आज्ञापत्र - पत्र १
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके,४२ मन्मथनाम संवत्सरे,
मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी, गुरुवासरे, क्षत्रियकुलावतंस
श्रीराजा शंभुछत्रपती स्वामी यांणी समस्त कार्यधुरंदर
विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य
हुकुमतपन्हा यांसी आज्ञा यैशी जे :
स्वामी राज्यसत्तारुढ जाहलें असतां सर्वांची समाधानें केलीं. राज्याचा सर्वहि अर्थ मनास आणिला. त्यास सकलहि लहान-थोर सेवक राज्याचे बिज्वर प्रसंगामुळे केतेक आपलाले योगक्षेमविषयी कुंठितबुद्धि व हतधैर्य जाले. ज्यांणीं परंपरेने एकनिष्ठपणे सेवा करुन या राज्यांत आपल्या नाम्रा संपादिल्या यैसेहि कितेक सेवक होते, त्यांणी अवसानें सोडोन परंपरागत मेळविलें अधिकाराचा परिच्छिन्न परित्याग करुन इतरावलंबी जाहले. कितेक केवळ जो अन्याय मार्ग होता तोच आपला जीवनोपाय कल्पून त्याच प्रवाहीं पडिले. हें एक राज्य, या राज्याची एक मर्यादा, हा भाव अगदी उडोन गेला. यैसें जाहलें असतां स्वामींनी तितकाहि विचार बरा चित्तांत आणून, हे राज्य केवळ ईश्वरदत्त, या राज्याची अभिवृद्धि व्हावी हे परमेश्वरास परम आवश्यक, तदनुसार श्रीनें या राज्याचे अभिवृद्धिचा कीर्तिलाभ स्वामीचेच विभागास आणिला यैसें समजोन, यथास्थित निश्चयें ईश्वरस्मरण करोन तत्प्रसादसामर्थ्य या विस्कळित प्रसंगात बरी सुक्ष्म वृद्धि चालऊन जे ईश्वरनिष्ठ परंपरागत सेवक बुद्धिमान कार्यकर्ते होते, ज्या उपायें त्यांचे मनोधारण करावे त्या उपायें त्यांची समाधानें करुन त्यांचे विचारें बुद्धीनें बुद्धी वाढवून सर्वहि आपलाले अधिकारानुरुप राजकार्यविषयीं सानुरुक्त व उद्योगतत्पर केले.
स्वामींचे विहित शासनें प्रजा संरक्षण पाऊन सकल क्षुद्रोपद्रवविषयीं निश्चिंती मानोन वंशपरंपरेनें संपादिले अर्थकीर्तिविषीं स्वस्थचित्त होऊन दुसरा अर्थ चित्तांत न आणीतां नि:संशयपणें स्वामीकार्यास सादर जाले.
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2019
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP