१. ‘विषम’ चा अर्थ इतर अनेक अर्थांबरोबरच ‘अनियमित’ किंवा ‘कठीण’ असा आहे.
२. पूरक, कुंभक व रेचक यांना दिला जाणारा अवधी सारखा नसतो, म्हणून याला विषमवृत्ती प्राणायाम म्हणतात.
३. प्राणायामाच्या या प्रकारात पूर्ण पूरकाला ५ सेकंद लागतात, आंतर कुंभक २० सेकंद केला जातो आणि रेचकाला १० सेकंद लागतात. म्हणजे प्रमाण १ : ४: २ असे राहाते. प्रथम अभ्यासाने सर्व काही सोपे होईल.
४. उलट, पूरक १० सेकंदांचा असेल, तर कुंभक २० सेकंद केला जातो आणि रेचकाला ५ सेकंद लागतात व प्रमाण २ : ४: १ असे असते.
५. पुन्हा पूरक २० सेकंद, कुंभक १० सेकंद व रेचक ५ सेकंद असा अवधीमध्ये बदल केला, तर प्रमाण ४ : २: १ असे पडते.
६. प्राणायामाच्या एका आवर्तनात १ : २: ४, २ : ४ : १ आणि ४ : १ : २ अशी प्रमाणे ठेवता येतात. मग या तिघांची गणना ‘प्राणायामाचे एक आवर्तन’ अशी एकत्र केली जाते.
७. यातच बाह्य कुंभक केला, तर प्रमाणाच्या रचना संख्येने आणखीच होतील.
८. उज्जायी, सूर्यभेदन, नाडीशोधन, भ्रमरी, शीतली व शीतकारी यांसारख्या प्राणायामांच्या मूलभूत प्रकारांमध्ये वेगवेगळी प्रमाणे पुढे दिलेल्या विलोम, अनुलोम आणि प्रतिलोम पध्दतींनी घेतली, तर रचनांची संख्या अमाप होईल.
९. या सर्व रचना एका आयुष्यात कोणत्याही मर्त्य प्राण्याला करता येणार नाहीत.
१०. विषमवृत्ती प्राणायामाचा मार्ग फार धोक्याचा आहे. तेव्हा अनुभवी गुरुच्या किंवा शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय स्वतंत्रपणे हा प्रकार करण्याचा विचार स्वप्नातसुध्दा मनात येऊ देऊ नका.
११. पूरक, कुंभक व रेचक यांच्या अवधीमधील विषमप्रमाणामुळे शरीरातील सर्व यंत्रणांचा समतोल बिघडतो व त्यांच्यावर फार मोठा भार पडून भलताच ताणही जाणवतो. समवृत्ती प्राणायाम या शीर्षकाखाली कुंभकाबाबत परिच्छेद क्र.५ ते १० यांमध्ये (पृ.२६३ पाहा.) ज्या धोक्याच्या सूचना दिल्या आहेत, त्या विषमवृत्ती प्राणायामाच्या संदर्भात अधिकच लागू होतात.
१२. हठयोगप्रदीपिकेच्या दुसर्या अध्यायात स्वात्मारामाने केलेल्या पुढील विधानातील तथ्य आता हळूहळू मनात बिंबू लागते. "सिंह, हत्ती किंवा वाघ या प्राण्यांना आपण माणसाळवून कसरत शिकवतो त्यापेक्षा अधिक सावकाश आणि टप्प्याटप्प्याने (ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे व शारीरिक मर्यादेप्रमाणे) प्राणाला माणसाळवावे. नाहीतर तो शिकवणार्यावरच उलटून त्याचा घात करील.”
विलोम, अनुलोम आणि प्रतिलोम प्राणायाम
पूरक, कुंभक व रेचक यांसाठी लागणार्य़ा अवधींमध्ये विशिष्ट प्रमाण ठेवण्याशी समवृत्ती आणि विषमवृत्ती या प्राणायाम-प्रकरांचा संबंध आहे. विलोम, अनुलोम आणि प्रतिलोम या प्राणायाम-प्रकारांचा संबंध पूरक आणि रेचक या क्रियांच्या पध्दती आणि तंत्रे यांच्याशी आहे. विलोमामध्ये पूरक किंवा रेचक ही सलग प्रक्रिया नसून अनेक विराम घेत घेत ती टप्प्याटप्प्याने केली जाते. अनुलोमामध्ये पूरक उज्जायीतल्याप्रमाणे दोन्ही नाकपुडयांमधून घेतला जातो, व रेचक मात्र नाडीशोधनातल्याप्रमाणे या किंवा त्या नाकपुडीमधून आळीपाळीने सोडला जातो. प्रतिलोमामध्ये सर्व पूरक या किंवा त्या नाकपुडीतूण आळीपाळीने घेतला जाऊन सर्व रेचक मात्र उज्जायीतल्याप्रमाणे दोन्ही नाकपुडयांकडून सोडला जातो.