अध्याय चौथा - साधन सिध्दता
भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.
जय जय श्रीरामेश्वरा । केळकर कुलदीपका सोमेश्वरा । सांप्रदायाच्या ईश्वरा । साष्टांग नमन तवचरणी ॥१॥
रेवणसिध्द मरुळसिध्द । समर्थ श्री काडसिध्द । ज्यांच्या अनुग्रहे श्रीनारायणसिध्द । गुरुलिगजंगम झाले ॥२॥
गुप्तपणें साधन करुन । संपादिलें आत्मज्ञान । पुरुषार्थाचाही पुरुषार्थ साधून । जगदोध्दार केला ॥३॥
सांप्रदायाच्या सिंहासनीं । श्री नारायण दिसती शोभुनी । ध्वज डोले गगनी । परमार्थाचा ॥४॥
पाया भक्कम भरला । इमारतीला डौल आला । आणि कारभार पसरला । दिगंतरी ॥५॥
तें निंबरगी मूळपीठ । जेथून फुटलें मार्ग नीट । सुत्रधार श्रीनारायण सुस्पष्ट । म्हणोनी वरिष्ठ सर्वांसी ॥६॥
थोर पुरुष आपणां ऐसे । निर्माण केले योग्य जसे । म्हणोनी भाग्य आपैसे । आले सामान्य जनांसी ॥७॥
गुरुलिंग जंगमांचा साधनक्रम । नेहमी दिसे अनुपम । नित्यक्रमी विक्रम । साधिती सुखोपायें ॥८॥
मेंढरें राखण्या दूर जावें । एकांत स्थळ शोधावें । स्वात्मानुभवीं रमावें । हा त्यांचा दिनक्रम ॥९॥
ऐशा साधनी स्वानंद भोंगता । अद्भुत घडलें ऐका आतां । रघुनाथप्रियसाधु सहजतां । आले सोनगीगांवीं ॥१०॥
निंबरगीपासून न अति दूर । रघुनाथप्रिय करिती चमत्कार । तपोबल त्यांचें थोर । चकित होती जनबहू ॥११॥
पुढील कार्य ओळखून । श्रीनारायणांनी आगमन । सोनगी गांवास करुन । रघुनाथप्रियासी भेटले ॥१२॥
“पुण्यमार्ग हा तुमचा । वाटतो जरी भाग्याचा । फेरा न चुकवील जन्ममरणाचा । आहे हें सर्व मायिक” ॥१३॥
येतां श्रेष्ठांचा सुशब्द कानीं । दचकले रघुनाथप्रिय अंतकरणी । अधिकार ओळखुनी । घातले लोंटगण पायावर ॥१४॥
वरद हस्त मस्तकी आला । जीव सार्थकीं लागला । श्रीनारायणांचाही झाला । भक्तिप्रसार सोपा ॥१५॥
पापपुण्य ओंलाडुनी । जाणें आहे निरंजनीं । ऐसे रघुनाथप्रियासी सांगुनी । म्हणती त्यांना ॥१६॥
“जगदोध्दारासाठीं । पडल्या तुमच्या आमच्या गांठी । आतां हें कार्य उठाउठीं । पडलें तुमच्या शिरीं ॥१७॥
वैभव तुमचे वाढेल । थोर कीर्ती होईल । परमार्थही पसरेल । दशदिशा ॥१८॥
ऐसें आशीर्वचन । मिळालें भाग्याचें भाग्याचें पूर्ण । चिमड पसरेल । दशदिशा ॥१८॥
ऐसें आशीर्वचन । मिळालें भाग्याचें पूर्ण । चिमड क्षेत्र दिंले नेमून । भक्तिप्रसारासाठीं ॥१९॥
श्रीरामभाऊ महाराज यरगट्टीकर । श्री नारायणांचे दुसरे शिष्यवर । साक्षात्कारीं द्विजवर । चिमडासी पाठविले ॥२०॥
श्रीलक्ष्मीआक्का नामें एक । श्रीगुरुलिगजंगमांची शिष्या अलौकिक । तपस्विनी अन्वर्थक । शोभे ज्यांना ॥२१॥
त्याही आल्या चिमडाला । भक्ति प्रसार करण्याला । ऐंसे महत्व या क्षेत्राला । अनन्य साधारण ॥२२॥
श्री रामभाऊ महाराजांचे पुत्रवर । श्रीनारायण महाराज यरगट्टीकर । अधिकार ज्यांचा थोर । परमार्थ कार्य चालविती ॥२३॥
याची एक शाखा । सांगलीस आली ती ऐका । भर सांगलीच्या लौकिका । जेणें आला ॥२४॥
हनुमंतराव कोटणीस । परमार्थाचा हव्यास । सांगलीच्या रसिकांस । गोडी परमार्थाची लाविली ॥२५॥
साक्षात्कारीं संत हनुमंत । ऐशी कीर्ती झाली दिगंत । तों मामाहीं विचारांत । पडले एके दिवशी ॥२६॥
जपजाप्य पुरश्चरणें । जरी केली जागरणें । तरी सद्गुरुवीण उणें । सर्व काही ॥२७॥
मनीं एक निश्चय केला । गेले तात्यांच्या घराला । डोई ठेविली चरणाला । तों तात्यांनीं जाणलें ॥२८॥
तरी म्हणती अहो, बापूराव, । आज वेगळाच दिसे भाव । काय मनींची हांव । करा निवेदन निसंकोच ॥२९॥
मामा सद्गद होवोनी म्हणति । आलो ऐकून तुमची कीर्ति । जीवास मिळेल परम शांती । तो मार्ग दाखवा ॥३०॥
आलो धरुन विश्वास । निश्चयाची बळकट कांस । जीव लागे झुरणीस । आतां अंतर न दयावें ॥३१॥
चरणी जीव जडला । आतां अनुग्रह व्हावा आपुला । धरोनी या आशेला । आलों द्वारी ॥३२॥
प्रेमळ सत्पात्र शिष्य पाहोनी । तात्या गहिंवरले मनीं । बोलले विचार करुनी । अमृत वचन ॥३३॥
तुमचा विश्वास माझेवरी । हें मज समाधान अंतरी । मी जें सांगेन खरोखरीं । तें सावधान ऐकावें ॥३४॥
नाहीं तुम्हांस म्हणूं कैसे ? । परी ईश्वरी योजना वेगळींच असे । मम बोलावरी विश्वासें । राहावेंजी ॥३५॥
तुमचे सद्गुरु पूर्वनियोजित । असति चिमड क्षेत्रांत । श्रीनारायण संतश्रेष्ठ । थोर अधिकारी ॥३६॥
विलंब आतां न करावा । सत्कार्यास उशीर न व्हावा । मार्ग आपुला सुधारावा । विघ्ने येथें असति बहु ॥३७॥
तुमची इच्छा होईल सफळ । मन करावें निर्मळ । विकल्पांचा कोलाहाल । करुं नये ॥३८॥
ज्या पुढें अडचणी येतील । त्या येथेम दूर होतील । एकता हें मधुर बोल । मामा संतोष्लें ॥३९॥
शिर्सावंद्य शब्द मानोन । आणि चरण वंदून । मामा गेले चिमडास निघोन । साधुरायापाशी ॥४०॥
तापनाशी तीर्थात । श्रीसाधुरायाची समाधि शोभत । श्री गुरुलिंगजंगमांचें लक्ष जेथ । सदा असे ॥४१॥
घातलें साष्टांग दंडवत । जोडिले दोन्ही हात । मस्तक करोनी नत । राहिले उभे ॥४२॥
तों आले श्रीनारायण । पुसती आदरें आपण “कोण ?” । कां केलें आगमन । शुभवर्तमान सांगा जी ॥४३॥
पाहोनी घट्ट धरीलें चरण । केले अश्रुंचें सिंचन । पुढें शुभे दर्शन । झाले आजी ॥४४॥
कृतार्थ व्हावया जीवन । कैसे असावें आचरण । आपुला अनुग्रह व्हावा पूर्ण । हा मानस ॥४५॥
शके आठरांशे अठ्ठावीस । माघ वदय द्वितियेस । गुरुवार हा शुभ दिवस । श्रीनारायण प्रसन्न झाले ॥४६॥
स्वत: अनुग्रह देऊन । शांत केले मामांचे मन । साधन मार्ग विस्तारुन सांगते झालें ॥४७॥
संसार ‘सोडूं’ म्हणून सुटेना । करावी लागे पोटाची विवंचना । परी तेथें मनानें गुंतावें ना । हें आपुल्या हातीं असे ॥४८॥
संसार न संपवी येरझार । म्हणोनी आसक्ति सोडावी सत्वर । अलिप्तपणे करी संसार । तोची धन्य ॥४९॥
वृथा शरीर न दंडावें । न सुखसाधनी गुंतवावें । नेटके लावावें ठेवूनी अनुसंधानीं ॥५०॥
वर्म जाणेल तोंची संत । सुगम मार्ग असे तेथ । वाउगे कष्टताप्राप्त । कष्टचि होती ॥५१॥
एकाग्र करोनिया मन । जें केलें भजन पूजन । तेंचि होय देवासी अर्पण । इतर कष्ट वाउगे ॥५२॥
मन परतेल संसारांतून । तेव्हां तें करील ईशचिंतन । म्हणोन तोडावें बंधन । निश्चयानें ॥५३॥
क्षणभंगुर सुखासाठीं । त्यागाव्या शाश्वत सुख गोष्टी । ही तरी अविवेक दृष्टि । करी अध:पात ॥५४॥
निजसुखाची सोडोन कांस । जन उगाच होती उदास । जेथें सुख नाहीं तेथें खसखस । त्यांची उगाच चाले ॥५५॥
तेथून व्हावया निवृत्ति । आजी निजसुखाची प्राप्ति । विवेक आणि विरक्ती । ही जोडी पाहिजे ॥५६॥
विवेक करावी ईश्वरभक्ति । संसारा सोडवी विरक्ति । हीच परमार्थाचि युक्ति । मार्ग सुखाचा ॥५७॥
दृढभाव गुरुचरणांवरी । ठेवून वृत्ति अंतर्मुख करी । मोडी द्वैताची वाटच पुरी । साधन मार्गे ॥५८॥
विचारोप्तत्ति विचारलय । हाचि भवसागराचा प्रलय । तो थांबता देवालय । हें शरीरचि होईल ॥५९॥
राम तोचि आत्माराम । साधक तोचि उदयांचा सिध्द परम । चिद् चिद् ग्रंथी भेदन उत्तम । साधी साधन मार्गे ॥६०॥
मन धरीं देहाभिमान । तों गळतां ते मनच होय उन्मन । मंगलचि मंगल खूण । साधन मार्गे ॥६१॥
खंडसुख मायेचें । अखंड सुख आत्मारामाचें । दिवस येतील भाग्याचें । साधन मार्गे ॥६२॥
ऐसा असावा भाव । सद्गुरु वचनावीण सर्व वाव । सत्पदीं मिळवावा ठाव । साधनमार्गे ॥६३॥
सहा जिंकोनी निर्विकार व्हावें । सावध त्यासचि म्हणावें । अलक्षीं लक्ष साधावें । साधनमार्गे ॥६४॥
रामनाम छंद मनोमार्ग गति । संकल्प विकल्पीं रामचि चित्तीं । याची देहातचि प्रचिती । साधनमार्गे ॥६५॥
इडा आणि पिंगला । सुषुम्नेंत सरल्या । रामनाम लेणें ल्याल्या । साधनमार्गे ॥६६॥
जैसा जैसा साधेल पवन । निश्चित करवील देवदर्शन । मग अष्टौप्रहर ईशचिंतन । आपोआप होईल ॥६७॥
सावधानता आणि नित्यनेम । साधील साध्य परम । अंतरी सद्गुरुंचें प्रेम । मग काय उणें ॥६८॥
होता देवाची भेटी । मग आत्मसुख्याच्याच गोष्टि । मग वृथा संसार संकटी । कोण येतो ॥६९॥
ऐकतां ऐसे सद्गुरुवचन । मामा झालें सुखसंपन्न । विसरले देहाभिमान । एकसरें ॥७०॥
आधींच मामांचे आचरण । निर्मल आणि सद्गुणसंपन्न । वरी सद्गुरुंचे कृपादान । कळस सोन्याचा ॥७१॥
कधीं न इच्छिती मोठेपण । नम्रभाव अनन्यसाधारण । आपुलीं सत्कृत्यें लपवून । हरप्रयत्नें करुनी ॥७२॥
कधीं न कोणाचें मन दुखविती । अन्याय साहून मृदुवचन बोलती । त्रिंविध तापांचे आघात सोशिती । मनें कष्टीं न होऊनी ॥७३॥
साधा सरळ स्वभाव । गुरुपदीं अनन्यभाव । शुध्दाचरण सदैव । सप्रेम उपासना ॥७४॥
सदा मनावरी अंकुश । कार्य साधिती सावकाश । नित्यनेमाचा हव्यास । मनापासूनि ॥७५॥
आसक्ति न देहाची । अथवा धन मान स्वजनांची । अनन्यभक्ति परमेश्वराची । वृत्ति रंगली अहर्निश ॥७६॥
रात्र रात्र साधनीं घालविती । श्रवण मनन अभ्यास चित्तीं । परमार्थी निश्चल वृत्ति । सदोदित ॥७७॥
सद्गुरु अधिकार संपन्न । आणि शिष्य साधनीं निमग्न । संसार मानोनी गौण । सुखविती सद्गुरुंना ॥७८॥
मामांनी धरिले सद्गुरुचरण । जें स्वात्मसुखाचें परमनिधान । मिळतां आशीर्वचन । आले समाधिपाशीं ॥७९॥
रघुनाथप्रिय गुरुवर । सदा जागृत सुत्रधार । वाढविती परिवार । संत जनांचा ॥८०॥
दीपें दीप उजळले । प्रांतो प्रांती गेले । अखंड रुपे झळकूं लागले । भक्तभजनास्तव ॥८१॥
श्रीगुरुलिंगजंगमाची । कृपा जेथ सदाची । प्रभा साधुरायाची । उजळोन दिसे ॥८२॥
पंचप्राणपंचारती । मामा सद्गद हृदयें ओवाळिती । आणि एकदांच होती । सुखसहित दु:खरह्ति ॥८३॥
निरोप घेवून सद्गुरुचा । मार्ग आक्रमिला स्वगृहाचा । येथून मामांच्या साधनक्रमाचा । मार्ग बदलला ॥८४॥
साधन झालें संप्रदायानुकूल । वाचन, पंचपदी भाव भक्ति सोज्वळ । श्रीराम उपासनोत्सव, पुण्यतिथी, सकळ । नित्य सुरुं झालें ॥८५॥
उग्र तपाचरण केलें । तेथें सहज साधन आलें । श्रीनारायणसांप्रदायाचें कळलें । महत्व आगळें ॥८६॥
संसारियासी परमार्थ । येथें कळे यथार्थ । साधावया खरा स्वार्थ । करावा संसार परमार्थनुकूल ॥८७॥
संसार करावा परमार्थासाठीं । केवळ शरीर रक्षणासाठीं । नेटके करुन ईश्वरगांठीं । करण्यासुगम ॥८८॥
जे आकंठ बुडाले संसारीं । त्यांना श्रीनारायणपंथी सोय खरी । चिमड निंबाळ उमदी यापरी । नांवे जरी दिसती विविध ॥८९॥
श्रीगुरुलिंगजंगम श्रीनारायण कर्णधार । सर्वांचा जेथें विश्वास थोर । म्हणोनि दिगंतरी गजर । झाला प्रसार सांप्रदायाचा ॥९०॥
मामा आले तात्यांच्या घरीं । निवेदिली कथा सारी । तात्या म्हणती तुमच्या भाग्याची थोरी । काय आतां वर्णावीं ? ॥९१॥
श्रीरघुनाथप्रिय समाधि परिसर । चिमड हे पुण्यक्षेत्र थोर । तेथें जों जों रमेल नर । तो होईल नारायण ॥९२॥
धरोनी तात्यांचे चरण । मामा बोलती सद्गद वचन । आपणचि मार्ग दाखवून । केले मज कृतार्थ ॥९३॥
मामा श्रीरामाचे सेवक । श्रीराम मनीं धरती एक । तेणें श्रीहनुमंत त्यांचा रक्षक । सदा पाठीशीं ॥९४॥
श्रीराम शिरला हृदयांत । सखा झाला श्रीहनुमंत । मग काय उणें तेथ । सदा पूर्ण ॥९५॥
तात्या तरी अति प्रेमळ । श्रध्दावंतासाठीं अति सरळ । मार्ग दाखवून सोज्वळ । भाग्यविधाते शोभती ॥९६॥
मामांची साधन सरिता । अखंड वाहू लागली आतां । दिन प्रतिदिन सुगमता । उमगूं लागली ॥९७॥
हा साधन-मार्ग नव्हें आजचा । तो चालत आला युगायुगांचा । शुक सनकादिकांचा । हाच मार्ग ॥९८॥
सुख जेथ सुखासि आलें । म्हणोनि आनंदाश्रम नाम शोभलें । मामांनी अखंड साधन सुरुं केले । या आश्रमीं ॥९९॥
कधीं न दार बंद यांचे । दर्शन साधनीं रत मामांचे । जें जें घेती त्यांच्या मनांचे । विकल्प मावळती ॥१००॥
ऐसा महिमा आनंदाश्रमाचा । सोहळा मामांच्या आत्मसुखाचा । रात्ररात्र चाले तरी हव्यास मनाचा । पुरा न होई ॥१०१॥
या दिव्य सुखाच्या साधनीं । मामा जीवभाव टाकिती ओंवाळुनि । शांत प्रसन्न दिसती मौनी । जसे मुनि पूर्वींचे ॥१०२॥
शिक्षकाचा पेशा सोडला । तो जेव्हां साधनाच्या आड आला । द्रव्यार्जनाचा मार्ग सोडला । आत्मसुखासाठीं ॥१०३॥
एक नाम मनीं धरीलें । परम प्रीतीनें कवटाळिलें । तेणें संसारासि दिलें । तिलोदक ॥१०४॥
एक साधन उत्तम मानून । झिजविलें देहाचें चंदन । सुगंध राहिला दरवाळून । दशदिशा ॥१०५॥
संसार आणि धन । यांचे सदाचें लग्न । तें प्रारब्धावरी सोपवून । केलें मोठें धाडस ॥१०६॥
अखंड जोड साधनाची । लाज सोडिली जनांची । होळी केली संसाराची । यापरीस वैराग्य कोणतें ? ॥१०७॥
जवळी असोन कांता । जो तीस शिवे संततीपुरता । या निष्कामतेची अपूर्वता । आगळीचे असे ॥१०८॥
कोसळले संकटांचे गिरीवर । तरी यांचा न सुटे धीर । सागरासम गंभीर । हें शांतपण अवर्णनीय ॥१०९॥
लोकनिंदेचें तीव्र वार । सुटतां यांचे चित्त न थरारें । उलट निंदकांचेच चिंतिति बरें । ऐसे संतपण मामांचे ॥११०॥
कठोर नेमधर्माचें पाश । आवळोनि आति कर्कश । मामा राहिले स्थिर पुरुष । हे श्रेष्ठपण असाधारण ॥१११॥
आपुल्या सामर्थ्य बळें । निमटिले कामक्रोधांचे गळे । म्हणोनी त्यांच्या शौर्याचे सोहळे । चकित करिती ॥११२॥
तन मन आणि धन । वेंचून झाले सेवापरायण । जीवन केले श्रीरामार्पण । हा त्याग अवर्णनीय ॥११३॥
तिळमात्र न अभिमान । नामीं रंगलें ज्यांचें मन । विसरले देहाभिमान । हें विदेहपण अलौकिक ॥११४॥
घरी येतां संतसज्जन । ज्यांचे हृदय ये उचंबळोन । करिती प्रेमभावे पूजन । ही सेवा अमुपम ॥११५॥
शुध्द ठेवून आचरण । अखंड ठेविले अनुसंधान । तीच त्यांची शिकवण । हें दिव्यत्व अमोघ ॥११६॥
अखंड वाचन संद्ग्रंथाचें । धडे गिरविले सद्विचारांचे । जें जें अनुकरणीय त्याचे आचरण झाले ॥११७॥
वृथा न बहर भावनांचा । कधीं न दुराग्रह स्वमताचा । निकटवर्तियास ताप यांचा । कणमात्र नसे ॥११८॥
अतिनेमक बोलणें । सुत्रमय उत्तर देणें । प्रतिपक्षांचे साहणें । कठोर वचना ॥११९॥
उलट त्याचाच करुन गौरव । वादवादास न देती वाव । लीनपणाचा स्वभाव । कदा न सोडती ॥१२०॥
दाटून उपदेश न करणें । योग्य तें पुन:पुन: वदणें । भक्ति मार्गावरी आणणें । हर एकासी ॥१२१॥
शंका त्यांच्या दूर कराव्या । परमार्थीवृत्ती भराव्या । सद्वर्तनीं आणाव्या । चित्त वृत्ति ॥१२२॥
जो स्वत: सन्मार्गी लागला । त्यानें त्याच मार्गे न्यावें दुसर्याला । जो भक्तिभावें येईल त्याला । समजावोनी ॥१२३॥
म्हणोनी किर्तन आरंभिलें । तें उत्साहें तडिस नेलें । निरुत्साहाचें प्रसंग आले । तरी अखंड किर्तन ॥१२४॥
अत्यंत निरपेक्ष बुध्दि । दूर सारी करी उपाधि । करी साधन समृध्दि । सुखोपायें ॥१२५॥
सदा विवेक जागृत । घेती लोकमत विचारांत । परीं मनींचा निर्यण निश्चित । उत्स्फूर्त असे ॥१२६॥
जें जें संत अवतरले । प्रकृतिपरत्वें वेगळें भासलें । परी ज्यानें अंतर ओळखले । तोचि धन्य ॥१२७॥
तात्या आणि मामा । गाती ईश्वर महिमा । परि एकाची एकास उपमा । न साहे ॥१२८॥
दोघे करिती किर्तन । परि त्यांचें स्वरुप भिन्न । भक्ति भावें अनन्य । तरीही वेगळे ॥१२९॥
किर्तन एक परि रंग वेगळा । भक्तीभाव एक परि खाक्या निराळा । निष्ठा नियमितपणा एक परि आगळा । वाण याचा नि त्याचा ॥१३०॥
परिस्थितीचा किंकर । असे प्रत्येक नर । म्हणोनि फरक फार । कालपरत्वें ॥१३१॥
तात्यांचे साथीदार । सुदैवें होते अपार । त्यांचे पाठांतर फार । आणि समय स्फूर्ति ॥१३२॥
रंजवून मन श्रोत्यांचे । तात्या काम करिती अध्यात्म प्रसाराचें । तेंच अंतरीं जिरविण्याचें । काम होते मामांना ॥१३३॥
तेथें करमणुकीस नव्हता वाव । साथीदारांचाही अभाव । सुबुध्द साक्षेपी श्रोते सदैव । ठाव शोधिती किर्तनाचा ॥१३४॥
अखंड नामस्मरण । हेचि उत्तम किर्तन । म्हणोनि तेच अधिक करुन । मामा करवून घेती ॥१३५॥
मामा आणि तात्या । एकमेकांना पूरक उभयता । निवड मामांची करिती तात्या । पूर्ण विचारें ॥१३६॥
येणे परी मामांनी । श्रवण केलें अर्थांतर साधुनी । तें भिनविलें साधन करुनी । सद्गुरुप्रसादे ॥१३७॥
सारग्राही मामांचे वचन । तपशिलासह तात्यांचे प्रवचन । करविणें, विवरणें हे दोन । मार्ग होते दोघांचे ॥१३८॥
हातीं घेऊन किर्तनमाला । दोघे आले शारदा मंदिरला । दोघांनी कंठी हार घातला । परी शोभती वेगळेपणें ॥१३९॥
देहधर्म आपआपुले । नियोजीत कार्य आपआपले । शोधून मार्ग पाहिजे सुधारले । केवळ अनुकरण तें नाटक ॥१४०॥
म्हणोन वैराग्य आणि विवेक । दोन पंथ धरी साधक । ते बळकट तितका त्तो तडक । पोचे पैलतीराला ॥१४१॥
उपाधि लागती शरीराला । त्यांच्या बेताल पडे घाला । परी त्यांची झळ अंतराला । न लागू देती संत ॥१४२॥
यापरी जीवन । संसारीं असोन भिन्न । जैसे वर्णिती संतजन । तैसे आंखिले रेखीव ॥१४३॥
“काही करणें ?” नव्हें ! कांहीं होणें । हा साधन प्रभाव दाखविणें । सामान्यासारिखें राहणें । तरी असामान्य ॥१४४॥
निर्भय समाधानी वृत्ती । नेत्र बाह्यसृष्टि न देखती । सदा रमले चित्तीं । श्रीरामचरणीं ॥१४५॥
जरी अंतरीं विषयांची खळबळ । ती चेहर्यावरी उमटे तत्काळ । परी येथें चेहरा शांत निर्मळ । प्रसन्न दिसे मामांचा ॥१४६॥
जो संसार तापें तापला । तो डोई ठेवी चरणाला । पाहोनी मुखकमळाला । क्षणैक होई सुप्रसन्न ॥१४७॥
विसरोनी संसार । जरी एक क्षणभर । तो म्हणें हेंचि देवद्वार सुचवा । तोचि निश्चय व्हावा । जो मामांचा ॥१४९॥
माघ महिना मामांचा । श्रीसमर्थांचे स्मरण करण्याचा । दासबोध वाचनाचा । नेम होता ॥१५०॥
एकदां रात्रीं वाचत बैसले । तों सापाचे पोर हाताशीं बिलगले । आणि तेथेंचि स्थिरावलें । कां देव जाणें ? ॥१५१॥
स्पर्श लागतां गारं । मामा राहिले खबरदार । निश्चल राखोनी शरीर । अर्पिले श्रीसमर्थचरणी ॥१५२॥
सुरुं ठेविले दासबोधवचन । साप गेला कांही वेळांनें निघोन । ही वृत्ती असामान्य । सूचक आणि उद्बोधक ॥१५३॥
तैसेच एकदां विंचवाने । दंश केला अति त्वेषानें । एकाग्र नामस्मरणानें । मामांनी विंचू उतरविला ॥१५४॥
एकदां एका कोनाडयांत । एक वस्तु होती सुरक्षित । गांधिल माशांचे पोळें लोंबत । राहिलें काहीं काळानें ॥१५५॥
मामा निवांतपणे गेले । आपली वस्तु घेऊन आले । गांधिल माशांचे मन न झालें । डंख करावया सिध्द मामांना ॥१५६॥
मामांच्या किर्तनाची निर्भत्सना । लोक करिती नाना । न शिवे तो मळ मामांच्या मना । यत्किंचित ॥१५७॥
ही समूळ बदललेली वृत्ति । कितीएक प्रसंग दाखविती । विचक्षण निरीक्षक चित्तीं । म्हणती हें संतपण ॥१५८॥
रेखिलें जीवन ऐसे । जेथें विषय वृत्तीस वावच नसे । सदा परमार्थाचे पिंसे । अष्टौप्रहर ॥१५९॥
जावें हनुमत् समाधि दर्शना । चित्त लावावें वाचना मनना । अथवा अनुसंधाना । निरंतर ॥१६०॥
वाचावें रामायण भागवत । अध्यात्म चर्चावें सादयंत । किंवा रमावें किर्तनांत । हा छंद मामांचा ॥१६१॥
कधीं न करिती गप्पा गोष्टी । वाउग्या चर्चा करमणुकीसाठीं । कधीं न खेळाची आवड मोठी । सदा रत नामस्मरणीं ॥१६२॥।
घ्याव्या संतांच्या भेटी । सांगाव्या त्यांच्याच गोष्टी । यांतच मामांना आवड मोठी । जी कधी न विटे ॥१६३॥
सद्ग्रंथांचा हव्यास । वाचनाचा भारी सोस । हंसक्षीर न्याय विशेष । त्यांत दिसे ॥१६४॥
वाचणें ते स्वत:साठीं । उच्चार आचार शुध्दतेसाठीए । हीच मनास शिकवण मोठीं । शोधज्योत तत्वीं पडे ॥१६५॥
सामान्यासारिखे दिसावें । परी असामान्य असावें । कैसे यासांठी शोधावें । मामांचे चरित्र ॥१६६॥
लक्षावधि सामान्यजन । म्हणतील हें स्फूर्तिस्थान । करुं लागतील भगवद्भजन । ऐसे चरित्र मामांचे ॥१६७॥
प्रहरो प्रहर साधन करिती । दुसर्याकरवीं करविती । शंका अडचणी निवारिती । मुमूक्षूंच्या ॥१६८॥
घर ही करुन पाठशाळा । शिकविती अध्यात्माला । घर हीच प्रयोगशाळा । साधकांची ॥१६९॥
कष्टविती देहासी । निरिच्छवृत्तीं अहर्निशीं । समवृत्ति लहानथोरांशी । सदोदित ॥१७०॥
ऐसा साधनक्रम मामांचा । अखंड वर्षानुवर्षांचा । नव्हें तपानुतपाचा । अव्याहत अचूक ॥१७१॥
इतिश्री गोविंदचरित् मानस । जें स्वभावेंचि अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । साधनसिध्दता नाम चतुर्थोध्याय: ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 29, 2020
TOP