प्राणायाम - सूचना आणि इशारे

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


पुढे उल्लेखिलेल्या प्राणायामाच्या पध्दतींचा सराव करु लागण्यापूर्वी पुढील सूचना व दक्षतेचे वाचून त्यांचे मनन करा.

योग्यतेच्या कसोटया
१. ज्या विषयात पदवी घेतली तो विषय आत्मसात करताना मिळवलेली क्षमता व शिस्त यांवर ज्याप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण आधारलेले असते, त्याप्रमाणे प्राणायामाच्या साधनेसाठी आसनांवर प्रभुत्व आणि त्यामधून येणारी शक्ती व शिस्त यांची फार गरज असते.
२. प्राणायामाचे शिक्षण व प्रगती या बाबतीत साधकाची पात्रता अनुभवी गुरुने अजमावली पाहिजे; तसेच त्याची वैयक्तिक देखरेख अतिशय आवश्यक आहे.
३. कठीणात कठीण अशा खडकाचा भेद न्युमँटिक गिरमिटे करु शकतात. प्राणायामामध्ये योगी आपल्या फुप्फुसांचा उपयोग न्युमँटिक अवजारांप्रमाणे करतो. त्यांचा वापर योग्य रीतीने केला नाही तर हत्यार आणि ते वापरणारी व्यक्ती या दोघांचाही नाश होतो. प्राणायामाचेही तसेच आहे.

स्वच्छता आणि अन्न
४. अस्वस्थ शरीर आणि मन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करीत नाही. आपल्या शरीराच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी योगी स्वच्छतेचे नियम पाळतो.
५. प्राणायामाला प्रारंभ करण्यापूर्वी मलाशय व मूत्राशय रिकामे करावेत. त्यामुळे बंध सहजसुलभपणे करता येतात.
६. प्राणायाम शक्यतो रिकाम्या पोटावर करणे चांगले. पण हे कठीण वाटले, तर एक कप दूध, चहा किंवा काँफी घ्यायला हरकत नाही. जेवण झाल्यानंतर कमीत कमी सहा तास गेल्याखेरीज प्राणायाम करु नये.
७. प्राणायाम पूर्ण झाल्यावर अर्ध्या तासाने अल्प आहार घ्यायला हरकत नाही.

काळ आणि स्थळ
८. शक्यतो सूर्योदयापूर्वी सकाळ आणि संध्याकाळ या (संधिकाल) वेळा प्राणायामासाठी उत्तम असतात. हठयोगप्रदीपिकेच्या मतांप्रमाणे, प्राणायाम पहाटे, मध्यान्ही, संध्याकाळी आणि मध्यरात्री असा दिवसातून चार वेळा करावा. प्रत्येक वेळा ८० आवर्तने करावी. (अध्याय २, श्लोक ११) आजच्या घाईगर्दीच्या आधुनिक जगात हे जमणे कठीणच. तेव्हा दिवसातून निदान १५ मिनिटे प्राणायाम करावा असे म्हणता येईल. अर्थात ८० आवर्तने ही योगसाधनेला वाहून घेतलेल्या साधकासाठी असतात, सर्वसामान्य गृहस्थासाठी नव्हेत.
९. वसंत ऋतू व शरद ऋतू यांमध्ये हवामान सम असते. त्यामुळे प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यासाठी हे ऋतू चांगले.
१०. स्वच्छ, हवेशीर आणि कीटकांपासून मुक्त अशा जागी प्राणायाम करावा. गोंगाटाने एकाग्रतेत व्यत्यय येतो, त्यामुळे प्राणायाम निवांत वेळीच करावा.
११. जागा, वेळा किंवा आसन न बदलता प्राणायाम चिकाटीने आणि नियमितपणे करावा. बदल संमत आहे तो फक्त प्राणायामाच्या प्रकारात. उदाहरणार्थ, एका दिवशी सूर्यभेदन प्राणायाम केला तर दुसर्‍या दिवशी शीतली करावा आणि तिसर्‍या दिवशी भस्त्रिका करावी. नादीशोधन प्राणायाम मात्र दररोज करावा.

आसन
१२. शीतली आणि शीतकारे सोडल्यास प्राणायाम फक्त नाकातून करावयाचा असतो.
१३. सतरंजीची घडी जमिनीवर ठेवून तिच्यावर बसून प्राणायाम करणे सर्वात चांगले. सिध्दासन, वीरासन, पद्मासन आणि बध्दकोणासन ही आसने प्राणायामाला अनुकूल आहेत. कण्याच्या पायथ्यापासून मानेपर्यंतची पाठ पूर्णपणे ताठ आणि जमिनीशी काटकोनात राहाणार असेल तर बसून करण्याची इतर आसनेही चालतील. काही प्रकार मात्र पुढे वर्णिल्याप्रमाणे निजून करता येतील.
१४. प्राणायाम करताना चेहर्‍याचे स्नायू, डोळे, कान किंवा मानेचे स्नायू, खांदे, हात, मांडया अगर पावले यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण जाणवता कामा नये मांडया व हात आवर्जून सैल सोडावे, कारण प्राणायाम करताना ते अजाणता तंग बनतात.
१५. जीभ निश्चेष्ट ठेवा, नाहीतर तोंडात लाळ जमा होईल. झाली तर ती रेचकापूर्वी गिळून टाका. कुंभक करताना गिळू नका.
१६. पूरक आणि कुंभक करताना बरगडयांचा पिंजरा पुढच्या व बाजूच्या दिशांना फुगला पाहिजे; पण खांद्यांची पाती व बगला यांच्या खालचा भाग मात्र फक्त पुढच्या दिशेने फुगावा.
१७. सुरुवातीला घाम येईल आणि कंप सुटेल; पण कालांतराने ही लक्षणे दिसत नाहीशी होतील.
१८. बसून करावयाच्या सर्व प्राणायाम प्रकारामध्ये मानेच्या तळापासून पुढले डोके ओढंगलेले असावे, व हनुवटी गळपट्टीच्या हाडांमध्ये व उरोस्थीच्या वरील खोबणीत विसावलेली असावी. हा हनुवटीचा बंध किंवा जालंधरबंध, यापुढे वर्णिलेल्या पध्दतीत जेथे स्पष्टपणे वर्ज्य केला असेल अशा वेळा सोडून, इतर सर्व वेळी अनुसरावा.
१९. डोळे सर्व वेळ मिटून ठेवावे. नाहीतर बाहेरच्या वस्तूंमागून मन जाईल आणि त्याची एकाग्रता ढळेल. डोळे उघडे ठेवले तर जळजळू लागतील, चुरचुरु लागतील.
२०. प्राणायाम करताना कानांच्या आतल्या बाजूला दाब जाणवता कामा नये.
२१. डावा हात सरळ ठेवावा. मनगटाची मागची बाजू डाव्या गुडघ्यावर टेकावी. तर्जनी आंगठयाकडे वळवावी. तिचे टोक आंगठयाच्या टोकाशी जुळवावे. पुढे ‘पध्दती’ मध्ये दिलेली ज्ञानमुद्रा ती हीच.
२२. उजवा हात कोपराशी वाकवावा, व श्वसनाचा ओघ नियमित व समतोल ठेवण्यासाठी व त्याची सूक्ष्मता अजमावण्यासाठी उजव्या हाताचा पंजा नाकावर ठेवावा. डाव्या नाकपुडीचे नियमन करणारी अनामिका व करंगळी ही बोटे आणि उजव्या नाकपुडीचे नियमन करणारा आंगठा यांच्या टोकांमधून हे जाणवते. उजवा हात नाकावर कसा ठेवावा याची चर्चा पुढे ‘पध्दती’ त केली आहे. आसनाच्या काही प्रकारांमध्ये दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये गुडघ्यांवर ठेवलेले असतात.
२३. जेव्हा लहान मूल आपण होऊन चालायला शिकत असते, तेव्हा आई शारीरिक दृष्टया निष्क्रिय राहाते; पण मनाने जागरुक असते. आपत्तीच्या वेळी, उदाहरणार्थ, मूल अडखळले की त्याला पडण्यापासून वाचवण्यासाठी तिचे शरीर एकदम कार्यरत होऊन पुढे झेप घेते. त्याचप्रमाणे प्राणायामाच्या सरावामुळे मेंदू निष्क्रिय, पण जागृत राहातो. शरीराचे अवयव योग्य रीतीने कार्य करीनासे झाले की जागरुक मेंदू इशार्‍याचे संदेश पाठवू लागतो. श्वसनाच्या योग्य आवाजाचे श्रवण करण्याचा आदेश कानाला पाठवला जातो. (त्या आवाजाचे वर्णन पुढे दिले आहे.) नासिका-मार्गातून वाहणार्‍या श्वासाची संवेदना निरखण्याचा आदेश हात व नाक यांना दिला जातो.
२४. ज्ञानेंद्रियांना इशारे पाठवणे हे मेंदूचे कार्य असेल तर प्राणायामावर लक्ष केंद्रित करणे कसे शक्य आहे अशी शंका येणे शक्य आहे. आपल्या कामात गढलेल्या चित्रकाराच्या लक्षात यथादर्शन आणि रचना, रंगांच्या छटा, पुरोभूमी आणि पृष्ठभूमी आणि कुंचल्याचे फटके हे सर्व तपशील एकाच वेळी एकत्रपणे येतात. एखादा राग वाजवणारा वादक आपली बोटे व सुरावटी, वाद्याचा सुरेलपणा व त्याची पट्टी यांवर लक्ष ठेवतो. चित्रकार व वादक तपशील निरखीत व त्यांमधील दोष काढून टाकीत असले तरी त्यांचे लक्ष त्यांच्या कामावर केंद्रित झालेले असते. त्याचप्रमाणे योगी काल, आसन आणि श्वासाची लयबध्दता यांवर लक्ष ठेवून असला तरी त्याच वेळी आपल्या शरीरातील, प्राणांचा संचार तो दक्षतेने आणि सूक्ष्मतेने अनुभवीत असतो.
२५. ज्याप्रमाणे काळजी करणारी आई मुलाला निश्चितपणे चालायला शिकवते त्याप्रमाणे सावध व दक्ष योगी आपल्या ज्ञानेंद्रियांना निश्चितपणा शिकवतो. प्राणायाम अखंडपणे केल्यामुळे पूर्वी ज्या विषयांसाठी इंद्रिये झुरत असत, त्यांच्या आसक्तीपासून ती मुक्त होतात.
२६. प्राणायाम करताना प्रत्येकाने आपली शक्ती किती आहे ते नक्की करावे आणि ती मर्यादा उल्लंघू नये. शक्ती पुढीलप्रमाणे मोजता येईल. समजा, विशिष्ट वेळात, उदाहरणार्थ पाच मिनिटांच्या अवधीत, १० सेकंदाचा पूरक आणि १० सेकंदांचा रेचक असा लयबध्द श्वासोच्छ्‍वास आपण विनात्रास करु शकतो. पूरक किंवा रेचक यांचा वेळ १० ऐवजी ७ किंवा ८ सेकंदावर येऊ लागला, तर आपण आपल्या शक्तीची सीमा गाठली असे म्हणता येईल. या अवधीपेक्षा अधिक वेळ प्राणायाम केला, तर फुफ्फुसांवर गैरवाजवी ताण पडू लागतो व त्याच्यामागून अनेक श्वसनविषयक रोग शरीरात प्रवेश करतात.
२७. सदोष पध्दतीमुळे फुफ्फुसे, छाती आणि पोट यांमधील पडदा यावर गैरवाजवी ताण पडतो. श्वसनयंत्रणा बिघडते आणि मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम घडतो. प्राणायाम सदोष पध्दतीने केल्यामुळे निरोगी शरीर आणि निकोप मन यांच्या पायालाच हादरा बसतो. भस्त्रिका प्राणायाम वगळला तर इतर प्रकारच्या प्राणायामांत जोराचा किंव कष्टाचा श्वासोच्छ्‍वास अयोग्य असतो.
२८. श्वसनातील समतोलपणामुळे मज्जातंतू निरोगी बनतात आणि त्यामधून मन व वृत्ती यांना समतोलपणा लाभतो.
२९. प्राणायाम केल्यावर ताबडतोब आसने कधीही करु नयेत. प्राणायाम केलेला असेल तर आसने करण्यापूर्वी एक तास मध्ये जाऊ द्यावा. कारण प्राणायाम केल्यामुळे शांत झालेल्या शिरा आसनांमधील शारीरिक हालचालींमुळे प्रक्षुब्ध होण्याचा संभव असतो.
३०. आसनांच्या साध्या कार्यक्रमानंतर पंधरा मिनिटे जाऊ देऊन प्राणायाम करायला हरकत नाही.
३१. जोरकस आसनांमुळे थकवा येतो. असा थकवा आलेला असताना बसलेल्या स्थितीत प्राणायाम करु नये. कारण या स्थितीत पाठ ताठ राहू शकत नाही. शरीराला कंप सुटतो आणि चित्त अस्वस्थ होते. निजून उज्जायीतल्याप्रमाणे दीर्घ श्वसन केले तर थकवा जातो.
३२. दीर्घ, स्थिर आणि बहुकालीन श्वसन लयबध्दपणे करणे कठीण झाले की थांबा. प्राणायाम पुढे चालवू नका. पूरक करताना सायकलच्या ट्यूबला भोक पडल्यावर येतो तसा ‘स् स् स्’ असा आवाज येतो व रेचक करताना हुंकारयुक्त आवाज येतो. या आवाजावरुन लयबध्दता मोजता येते. या ध्वनीची उच्चनीचता कमी झाली तर थांबा.
३३. पूरक आणि रेचक यांमध्ये समप्रमाण ठेवण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, एका आवर्तनामध्ये पूरकाला ५ सेकंद दिले, तर रेचकही तेवढाच वेळ करावा.
३४. गर्भवती स्त्रियांना प्राणायामाचे उज्जायी व नाडीशोधन हे प्रकार सर्वात अधिक लाभदायक आहेत. ते बध्दकोणासनात करणे चांगले. गरोदरपणात अनुभवी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखेरीज श्वास कधीही रोधू नये.
३५. प्राणायाम केल्यानंतर नेहमीच ५ ते १० मिनिटे शवासन (चित्र क्र.५९२) स्तब्ध राहून करावे. मनाचे व्यापार पूर्णपणे बंद करावेत व अवयव आणि ज्ञानेंद्रिये मृत शरीरातल्याप्रमाणे निश्चेष्ट असावीत. प्राणायामानंतर केलेले शवासन शरीर व मन यांना ताजेतवानेपणा देते.

कुंभक
३६. पुढे खुलासा केल्याप्रमाणे जालंधर, उड्डियान आणि मूल हे तीनही बंध कुंभकाच्यावेळी करावेत. कुंभक म्हणजे पूर्ण पूरकानंतर किंवा पूर्ण रेचकानंतर श्वास रोधणे. बंध म्हणजे सेफ्टी व्हाँल्व्ह. कुंभक करताना ते मिटलेले असावेत.
३७. आंतरकुंभक म्हणजे पूरकानंतरचा कुंभक शिकायला लागण्यापूर्वी पूरक आणि रेचक या श्वसनक्रिया पूर्णपणे आत्मसात होणे आवश्यक आहे.
३८. आंतरकुंभक सहजपणे येऊ लागल्याशिवाय बाह्य (रेचकानंतरचा) कुंभक करण्याचा प्रयत्न करु नये.
३९. कुंभकाचा अभ्यास करताना श्वास-निरोधाचा काळ वाढवण्यासाठी श्वास घेतानाच पडदा आणि पोटाचे स्नायू आवळणे आणि सैल सोडणे या क्रिया करण्याची प्रवृत्ती असते. ही अजाणता आणि निर्हेतुक असते. ती टाळण्याची दक्षता घ्यावी.
४०. प्रत्येक पूरकानंतर व रेचकानंतर कुंभक करणे कठीण वाटू लागले तर दीर्घश्वसनाची काही आवर्तने करुन मग कुंभक पुन्हा सुरु करावा. उदाहरणार्थ, दीर्घश्वसनाच्या तीन आवर्तनानंतर कुंभकाचे एक आवर्तन करावे. नंतर पुन्हा दीर्घश्वसनाची तीन आवर्तने व पुन्हा कुंभक ..... असा क्रम ठेवावा.
४१. पूरकाची किंवा रेचकाची लय श्वास रोधल्यामुळे बिघडू लागली, तर कुंभकाचा अवधी कमी करावा.
४२. काचबिंदू किंवा कानातील पू यासारखे डोळे, कान यांचे विकार असलेल्या व्यक्तींनी श्वास रोधण्याचा प्रयत्न करु नये.
४३. कुंभक करायला सुरुवात केली की कधी कधी पहिल्या टप्प्यामध्ये बध्दकोष्ठता होते. हे तात्पुरते असून कालांतराने नाहीसे होते.
४४. दर मिनिटाला १५ हे श्वसनाचे सर्वसामान्य प्रमाण असते. अपचन, ताप, सर्दी आणि खोकला इत्यादींमुळे किंवा भीती, राग, अभिलाषा यांसारख्या भावनांनी शरीर अस्वस्थ झालेले असते तेव्हा हे प्रमाण वाढते. दर २४ तासांना २१,६०० श्वास-नि:श्वास हे नेहमीचे प्रमाण असते. योगी आपले आयुष्य दिवसांच्या संख्येने न मोजता श्वासांच्या संख्येने मापतात. प्राणायामामध्ये श्वसनाचे दीर्घीकरण होते, तेव्हा प्राणायाम केल्यामुळे दीर्घायुष्याचा लाभ होतो.
४५. प्राणायाम सातत्याने केल्यामुळे अभ्यासकाची मनोवृत्ती बदलेल आणि धूम्रपान, मद्यपान, मैथुन इत्यादी वैषयिक सुखांबद्दलची त्याच्या इंद्रियांची आसक्ती खूपच कमी होईल.
४६. प्राणायाम केल्यामुळे इंद्रिये आत मुरडली जातात आणि कुंभकाच्या नीरवतेत त्याला आपला आतला आवाज ऐकू येतो. "आत पाहा ! सर्व आनंदाचा मूलस्त्रोत आतच आहे !” यामुळे त्याची योग्याच्या पुढच्या अंगाची म्हणजे प्रत्याहाराची पूर्वतयारी होते. प्रत्याहारामुळे इंद्रियांचे आपल्यावरील प्रभुत्व आणि त्यांची गुलामगिरी यांमधून आपली मुक्तता होते.
४७. प्राणायाम करताना सर्व वेळ डोळे मिटलेले असतात, तेव्हा किती वेळ गेला याची मोजणी एखाद्या मंत्राच्या किंवा नामाच्या जपाच्या साहाय्याने होते. हा मंत्राचा किंवा नामाचा जप हे योग्याच्या मनात पेरले जाणारे बीज असते. हे बीज वाढते आणि योग्याची सहाव्या-ध्यानाची-पूर्वतयारी करुन देते. अखेर त्याला समाधिरुप फलप्राप्ती होते. पूर्ण ज्ञान आणि परम आनंद यांचा अनुभव समाधीत मिळून योगी विश्वकर्त्याशी एकरुप होतो. हा अनुभव त्याला कधीच व्यक्त करता येणार नाही; पण तो लपवूनही ठेवता येत नाही. त्याचे वर्णन करण्यासारखे अचूक शब्द मनाला सापडू शकत नाहीत, त्यामुळे तो अनुभव दुसर्‍यापर्यंत पोचवण्यात शब्द अपेशी ठरतात. सर्व आकलनापलीकडचा असा तो शांतीचा अनुभव आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP