स्कंध ८ वा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६५
निवेदिती शुक रायासी त्या काला । प्रभु साह्य ज्याला यश त्यासी ॥१॥
देव-दैत्यांलागीं समानचि श्रम । पावले कल्याण परी देव ॥२॥
भक्तकाज ऐसें करुनि श्रीहरी । वैकुंठविहारी निघूनि गेले ॥३॥
पाहूनि तें दैत्य क्रोधाकुल होती । जाहले युद्धासी सकळ सिद्ध ॥४॥
एकाचि कार्यार्थ ज्यांचा महायत्न । घ्यावयाची प्राण सिद्ध तेचि ॥५॥
वासुदेव म्हणे स्वार्थ हा राक्षस । करीतसे ग्रास ब्रह्मांडाचा ॥६॥

६६
खवळलीं सैन्यें कोंदे रणनाद । संहार असंख्य सैनिकांचा ॥१॥
‘वैहायस’ नामें विमानीं बैसूनि । बळी समरांगणीं युद्ध करी ॥२॥
नमुचि, शंबर, बाणादि सकळ । विमानस्थ वीर लढती शौर्ये ॥३॥
इंद्रादि देवही बैसूनि वाहनीं । सिद्ध रणांगणीं युद्धालागीं ॥४॥
वासुदेव म्हणे वाग्युद्ध प्रथम । द्वंद्व तें दारुण पुढती होई ॥५॥

६७
महाभयंकर युद्ध वर्णवेना । प्रमुखांच्या संज्ञा कथिती शुक ॥१॥
इंद्रासवें बळी, तारकासुर तो । भिडला सक्रोध कार्तिकेया ॥२॥
मयासुर विश्वकर्मा, तेंवी त्वष्टा । वैरी शंबराचा महावीर ॥३॥
राहूप्रति चंद्र, वायु, पौलोम्यासी । शुंभ-निशुंभांसी भद्रकाली ॥४॥
वातापि-इल्वलां ताडी ब्रह्मपुत्र । बृहस्पति - शुक्र भिडले रणीं ॥५॥
वासुदेव म्हणे उभयही वीर । विजयेच्छा थोर धरिती मनीं ॥६॥

६८
चक्र गदा खड्‍ग भृशुंडी उल्मुक । प्रास परशु भल्ल भिंदिपाल ॥१॥
आयुधें यापरी योजूनि संहार । करिताती घोर उभय योद्धे ॥२॥
छिन्न अवयव भग्न अलंकार । वस्त्रांचा संभार शस्त्रें बहु ॥३॥
वस्तूंनीं या रणस्थान भयानक । युद्ध ईर्षायुक्त चालतसे ॥४॥
धडें शिरेंही तीं सावेश जाहलीं । पराभूत बळी केला इंद्रें ॥५॥
वासुदेव म्हणे अंतीं मायायुद्ध । पाहूनि देवांस भय वाटे ॥६॥

६९
असुर मायेनें पाषाण वर्षिती । भुजंग सर्पादि वृश्चिकही ॥१॥
व्याघ्र सिंहादिक तेंवी क्रूर पशु । संचरती बहु सैन्यामाजी ॥२॥
अक्राळ-विक्राळ राक्षसही येती । सवेग वर्षती मेघ बहु ॥३॥
प्रलयाग्नि अंतीं निर्मी बळिराजा । उल्लंघी मर्यादा सागरही ॥४॥
वासुदेव म्हणे त्यांत झंझावात । ऐशापरी नाश बहु होई ॥५॥

७०
पाहूनि तो नाश भयाकुल इंद्र । म्हणे लक्ष्मीकांत कृपा करो ॥१॥
प्रार्थना तैं देव करिती सकळ । ऐकूनि दयाळ धांव घेई ॥२॥
सूर्यदर्शनेंचि अंधकारनाश । तैसा मायानाश देव येतां ॥३॥
चिंतनें प्रभूच्या नासती संकटें । सिद्धांत हा असे सुविख्यात ॥४॥
कालनेमी, माल्यवान तैं धांवले । अंगावरी आले भगवंताच्या ॥५॥
वासुदेव म्हणे लीलेनें श्रीहरी । असुरांचा करी शिरच्छेद ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP