं होय अभिन्नता । दैवभाव उडोन पुरता । उरे एक गोविंद ॥१३८॥
हीच देहाची सार्थकता । रामनांमी देह झिजतां । मन पावेल स्थिरता । होशींल स्थिरपद ॥१३९॥
गोविंद म्हणे नाम नेम । करील तुज पूर्णकाम । जीवा अखंड आराम । तेथेचि असे ॥१४०॥
यापरी संक्षेपरीति । वर्णिली मी किर्तन अंगरंग स्थिति । प्रयत्न केला यथामति । मामांच्या कृपें ॥१४१॥
यापरी संक्षेपरीति । वर्णिली मी किर्तन अंतरंग स्थिति । प्रयत्न केला यथामति । मामांच्या कृपें ॥१४१॥
यांत किती एक चरण । घेतले मामांच्या अभंगातून । गावया मामांचे महिमान । मामांच्याच शब्दें ॥१४२॥
एक एक ओवी । अभंगाचे सार दावी । मामांच्या कीर्तनाचें करवी । विहंगम दर्शन ॥१४३॥
विस्तार भयास्तव । दिला थोडया अभंगास वाव । नातरीं मामांच्या अभंगाचे पर्व । असे भारताएवढें ॥१४४॥
एकापरिस एक । अभंग असतीं मनोवेधक । एक नाममहात्म्य सम्यक । वर्णिले असें तेथें ॥१४५॥
रामपाठांत अधिकांश । मामांच्या वचनांचा सारांश । रामपाठ अमृताचा कलश । सुखवील सर्वासी ॥१४६॥
‘नामयोग रहस्य” । हा ज्या ग्रंथाचा विषय । त्याचा सामग्रीची सोय । मिळे मामांच्या अभंगात ॥१४७॥
हजारोंनीं अभंग लिहिलें । ‘नामयोग रहस्य’ वर्णिले । दुसर्‍या विषयास न शिवले । जन्मवरी ॥१४८॥
जरी विषय दिसती वेगळाले । तरी असति नामसुत्रांत गोविलेले । मामांनी एक ध्येय ठेविले । नामस्मरण ॥१४९॥
श्रीहनुमत् चरित्र सार । मामांचा ग्रंथ थोर । आहे लहान आकार । परि महत्व मोठें ॥१५०॥
साधनाभ्यास हेंचि सूत्र । तेथेंहि सांपडेल सर्वत्र । मामांचा एक मंत्र । नामस्मरण योगराज ॥१५१॥
नामयोग रहस्यवर्णन । साधिलें चरित्रांचें मिष करुन । नामसाधन केंद्र बिंदु धरुन । मामा राहिले जन्मवरी ॥१५२॥
ऐशी नामनिष्ठा थोर । मामांचा आचार धर्म कठोर । तोचि त्यांच्या किर्तनाचा विस्तार । जन्मवरी ॥१५३॥
म्हणोनि मामांचें किर्तन । नव्हते सामान्य । निष्ठावंतास थोरपण । लाभले निश्चितीचें ॥१५४॥
एक नामाचा विचार । विचार तैसा उच्चार । उच्चार तसा आचार । होता मामांचा ॥१५५॥
शंभर कोटि रामायण । दिलें तिन्ही लोकांत वाटून । उरली दोन अक्षरें तोचि प्राण । झाला महादेवाचा ॥१५६॥
तैसे अध्यात्मशास्त्र अमित । तें शोधून घेतले बहुत । त्यांत रामनाम सार फक्त । ठेविलें जतन करोनि ॥१५७॥
एक तेंचि गावें । तेंचि तें वर्णावें । तेंचि पुन: खुलवावें । एकनिष्ठेनें ॥१५८॥
हा मामांचा ध्यास । त्यासाठी केला अट्टाहास । धरोनी साधनाचा सोस । किर्तन साधन बनविंलें ॥१५९॥
कीर्तनी निवारुन शंका । म्हणती आतां रामनाम ऐका । तोचि एक साधका । होय विसावा ॥१६०॥
ऐसे एकनिष्ठ एकतंत्र । लोकाचारांहून स्वतंत्र । थोर गुरुकृपेस पात्र । किर्तन ज्ञानसत्र मामांचें ॥१६१॥

इतिश्री गोविंदचरितमानस । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । कीर्तन अंतरंग वर्णन नाम अध्याय सहावा ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP