विलोम प्राणायाम
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
लोम म्हणजे केस. ‘वि’ हा उपसर्ग अभाव किंवा नकार दर्शवण्यासाठी वापरतात. विलोम म्हणजे केसांच्या विरुध्द, निसर्गक्रमाविरुध्द; उलटा किंवा उफराटा. विलोम प्राणायामामध्ये पूरक किंवा रेचक ही सलग, अखंड अशी क्रिया नसते अनेक विरामांनी ती खंडित होत असते. उदाहरणार्थ, फुफ्फुसे भरन टाकण्यासाठी सलग पूरक किंवा हवा बाहेर घालवण्यासाठी सलग रेचक यांना जर प्रत्येकी १५ सेकंद लागत असतील तर विलोम प्राणायामात पूरकाच्या किंवा रेचकाच्या दर तिसर्या सेकंदानंतर दोन सेकंदांचा विराम येईल. अशा तर्हेने पूरकाची किंवा रेचकाची क्रिया लांबेल व २५ सेकंदांची होईल. खाली ही पध्दती दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये दिली आहे.
पध्दती-टप्पा १
१. विलोम प्राणायाम बसून किंवा पडून करता येतो.
२. बसून केल्यास पाठ ताठ ठेवा. डोके धडावर ओठंगू द्या, हनुवटी गळपट्टीच्या हाडांच्या मध्ये व उरोस्थीवरील खोबणीत टेकू द्या. हा जाला जालंधरबंध. हात ज्ञानमुद्रेत असू द्या. (पाहा : पृ.२४४, परिच्छेद क्र. २१)
३. दोन सेकंद पूरक करा. दोन सेकंद श्वास रोधून विराम घ्या. पुन्हा दोन सेकंद पूरक करा, पुन्हा दोन सेकंद श्वास रोधा आणि अशाच रीतीने फुफ्फुसे पूर्ण भरेपर्यंत क्रिया करीत राहा.
४. आता शक्यतेप्रमाणे ५ ते १० सेकंद आंतरकुंभक करा. त्याचबरोबर मूलबंध करा. (पाहा : पृ. २४९)
५. पूरकामधील विराम घेताना मूलबंध करावा.
६. संथ, दीर्घ रेचक उज्जायीतल्याप्रमाणे व हुंकारध्वनीसह करा. रेचक करताना मूलबंध सैल करा.
७. येथे विलोम प्राणायामाचे पहिल्या टप्प्याचे एक आवर्तन पूर्ण होते.
८. या टप्प्याची १० ते १५ आवर्तने सलगपणे करा.
टप्पा २
९. एक दोन मिनिटे विसावा घ्या.
१०. आता उज्जायीतल्याप्रमाणे उरोस्थीवर हनुवटी टेकून सकारयुक्त, दीर्घ आणि अविरत श्वास घ्या. फुफ्फुसे पूर्णपणे भरुन घ्या.
११. मूलबंधासह आंतरकुंभक ५ ते १० सेकंद करा.
१२. दोन सेकंद रेचक करा. नंतर दोन सेकंद थांबा. पुन्हा दोन सेकंद रेचक करा व दोन सेकंद थांबा. फुफ्फुसे पूर्णपणे मोकळी होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवा.
१३. विरामांच्या वेळी मूलबंध कायम ठेवा.
१४. विलोम प्राणायामाच्या दुसर्या टप्प्याचे एक आवर्तन येथे पूर्ण होते.
१५. विलोमाचा दुसरा टप्पा १० ते १५ वेळा सलगपणे करा.
१६. येथे विलोम प्राणायाम पूर्ण होतो.
१७. त्यानंतर शवासनात पडून राहा. (चित्र क्र.५९२)
परिणाम
विलोम प्राणायामाचा पहिला टप्पा कमी रक्तदाब असलेल्यांना लाभदायक ठरतो. दुसरा टप्पा तीव्र रक्तदाब असणार्यांना उपयोगी आहे.
इशारा
१. तीव्र रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विलोमाचा दुसरा टप्पा फक्त पडून राहूनच करावा.
२. नाडीशोधन व उज्जायी प्राणायाम आत्मसात केल्याखेरीज हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी विलोम करु नये.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP