आज्ञापत्र - पत्र १०
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
प्रथम राजेलोकीं, सृष्टि ईश्वरनिर्मित सकलांचा नियंता ईश्वर त्यांणे निर्माण केले जनांमध्यें आपण येक; परंतु सकलांच्या प्रकृति भिन्न भिन्न; त्यांस येक नियम संरक्षणकर्ता नसतां परस्परें विरोध पावोन नाशातें पावतील यैसें न व्हावें; आपली प्रजा निरुपद्रव होत्साती धर्मपथप्रवर्तक असावी, या प्रजेचे करूणेस्तव ईश्वरे संपूर्ण कृपानुग्रहें आपणांस राज्य दिधलें आहे; या ईश्वराज्ञेस अन्यथा केलियाने ईश्वराचा क्षोभ होईल हे संपूर्ण भय चित्तास आणून राज्यमदारुढ न होतां, सर्वकाळ अप्रमत्त होऊन प्रजेचे हितकार्यी सादर असावें. तैसेच आपले लाभालाभ ईश्वराधीन आहेत, तें कोणाच्यानें अन्यथा करवत नाहींत, हा दृढ निश्चय चित्तांत आणून सर्वकाळ ईश्वरास शरण असोन, अंतरंगे पराधीन न होतां, सेवकलोकी केले सेवेची अवगणना न करितां, यथान्यायें यथाधिकारें यथोचित सेवक लोकांचे मनोधारण करुन वर्तावें. परंपरागत जो उत्तम वडील वडील आचरत आले असतील तोच धर्म आचरोन जेणेंकडून कीर्तिलाभ होय तें करावें. सकल कार्यामध्ये अपकीर्तिचे भय बहुत वागवावें. पूर्वी जे राजे होऊन गेले त्यांणी धर्मेचकडून यहलोक परलोक साधला आहे. धर्माचरन, देवतापूजन, सत्पुरुषानुग्रह (या) साधने सकल कल्यान प्राप्ति व राज्यादि वंशवृद्धि अव्याहत नेमीत आहे या दृढ निश्चयें राज्यामध्यें जे देवतायनें व तीर्थे व क्षेत्रें व सत्पुरुषाचे मढ व समाधिस्थानें असतील, तेथील नित्याभिषेक व पूजानैवेद्य व प्रतिवार्षिक यात्रा-महोत्सवाचे अनुकुलतेची जेथील तेथें तेजोविशेषानुरुप मोईन करुन देऊन स्वांगे परामर्थ करुन हा प्रसंग अव्याहत चालवावा. ब्राम्हण, वैदिक, शास्त्रज्ञ, नि:स्पृह, अयाचित, वनवासी, तपस्वी, सत्पुरुष यांचे ठाई परम निष्ठा धरुन जेथें जेथें असतील तेथील तेथें त्यांचे योगक्षेमाचा निर्वाह करुन देऊन सर्व प्रकारें त्यांस संतुष्ट करुन आपल्या कल्याणाभिवृद्धिविषयी आशीर्वाद संपादित जावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP