स्कंध ८ वा - अध्याय १७ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
११०
निवेदिती शुक ऐकूनि तें व्रत । होऊनि सश्रद्ध करी देवी ॥१॥
पाहूनि ते श्रद्धा पीतांबरधारी । प्रगटला हरी पुढती तिच्या ॥२॥
उत्थापन देई पाहूनि तयासी । लोचनीं लोटती आनंदाश्रु ॥३॥
सद्गदित कंठें उमटे न शब्द । अष्टभाव व्यक्त भक्तिभावें ॥४॥
पुढती निश्चल करुनियां दृष्टि । हळु हळु स्तुति करुं लागे ॥५॥
वासुदेव म्हणे अदिति स्तवन -। करी, तें ऐकून घ्यावें आतां ॥६॥
१११
यज्ञपते नरोत्तमा जे शरण । अथवा जे दीन रक्षिसी त्यां ॥१॥
गुणगान तुझें देवा, पुण्यप्रद । नामें पुण्यश्लोक, रक्षीं आम्हां ॥२॥
उभारुनि विश्व आलिप्त तुं नित्य । घेई नमस्कार निर्विकारा ॥३॥
प्रसन्न तूं होतां रुप गुण वय । अणिमादि सर्व प्राप्त होती ॥४॥
धर्म-अर्थादि ते लाभती पुरुषार्थ । काय या अशक्य देवा, तुज ॥५॥
वासुदेव म्हने प्रार्थना ऐकूनि । बोलला हांसूनि जगन्नाथ ॥६॥
११२
देवमाते, दैत्यनिर्दलनें देव । व्हावे सवैभव इच्छिसी हें ॥१॥
परी ब्राह्मणांनीं रक्षिलें जयासी । नाश न तयासी जाण कदा ॥२॥
तथापि व्रतानें तोषविलें मज । योजणें उपाय भाग तेणें ॥३॥
कश्यपतेजस्थ होऊनि त्वत्पुत्र । रक्षीन देवांस पुण्यव्रतें ॥४॥
वचन हें माझें राखूनियां गुप्त । सेवीं कश्यपांस ईशभावें ॥५॥
वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । गुप्त होई तेथें भगवान ॥६॥
११३
देवमाता तें ऐकूनि । होई आनंदित मनीं ॥१॥
पतिसेवा करी प्रेमें । मुनि जाणिती तपानें ॥२॥
मुनिकश्यपशरीरीं । अंशें प्रवेशला हरी ॥३॥
वायु काष्ठामाजी अग्नि । प्रगट करी जेंवी वनीं ॥४॥
गर्भधारण तैं होई । देवी अदितीच्या ठाईं ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मा । रुतवी गर्भनारायणा ॥६॥
११४
षड्गुण ऐश्वर्यसंपन्ना हे देवा । स्तविती तुजला सकल लोक ॥१॥
जयजयकार तव असो सर्वकाळ । इच्छिती सकल तव कृपा ॥२॥
नमस्कार तुज असो हे ब्रह्मण्या । नियंत्या त्रिगुणां गुणातीता ॥३॥
पृश्निपुत्र तूंचि, तूंचि वेदाधार । त्रैलोक्याचें मूळ तव नाभि ॥४॥
सर्वश्रेष्ठ तुझें नारायणा, स्थान । व्यापक असून अंतर्यामी ॥५॥
आदि अंत तूंचि विश्वाचा अनंता । जल तृणादिकां नेई जेंवी ॥६॥
तेंवी तूं प्रलयी ओढिसी विश्वातें । अनंत ब्रह्मांडें लीला तव ॥७॥
वासुदेव म्हणे बुडत्यासी नौका । तेंवी तूं पतितां ब्रह्मा म्हणे ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2019
TOP