स्कंध ८ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



परीक्षितीप्रति शुक निवेदिती । क्षीरसिंधूमाजी गिरि एक ॥१॥
चाळीस सहस्त्र कोश त्या विस्तार । नाम त्या साचार त्रिकूट हें ॥२॥
रौप्य सुवर्ण तैं लोहाचीं शिखरें । नभ आक्रमिलें ऐसीं उंच ॥३॥
वृक्षलताकीर्ण अन्यही त्या शृंगें । शोभला निजांगें गिरिश्रेष्ठ ॥४॥
तयावरी बहु निर्झर वाहती । शोभा अपूर्व ती न वर्णवे ॥५॥
क्षीरसागराचा गिरीसी त्या वेढा । दणाणे लाटांचा नाद नभीं ॥६॥
आघातें त्या रत्ननिधि होती मुक्त । पाचूनें हरित दिसे भूमि ॥७॥
गिरिगुहांमाजी चारण गंधर्व । अप्सरा किन्नर करिती क्रीडा ॥८॥
वासुदेव म्हणे गंधर्वांच्या गानें । अन्य गजभ्रमें भ्रमती गज ॥९॥


वन्य पशुवृंद करिती संचार । स्वर्गीय साचार वनें बहु ॥१॥
बहुविध पक्षी गाती वृक्षांवरी । नीर सरोवरीं स्फटिकासम ॥२॥
सभोंवतीं त्याच्या पुलिनें रत्नांचीं । देवांगना येती क्रीडेस्तव ॥३॥
सुगंधित तेणें वायूच्या लहरी । येती गिरीवरी वारंवार ॥४॥
पुष्पफलाकीर्ण वरुणोपवन । ‘ऋतुमत्‍’ हें नाम तया वना ॥५॥
मंदार, पाटल, पारिजात, आम्र । अशोक, प्रियाल, फणस, जांब ॥६॥
चंपक, आंबाडे, नारळी, पोफळी । तमाल, खर्जुरी, साल, ताल ॥७॥
अश्वत्थ, असणा, अर्जुन, उंबर । वट, देवदार, पळस, लिंब ॥८॥
चंदन, सरल, कोविदार, द्राक्ष । बदरी, जंबू, अक्ष, कदली, इक्षु ॥९॥
हिरडे, आंवळी, कवठी, बिल्व, ईड । तेंवी भल्लातक आदि वृक्ष ॥१०॥
वासुदेव म्हणे समृद्ध तें वन । सरोवर जाण जवळी एक ॥११॥

१०
अति रम्य तया सरोवरामाजी । कमळें शोभती कनकवर्ण ॥१॥
कुमुदें, कल्हारें, उत्पलें, शतपत्रें । शोभा उदकातें देती बहु ॥२॥
तयावरी भृंगगुंजारव होई । द्विज कूजनही करिती नित्य ॥३॥
हंस, कारंडव, जलकुक्कुटही । चक्रवाक तेही सारसादि ॥४॥
जलावगाहन आनंदें करिती । मत्स्य कूर्म येती-जाती, जळीं ॥५॥
आघातें कमलपराग जळांत । गळती, तैं पीत वसन भासे ॥६॥
देवनळ तेंवी कदंब तैं नीप । शोभा त्या तीरास देती बहु ॥७॥
कुंद, कोरांटकी, अशोक, शिरीष । कुटज, कुब्जक, सोनजाई ॥८॥
नागचांफे, जाई, पुन्नाग, मोगरे । माधवी, शतपत्रें, जालकादि ॥९॥
पुष्पतरु तीरावरी प्रफुल्लित । वासुदेव तेथ रमला मनें ॥१०॥

११
राया, ऐसा तो नगेंद्र । वसे त्यावरी गजेंद्र ॥१॥
पशु ज्याच्या मदगंधें । भयाभीत होती धाकें ॥२॥
सिंह, व्याघ्र, सर्प, नाग । ऋक्ष, वराह तैं वृक ॥३॥
मृग, गोपुच्छ वानर । साळी वनगाई सकळ ॥४॥
सैरावैरा पळूनि जाती । व्याघ्रादिकां मृग न भीती ॥५॥
गंडस्थळीं वाहे मद । तेथें भ्रमरावली धुंद ॥६॥
करी कंपित धरणी । सहज चालतां तो वनीं ॥७॥
वासुदेव म्हणे गज । करीं विहार स्वच्छंद ॥८॥

१२
कलत्र करेणु सहस्त्रावधि त्या । भोंवतीं गजाच्या सर्वकाळ ॥१॥
गजही बहुत आणिक उन्मत्त । जाहले तृषार्त एक्या वेळीं ॥२॥
गजेंद्र आतपतप्त महावेगें । मदधुंद नेत्रें उदकास्तव ॥३॥
सरोवरीं तदा करी अल्पक्रीडा । परागसंयुक्ता उदका प्राशी ॥४॥
पुढती शुंडेनें घेऊनि उदक । स्नान करिणीस घाली हर्षे ॥५॥
कलभांसी जल पाजी स्वशुंडेनें । लडिवालपणें गजराज ॥६॥
वासुदेव म्हणे विषयांध गज । पुत्र-कलत्रांत धुंद झाला ॥७॥

१३
गजराज ऐसा आनंदनिमग्न । असताणं येई विप्र एक तया ॥१॥
महानक्रें एका धरिलें तयासी । त्वेषें जळामाजी ओढी वेगें ॥२॥
गजराज करी यत्नें पराकाष्ठा । उपाय तयाचा न चले परी ॥३॥
जळामाजी कोणी ओढी हें जाणूनि । आक्रोश करिणी करिती तदा ॥४॥
विव्हल गजेन्द्रमुक्तीस्तव गज । वेंचिताती निज सकल शक्ति ॥५॥
परी कांहीं बळ चालेना तयांचें । नक्र गजेंद्रातें ओढी जळीं ॥६॥
गजेंद्र नक्रातें, नक्र गजेंद्रातें । ओढिताती ऐसें समर जुंपे ॥७॥
यापरी सहस्त्र दिव्य वर्षे गेलीं । नवल त्या वेळीं देवांतेंही ॥८॥
वासुदेव म्हणे वासना प्रबळ । जीवा दीर्घकाळ छळिती ऐशा ॥९॥

१४
अन्नोदकावीण पुढती गजेंद्र । होई अति कृश शनै: शनै: ॥१॥
वृद्धिंगत परी बळ त्या नक्राचें । दीन दैवयोगें होई गज ॥२॥
हताश होऊनि मुक्तिमार्ग चिंती । म्हणे हा मृत्यूचि नक्र मज ॥३॥
व्यर्थ माझे यत्न आप्तही दुर्बळ । नर्काहूनि बळ नसे तयां ॥४॥
आतां ब्रह्मादिकां आश्रय जयाचा । तोचि एक त्राता संकटीं या ॥५॥
कालसर्पवेग प्रचंड हा वाटे । रक्षण आर्तांचें करी देव ॥६॥
तोचि एक आतां सोडवील मज । अन्याचें न काज संकटीं या ॥७॥
वासुदेव म्हणे हरीविण कोण । निवारील अन्य काळभय ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP