स्कंध ८ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३७
निवेदिती शुक परीक्षिता ऐकें । दैत्य वासुकीतें पाचारुनि ॥१॥
अमृतांशदानसंकल्प करुनि । वासुकी योजूनि रज्जुस्थळीं ॥२॥
सागरीं पर्वत ठेऊनि मंथन । आरंभिती जाण देव-दैत्य ॥३॥
प्राणाहूनि मान दैत्यांलागीं प्रिय । जाणूनि केशव युक्ति योजी ॥४॥
प्रथम जाऊनि धरी सर्पमुख । जाणूनि तें देव धरिती मुखा ॥५॥
परी अपमान वाटला तो दैत्यां । म्हणती आम्हींचि कां धरणें पुच्छ ॥६॥
वासुदेव म्हणे ओळखूनि ज्ञाता । इष्ट तेंचि मूर्खांकरवीं करी ॥७॥

३८
जाणूनीच तैसें केलें होतें देवें । मुखासी त्यागिलें धरिलें पुच्छ ॥१॥
तैसेंचि देवांनीं केलें मागोमाग । इष्ट तोचि मार्ग होता तयां ॥२॥
वासुकीची ऐसी करुनियां दोरी । मंथन सागरीं आरंभिलें ॥३॥
पर्वत त्यावेगें बुडूं लागे तळीं । निराशा जाहली सकलांची ॥४॥
जाणूनि तें देव कूर्मरुप होई । पृष्ठभागीं घेई पर्वतासी ॥५॥
वासुदेव म्हणे कूर्मावतार हा । प्रसिद्ध जाहला त्रैलोक्यांत ॥६॥

३९
द्वीपासम एका विशाल तो कूर्म । विस्तार योजन शत सहस्त्र ॥१॥
संरक्षित गिरि पाहूनि मंथन । करिती हर्षपूर्ण देव-दैत्य ॥२॥
तेणें पृष्ठभाग कुरवाळिल्यापरी । आनंद अंतरीं कूर्मा होई ॥३॥
वासुकीसवें त्या सकलां सामर्थ्य । देई अमृतार्थ जगन्नाथ ॥४॥
मंथनें पतन पाहूनि गिरीचें । अजस्त्र रुपातें धरी देव ॥५॥
राखूनियां तोल गिरीवरी बैसे । पाहूनि तयातें पुष्पवृ्ष्टि ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी मंथन - । कार्य, तें निर्विघ्न होऊं लागे ॥७॥

४०
मत्स्य मकरादिकांची । तदा दुर्दशा ते साची ॥१॥
बहु नेत्र-मुखांतूनि । वासुकीच्या उठे अग्नि ॥२॥
दग्ध होती किती दैत्य । देव तापेंचि त्या त्रस्त ॥३॥
वस्त्रें भूषणें धूसर । प्रभा लोपली समग्र ॥४॥
पाहूनि तें नारायण । पाडी त्यांवरी पर्जन्य ॥५॥
जलस्पर्शे देव-दैत्यां । वासुदेव म्हणे आशा ॥६॥

४१
रायालागीं शुक निवेदिती ऐसीं । विघ्नें बहु येती परि न सिद्धि ॥१॥
स्वयें भगवान करी तैं मंथन । तयाचें वर्णन केंवी व्हावें ॥२॥
ढवळला सिंधु त्रस्त जलचर । इतुक्यांत थोर नवल झालें ॥३॥
हालाहल विष निघालें बाहेरी । दाहें त्या धरित्री पेटूं पाहे ॥४॥
भयविव्हल तैं सकळ त्रैलोक्य । त्राता न कोणास दिसे कोणी ॥५॥
वासुदेव म्हणे अंतीं शिवाप्रति । प्रार्थिती कैलासीं सकल लोक ॥६॥

४२
प्रजाप्रति तदा स्तविती शिवासी । आत्मा सकलांसी तूंचि एक ॥१॥
विश्वपालका, न लाभलें अमृत । हालाहलें त्रस्त त्रैलोक्य हें ॥२॥
संरक्षक आम्हां तुजविणें नसे । रक्षिसी विश्वातें नाना मार्गे ॥३॥
देवदेवतांचा तूंचि नियामक । मायेचा चालक तूंचि देवा ॥४॥
थोर थोर देव तुझे अवयव । चिंतितां विस्मय त्वद्रूपाचा ॥५॥
गुणातीता, समदृष्टी तूं, मदन । जाळिलासी क्षण न लागतां ॥६॥
वासुदेव म्हणे शिवाचें स्तवन । यथार्थत्वें कोन करुं जाणें ॥७॥

४३
लीलामात्रें खेळ करिसी विश्वाचे । स्मरणही नसे परी तुज ॥१॥
पार्वतीसान्निध्यें म्हणती आसक्त । स्मशाननिवास क्रूरत्वादि ॥२॥
परी मूढांच्या या कल्पनाचि सर्व । न कळे अपूर्व त्वद्रूप त्यां ॥३॥
यथाशक्ति तव करितों स्तवन । दर्शनें या धन्य झालों आम्हीं ॥४॥
वासुदेव म्हणे संरक्षणास्तव । प्रार्थिताती देव शिवाप्रति ॥५॥

४४
कळवळे भोलासांब ऐकूनि स्तवन ।
म्हणे भवानीसी दु:खी हालाहलें जन ॥१॥
अभय जनांसी देणें प्राप्तचि मजसी ।
सुजन सोसूनि हाल जनां सौख्य देती ॥२॥
मायामोहित कलह करितां स्वार्थानें ।
सलोखा करिती ज्ञाते त्यांचा प्राणपणें ॥३॥
क:पदार्थ प्राण तयां तेणें ईशतोष ।
चराचरासवें तेणें मजही संतोष ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसें बोलूनि शंकर ।
प्राशनासी सिद्ध होती सुखें हालाहल ॥५॥

४५
अतर्क्य सामर्थ्य जाणूनि शिवाचें । अनुमोदन दे सती तया ॥१॥
तलहस्तीं तदा घेऊनि तें विष । प्राशी भोलानाथ दयाभावें ॥२॥
शिवाचाही कंठ जाहला तैं निळा । प्रभाव दाविला हालाहलें ॥३।
भूषणचि परी तया तें जाहलें । लांछन शोभलें विष्णूसी जैं ॥४॥
सत्कर्म साधितां येतील जे दोष । जाणावे ते श्रेष्ठ अलंकार ॥५॥
शिवाच्या त्या कर्मा स्तविती सकळ । पडे हालाहल प्राशितां जें ॥६॥
वासुदेव म्हणे सर्प वृश्चिकादि । तेंवी विषौषधि सेविती तें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP