स्कंध ८ वा - अध्याय ८ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


४६
हालाहल विष प्राशितां शिवानें । मंथनकार्यातें स्फूर्ति येई ॥१॥
कामधेनु तदा येई सिंधूतूनि । स्वीकारिती मुनि तिजसी तदा ॥२॥
चंद्रकांतीयुक्त उच्चैश्रवा लाभे । इच्छितां बळीतें अर्पिती तो ॥३॥
शुभ्रवर्ण चतुर्दंत ऐरावत । स्वीकारुनि इंद्र तोष पावे ॥४॥
कौस्तुभ नामक पद्मराग मणि । धारण करुनि हरि धाला ॥५॥
वासुदेव म्हणे पारिजात तेंवी । अप्सरा देवांसी तोष देती ॥६॥

४७
निवेदिती शुक राया, परीक्षिता । तेजें विद्युल्लता भासली जे ॥१॥
संपत्तीची मूर्ति विष्णूसी अनुरक्त । जाहली प्रगट लक्ष्मी तदा ॥२॥
रुप, वया, वर्ण, औदार्य, माहात्म्य । पाहूनियां मन मोह पावे ॥३॥
सकळही इच्छा करिती तियेची । सर्व सत्कारिती प्रेमें तिज ॥४॥
देवेंद्र आसन, नद्याही जीवन । औषधि अर्पण करी पृथ्वी ॥५॥
धेनु पंचगव्य म्हणे वासुदेव । वसंत अपूर्व अर्पी शोभा ॥६॥

४८
महामुनि होती सिद्ध । तयावेळीं अभिषेकार्थ ॥१॥
रमले गंधर्व गायनीं । अप्सरा त्या नृत्यकर्मी ॥२॥
शंख गोमुख मृदंग । हर्षे वाजविती मेघ ॥३॥
दिग्गज ते करिती वृष्टि । मंत्रघोषणा विप्रांची ॥४॥
वस्त्रें अर्पितो सागर । वरुण वैजयंती माळ ॥५॥
विश्वकर्मा अलंकार । अर्पी शारदा सुमहार ॥६॥
कमल अर्पिले ब्रह्मयानें । नाग अर्पिती कुंडलें ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा । होई गौरव लक्ष्मीचा ॥८॥

४९
निवेदिती शुक कमल घेऊनि । फिरे तयास्थानीं लक्ष्मी हर्षे ॥१॥
मुखांबुज होतें प्रफुल्ल तियेचें । सलील सुहास्यें शोभायुक्त ॥२॥
मुग्ध लज्जाभाव जाहला सुस्पष्ट । कलोलीं कुंडलकांति शोभे ॥३॥
उदर तियेचें होतें बहु कृश । पयोधरोन्नत पुष्ट सम ॥४॥
अंतर त्यांमाजी मुळींही नव्हतें । कुंकुमगंधें ते चर्चियेले ॥५॥
वासुदेव म्हणे नुपुरें चरणीं । सुवर्णलता ती भासे जनां ॥६॥

५०
षड्‍गुण ऐश्वर्यसंपन्न पतीसी । शोधितां तियेसी गवसेचिना ॥१॥
दुर्वासादि तपी करी क्रोधाकुल । ज्ञाते गुरु शुक्र विरागी न ॥२॥
ब्रह्मा चंद्रादींनीं जिंकिला न काम । आश्रयावांचून इंद्र दीन ॥३॥
परशुरामादि धार्मिक, निर्दय । शिबि दानशूर परि न मुक्त ॥४॥
कार्तवीर्यासम बळी, कालाधीन । सनकादि निमग्न समाधींत ॥५॥
चिरंजीव मार्कंडेय ब्रह्मचारी । वरुं कैसें तरी तयां म्हणे ॥६॥
हिरण्यकशिपु आदि ललनाप्रिय । परी दीर्घायुष्य नसे तयां ॥७॥
वासुदेव म्हणे सर्वगुणी शिव । परी अमांगल्य वसे तेथें ॥८॥

५१
निवेदिती शुक राया, होता एक । सद्‍गुणमंडित पुरुशश्रेष्ठ ॥१॥
परी निरिच्छ तो सर्वदा, अंतरीं । चिंती परोपरी लक्ष्मी तया ॥२॥
अंतीं मुकूंदासी घालूनियां माळ । जोडूनियां कर उभी राहे ॥३॥
सुहास्यवदनें वक्षस्थळ पाही । आश्रय त्या ठाईं लाभो म्हणे ॥४॥
जाणूनि तें हरि पूर्ण करी इच्छा । आनंद लक्ष्मीचा न वर्णवें ॥५॥
वासुदेव म्हणे कृपाकटाक्षानें । संतुष्ट सन्मनें पद्या करी ॥६॥

५२
त्रैलोक्याचा पिता हरि । जननी त्रैलोक्यसुंदरी ॥१॥
ऐक्य तयांचें पाहून । हर्ष पावले सज्जन ॥२॥
वाद्यें मंगल वाजती । देव करिती पुष्पवृष्टि ॥३॥
स्तविती अमोघ मत्रांनीं । लक्ष्मी कटाक्ष फेंकूनि - ॥४॥
करी प्रसन्न देवांसी । लज्जा वाटली असुरांसी ॥५॥
वासुदेव म्हणे सुरा । पुढती मानली असुरां ॥६॥

५३
मंथन यापरी चालतां अपूर्व । अद्‍भुतचि नर प्रगटे तेथें ॥१॥
पुष्ट देह मेघवर्ण बाहु दीर्घ । त्रिवळीसंयुक्त कंबुकंठ ॥२॥
आरक्त नयन अलंकार माला । पीतांबर ल्याला भरजरी ॥३॥
विशाळ वक्ष तैं कुंडलें कर्णांत । रुळताती केश कुरळे स्कंधीं ॥४॥
अल्प वय परी व्यक्त पराक्रम । सौंदर्य खुलून दिसे त्याचें ॥५॥
वासुदेव म्हणे अमृतकलश । घेऊनियां प्राप्त धन्वंतरी ॥६॥

५४
आयुर्वेदामाजी निष्णात तो होता । हविर्द्रव्यभोक्ता यज्ञामाजी ॥१॥
अमृतकलश करांत पाहूनि । नेती हिरावूनि दैत्य बळें ॥२॥
पाहूनि तें देव होती बहु दीन । देई नारायण अभय तयां ॥३॥
कलह दुष्टांचा लावूनियां म्हणे । स्वाधीन तुमचें सकळ कार्य ॥४॥
बोले श्रीहरी तों अमृतार्थ वाद । जाहला दैत्यांत प्राशनार्थ ॥५॥
वासुदेव म्हणे बलवंत तोचि । करी अमृताची प्रथम इच्छा ॥६॥

५५
दुर्बळ जे दैत्य कथिती ते धर्म । म्हणती अधर्म न घडो एथें ॥१॥
श्रम सकालांचे समानचि एथ । देवांही अमृतलाभ घडो ॥२॥
समान विभाग लाभो हाचि धर्म । जाणा सनातन श्रेष्ठ तत्त्व ॥३॥
ऐसा जो कलह होई तोंचि लीला । करुनि, अबला होई हरी ॥४॥
वासुदेव म्हणे मोहिनीअवतार । घेई शारड्धर देवांस्तव ॥५॥

५६
अवर्णनीय तें रुप श्रीहरीचें । नीलकमलातें लाज वाटे ॥१॥
रेंखीव गोंडस सर्व अवयव । कुंडलें कपोल दीप्तिमंत ॥२॥
उन्नत नासिकायुक्त मुखचंद्रा । कुंडलांची प्रभा शोभा देई ॥३॥
श्वाससुगंधाचा मोह भ्रमरांसी । शोभे कृश कटि यौवनानें ॥४॥
गजरा केशांत शोभे मोगरीचा । सालंकृत साचा कंठ शोभे ॥५॥
वासुदेव म्हणे मोहक तें रुप । मोहवी दैत्यांस लीलामात्रें ॥६॥

५७
शुभ्र नाजुक तें वस्त्र । केवळचि भासमात्र ॥१॥
सकल सौंदर्यकल्पना । स्पष्ट होई प्रेक्षकांनां ॥२॥
नूपुरांचा मधुरध्वनि । घेई चित्त आकर्षूनि ॥३॥
शुक बोलती हे नृपा । जेणें मोहिलें या जगा ॥४॥
होतां मोहिनी तो जाण । भुलणार नाहीं कोण ॥५॥
नेत्रकटाक्षें मोहिनी । कामबाधा करी मनीं ॥६॥
वासुदेव म्हणे काम । जिंकी तोचि जगीं धन्य ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP