अध्याय अकरावा - संत दर्शन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


यश कीर्ति आणि प्रताप । न इछिताही जोडपे अपाप । पूर्ण होताची तप । मामांचे ॥१॥
कीर्ति हा सुगंध सत्कृत्यांचा । यश हा वाटा धर्माचा । प्रताप हा ठेवा ईश्वराचा । मनुष्यापाशीं ॥२॥
जेथ हें तीन्ही एकवटले । ते परम भाग्यवंत ठरले । संत सज्जनांचें लागलें । लक्ष त्याकडे ॥३॥
सहज उद्गार गौरवाचें । येती ज्याच्या त्याच्या वाचे । म्हणती कलियुगीं हें भाग्य आमुचें । म्हणोनि घेती संतदर्शन ॥४॥
नित्य नेम तडीस गेला । साधनाभ्यास पुरा झाला । शुध्दाचरणाचा कित्ता दिसला । सामान्य जनांनाहि ॥५॥
महापुरुषांचे दिव्यत्व दर्शन । लोकांसी घडावया कारण । ईश्वर पसरवी कीर्ती आपण । भक्ताची इच्छा नसतांहि ॥६॥
देणें ईश्वराचें । ते न इच्छिताही भोगावयाचे । नातरी अंगीं आदळायचें । हा विधिक्रम दिसे ॥७॥
सागराच्या शांत लहरी । पोंचती दूर किनार्‍यावरी । हा सहज क्रम परी । चाले अव्याहत ॥८॥
तैसा मामांच्या कीर्तीचा सुगंध । दशदिशा पसरला अनिर्बंध । फोडोनिया बांध । जें मामांनीं सुविचारें घातलें ॥९॥
कीर्ति ठेवून दूर । मामांनीं चालविला परमार्थ खडतर । परी देवाची इच्छा अनिवार । वेगळीच दिसे ॥१०॥
पंख फुटले कीर्तीला । ती पसरली दशदिशाला । हरएक समंजस व्यक्तीला । वाटे दर्शन ऐकूं ॥१३॥
ते मुक्त कंठानें प्रशंसति । मामांना वाखाणति । गांठी भेटी होतां आनंदती । अकृत्रिम सौख्यभरें ॥१४॥
पौत्र श्रीगुरुलिंगजंमांचे । श्रीनागाप्पाण्णा नाम त्यांचे । थोर सिध्द परी कीर्तीचे । वावडे त्यांना ॥१५॥
आले मामांच्या घरीं । भेटून आनंदले अंतरीं । आनंदाच्या लहरीवरी । लहरी अंत:करणांत ॥१६॥
निरोप घेऊन टांग्यात । बैसले जाण्याचा करुन बेत । परी घोडयानें पाय रोवले तेथ । हालेना जागचा ॥१७॥
तव श्री सद्गुरु बोलले । पहा कैसे नवल झाले । या घोडयांच्या मनानेंही घेतले । विरह दु:ख अनिवार ॥१८॥
ऐसें प्रेम एकएक संतांचे । वर्णन करतां मन आनंदानें नाचे । भाग्य श्रोत्यांचे । आणि लेखकांचेही ॥१९॥
शंकर महाराज मिरीकर । महाराज ताम्हनकर । तसेच संत श्री मळणगांवकर । एकनाथ म्हणती मामांना ॥२०॥
रामानंद खटावकर । मुकुंदराजपंथीं संत थोर । पशंसोद्गार । मामांच्या संबंधीं काढीती ॥२१॥
निर्लोभ निस्वार्थी सेवक । निष्ठेचे साधक । कीर्तन भक्तीचे उपासक । संत थोर मामा ॥२२॥
श्री गुरुदेव रानडे एकदां । मान देण्या मामांच्या शब्दा । आले सुख संवादा । मामांच्या घरीं ॥२३॥
आले सांगलीस अवचित । श्रीमंत राजेसाहेबांचे पाहुणे नित्य । दोघांचे प्रेमसंबंध अत्यंत । असती बहुसाल ॥२४॥
आवड अध्यात्माची । श्रीमंतांना मनापासूनची । म्हणोन गुरुदेवांच्या आगमनाची । वाट पाहती आतुरतेनें ॥२५॥
यावेळीं श्रीमंतांकडे आले । क्षण-एक थांबले । म्हणती जाणें आहे पहिले । बापूरावजींकडे ॥२६॥
वेळ असे रात्रीची । श्रीमंत म्हणती विश्रांतीची । घाई कासयाची । उदयां चला ॥२७॥
परी न मानले श्रीगुरुदेवाना । ह्मणती घोडेस्वार पाठवाना । कळविण्या बापुरावजींना । जाऊं आम्ही पाठोपाठ ॥२८॥
तवं इकडे उडाली घाई । काय भेटीची नवलाई । झटपट केली साफसफाई । तों मोटार वाजली दारांत ॥२९॥
श्रीगुरुदेवांचे आगमन । मध्यरात्रीं सूर्यदर्शन । साक्षात्कारी संत विद्वान । मामा जाती लोटांगणीं ॥३०॥
आनंद झाला उभयता । न ये शब्दाने वर्णितां । पुसती परमार्थाच्या वार्ता । एकमेका ॥३१॥
कांहीं दिवस लोटले । श्रीगुरुदेव श्रीमंतांचेकडे आले । तेव्हां मामांना आमंत्रण आले । भेटीसाठीं ॥३२॥
क्षेमकूशल झाले । श्रीगुरुदेव आनंदले । मामांना विचारूं लागले । अहो बापूराव ॥३३॥
श्रीमंतांनीं तुमचे । कीर्तन ऐकावें भक्तिचें । ऐसा योग जमण्याचें । आजवरी सुचिन्ह नव्हतें ॥३४॥
माझ्याही मनींची । इच्छा कधींची । पूर्ण करुन घेण्याची । आतां संधी यावी ॥३५॥
आपण अनुमति दयाल । तरी हा योग येईल । मामा म्हणती आज्ञा कराल । तेव्हां मी आहे हजर ॥३६॥
तों त्याच दिवशीं भला । योग जमला सायंकाळला । आणि किर्तनाला । आला रंग बहुत ॥३७॥
तवं श्रीमंत म्हणती आनंदून । घरगुती छान झालें कीर्तन । जेणें पूर्ण समाधान । चित्तास होई ॥३८॥
याहीवरी एकदां । श्री देशपांडे यांना हलवून गदागदा । श्रीगुरुदेव म्हणती उचला पदा । ते पहा बापूराव चालले ॥३९॥
आपण त्यांना बोलावून । पाहूं करितील कां कीर्तन । रमेल आपुलें मन । हरिकीर्तनीं ॥४०॥
मामा आले आणि बसले । करताल धरुन सुरुं केलें । कीर्तन श्रीगुरुदेवांनी ऐकिलें । भक्तिभावें ॥४१॥
ऐसे श्रीगुरुदेवांचे पूर्ण । मामांच्याशी स्नेहबंधन । वेळोंवेळीं आले दिसून । अभावितपणें ॥४२॥
श्रीमंतही तैसेंच उदार । हरिभजनीं ओढा फार । गुणी जनांचा गौरव तत्पर । राहून करिती ॥४३॥
त्रितप महोत्सव झाल्यावरतीं । मामांची गांठ घेण्याचे ठरविती । मामांच्या प्रकृतीची क्षीण स्थिति । म्हणूनिया ॥४४॥
थोर आदर परमार्थाचा । आणि संत सज्जनांचा । गौरव गुणी जनांचा । गुणी लोक करीती ॥४५॥
“मी एक सामान्य नागरिक । तरीही श्रीमंतांना हे कौतुक । ऐशी ही प्रेमाची जवळीक ।” म्हणती मामा ॥४६॥
ऐसे किती एक प्रसंगोपात् । मामांच्या घरी आले सज्जन संत । आवडींने मामांच्या घरांत । सुख समाधानासाठीं ॥४७॥
आचार्य श्री दांडेकर । महाराष्ट्राचे संत थोर । जेव्हां जेव्हां भूषविती सांगली नगर । येती मामांच्या घरीं ॥४८॥
मामांचे कीर्तन ऐकून । तेही होती तल्लीन । संतांचें संतचि महिमान । ओळखती खरें ॥४९॥
गोविंद मह्हाराज वाटेगांवचे । प्रेम जाणून मामांचे । सोसून दु:ख वृध्दपनाचें । येती मामांच्या घरीं ॥५०॥
तें प्रेमचि अनिवार । ओळखति एकमेकांचें अंतर । अध्यात्मास बहर । येई त्यांवेळीं ॥५१॥
मामांनी चरण धरिले । गोविंद महाराजांचे भले । आनंदून बसले । पाय आपुले मुरडून ॥५२॥
तंव “गोविंदजी” म्हणती । पाय करा देवाचे मज पुढती । मी जाणें त्यांची महती । ह्मणोन चरण धरिती ॥५३॥
देव भेटला देवाला । हा त्याला आणि तो याला । सीमा आनंदाला । मुळींच नसे ॥५४॥
श्रीकेतकरमहाराज । पोटीं प्रेम निर्व्याज । भेटींचे मनीं धरुन काज । येती मामांच्या घरीं ॥५५॥
दासगणु थोर हरिसेवक । कीर्तिमंत अलौकिक । आधुनिक महिपती ह्मणती लोक । गौरवून त्यानां ॥५६॥
तेहि आले मामांच्या घरीं । रंगले कीर्तन गजरीं । मामांच्या गुणगौरवापरी । बोलती मुक्तकंठ ॥५७॥
तैसेच गोंदेमहाराज दूरचे । मार्ग मानून जवळचे । उराउरीं भेटण्याचे । सौख्य उपभोगती ॥५८॥
गोपाळकाका कोटणीस । मामांचे वर्णन सर्वापरीस । करिती अत्यंत सुरस । मामांची योग्यता जाणोनी ॥५९॥
पैठणकरमहाराज एकनाथ वंशांचे । शोभते थोर कुलाचें । मामांच्या कीर्तन सेवेचें । कौतुक करिती प्रेमभरें ॥६०॥
सांगलीच्या आसपास आले । आणि मामांच्या घरीं न येता गेले । ऐसे कधीं न झाले । ऐसे प्रेम उभयतांचे ॥६१॥
धुंडा महाराज चौंडे महाराज । निजापूरकरमहाराज, चाफळकर महाराज । बाळेकुद्रींकर महाराज आणि इतरही संतराज । भूषविती मामांचे घर ॥६२॥
आण्णासाहेब कुलकर्णी इचलकरंजीचे । अधुनिक सावंता माळी लोकांचे । शब्द बोलती आदराचे । मामांच्यासंबंधी ॥६३॥
रामनामें बेळगावचे रहिवासीं । येती मामांच्या घरासी । गौरविती सद्भक्तासी प्रेमभरे ॥६४॥
अखिल संतजन म्हणती । धन्य बापुरावांची भक्ति । एकच पुत्र परि तोही परमार्थी । हे भाग्य परम दुर्लभ ॥६५॥
ऐकून रामांचे निरुपण । संत पावती समाधान । म्हणती धन्य धन्य धन्य । हें केळकर कुल ॥६६॥
संतांचा सहवास लाभावा । त्यांचा प्रसाद मिळावा । त्यांचा आशिर्वाद लाभावा । हे इच्छिती सुजन ॥६७॥
गुंडूबूवा बुधगांवचे । जे भानावर नसायचे । परी मामांच्या कीर्तनी नाचावयाचे । समाधि मंदिरांत ॥६८॥
अहो जी श्रोतेजन । मी एक प्रश्न करितो लहान । मज दयावे अवधान । एक वेळ ॥६९॥
एक एक संतांची गांठ पडायां । पुण्याच्या क्रोडी लागती कराया । श्री राममंदिरीं या । येती किती संत ॥७०॥
अखिल विदयमान संत । ज्ञात आणि अज्ञात । मामांच्या गुण गौरवांत । आनंद मानिती ॥७१॥
हे काय गणित असे ? याचे उत्तर काढावें कसे ? हें ज्याच्या त्याच्या मनीं वसे । असंदिग्ध आणि स्पष्ट ॥७२॥
तरीही निंदक म्हणती मामा । वेळ घालविती रिकामा । मोठेपणासाठीं यम नियमां । सांभाळिती ॥७३॥
सतेज जो सुर्यासारखा । त्यास म्हणती अत्यंत फिका । परी किलकिलती त्यांचेच नयन कां ? । सागां मज ॥७४॥
हे निंदक बाहेर निंदती । परी त्यांच्याही अंतरीं असेल जागृति । ती न दिसे लोकांती । अहंभाव चित्तीं म्हणोनियां ॥७५॥
प्रसंगी तेही करद्वय जोडून । करिती अभावितपणें वंदन । ऐसे संतांचें संतपण । दिसोन येई ॥७६॥
भक्तिभाव तरी सद्गद होती । मामांची जाणून महती । लाभावी त्यांची संगति । म्हणोनि करिती प्रयत्न ॥७७॥
माई करमरकर । दूर सोडून आपुलें घरा मामांछ्या वाडयांत निरंतर । वसतीस आल्या ॥७८॥
अठरा वर्षे ऐकून कीर्तन । त्या झाल्या तल्लीन । म्हणती आतां देह ठेवीन । याच पवित्र आवारांत ॥७९॥
तो पण त्यांनी साधला । अखंड सहवासाचा लाभ घेतला । नामस्मरणी जीव रमविला । माईसाहेबांनीं ॥८०॥
नाना जोगळेकर । आप्त माईंचे निकटतर । त्यांनींही श्रीराममंदिर । जवळ केलें ॥८१॥
निष्ठा मामांच्यावरी । त्यांची बसली भारी । परततांना एकदां पुण्यपुरीं । त्यांनी वस्ती केली ॥८२॥
तेथें श्री-सहस्त्रबुध्दे संत । होते अति विख्यात । म्हणोनिअ चरणवंदनाचा हेत । धरोनि गेले ॥८३॥
तवं ते संत बोलती । तुम्ही सांगलीहूनि आलाति । ज्या चरणांची मिळाली संगति । ती आतां सोडूं नका ॥८४॥
तंव चमकले । म्हणती हें यांना कसें कळलें ? । अंतर्ज्ञानी संत भले । म्हणोनिया ॥८५॥
ज्ञात आणि अज्ञात । हा मागील उल्लेख आणा लक्षांत । मामांच्या महत्वाची संगत । आतां नीट लागेल ॥८६॥
ऐसा हा वृत्तांत । सांगावा तितुका अद्भुत । एकचि चांचपोन शित । जाणावें सुजनानी ॥८७॥
ऐसा हा सुरम्य इतिहास । घडतां वर्षे पन्नास आणि वीस । त्याहीवरी दोन खास । उलटून गेलीं ॥८८॥
कालचक्र गरगरा फिरे । माया मोहांचें वारें । अज्ञानतिमिर भरे । करी क्षीण विवेक ॥८९॥
विवेक जागवावया सतत । संतांची धरावी लागे संगत । काळ म्हणे मी हातोहात । आतां नेईन संतासी ॥९०॥
शक उगवला अठराशे त्र्यांऐंशी । आणि जमल्या दु:खराशी । आकाशीं अष्टग्रहासी । मेळ आला यावेंळीं ॥९१॥
मामा मनांत विचार करिती । कांही खूणगांठ बांधिती । लोकांना ती विचार संगती । कळली वेळ गेल्यावरी ॥९२॥
रामनवमीस कीर्तन । मामांनी केले उत्साह भरुन । देह सार्थक साधन । सांगती सुगम शब्दें ॥९३॥
श्रीराम जयराम जयजयराम । घोष करिती सप्रेम । श्रीराम हाचि विराम । म्हणती जीवाचा ॥९४॥
कीर्तन संपल्यावर । स्वस्थ राहती अंथरुणावर । तो सहस्त्रबुध्दे चरणांवर । माथां ठेवती ॥९५॥
जातो दूर देशाला । आशीर्वाद असावा मजला । आता भेट पुढील वर्षाला । तोंवरी स्मरण असूं दे ॥९६॥
राहतो तुमच्या वाडयांत । हे सौख्य मनांत । वियोग होतां दु:खित । मन होय ॥९७॥
तवं मामा त्यांना म्हणती । वर्षाची काय निश्चिती । झाली भेट हीच चित्तीं । असो दयावी ॥९८॥
बुध्दि याचा अर्थ सांगे । परी मन विकल्पी तरंगे । मायेचा पडदा लागे । आपोआप ॥९९॥
मामा मनीं विचारती । तीन तपावरी केली कीर्तन संगतीं । त्याचा आढावा चित्तीं । आतां घेऊं ॥१००॥
सार ठेवूं लिहून । आतां स्वमुद्रांकित करुन । भाविकांना मार्ग दर्शन । तेचि पुढें होईल ॥१०१॥
एक वर्षाच्या किर्तनाची टांचणें । आतां सुसंबध्द लिहिणें । तेंचि होईल ठेवणें । पुढीलासी ॥१०२॥
विकल शरीर सावरती । उशा पायांशी ठेविती । सावकाश बसोन लिहती । टीपणें कीर्तनाची ॥१०३॥
हात न चाले भराभरा । घाम सुटे शरीरा ॥ तरीही सुवाच्य काढूनि अक्षरा । विचार धन सांठविती ॥१०४॥
कोणी येतील साक्षेपी जन । ते वेंचितील हें धन । तेची त्यांचे सुफल जीवन । म्हणोनिया ॥१०५॥
तासन् तास काम चाले । देहदु:खाची तमा न चालें । ऐसें दहा महिने चाललें । काम अव्याहत ॥१०६॥
हीच मामांची संपत्ति । ते आपल्या भक्तासाठीं गोळा करिती । जन उध्दाराची तळमळ चित्ती । धरोनियां ॥१०७॥
प्रत्येक आपुले कीर्तन । त्यांनी ठेविलें स्वमुद्रांकित करुन । वाचतां मन ये आनंदून । क्षणोक्षणी ॥१०८॥
ऐसे दहा महिने होत आले । काळाचे माप भरत आलें । शरीर थकतचि चाललें । दिवसें दिवस ॥१०९॥
लिहिण्याचे कष्ट न सोसती । तेव्हां दुसर्‍याची मदत घेती । परी कार्य न थांबविती । क्षणमात्र ॥११०॥
दिनप्रतिदिन विकल काया । डाँक्टरही थकले औषध दयाया । कांहीं न चले उपाया । म्हणती हा वृध्दापकाळ ॥१११॥
उभा राहून कीर्तन । तें न जमे तेव्हां खुर्चीवर बसून । तीही सीमा उल्लंघून । गादीवर आले ॥११२॥
बसल्या बसल्या कीर्तन । तेही होई कठींण । परी नित्य नेम समाधान । ढळूं न देती ॥११३॥
करोनि मन घट्ट । देहाचा एकही न पुरविती हट्ट । हें कर्मचि अचाट । वाटे किती एकांना ॥११४॥
ध्येयासाठीं जीवन । ईश्वरासाठीं पंचप्राण । उपासनेंसाठीं देहदंडन । ऐसे तप खडतर ॥११५॥
होतां होतां हनुमत् षष्ठी । आली दयावया स्वानंद पुष्टी । परी मामांची देहयष्टी । खिळली अंथरुणाला ॥११६॥
समाधी मंदिरात उत्सव । मामांचा तेथे अडकला जीव । परी त्यांना आपले अवयव । आपले नव्हते ॥११७॥
श्रीहनुमतषष्ठीच्या दिवशीं । समाधि मंदिरांत कीर्तन करावें ऐशीं । मामांची इच्छा मनाशीं । परी उपाय काय ? ॥११८॥
अंतकाळीची इच्छा कळलीं । श्रीहनुमंत सद्गुरुंची कृपा वळली । गंगाधररावजींना बुध्दि झाली । अकस्मात ॥११९॥
उत्सवांत राम करितो कीर्तन । तेंच आपुलें मानून । त्यांतच समाधान । मामांनी मानलें ॥१२०॥
तें न मानले श्रीसद्गुरुंना । म्हणती “फुलासारखे उचलून आणा । येथें आज बापूरावजींना । माझ्यापुढें ॥१२१॥
तरीच माझे मन । आज होईल सुप्रसन्न । कीर्तन करीत असतां वदन । पाहीन बापुरावजींचें” ॥१२२॥
दिन गेला अस्तवानीं । मामांना अणिले खुर्चीत बसवूनी । लोक सांभाळति प्राणाहुनि । या भीष्माचार्यांना ॥१२३॥
देह दु:ख विसरुन । मामांचे हृदय गेले आनंदून । चेहर्‍यावरी खदखदून । हास्य उमटले ॥१२४॥
निरागस हास्यबालकाचें । की मुक्त हास्य शिवशंकराचें । कीं सहज उमलणें कमल कलिकेचें । ऐसे वाटे मना ॥१२५॥
खुर्ची ठेविली समाधि समोर । तों मामा बोलूं लागले सुरवर । रघुनाथ प्रिय गुरुवर । त्यांनी पाचारिलें ॥१२६॥
प्रसन्नवदन मामांचे । की अमृतहास्य तात्यांचे । भाव मिळाले एकमेकांचे । मामांच्या वदनीं ॥१२७॥
कीर्तनासी अपूर्व रंग आला । ऐसा पूर्वी कधीं न देखिला । लोक म्हणति प्रभुवर देखिला । मामांनी आज ॥१२८॥
मामा गर्जून सांगतीं । अढळ निष्ठा सद्गुरु चरणांप्रती । ठेवा त्याची प्राप्ति मोठी । कोण मोल करील त्याचे ॥१२९॥

हनुमंत षष्ठी । करी स्वानंदाची पुष्टी ॥१॥
षडैश्वर्ये देऊन । करीती भक्तांचे रक्षण ॥२॥
गोविंदासी नेमी । आणिती गंगाधर स्वामी ॥३॥

सद्गुरु भक्तांचेंरक्षण । करिती षडैश्वर्ये देऊन । शमदमादि साधन संपन्न । स्वयें करिती भक्तांसी ॥१३०॥
भव दु:खाच्या पार । कसें व्हावें हे शिकविणार । सामर्थ्य संपन्न करणार । आपल्या भक्तांसी ॥१३१॥
नेभळ्या भक्तासी खांदयावर । घेऊन सद्गुरु पार करणार । ऐसा नाहीं येथें प्रकार । सुजन हो ॥१३२॥
ज्याचें त्यांने हित साधावें । आपण सामर्थ्य संपन्न व्हावें । संत होवोनि संतासी मिळावे । हे भाग्य देती सद्गुरु ॥१३३॥
ऐसे प्रभावी कीर्तन । मी ऐकलें नव्हते अजून । आतां मामा बोलती आवर्जून । ऐका काय तें ॥१३४॥
आजवरी कीर्तन घडलें । प्रतिवर्षी पूर्ण झालें । म्हणोन आज माझें मन धालें । पूर्ण पावलों समाधान ॥१३५॥
आतां माझी सेवा पूर्ण झाली । ती सद्गुरुंनी करवून घेतली । यापेक्षां अधिक न पाहिली । मी मौज कोठें ? ॥१३६॥
तात्यांचे भक्तजन । असती कितीतरी अधिकार संपन्न । त्यांत मी पहिला परी शेवटून । असो दया जी ॥१३७॥
शब्द मामांचे ऐसे । ऐकतां मन झालें कसेसें । अपार प्रेम हृदयीं वसे । म्हणोनि वाटे बोलती ॥१३८॥
हा निरोप अखेरचा । हा नसेल हेत मनींचा । हे मानोन आम्हीं त्याचा । नादच सोडला ॥१३९॥
मामा आहेत अजरामर । ते नाहींत आम्हांस सोडून जाणार । आम्ही मरुं परंतु मामांचे कीर्तन चालणार । अखंडित ॥१४०॥
नरदेह आहे नश्वर । कितीएक संत गेले भवपार । हा नित्त्याचा कीर्तनी गजर । तरी ही आम्ही विसरलो ॥१४१॥
मामा घरीं कीर्तन करिती । समाधिमंदिरात जाती । तेव्हा त्यांची आत्मशक्ति । कांहीं वेगळींच दिसे ॥१४२॥
जेथें प्रथितयश डाँक्टर । सोडती मनींचा धीर । तेथें मामांचे धैर्य अनिवार । दिसे सर्वांना ॥१४३॥
जोंवरी मामांचे कीर्तन अखंड । तोंवरी आम्हास विश्वास उदंड । वाटे येथें कळिकाळांचे बंड । पडेल मोडून ॥१४४॥
रोग जरी असाध्य दुस्तर । तरी मामांचे आयुष्य शंभरावर । डाँक्टरांचा सुटे विचार । तेथें चमत्कार मामांचा ॥१४५॥
ऐशीं भोळी आशा मनीची । दृढावली साची । मामांच्या प्रकृतीची । धास्ती कधीं वाटेना ॥१४६॥
परी जाणते बोलूं लागले । कीं हे चिन्ह नव्हे भलें । मामांचे आयुष्य उरलें । बोटावर मोजण्याचें ॥१४७॥
परी हे न पटे कोणासी । भोळी भावना धरिती मनांशी । मामा राहावे अशी । आशा मनांत ॥१४८॥
मामा कीर्तन करिती । गोजिरी दिसे त्यांची मूर्ति । बाल गोपालांचा मेळा भोवतीं । म्हणती श्रीराम जयराम जयजयराम ॥१४९॥
शुभ्र सदरा लाल रुमाल । गौरवर्ण गोल मुखकमल । शांत भाव प्रसन्न बोल । ऐसे मामा ॥१५०॥
जैसा प्रेमळ पिता । बुझावी आपुल्या सुता । कधीं न रागेजतां । ज्ञान सांगे ॥१५१॥
तैसे हे वयोवृध्द । विमल ज्ञानवृध्द । कठोर तपोवृध्द । प्रेमळ मामा ॥१५२॥
विशाल परिवार त्यांचा । पडदा न जेथें जातिभेदाचा । विशुध्द सागर प्रेमाचा । ऐसे मामा ॥१५३॥
जेव्हां त्यांच्या कीर्तनास विराम । मिळेल आणि सुटेल शरीराचा आराम । तेव्हांच म्हणूं राम रे राम । धांव आतां ॥१५४॥
कांहीं कुशल विचारुं । कांही मनींच्या शंका निवारुं । कांही संदेश मागूं । अंतकाळी ॥१५५॥
करुं निरवा निरवीच्या गोष्टी । नातरी विचारु स्पष्टास्पष्टी । फिरवा काळासी यासाठीं । हट्ट धरुं ॥१५६॥
घालूं देवासी सांकडे । नवस करुं देवापुढें । आपुलें आयुष्यहीं रोकडें । वेचूं मामांच्यासाठीं ॥१५७॥
भाबडया ऐशा लोकांना । कांहीं न देवोन सूचना । मामा म्हणती प्रभुवरांना । कांहीं वेगळेच ॥१५८॥
मामा म्हणती रामाला । चालीव या कीर्तन परंपरेला । जरी तूं अशक्त तरीं हें तुला केलें पाहिजे ॥१५९॥
अरे आपण श्रीरामाचें सेवक । नको येथे देहदु:खाचें कौतुक । चालीव माझा प्रिय नेम एक । नित्य कीर्तनाचा ॥१६०॥
कोणा आवडो वा नावडो । कोणी कीतीही विघ्नें घेऊन पडो । जन निंदेचीही झडो । रास शिरावरी ॥१६१॥
एक देव आणि आपण । यांची गांठ असोदयावी करकचून । तुटे देह परी कीर्तन । चुकू नये कदापिही ॥१६२॥
ऐशी आवडी धरुन हे रामा । मी गांठली आयुष्याची सीमा । आतां सहजेची या कामा । हातीं धरावें ॥१६३॥
कोण कैसी येईल वेळ । हे न कळे सदा सर्वकाळ । मन राखोनि निश्चल । सदा वर्तावें ॥१६४॥
प्रेमापोटीं बोललें । ऐसे रामाला वाटलें । हे जातील हें न शिवलें । त्याच्या मना ॥१६५॥
विशुध्द प्रेम अंतरींचे । तेथें काय काम कुकल्पनेचें । हें असेल बोलणें नित्याचे । म्हणें राम ॥१६६॥
मामांचे अनेक भक्त । दचकती अंतरांत । माम सुचविती आपुला अंत । विविध प्रकारें ॥१६७॥
कोणी म्हणे हा तेजाचा गोळा । चालला पहा दक्षिण दिशेला । अरे याचा अर्थ मला । सांगा कोणी ॥१६८॥
मामांच्या फोटोची फ्रेम दिसे । परी देहाकृतीवरी पडदा भासे । म्हणती हें नवलसें । झालें काय ? ॥१६९॥
कोणी बसे साधनाला । तों मामा म्हणती चला । झडकरी सांगलीला । तरीच भेट ॥१७०॥
नारायणरावांना भेटती । तात्या आणि बोलती । आतां बापुरावांची निश्चिती । मुळींच नसे ॥१७१॥
चालल्या आहेत वाटाघाटी । या साधुमहाराजांच्या हातच्या गोष्टी । हे ऐकतां मन हिंपुटी । होय त्यांचे ॥१७२॥
सौ. इंदिराबाई वाटवे विचारिती । मामांना पुढतपुढतीं । दासबोध ऐकावा म्हणती । मामांच्या मुखें ॥१७३॥
मामा देती प्रत्युत्तर । आतां हें रामचि सांगणार । हें कार्य त्याच्या शिरावर । सहजचि आहे ॥१७४॥
माघ शुध्द सप्तमीचा । दिवस उगवला दु:खाचा । काळ म्हणे आमचा । समय पातला हळुहळूं ॥१७५॥
मामा म्हणती दोनच कीर्तनाची । आतां टांचणें करायचीं । तीच आपुल्या कार्याची । पूर्तता समजूं ॥१७६॥
सोमवारचें पुढील टांचण । रामचि सांगेल आपण । रविवारी मामा गेले बोलून । ते ऐकती धुंडिराज ॥१७७॥
नातू शेठ माधवनगरचे । काय थोरपण त्यांच्या उत्साहाचें । क्ष किरणें फोटो काढवून मामांचे । मुंबईला पाठविती ॥१७८॥
तेथे थोर डाँक्टर तपासती । सुक्ष्मदर्शक त्यांचे नेत्र असती । परीक्षेची झाली परिणती । त्यांचे निर्णय आले ॥१७९॥
सर्वतोमुखी निराशा । परी डाँक्टर देती दिलासा । भयशोक निवारावया थोडासा । परी खिन्नता पसरे ॥१८०॥
इष्ट मित्र गणगोत आले । कोणी सेवेस तिष्ठत बसले । रजेचे अर्ज पाठवलें । सांगली सोडवेना ॥१८१॥
धनंजय कोल्हापुराहून । आला तार पोंचून । गाडींत उभा राहून । धांवला मामांच्या दर्शना ॥१८२॥
जो आला तो खिळून बसला । छाती धडधडे क्षणाक्षणाला । उचकी ठसका मामांना लागला । कीं पाहे मुखाकडे ॥१८३॥
कोणी ओळखी कोणी अनोळखी । कोणी पाही कोणी नेत्र झांकी । सर्वांची तोंडे फिकी । पडली त्या दिवशीं ॥१८४॥
अटळ दिसे विधी घटना । निराशा घेरीं अंत:करणा । कोणी पुसे डाँक्टरांना । केविलवाण्या मुद्रेनें ॥१८५॥
शुक्रवार शनिवार रविवार । चिंता वाटे अनिवार । मामांनी सुरुं केला गजर । श्रीराम जयराम जयजयराम ॥१८६॥
होते पूर्ण भानावरी । परी मौन धरिले बाह्याभ्यंतरी । आणि रंगले अंतरीं । नामस्मरणांत ॥१८७॥
नेत्र ठेविले झांकून । मुख सतेज प्रसन्न । संसार चिंता सोडून । रंगले नामस्मरणांत ॥१८८॥
लोक म्हणती मामांना । धनंजय आला पहाना । डोलवून माना । ऐकिलें हे सुचविती ॥१८९॥
सुत्रचालक परमेश्वर । अखेर हित तेंच करणार । आशेचे उमाळे वारंवार । तरीही येती ॥१९०॥
नारायणराव वाटवे गेले । श्री बाबूरावजींना निरोपलें । तेही त्वरेंने आले । मामांची विचारपूस करण्या ॥१९१॥
येथून पुढें निर्याण प्रसंग । अति कठीण करुणरसरंग । अनिष्ट अटळ शोकसागर अथांग । परी वर्णन करणें असे ॥१९२॥
कैशी चालेल मति । विचारांची मोडेल संगति । हृदय उचंबळेल किती । सांगता नये ॥१९३॥

इतिश्री गोविंदचरित मानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । संत दर्शननाम एकादशोध्याय ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP