स्कंध ८ वा - अध्याय १६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१०१
परीक्षितीलागीं निवेदिती शुक । होऊनियां गुप्त वसती देव ॥१॥
पाहूनि तें दैन्य आदितीसी दु:ख । मातृहृदयास पीळ पडे ॥२॥
दीर्घकाळ पति समाधींत मग्न । पाहूनियां खिन्न होई मनीं ॥३॥
उतरे समाधि आश्रमीं तैं मुनि । येती तें पाहूनि अदितीमाता ॥४॥
विसरुनि दु:ख सत्कारी पतीसी । परी कश्यपासी दिसली म्लान ॥५॥
वासुदेव म्हणे बैसूनि आसनीं । चिंतूनियां मुनि करितां प्रश्न ॥६॥

१०२
प्रिये, सुशीले कां ऐसी म्लान तूं यापरी ।
दु:ख काय कथीं मज, ऐसें त्वदंतरीं ॥१॥
विप्र, धर्म वा संकटीं प्रजानन सांगें ।
पतिव्रताचि केवळ धीर गृहस्थातें ॥२॥
त्रिवर्गसाधनीं न्यून, काय गृहामाजी ।
सन्मानिलेंसी कीं नित्य सांग अतिथींसी ॥३॥
अतिथिसत्कार जया, गृहीं न, ती गुहा ।
चुकली नाहीं ना सांगें कदा अग्निसेवा ॥४॥
सकळ अपत्यें तव सुखी असतीना ।
निवेदीं मजसी ऐसा खेद कां त्वन्मना ॥५॥
वासुदेव म्हणे मुनि कश्यप प्रियेसी ।
गौरवूनियां कथिती होऊं नको दु:खी ॥५॥

१०३
जोडूनियां कर बोलली अदिति । धेनु ब्राह्मणही असती सुखी ॥१॥
अतिथि वा अग्निसेवा न चुकली । त्वदुक्ति ठसली मनीं माझ्या ॥२॥
काय उणें मज असतां त्वत्कृपा । कठिण बाळांचा काळ परी ॥३॥
वैभव तयांचें हरिलें शत्रूंनीं । दु:खसागरीं मी बुडले तेणें ॥४॥
सकळही प्रजा आपुलीच परी । भक्तांचा कैंवारी ईश्वरही ॥५॥
पतिदेवा, तूंचि माझा परमेश्वर । भक्ति मी साचार करितें तव ॥६॥
मनोरथ माझे पुरवीं यास्तव । कथावा उपाय कांहीं मज ॥७॥
वासुदेव म्हणे सेवकसंकटें । मानिताती ज्ञाते आपुलींचि ॥८॥

१०४
ऐकूनि कश्यप बोलले सतीसी । माया श्रीहरीची अतर्क्य हे ॥१॥
हेतुपूर्तीस्तव सेवीं श्रीविष्णूतें । गुरु या जगातें तोचि एक ॥२॥
ईशभक्ति हाचि सिद्धीचा उपाय । प्रेमें धरी पाय अदिति तदा ॥३॥
सत्य संकल्पाचा दाता म्हणे ईश । प्रसन्न त्वरित होवो मज ॥४॥
यास्तव कथावा मार्ग मजप्रति । तळमळ चित्तीं पुत्रदु:खें ॥५॥
वासुदेव म्हणे ऐकूनि प्रार्थना । सदय मुनींना दया येई ॥६॥

१०५
कथिती कश्यप यदा मजप्रति । पुत्रकाम चित्तीं उगवे पूर्वी ॥१॥
तदा पुशितां मी श्रेष्ठ ‘पयोव्रत’ । कथी ब्रह्मा मज तेंचि ऐकें ॥२॥
दृढविश्वासें तें आचरी जो त्याचे । मनोरथ साचे पूर्ण होती ॥३॥
वासुदेव म्हणे पयोव्रतविधि । कश्यप कथिती तोचि ऐका ॥४॥

१०६
माघ अमेप्रति वराहमृत्तिका । लावूनि सर्वांगा तीर्थामाजी ॥१॥
मंत्रोच्चारें स्नान करुनियां सर्व । नित्यनैमित्तिक आटोपावें ॥२॥
प्रतिमा स्थंडिल सूर्य जल अग्नि । गुरु वा चिंतूनि ईशासम ॥३॥
आवाहनमंत्रें करावें त्या ठाई । यथाविधि व्हावी पूजा सर्व ॥४॥
पुनरपि गंधपुष्पें समर्पूनि । सप्रेमें करुनि पयस्नान ॥५॥
वासुदेव म्हणे वस्त्र उपवीत । अलंकारादिअक समर्पावे ॥६॥

१०७
वासुदेवमंत्रें पाद्यादिक पूजा । पायस नैवेद्या शक्य तरी ॥१॥
हवनही पायसानें, त्याचि मंत्रें । मंत्र आचमनें पुन: पूजा ॥२॥
तांबूल अर्पूनि अष्टोत्तर जप । स्तवनें गोविंद तोषवावा ॥३॥
स्तवनापुढती प्रदक्षिणायुक्त । वंदावें साष्टांग प्रेमभावें ॥४॥
पुढती निर्माल्य घ्यावा स्वमस्तकीं । पूजा विसर्जावी ऐसी प्रेमें ॥५॥
वासुदेव म्हणे नमस्तुभ्यादि । आवाहनाप्रति मंत्र घ्यावे ॥५॥

१०८
विप्रद्वय तरी तोषवावें अन्नें । पायसभोजनें नैवेद्याच्या ॥१॥
अथवा भक्षण करावा तो स्वयें । इष्टमित्रांसवें घ्यावें अन्न ॥२॥
ब्रह्मचर्यव्रत व्हावें निष्ठायुक्त । ऐसें व्हावें शुद्ध अमेप्रति ॥३॥
पुढती द्वादश दिन हाचि क्रम । गोदुग्ध सेवन करणें मात्र ॥४॥
त्रिकालस्नान तैं शयन भूमीसी । टाळावी यत्नेंसी परपीडा ॥५॥
वासुदेवध्यान व्हावें सर्वकाळ । कथी वासुदेव पुढती ऐका ॥६॥

१०९
त्रयोदहीप्रति व्हावी महापूजा । व्हाया पायसाचा नैवेद्यही ॥१॥
विप्रधेनुप्रति तोषवावें अन्नें । वस्त्रालंकारानें विप्रां तोष ॥२॥
आविप्र चांडाळां समर्पावें अन्न । अंध पंगु दीन तोषवावे ॥३॥
संतोषें दीनांच्या साक्षात विष्णुतोष । पुढती नैवेद्य घ्यावा स्वयें ॥४॥
गीतावाद्य कथा मंत्रजागरादि । प्रत्यहीं यापरी व्हावी सेवा ॥५॥
‘पयोव्रत’ ऐसें आचरीं श्रद्धेनें । सकलही तेणें पुरती इच्छा ॥६॥
सर्वयज्ञ कोणी महाभाग यातें । म्हणती, हरीतें येणें तोष ॥७॥
वासुदेव म्हणे कामना संपूर्ण । पयोव्रतें पूर्ण भाविकांच्या ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP