अध्याय पहिला - प्रस्तावोध्याय

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


श्रीगणेशायन नम: ॥ ॐ नमोजी अनंता । नकळे तुझी उदारता । न दिसोन तुझी सत्ता । ये प्रत्यया सहजेची ॥१॥
तूं आहेंस करुणाघन । भक्त-जनांचे विश्रांतिस्थान । भावाचा भुकेला म्हणोन । संत जन वाखाणिती ॥२॥
देवभक्त आपणचि व्हावें । द्वैती अद्वैत अनुभवावें, । आत्मसुखासि भरतें यावें । अनुपम ॥३॥
म्हणोनि केला विश्वाचा पसारा । विश्वंभरे अवाढव्य सारा । मध्यें मायेसि देऊनि थारा । लीला विनोदें ॥४॥
तों झाले एकाचें एक । मायेचेच वाढलें कौतुक ॥ देवा भक्तासि वेगळिक । निर्माण झाली ॥५॥
प्रेय तें आवडूं लागलें ॥ श्रेय डोळ्यांआड झालें । मायेच्या जाळ्यांत अडकले । जीव सारे ॥६॥
भुरळ पडे बुध्दीला । आडमार्गी चालवी मनुष्याला । राजाचा रंक झाला । फिरे भ्रमांवर्ती ॥७॥
वेडया पुत्रासाठीं । मातेची ममता मोठी । तैसा तूं जगजेठी । पतितासी ॥८॥
संत सगुणरुपधारी । तुझी वर्णावया थोरी । अवतरती भूवरीं । किती म्हणोनि सांगो ॥९॥
तूंच त्यांतें पाठविसी । दीन अनाथा उध्दरावयासी । कळकळोनी तूं होसी । बाप कृपाळू आमुचा ॥१०॥
जे जे संत आले भूवरीं । ते ते अमर झाले ग्रंथांतरीं । देती सद्विचारांची शिदोरी । मुमुक्षू जनां ॥११॥
संसारयात्रा अती दुर्घट । कांटे कुटे, खड्डे अचाट । ग्रंथ दीप उजळोनि नीट । ठायींठायी ठेविले ॥१२॥
प्रासादिक ग्रंथ थोर । ग्रंथ नव्हे, संतचि साचार । त्यांचाच अमर अवतार । आत्मसुखासाठीं ॥१३॥
परि या मायेचा । प्रभाव अति लाघवाचा । पडदा ओढून अज्ञानाचा । दीपप्रकाश मंद केला ॥१४॥
कोणी असति अज्ञानी । कोणी पंडित महाज्ञानी । निंदक, आळशी, अभिमानी । न पाहती ते ग्रंथ ॥१५॥
म्हणति अति गहन । अतिरंजित म्हणति कोण । थोतांड म्हणति आणिक जन । विकल्प - रण माजविती ॥१६॥
महापंडितांचे शब्दजाल । माजवि अति कल्लोळ । नासोन सद्भाव सोज्वळ । जाय भाविकांचा ॥१७॥
म्हणोन संतांची परंपरा । चालविसी उदारा । मायेसि न दयावया थारा । करुणाकर शोभसी ॥१८॥
तुझी लीला अगाध । अनेकी एकत्वाचा बोध । फोडोन मायेचा बांध । कार्य साधिसि ॥१९॥
जे जे सत्वशील । सन्मार्गावरी निश्चल । परमार्थाची वाटचाल । करुं इच्छिती ॥२०॥।
त्यांना कुमार्गापासूनि सोडविसी । मार्ग त्यांचे प्रक्षाळिसी । समजावोनि चालतें करिसी । आत्मसुखाच्या मार्गावरी ॥२१॥
या खटाटोपासाठीं । करविसी संतांच्या भेटीं । शेखी ठेवूनि करकटीं । राहतोसी ॥२२॥
धन्य तुझी अलिप्तता । करोन पुन: तूं अकर्ता । निर्गुणीं तुझी सगुणता । दयाघना पांडुरंगा ॥२३॥
रामकृष्णादि अवतार । प्रगट पराक्रम केला थोर । किर्ती झाली अजरामर । दुर्जन अवघे संहारिले ॥२४॥
चरित्र त्यांचे श्रवण करितां । अति उल्हास ये चित्ता । प्रेमभरें डोलतां । ये तन्मयता मनासि ॥२५॥
परी आपण त्यांच्यासारिखें व्हावें । हें तों दुर्घट स्वभावें । सद्भावें नमस्कारावें । हेंचि उत्तम ॥२६॥
आकाशींच्या तारका । लखलखती अनेकां । मार्ग दाखविती निका । परि त्या दुष्प्राप्य ॥२७॥
दीन दयाळा परेशा । हें दूरपण करी निराशा । जरी मनी दृढ आशा । तुझ्या सख्यत्वाची ॥२८॥
ह्मणोनि संतरुपें तूं अवतरसी । अपार सामर्थ्य करी परि लपविसी । नराऐसी करणी करसी । नारायण असूनी ॥२९॥
संसारीं कैसें असावें आचरण । हे दाखविसी आचरुन । सुगम आणि सोप्या रीतीं ॥३१॥
ह्मणोनि संतांचें चरणरज । लाभतां सहज । सद्भावें वंदावे हें काज । निजसुखासाठीं ॥३२॥
संत अति उदारमूर्ति । आत्मज्ञानाचे चक्रवर्ति । तें योग्य तेंचि साधिती । सुगम यत्ने ॥३३॥
नारायण स्वरुपीं नर । नरासि करिती परमेश्वर । ह्मणोनि प्रमाण त्यांचा आचार । वाटे आम्हां ॥३४॥
संत अति करुणाघन । अपकार्‍यासी उपकार करुन । भाविकांचा मार्ग सुधारुन । करिती सर्वदा सरतें ॥३५॥
परि संत प्रसिध्दिपराड; मुख । सदा असति अंतर्मुख । सेविती जे आत्मसुख । तेंचि त्यांचे चरित्र ॥३६॥
तें चरित्र अति गहन । जेथें शब्दापडे मौन । तेथें न प्रवेशति इतरेजन । अगम्य दुर्बोध यास्तव ॥३७॥
निकट सहवास लाभे ज्यासी । आणि रीघ संतवचनासी । मीनलिया सेवेसी । कृपालव प्राप्त होय ॥३८॥
ऐसा कृपा-प्रसाद होता । साहित्य किंचित येई हातां । प्रसंगे त्यांची वाणी वदतां । मति प्रकाशे अंतरीं ॥३९॥
संत संगतीनें तुझी भेटी । नातरी जन्मवरी तुटी । ही देवा तुझी रीत मोठी । सुगम आणि दुर्गम ॥४०॥
लक्षांमध्यें एक । पावे संतांची जवळीक । महद्‍भाग्यें होतसे सेवक । कल्याण समर्थांचा ॥४१॥
म्हणोनि वाटे हे दुर्गम । परी एका अर्थी सुगम । सदग्रंथीं ठेवितां प्रेम । सत्संग होय सुलभ ॥४२॥
बालवय वेणाबाईचें । परी वेड नाथ भागवताचें । अर्थ न कळती तेथीचे । परि सद्भाव सोज्वळ ॥४३॥
श्रीसमर्थ भेटले । ग्रंथगर्भींचे गूढ उकलिलें । सदग्रंथाचें महत्व भलें । ऐसें आहे ॥४४॥
सद्भावें ग्रंथ धरितां हातीं । संतचि आपुली काळजी वाहती । सर्व संकटे दूर होती । संत दयावंत म्हणोनिया ॥४५॥
जे ग्रंथी व्याख्यान । तैसेच संतांचें आचरण । ह्मणोनि संतांचें चरित्रश्रवण । थोर लाभ पडे पदरीं ॥४६॥
बाह्यात्कारें संत । वेगळाले भासत । वेगळाले मार्ग दावित । प्रकृति-भेदासाठीं ॥४७॥
कोणी असति संन्यासी । कोणी गृहस्थाश्रमवासी । कोणी संसारी वनवासी । दिसती सदैव ॥४८॥
कोणी गृहस्थाश्रमी संन्यास घेती । कोणी संन्यासी गृहस्थाश्रम स्वीकारती । कोणी अंतरी विरक्त बाहेरी दिसती । रंगलेले संसारीं ॥४९॥
संत ओळखावें अंतरांत । तेथें त्यांचे एक चरित्र । बाह्यात्कारी देहधर्म दिसत । वेगळाले ॥५०॥
देहधर्म चालवी प्रकृति । प्रारब्ध योगें विचित्र परिस्थिति । ती असार जाणोनि चित्तीं । अंतरी शिरावें ॥५१॥
देहधर्म ज्यांचे त्यांनें ओळखून शोधावी आदर्शस्थानें । मग न लागेल पस्तावणें । कोणा एकासी ॥५२॥
सच्चरित्र जागतां वेदांत । भूतलींची प्रकाशज्योत । भक्तांचें मूर्तिमंत हित । चरित्र संतांचे ॥५३॥
संत विवेकाचे सागर । संत सुखाचें माहेर । संत दु:खाचा विसर । सोहळा आनंदाचा ॥५४॥
ऐशाच एका संताचेम । साहचर्य लाभलें भाग्याचें । तेंच चरित्र वर्णन करण्यांचे । योजिलें मनीं ॥५५॥
झालो प्रवृत्त लिहिण्यास । जेणे हर्ष अत्यंत मनास । तें पुरें होवो ही आस । अंतरीं राहे ॥५६॥
अनंताचा सुत । गोविंद नामें विख्यात । केळकर कुल शोभिवंत । ज्यांचेनि झालें ॥५७॥
सहा तपावरी । भक्तिध्वजा फडकविली अंबरीं । अपार प्रेमा ईश्वरावरीं । ठेवोनिया ॥५८॥
माझ्या बाळपणापासोन । तों गोविंदजींचे होय देहावसान । तोंवरी त्यांचे भक्तिजीवन । मी जवळून पाहिलें ॥५९॥
ऐसे चरित्र विलोभनीय । ऐसें चरित्र कमनीय । ह्मणोनी होय श्रवणीय । ऐसा विचार केला ॥६०॥
काय मी होईन समर्थ । दाखविण्या पदोंपदींचा अर्थ । कैसे मी यथार्थ । गाईन हें ॥६१॥
मनीं सद्गुरुंचे स्मरण ठेवावें । त्यांच्या कृपेवर विसंबावें । करवितील तैसे वर्णन करावें । म्हणोनि लेखणी धरलीसें ॥६२॥
सांगली हें पुण्यक्षेत्र । पूर्वीपासूनि अति पवित्र । दंडाकारण्यनामें विख्यात । भूप्रदेश हा ॥६३॥
सांगली ही अध्यात्मप्रवण । इतर वैभव मानोन गौण । श्रीगजाननाचे अधिष्ठान । आणि कुलदैवत श्रीमंतांचें ॥६४॥
श्रीगजाननाची भक्तिसेवा । पावोन वैभव आले या गांवा । म्हणोनि अध्यात्माचा ठेवा । ही कृपा गणरायाची ॥६५॥
हाचि मुळारंभ निर्गुंणाचा । ऐशीं समर्थाची वदली वाचा । तो श्रीगजानन सांगलीचा । पाठिराखा असे ॥६६॥
श्रीमंत राजेसाहेब सांगलीकर । परमार्थी त्यांचाही भर । वैभव अर्पिले अपार । श्रीगजानन चरणी ॥६७॥
वैभव वाढविलें विघ्नहर्त्याचें । कृष्णातीरीं गणेशमंदिराचें । पंचायतन देवाधिदेवांचे । स्वर्गचि वाटे भूवरचा ॥६८॥
प्रसन्न ध्यान श्रीगजानन । करद्व्य जुळती आनंदून । मस्तक लवें श्रध्दापूर्ण । सहज भाव उपजे ॥६९॥
ऋध्दि-सिध्दी चवर्‍या ढाळीती । विदयुतद्दीप माळा झळकती । सुगंध दरवळे सभोंवती । धूप आणि मधुर फुलांचा ॥७०॥
स्तुति स्तोत्रांचा गजर । कर्ण निवती ऐकतांच सत्वर । महोत्सवाची शोभा फार । हरिगजर चालतसे ॥७१॥
कृपा असतां श्रीगजाननाची । मग उणीव कशाची । वसती संत सज्जनांची । झाली याच गांवा ॥७२॥
वेदशास्त्री पारंगत । कर्मानुष्ठानीं सदा रत । संसारीं असून विरक्त । ब्राह्मण दिसती ॥७३॥
संत श्री मळणगांवकर । ब्रह्म जाणोन झाले द्विजवर । त्यांचेही सांगलीकर । चाहते झाले ॥७४॥
परस्थही साधुसज्जन । करिती येथें आगमन । म्हणोन पुण्यक्षेत्र हें नामाभिधान । सांगलीस योग्य वाटे ॥७५॥
अध्यात्मविदयामंदीर । जो श्रीमंतांचा प्रसाद थोर । प्रेम प्रजाजनावरी फार । श्रीमंतांचे ॥७६॥
विदयापीठ अध्यात्माचें । ऐसे माहात्म्य सांगलीचें । पुण्यस्मरण श्रीगजाननाचें । म्हणोनि होय वारंवार ॥७६॥
विदयापीठ अध्यात्माचें । ऐसे माहात्म्य सांगलीचें । पुण्यस्मरण श्रीगजाननाचें । म्हणोनि होय वारंवार ॥७७॥
बाळंभट टिळक विख्यात । होते ब्राह्मण सत्प्रवृत्त । अधिकार त्यांचा अद्भुत । ऐका श्रोते जी ॥७८॥
एकदां कृष्णातीरी । स्नान संध्या करीत बैसली स्वारी । वृत्ति रंगली अंतरीं । बैसले ध्यानस्त ॥७९॥
तों एक मदोन्मत्त । हत्ती सुटला धांवत । लोक पळाले अस्ताव्यस्त । हत्ती आला कृष्णातीरीं ॥८०॥
ध्यानस्त देखोन ब्राह्मण । द्रवलें पशूचेही अंत:करण । प्रणाम सोंड फिरवून । करी मस्त हत्ती ॥८१॥
श्रीदत्तात्रेयांची कृपा पूर्ण । दिली छाटी प्रसाद म्हणून । ऐसें बाळंभटांचे महिमान । भूषण सांगलीचे ॥८२॥
तैसेच एक लक्ष्मण दीक्षित । कर्मानुष्ष्ठांनीं महान संत । पार्थिव पूजा नेम व्रत । आचरोनी रहाती ॥८३॥
एकदा निघाले यात्रेला । काशी क्षेत्रा जाण्याला । अनेकांचा मेळा निघाला । त्यात तेही होते ॥८४॥
मार्गांत नदितीरीं । स्नानसंध्या करावी बरी । म्हणोनी बैसले तों अंतरीं । वृत्ति रंगली ॥८५॥
यात्रेकरु पुढें गेले । हे मागे एकटेच राहिले । म्हणती आतां शिवशंकर भलें । रक्षण करितील ॥८६॥
तवं एक घोडेस्वार । येऊन म्हणे अहो जी द्विजवर । आम्ही काशी क्षेत्रासी जाणार । पहां येतां कां ? ॥८७॥
चालिलों एकटा मी । कंटाळवाणा मार्गक्रमीं । सोबत तुमची येईल कामीं । चला जी ॥८८॥
दीक्षीत आले यात्रा करुन । बैसले ध्यानस्थ होऊन । तों पुढें देखिलें ध्यान । घोडेस्वार उभा असे ॥८९॥
अरे, म्हणति हा शिवशंकर । भोला नाथ करुणाकर । दिला मज आधार । पाहोन असहाय्य ॥९०॥
म्हणती हे शिवशंकर । कैसा पडला मज विसर । जवळी असोन हा प्रकार । आतां धीर न धरवे ॥९१॥
भक्तिभाव अंतरीं । धरोनि राहिलो आजवरी । आतां नका ठेवूं दुरी । तळमळे जीव माझा ॥९२॥
तों साक्षात् शंकर । उभे राहिले समोर । भक्त सारथी करुणाकर । दूर करी दूरप्ण ॥९३॥
एकदां त्यांचे घरीं । झाली अवचित ओळखून त्यांची । मति द्रवली श्रीमंतांची । थैली पांचशे रुपयांची । पाठविली घरीं ॥९५॥
द्रव्य घेतले ठेवून । लोटले काही दिन । तेव्हां पांचशे एक रुपये खर्चून । अन्नदान केलें ॥९६॥
तैसेच एकदां महादान । करुं इच्छी एक श्रीमान । तें घेण्यास तैलंगण ब्राह्मण । आला त्वरेनें ॥९७॥
लोक म्हणती लक्ष्मण दीक्षित । असतां येथें सत्त्स्वस्थ संत । दान त्यांनीच घ्यावें हें उचित । आम्हासि वाटें ॥९८॥
लोकांचें न मोडावें मन । म्हणोनि दीक्षित घेती दान । परी कनवठीचा रुपाया काढून । ठेवती ढिगावरी ॥९९॥
म्हणति हा तैलंगण ब्राह्मण । आला दूर देशाहुन । तोचि होवो सुप्रसन्न । या दानें ॥१००॥
ऐसे एकाहुनी एक । आचरिती मार्ग अलौकिक । त्यागी विरक्त आणि पूण्यश्लोक । लोक सांगलीचे ॥१०१॥
आतां संसारीं असोन परमार्थ । करोन झाले जे समर्थ । आणि जगदोध्दारार्थ । जे शिकस्त करिती ॥१०२॥
ऐसे एक संत । सांगलीस राहिले आमराणान्त । त्यांचेही चरित्रगीत । गाजले येथें ॥१०३॥
ते संत श्रीहनुमंत । रुक्मिणी पांडुरंगाचे सुत । कोटणीस नामें विख्यात । झाले भूमंडळी ॥१०४॥
वास्तव्य करुन सांगलीस । वसविली अध्यात्म पेठ सुरस । तपानुतपें किर्तनाचा हव्यास । नित्य नवीन ज्यांनी केला ॥१०५॥
मूर्ति भव्य आणि रेखिव । गौरवर्ण तेज अभिनव । परमार्थी वाहिला जीव । असोनि संसारीं ॥१०६॥
व्यवसाय केला वकिलीचा । परि ठाव न सोडिला सत्त्याचा । मेळविला द्रव्याचा । अमित सांठा ॥१०७॥
अपार द्रव्य मेळविले । तें उदार हस्तें वेचिले । वैभव श्रीनारायणाचे वाढविलें । निर्लोभ वृत्तीनें ॥१०८॥
अनंत लोक येती जाती । किती जेवती याची न क्षिती । आश्रित तरी किती असति । गणति नसे ॥१०९॥
गृहस्थामध्यें गृहस्थ थोर । शूरामध्ये दानशूर । संतामध्यें जनक नृपवर । ऐसे शोभती ॥११०॥
अमोघ प्रसाद वाणीचा । वर्षाव जणुं अमृताचा । अध्यात्म श्रवणाचा । लाभ सांगलीकरांना ॥१११॥
रात्री ठोका नवाचा । किर्तनारंभ सुचवि नित्त्याचा । ध्वनी टाळ मृदंगाचा । कर्णी भरे ॥११२॥
गँसबत्तीच्या प्रकाशांत । भक्त ठेवती असंख्यात । मध्यें शोभती हनुमंत । हातीं चिपळ्या चिणचिणती ॥११३॥
जैसे हे किर्तनकार्र । तैसेच त्यांचे साथीदार । थोर त्यांचेही पाठांतर । साथ करिती समयोचित ॥११४॥
ईशस्तवनाचा सूर सुरंग । त्रिपिटिधिंग वाजे मृदंग । पेटी वाजे सा रे ग । मागे झांज झिणझिणे ॥११५॥
तररम आवाज तंबोर्‍याचा । खडासूर साथीदारांचा । भर येई उत्साहाचा । प्रमुदित दिसती श्रोतेजन ॥११६॥
अंताजीपंत केळकर । गुरुपदीं ज्यांचा भाव थोर । अभंग मौजेचा सुमधुर । गाती खडया सुरें ॥११७॥
साधुदास प्रसन्न प्रतिभेचे । अनंतराव परम भक्तीचे । नानबांच्या गुरुसेवेचें । मोलचि नसे ॥११८॥
आणखी कितीएक असति । प्रेमभरें गती डोलती । सारेचि तन्मय होती । रंगदेवता रंगणीं उतरे ॥११९॥
एक एक गाढे वीर । व्यासंगी आणि तत्पर । तात्यांच्या भोवंती फार । शोभा देती ॥१२०॥
नाद घुमे अंबरीं । तों वैकुंठचि उतरे भूवरीं । नाचे श्रीहरि । भक्तिसुखें ॥१२१॥
हा प्रसाद नारदांचा । मेळावा जमला संतांचा । रंग चढला अध्यात्माचा । सुरस आणि सुंदर ॥१२२॥
अध्यात्म हा बिकट विषय । निद्रादेवीचा जेथे जय । परि तो श्रुतिमनोहर होय । जाय भवभय उडोनी ॥१२३॥
सत्त्वमुर्ति हरिदास । करिती मायेचा निरास । समाधान चित्तास । होई श्रोत्यांच्या ॥१२४॥
अचाट तात्यांचे पाठांतर । वक्तृत्वही श्रुति मनोहर । साक्षात्कारी संतवर । सव्यसाची ॥१२५॥
करोनी सर्वांगाचें कान । श्रवण करिती भक्तजन । ऐसे मधुर किर्तन । आणि सोडवणूक जीवांची ॥१२६॥
घरोघरी लोक समस्त । वाचूं लागले गीता भागवत । तात्या नसते तर काय होत । हें सुगम लोकां ॥१२७॥
जे जे किर्तनास येती । त्यावरी तात्यांची प्रीती । शंका त्यांच्या निवारती । घडोघडी ॥१२८॥
सांगलीचे रसिक । आणि गावोंगांवींचे अनेक । विद्वान आणि भाविक । रंगून जाती ॥१२९॥
अध्यात्मशास्त्रीं पारंगत । सांगलीचे लोक समस्त । ऐसे परस्थही वानित । कीर्तनप्रवचनकार ॥१३०॥
रसिक श्रोते त्यांना मिळती । म्हणोनि ते आनंदती । सांगलीस वारंवार येती । आनंद परस्परां ॥१३१॥
हें भाग्य नाहीं परप्रांतीं । ऐसे सहजस्फुर्त बोलती । ऐशी सांगलीची ख्याती । तात्यांच्यामुळें ॥१३२॥
जयजय संत हनुमंत । ज्यांची कीर्ति दिंगत । त्यांचे सद्गुरु चिमंडात । श्रीरामचंद्रप्रभु असति ॥१३३॥
चिमड क्षेत्र अति पवित्र । ज्याची ख्याती सर्वत्र । जेथें चालें ज्ञानसत्र । अखंडित ॥१३४॥
चुकवावया जन्म मरण । कैसे करावें ईशस्मरण । कैसे करावे साधन । सुखोपायें ॥१३५॥
रघुनाथप्रिय साधुराज । साधन विस्तारांचे धरोनीए काज । तापनाशी तीर्थराज । तेथें जागृत असति ॥१३६॥
सांप्रदाय परंपरेची सुत्रें । चालवित राहती तेथें । भक्तीमान जनजाती एकचित्तें । त्यास देती आशीर्वाद ॥१३७॥
त्यांचे गुरु श्रीनारायण । श्रीगुरुलिंगजंगम म्हणति सज्जन । निंबरगी क्षेत्रीं परमार्थवृक्षारोपण । करिती सुनिश्चयें ॥१३८॥
त्यांची प्रिय शिष्या लक्ष्मीआक्का । त्याही चिमडास राहून लोका । मार्ग दाविती निका । परमार्थाचा ॥१३९॥
श्रीरामेश्वर सोमेश्वर । रेवणसिध्द मरुळसिध्द प्रभुवर । श्रीकाडसिध्द सद्गुरुवर । गुरुलिंगजंगमांचे ॥१४०॥
ऐशी ही गुरुपरंपरा थोर । मूळ ज्याचे श्री शिवशंकरा । संक्षेपें केला विचार । महत्व कळावया ॥१४१॥
श्रीनारायण गुरुलिंगजंगम । केला विस्तार अनुपम । असंख्यात संत उत्तम । आणिले संप्रदायी ॥१४२॥
शाखा आणि उपशाखा । जेथूनि अखंड फुटती देखा । परप्रांती ज्यांचें नांव मुखा । आजही येतसे ॥१४३॥
श्रीभाऊराव उमदीकर । श्रीगुरुलिंगजंगमाचे शिष्यवरा अंबुराव गुरुदेव शिष्यवर । श्रीभाऊरावांचे ॥११४॥
विद्वदवर्य श्री रानडे गुरुदेव । विश्वविदयालयीं ज्यांचा गौरव । सांप्रदायाची कीर्ति आणि प्रभाव । पसरला देशांतरी ॥१४५॥
श्री गुरुदेव रानडे । विद्वान अति गाढे । साता समुद्रापलीकडे । ज्यांचे चौघडे वाजती ॥१४६॥
अगणित परप्रांतियांनी । आणि परद्वीपस्थानी । दीक्षा गुरुदेवांकडून घेऊनी । परमार्थ मार्ग चोखाळला ॥१४७॥
आणिक किती एक असति । त्याचि करतां न ये गणति । यथानुक्रमें नांवें पुढति । येतील किती एकांची ॥१४८॥
ऐसे मूळ पुरुष श्रीनारायण । निंबरगीस ज्यांचे सिंहासन । तेथें असति विराजमान । वंदन भक्तांचे घ्यावया ॥१४९॥
संतश्रेष्ठ श्री तुकाराम । ज्यावरी अखिल महाराष्ट्राचे प्रेम । त्यांचा अवतार श्रीगुरुलिंगजंगम । भक्तजन मानती ॥१५०॥
श्री समर्थ रामदास । महाराष्ट्राचा करोनी विकास । दिला दासबोधाचा प्रकाश । ग्रंथराज स्वयंसिध्द ॥१५१॥
श्रीगुरुलिंगजंगमानीं । दिला प्रमाण ग्रंथ नेमुनी । सांप्रदायिकासी सच्चिंतनीं । लावण्यासाठीं ॥१५२॥
श्रीरामदास श्रीतुकाराम । दोन्हींकडे दिसे राम । साधकांचा विश्राम । कैवल्यमार्गीचा ॥१५३॥
सदाशिवानें हलाहल । ज्या रामनामें केलें हतबल । तेथे संसाराचे हलाहाल । टिकेल कैसें ? ॥१५४॥      
तो श्रीशंकर आणि श्रीराम । सद्गुरु आणि गुरुनाम । जवळ असतां भवभ्रम । राहील कसा ? ॥१५५॥
या संत सभेमाजी । गोविंद अनंत दिसती जी । ज्यांच्या लेखनाकाजीं । आजी मी प्रवर्तलों ॥१५६॥
जन्मापासोनि आमरणान्त । ज्यांनी घेतलें भक्तीव्रत । झिजविला देह सतत । देवकाजी ॥१५७॥
अखंड साधनीं राहती । कीर्तन सेवेवरी अतिप्रीती । जेणें सद्गुरुही वाखाणती । थोर गुरुभक्त ह्मणोनी ॥१५८॥
प्रसन्न झाले सद्गुरु । त्यांची थोरवी मी काय वर्णन करुं ? । तरीही अंतरींची ओढ निवारुं । मी न शके ॥१५९॥
मृदुवचन सुहास्यवदन । कधी न बोलती रागेजून । वृत्ती गेली अंतरीं रंगून । नामस्मरणीं ॥१६०॥
नाव पाण्यावरी तरे । जोंवरी पाणी आंत न शिरे । तैसा संसारी विचरे । हा महायोगी ॥१६१॥
करावया पितृवचनपूर्ती । निमित्तमात्र संसाराची संगति । अंगी बाणली खडतर विरक्ति । लाजविले संसारासी ॥१६२॥
निमित्तमात्र संसार । तरी आघातांचा भडिमार । सोशिती मन ठेवून स्थिर । सद्गुरुवचनांवरी ॥१६३॥
अष्टौप्रहर नित्यनेम । शरीर मन यासी लगाम । अर्पिले प्रेम कुसुम । श्रीरामावरी ॥१६४॥
अखंड ध्यान श्रीरामाचे । अखंड पूजन श्रीरामाचे । अखंड कीर्तन श्रीरामाचे । हेचि गोविंद चरित्र ॥१६५॥
तीन तपावरी कीर्तनप्रसार । अखंड आला भक्तीस भर । नामस्मरणाचा गजर । श्रीराम जयराम जयजयराम ॥१६६॥
तोषविले श्री हनुमंतरायासी । आणि श्रीनारायणासी । आणि संत सज्जनांसी । आपुल्या तपोबलें ॥१६७॥
कोठें हे श्रीरामाचे उपासक । आणि कोठे मी सामान्य लेखक । तरीही हट्ट धरी मी बालक । सद्गुरुमातेपुढें ॥१६८॥
मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वंदे । परमानंद माधवम् ॥
थोर विचार मनीं केला । परि मतिमंद या लेखकाला । कैसा हा भार झेपेल भला । ह्मणोनि होई सचिंत ॥१६९॥
संत होवोनि संत चरित्र गावें । तरी हे कार्य हातींचे टाकावें । आणि सच्चरित्रासी अंतरावें । शिव शिव ऐसे न होवो ॥१७०॥
जोवरी अवधि लेखनासी । तोंवरी वसावें मम मानसीं । हातीं धरोनी बालकासी । ‘ऐसे लिही’ ह्मणावें ॥१७१॥
माता न पाही बालकाचे गुण । तो तिजसाठीं सदा संपूर्ण । तिचा आशीर्वादाची कारण । बालक नाचे अत्त्यानंदें ॥१७२॥
मामा, आपुली पाउले गोजिरी । उमटली या भूमीवरी । तीच आम्हा जन्मवरी । उपकारक ॥१७३॥
पदांपदांतुनी अर्थ । जो भरला तो दाखवावा यथार्थ । तोच आमुचा निजस्वार्थ । वाटे आम्हा ॥१७४॥
तुम्ही आपुले जीवन । आजवरी ठेवले दडवून । कधीं न मिळूं दिलें प्रकाश किरण । आम्ही प्रयत्न करुनही ॥१७५॥
सद्गुरुनीं प्रसन्न व्हावे । आतां ऐसे न करावें । आमुच्या मनीं भरावें । तुमचें आचरण ॥१७६॥
सहा तपावरी आयुष्य वेंचून । दिली भक्तिध्वजा फडकवून । आणि आतां गेला निघोन । हळहळ वाटे ॥१७७॥
जाणार ते निघोन गेले । परि तुमचे चरण आचरण राहिलें । वेचू रज:कण तेथील भलें । अधीरपणें ॥१७८॥
काळाची सत्ता देहावरी । तें त्यानें नेलें जरी । तरी तुम्ही रुजविलें प्रेम अंतरी । तें तो हिरावूं शकेना ॥१७९॥
पाहूं तुमचे चित्र । आठवूं तुमचें चरित्र । आणि अर्पूं तुलसीपत्र । तुमच्या चरणांवरीं ॥१८०॥
दोन्ही हात जोडून । करुं प्रेम भावें वंदन । तुमच्या चरित्राचे मनन । घडो आम्हासी ॥१८१॥
म्हणोनि हा व्याप केला । तो पाहिजे सिध्दीस नेला । म्हणोन विनंती चरणाला । वारंवार करीतसे ॥१८२॥
कृपालव येईल हाता । तरी रंग उसळेल गगना वरुता । तेचि व्हावें हें वाटे आतां । तुमच्या चरित्र गायनी ॥१८३॥
जयजय श्रीगोविंद । तोडावया भवबंध । ध्यातो तुमचे पदारविंद । भक्तिभावें ॥१८४॥
मस्तक ठेवून चरणावर । विनंती करितो वारंवार । दयावा मज आधार । चरित्र गायनीं ॥१८५॥

इति श्रीगोविंदचरितमानस । जे स्वभावेंचि अति सुरस । जेथे अखंड उसळेल भक्तिरस । प्रस्तावोध्याय गोड हा ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP