उद्धवचिद्वन केवळ मी मोर तयासमोर हर्षानें ।
तांडव करितों होउनि गतताप तदीय सूक्तिवर्षानें ॥१॥
सन्मणिमाला-मोरोपंत.
ह्या कवीच्या चरित्रासंबंधानें सर्वस्वी विश्वसनीय अशी माहिती अद्याप उपलब्ध झाली नाहीं. या कवीनें लिहिलेली एक संतमालिका ‘महाराष्ट्र कवि’ मासिक पुस्तकांत प्रसिद्ध झाली आहे, तींत रामदास व त्यांचे शिष्य व तुकारामबुवा व त्यांचे मुलगे यांच्या नांवाचा उल्लेख आढळतो;ल यावरुन उद्धवचिद्वन हे रामदास-शिवाजीच्या कालीं विद्यमान असून, समर्थांपेक्षां ते वयानें लहान होते, असें स्पष्ट विधान करण्यास हरकत नाहीं. बीड येथील प्रसिद्ध सत्पुरुष जनी जनार्दन यांचे विद्यमान वंशज हरिभक्तिपरायण मथुरानाथ गोसावी, यांनीं रा० विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांस, उद्धवचिद्वनासंबंधानें जी माहिती दिली, तीही वरील विधानास बळकटी आणीत आहे. पुढील पद पहा:-
ज्याचे वंशीं कुळधर्म रामसेवा । त्याचे वंशी मज जन्म दे गा देवा ॥ध्रु०॥
वारंवार विनंति आयकावी । दयासिंधू ही सर्व सिद्धि न्यावी ॥१॥
ज्याची वाणी रंगली रामनामा । त्यासि मजसी संवाद घडो रामा ॥२॥
म्हणे उद्धवचिद्वन महाराजा । रामदासाचा संग घडो माझा ॥३॥
या पदाच्या शेवटच्या चरणांतील ‘रामदास’ या शब्दाचा अर्थ, हरिभक्तिपरायण मथुरानाथ गोसावी यांनीं, ‘श्रीसमर्थ रामदासस्वामी’ असा केला आहे व उद्धवचिद्वन हे समर्थांशी समकालीन होते, हें लक्ष्यांत घेतलें असतां, गोसावीबुवांचा हा अर्थ पुष्कळ अंशीं समर्पक दिसतो. परंतु वरील पदाच्या एकंदर रचनेकडे पाहिलें म्हणजे असें वाटतें कीं, ‘ज्याचे मुखांत निरंतर रामनाम आह, अशा रामभक्ताची व माझी गांठ पडो’ इतकीच विनंति कवीनें देवापाशीं सामान्यत्वेंकरुन केली आहे; ‘श्रीसमर्थरामदासस्वामीची व माझी भेट व्हावी’ अशा प्रकारची व्यक्तिविषयक कल्पना त्यांत कोठेंही नांहीं. आतां वरील पदाच्या शेवटच्या चरणाचा अन्वय जर ‘उद्धवचिद्वन म्हणे ‘महाराजा रामदासाचा माझा संग घडो’ असा लाविला, तर हें पद रामदासस्वामींस अनुलक्षून आहे, ही कल्पना कांहींशी सयुक्तिक दिसेल; पण अशा प्रकारची ओढाताण केल्यास मूळ पदाचा अर्थगौरव त्या मानानें कमी होतो, हें लक्ष्यांत ठेविलें पाहिजे. उद्धवचिद्वनाचा पुढील अभंगही असाच शंकाजनक आहे:-
रामनाम कथागंगा । श्रवणें पावन करी जगा ॥१॥
तीस प्रेमपूर आला । शंकरहृदयीं सामावला ॥२॥
रामदासांची माउली । आळशावरी गंगा आली ॥३॥
झालें कीर्तन या भावें । संतसज्जनीं मानावें ॥४॥
आम्ही रामाचे पाईक । आमुचा श्रीराम नाईक ॥५॥
आमुचा भाव रामापायीं । आम्हीं रामावांचुनि नाही ॥६॥
म्हणे उद्धवचिद्घन । आम्हीं जालों रामार्पण ॥७॥
या अभंगातील ‘रामदासांची माउली’ या शब्दांचा अर्थ कसा करावयाचा, हा मोठा प्रश्न आहे. पुढील चरणांत कीर्तन झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हां हें कीर्तन रामदास्वामींचेंच असावें असें वाटतें. उद्धवचिद्घन यांनीं संतचरित्रांवर एकदोन मोठे ग्रंथ लिहिले आहेत. ते जर सुदैवानें उपलब्ध होतील, तर या मुद्दयावर चांगला प्रकाश पडेल; तोंपर्यंत, या कवीसंबंधाची जी काय थोडी बहुत माहिती आज उपलब्ध झाली आहे, तिच्याच आधारानें पुढील मार्ग आक्रमण करणें भाग आहे.
उद्धवचिद्वन हे मोगलाईंत, वाडी स्टेशनापासूण १७ मैलांवर धारुर या नांवाचें एक गांव आहे, तेथें राह्त असत. उद्धवचिद्वन हें एक नांव नसून ‘एकाजनार्दन’ या नांवाप्रमाणें तें एक गुरुशिष्यबोधक नांव आहे. प्रस्तुत कवींचे नांव ‘उद्धव’ असून, ‘चिद्वन’ (चिद्धनानंद) हें त्यांच्या गुरुचें नांव होय. चिद्वन हे उद्धवस्वामीचे मामा असून गुरुही होते. रा० राजवाडे यांनीं प्रस्तुत कवीचा काल शके १६२० म्हणजे इ०स० १६९८ हा दिला आहे; पण त्यास आधार काय आहे, याचा उल्लेख त्यांनीं कोठेंही केला नाहीं. कविचरित्रकारांनीं उद्धवचिद्घनाचा जन्मशक १२५० दिला आहे; पण या कवीनें लिहिलेल्या संतचरित्रांत, चौदाव्या शतकांतील संतांचींही चरित्रें आढळतात, यावरुन, कविचरित्रकारांनीं दिलेला शक चुकीचा आहे, हें सप्रमाण सिद्ध होतें. काव्यसंग्रकारांनीं उद्धवचिद्घनाचा काल इ०स० १६५० दिला आहे; पण महिपतींनी दिलेल्या माहितीशीं तो सुसंगत दिसत नाहीं. काव्यसंग्रहकर्त्यांनीं आपल्या अनुमानजन्य विधानाच्या समर्थनार्थ जीं प्रमाणें दिलीं आहेत, त्यांत ‘या कवींच्या ‘भक्तकथामृतसार’ या ग्रंथांत शके १२५० च्या पुढील संतांचींही चरित्रें दिलीं आहेत’ असें एक प्रमाण दिलें आहे; पण "भक्तकथामृतसार" हा ग्रंथ आपणास अद्याप उपलब्ध झाला नाहीं’ असें त्यांनीं पुढें स्पष्ट सांगितलें आहे. अशा स्थितींत, जो ग्रंथ आपल्या अवलोकनांत आला नाहीं, त्यांत अमुक अमुक संतांचीं चरित्रें दिलीं आहेत, असें अगदीं ठांसून लिहिण्यास काव्यसंग्रहकार कसे धजावले, याचें मोठें आश्चर्य वाटतें. अस्तुएकंदरीत, उपलब्ध असलेला सर्व पुरावा लक्ष्यांत घेतां, उद्धवचिद्वन हे इ०स० १६८० च्या सुमारास विद्यमान होते, असें म्हणण्यास कांहीं हरकत दिसत नाहीं. या कवीचें आडनांव ‘कोकीळ’ होतें, असें ह०प० मथुरानाथ गोसावी यांजकडून समजल्याचें रा० राजवाडे यांनी ग्रंथमालेंत लिहिलें आहे. उद्धवचिद्वन हे देशस्थ ब्राह्मण. ते मोठे रामभक्त होते. प्रतिवर्षी धारुर येथें आपल्या मठांत रामनवमीचा मोठा उत्सव करण्याचा त्यांचा परिपाठ असे. एका रामनवमीच्या दिवशीं उद्धवचिद्वन हे बेदर येथें असतां, तेथें त्यांजकडून घडलेल्या एका चमत्काराची हकीकत महिपतींनी आपल्या भक्तविजयाच्या ५६ व्या अध्यायांत दिली आहे; ती सारांशरुपानें येथें देतों; -
‘एके वर्षी चैत्र शुद्ध प्रदिपदेस, उद्धवचिद्वन बेदर येथें गेले असतां तेथील लोकांनी त्यांचें कीर्तन करविलें कीर्तनास मोठमोठे पंडित, शास्त्री व इतर भाविक जन आले होते. त्यांस तें कीर्तन इतकें आवडलें कीं, आणखी कांहीं कीर्तनें करण्याची उद्धवचिद्वनांस त्यांनी विनंति केली. त्यावेळी उद्धवस्वामींनी त्यांस सांगितलें कीं, ‘रामनवमीच्या उत्सावासाठीं मला धारुर येथें गेलें पाहिजे.’ लोक म्हणाले कीं, ‘यंदाजी रामनवमी आपण येथेंच करावी.’ लोकांचा अत्याग्रह व आस्था पाहून उद्धवचिद्वन फार खूष झाले व त्या वर्षीची रामनवमी बेदर येथेंच करण्याचें त्यांनी कबूल केलें. मग, एक मोठा वाडा पाहून लोकांनीं तेथें प्रशस्त मंडप उभारिला व त्यांत मखर बांधून, श्रीरामचंद्राची मूर्ति आणून बसविली. उत्सवासाठीं मोठमोठे हरिदास, वैष्णव इत्यादिकांस आमंत्रणें दिलीं.
नित्य पक्वान्नाचें भोजन व रात्रौ हरिकीर्तनाचा मोठा थाट सुरु झाला. दिंड्या पताका घेऊन वैष्णव वीरांचे समुदाय मोठमोठया मिरवणुकी काढूं लागले. पुढें वाजंत्रीं वाजताहेत व मागून वैष्णववीर प्रेमानंदानें भजनाचा घोष करीत चालले आहेत, इतक्यांत, वाटेंत एक मशीद होती, तेथील मुसलमानास हा प्रकार पाहून मोठें वैषम्य वाटलें. त्या वेळीं बेदर येथें मुसलमानांचे फार प्राबल्य होतें. न्याय नाहीं, मनसुबा नाहीं, बळी तो कान पिळी, अशा प्रकारची झोटिंगपाच्छाई तेथें माजून राहिली होती. अशा स्थितीत, आपल्या मशिदीवरुन ‘हिंदु काफरांनीं’ भजन करीत जावें, ही गोष्ट तेथील मुसलमान गुंडांस कशी खपावी ? त्यांनीं एकदम वारकरी मंडळावर दगड आणि धूळ यांचा वर्षाव सुरु केला ! कित्येक गुंडांनीं वारकर्यांच्या पताका हिसकून घेतल्या, तर कोणी त्यांस विनाकारण मारुं लागले. विण्याच्या तारा तोडून टाकल्या, मृदंग फोडून टाकले व सगळ्या वैष्णवांस हांकून लाविलें ! मग ते बिचारे उद्धवचिद्वनांपाशी आले व झालेला वृत्तांत त्यांनीं त्यांस निवेदन केला. तो ऐकतांच उद्धव स्वामींस पराकाष्ठेचें दु:ख झालें.
‘मग मखरापाशी जाऊन तत्त्वता । म्हणे ‘जयजयाजी रघुनाथा ! ।
हें नव्हतें येत तुझिया चित्ता । तरी अट्टाहा वृथा कां केला ? ॥
तूं श्रीराम जानकीवरु । वससी सर्वांचे अंतरु ।
मी कासया आतां खेद करुं ? केला अनादरु संतांचा ॥
याप्रमाणें देवापाशीं गार्हाणें करुन उद्धवस्वामींनीं श्रीरामाची मूर्ति देव्हार्यांत नेऊन ठेविली, मखर मोडून टाकिलें व मंडपही काढून ठेविला. नंतर जमलेल्या वैष्णवांस नमन करुन ते सप्रेम हरिकीर्तन करीत बसले. भगवद्भक्ताची ही अनुकंपनीय स्थिति अवलोकन करुन मारुती अत्यंत क्रोधायमान झाले; सगळें बेदर शहर पालथें घालूं कीं जमिनींत गाडून टाकूं, असें त्यांस झालें. मग मोठयाने भु:भुकार करुन त्यांनीं मशिदीवर उड्डाण केलें व जोरानें मशिदीच्या भिंती हालविण्यास प्रारंभ केला. मशिदीशेजारीं एक फकिराचें झोपडें होतें; तो फकीर हा भयंकर प्रकार पाहून फार भयभीत झाला. त्यानें तत्काल जाणलें कीं, मुसलमान गुंडांणीम हरिभक्तांचा छल केल्यामुळें, त्यांचा सूड उगविण्यासाठीं हा बलभीम या ठिकाणीं प्राप्त झाला आहे; आतां मशिदींतील मुसलमानांची शंभर वर्षे भरलीं, यांत कांहीं संशय नाहीं. मग त्यानें हात जोडून अत्यंत भक्तिपूर्वक मारुतीची प्रार्थना केली कीं, ‘महाराज, माझ्या एवढया झोंपडीस कोणत्याही प्रकारें धक्का लावूं नये.’ हें फकिराचें भाषण मशिदींतील गुंडांच्या कानीं पडतांच त्यांस वाटलें कीं, फकीर ज्या अर्थी स्वत:शीच मोठयानें बोलत आहे, त्या अर्थी त्यास वेड लागलें असावें. तथापि फकिरानें, त्या लोकांच्या थट्टेकडे लक्ष्य न देतां, ‘एक वानर मशिदीवर बसून मशीद पाडीत आहे, तरी तुम्ही बाहेर पडा’ असें त्यांस सांगितलें. परंतु हा हितबोध त्या उद्धट लोकांस कसचा पसंत पडतो ? ते म्हणाले कीं, वानराचे बापदादे आले तरी त्यांजकडूनसुद्धां मशीद पाडली जाणार नाहीं ! हा त्यांचा उन्मत्तपणा पाहूण मारुतीराय अत्यंत क्रोधाविष्ट झाले व एका लाथेनें मशिदीची इमारत त्यांनी जमीनदोस्त करुन टाकली. मग जो अनर्थ उडाला, तो काय वर्णावा ? मशिदींतील बहुतेक गुंड जागच्या जागीं चिरडून मेले, कोणी अर्धमेले होऊन विव्हळूं लागले व थोडेसे वांचले, ते भयानें वाट फुटली तिकडे सुटले ! अशा स्थितींत, एका मुसलमानानें धांवत जाऊन, हा सगळा प्रकार मुसलमानी मोहल्यांत जाहीर केला. मशीद पाडल्याची हकीकत तो आपल्या जातभाईंस सांगत आहे, तोंच त्याच्या पोटांत असा भयंकर शूळ उठला कीं, त्याच्यानें पुढें एक अक्षरही बोलवेना ! इतक्यांत तो फकीर त्या ठिकाणीं प्राप्त झाला व मुसलमान गुंडांनी उद्धवचिद्वनांचा छल केला, म्हणून वानरानें मशीद पाडून गुंड मारल्याची हकीकत त्यानें सगळ्या मुसलमानांस कथन केली. मग, ज्या मुसलमानाच्या पोटांत शूळ उत्पन्न झाला होता, त्यानें उद्धवचिद्वनांची भेट घेऊन त्यांची क्षमा मागितली व त्यांस एक हजार रुपये देऊन श्रीरामनवमीचा उत्सव यथासांग रीतीनें करण्याविषयीं विनंति केली. मग शहरांतले लोक जमा होऊन, त्यांनीं थोडया वेळांत मंडप पुन: उभा केला व मखर करुन त्यांत श्रीरामचंद्राची मूर्ति स्थापन केली. ब्राह्मणभोजनें आणि हरिकीर्तन यांचा द्वादशीपर्यंत सारखा थाट उडून राहिला होता. असो. याप्रमाणें उत्सव समाप्त झाल्यावर उद्धवाचिद्वन हे आपल्या धारुर गांवी निघून गेले. या एकंदर चमत्काराचें वर्णन करुन, शेवटी महिपति म्हणतात:-
‘साधुसंतांचा द्वेष करी । तयासी दु:ख जन्मभरी ।
विघ्नें येती नानापरी । तयाचे घरीं शोधित ॥’
आमच्या साधुसंतांवर नेभळटपणाचा आरोप करणार्या प्रतिनिविष्टांनी आमच्या साधुसंतांचें भक्तिबल केवढें विलक्षण कार्यकर होतें, हें ह्या गोष्टीवरुन समजून घ्यावें. आमचे सगळे साधुसंत भूतदयेचे केवळ पुतळे असल्यामुळें, त्यांनी आपण होऊन आपल्या शत्रूसही त्रास दिला नाहीं, ही गोष्ट खरी; परंतु त्यांच्या ठायी ‘जें भगवंताचें अधिष्ठान’ झालें होतें तें एवढें सामर्थ्यवान् होतें कीं, त्या एकट्याच्या जोरावर ते मृत्यूच्या भयंकर दाढेंतूनही सुटून आले, अग्नि त्याचें दहन करुं शकला नाहीं, उदक त्यांस बुडवूं शकलें नाहीं आणि जुलमी व धर्मविध्वंसक राजांचे तुरुंग त्यांस कोंडून ठेवण्यास समर्थ झाले नाहींत. आमच्या साधुसंतांच्यासारखें भक्तिबल आणि पुण्यबल जर आमच्या हल्लींच्या पुढार्यांच्या अंगीं असेल, तर अखिल पृथ्वीवर त्यांच्या सन्मार्गाच्या आड येणारी अशी कोणतीच सत्ता असूं शकणार नाहीं. उद्धवचिद्वनाच्या जन्मतिथीप्रमाणेंच त्यांची मृत्युतिथीही प्रसिद्ध नाहीं, ही मोठया खेदाची गोष्ट आहे. उद्धवचिद्धन हे महाराष्ट्रांतील संतमालेंत चांगले नामांकित होते, हें या लेखाच्या आरंभींच दिलेल्या सन्मणिमालेंतील पंतांच्या आर्येवरुन स्पष्ट दिसतें. महिपतींच्या पूर्वीचें महाराष्ट्र-संतचरित्रकार या नात्यांने ते विशेष प्रसिद्ध आहेत. ‘उद्धवचिद्वनाच्या संतचरित्रांवरुन मी भक्तविजय ग्रंथ लिहीत आहें.’ असें त्या ग्रंथाच्या आरंभींच महिपतींनीं म्हटलें आहे. उद्धवचिद्वनाच्या कवित्वासंबंधानें महिपतींनीं पुढी उद्गार काढिले आहेत:-
‘जयाचीं पदपदांतरे बहुत । अनुभवरसिक जडाव अद्भुत ।
प्रेमळ विरक्त भाविक भक्त । भजनीं रत जाहलासे ॥’
उद्धवचिद्घनाची पुढील कविता काव्यसंग्रहांत प्रसिद्ध झाली आहे:-
१ शुकरंभासंवाद,
२ श्रियाळचरित्र,
३ नागनाथचरित्र,
४ हेगराजचरित्र,
५ बहिरंभटचरित्र,
६ मृत्युंजयचरित्र,
७ गोराकुंभारचरित्र,
८ अनुभवशतक,
९ भगवद्गीता,
१० गुरुशिष्यसंवाद
व ११ पदें ४३ - या सगळ्या प्रकरणांची पद्यसंख्या १०२० आहे. याशिवाय ध्रुवाख्यान, भक्तकथामृतसार व भक्तकथातत्त्व हे उद्धवचिद्वनाचे तीन ग्रंथ अद्याप अनुपलब्ध आहेत. हे ग्रंथ प्रसिद्ध झाल्याशिवाय उद्धवचिद्वनाचें चरित्र सर्वांगपूर्ण रीतीनें लिहितां येणें शक्य नाहीं. उद्धवचिद्धनाचें चरित्र सर्वांगपूर्ण रीतीनें लिहितां येणें शक्य नाहीं. उद्धवचिद्धनाची कविता अगदीं साधी परंतु भक्तिरसपूर्ण आहे. भाषा अत्यंत सुलभ असून, तींत परकीय भाषेंतले शब्द फारसे आढळत नाहींत. कवीचा कटाक्ष केवळ अर्थबोधाकडेच विशेष असल्यामुळें, काव्यदृष्टीनें, उद्धवचिद्धनाची कविता म्हणण्यासारखी हृदयसंगम दिसत नाहीं; तथापि एका प्रेमळ सत्पुरुषाचे उद्गार या दृष्टीने पाहिल्यास तिची योग्यता मोठी आहे, हें कोणाच्याही लक्ष्यांत येईल. उद्धवचिद्धनाच्या गीतार्थमंजरींत थोडेसें कवित्व चमकतें, पण त्यापेक्षां तें त्यांच्या पदांत अधिक चमकतें. त्यांच्या कवितेंतले थोडेसे वेंचे येथें देऊन, हा लेख आतां पूर्ण करितों.
पुढील श्लोकांत उद्धवचिद्धनांनीं आपल्या पारमार्थिक अनुभवाचें वर्णन केलें आहे:-
‘विराजलों शांतुसुखासनीं रे । स्थिरावलों आचल आसनीं रे ॥
आतां सुखाची मज काय वाणी । केला सखा सद्गुरु चक्रपाणी ॥
बहु नग कनकाचे तेंवि मी विश्व जालों ।
मजवरि जग खेळे मी तया भिन्न ठेलों ॥
दिनकरकिरणानें देखिलें जैं निशीतें ।
तइं मग मजमाजी नांदती सर्व भूतें ॥
केला निवास सहजें स्वरुपावबोधीं ।
तैंपासूनि विषमता हरली उपाधी ॥
आलें अपारपद वैभव भाग्य हाता । तेणेचि द्वैत सरलें जगदेव गातां ॥
मी राम म्यां मारुनि रावणातें । म्यां सोडियेलें विबुधा जनातें ॥
म्यां तारिले पर्वत सागरीं हो । मी रामनामें जग उद्धरीं हो ॥
मी कृष्ण मी मर्दुनि काळियाला । म्यां ब्रह्म हा गोपसमूह केला ॥
मी गोपिका भोगुनि ब्रह्मचारी । मी गोधनें चारुनि निर्विकारी ॥
मी शून्यता ग्रासुनि शून्य जालों । शून्यासही चाटुनि मीचि प्यालों ॥
अनंत मी मीपण हाचि अंतु । मी हारपे निश्चित निश्चितार्थु ॥
ब्रह्मादि मुंगी वरि ब्रह्मभावें । साष्टांगता सर्व भुतीं नमावें ॥
कामादि साहा रिपु ते दमावे । तैं भेटि देतो गुरुनाथ दैवें ॥
जाती कुळाचा अभिमान सांडी । जे कामना कर्म तया न मांडी ॥
अकाम घ्याई गुरुराज चित्तीं । भोगूं सुखें सर्व सुखानुभूति ॥
आधीं करीं साधुसमागमासी । संगी तयाचे मग तूंचि होसी ॥
तरु बहु चंदन अंगसंगें । जाले बहू ओघ पवित्र गंगे ॥
ज्याचे घरी भक्ति रुढीस आली । ज्याचे घरीं नित्य विरक्ति जाली ॥
ज्याचे घरीं वास असे क्षमेसी । ते संत सेवीं सुखरुप होशीं ॥
भावार्थ ज्यांनी बळवंत केला । संकल्प ज्यांचे धरिंचा पळाला ।
विवेक ज्यांचे पदिंचा मिराशी । ते संत सेवीं सुखरुप होसी ॥
जे दाविती अक्षय राम डोळां । मोक्षासि ज्या ठाव नसे निराळा ॥
जे दर्शनें उद्धरिती जगासी । ते संत सेवीं सुखरुप होसी ॥
जे दंभमानाप्रति शोचताती । जे भोगमोक्षाप्रति चूळ देती ॥
अहंकृती गर्व नसे जयांसी । ते संत सेवीं सुखरुप होसी ॥
सेजेवरी वृश्चिक आंथुरीले । तेथें निजे कोण सुखें निवाले ? ॥
ऐसे परी ज्यासि विरक्ति जाली । त्याचे घरीं धांव हरीच घाली ॥
अज्ञान मी स्पष्टहि बोल नेणें । कवित्व शब्दादि स्त्रजूं न जाणें ॥
नेणें रसाळत्व गणाष्टकांही । जसें तसें अर्पण संतपायीं ॥
मी अल्पबुद्धी वरि भक्तिहीन । साधूदया पूर्ण प्रकाशमान ॥
ते बोलवीते वदवी मुखानें । ते ऐकती सादर संत कानें ॥
श्रीचिद्घनी स्नेहसुधाप्रसादें । वळूनियां वर्षत पूर्ण बोधें ॥
आब्रह्म प्रेमोदधि पूर्ण जाला । पूर्णोदकीं उद्धवही विराला ॥
अनुभवशतक.
वरील श्लोकांची शब्दरचना फारशी चित्तवेधक नाहीं किंवा ती सर्वस्वी व्याकरणशुद्ध आहे असेंही नाहीं; तथापि त्यांत जें औत्सुक्य आणि वैराग्य भरुन राहिलें आहे, त्यामुळें कवितेच्या बाह्य स्वरुपाकडे लक्ष देण्यास सहृदय वाचकांस अवसरच मिळत नाहीं. आपण विद्वान नाहीं, कवि नाहीं, ही गोष्ट कवीच स्वत: कबूल करीत आहे; पण साधुकृपा अशी विलक्षण आहे कीं, स्वत: कवीनेंच म्हटल्याप्रमाणें, ‘ते बोलवीते, वदवी मुखानें । ते ऐकती सादर संत कानें;’ आणि तसाच प्रकार प्रस्तुत कवीच्या वरील श्लोकांत दृष्टीस पडतो.
गोराकुंभारचरित्र (साकी.)
बरवीं संतचरित्रें हो । पावन परम पवित्रें हो ॥ध्रु०॥
सत्यपुरी जे पावन नगरी लोकी म्हणती तेर ।
संतपरीक्षा करितो गोरा जातीचा कुंभार ॥१॥
अखंड आत्मध्यानीं निमग्न विठ्ठल विठ्ठल वाचे ।
शरीरप्रपंचे माती तुडवी प्रेम भरोनी नाचे ॥२॥
रांगत बाळस सोडुनि तेथें गेली कांता जिवना ।
येउनि पाहे तंव तें कोठें न दिसे तीच्या नयनां ॥३॥
पाहे तो चिखलांत जावळ मांसास्थी दिसताती ।
‘जळो भजन हें बाळक मारिलें’ वदन पिटी ती हातीं ॥४॥
ध्यानभंग विक्षेप होतां चक्रदंड पडताळी ।
येरि म्हणे ‘मज स्पर्श कराल तर आण विठूचि पाळी’ ॥५॥
टाकुनि काठी सहज स्थितिनें प्रपंच अवघा सारी ।
शय्यासन भोजनप्रवर्णी वर्जियली ते नारी ॥६॥
तिणें आपली भगिनी आणुनि लग्नसोहळा केला ।
चवथे दिवशी पिता वधूचा वरा प्रार्थिता जाला ॥७॥
‘हरिचे दास तुम्ही सज्जन तुह्मां लहान थोर नाहीं ।
दोघींचेंही समान पाळण, आण विठूची पाहीं’ ॥८॥
‘अवश्य’ म्हणुनी वस्त्र-भूषणें दोघिजणीसी पाळी ।
अंगस्पर्श न करी तेव्हां विचार करिती बाळी ।
निद्रिस्त भ्रतार देखुनी दोघिजणी दों भागीं ।
धरुनि त्याचे पाणी हृदयीं निद्रा करिती वेगीं ॥१०॥
जागृत होतां कर अन्यायी शास्त्रावरि आपटिले ।
कमळ तोडितां मृणाल तैसे थोटे बाहू जाले ॥११॥
नामदेव संकीर्तन करितां कथेसि गोरा आला ।
नामघोषप्रेमें टाळी करपल्लव थोटया फुटला ॥१२॥
रांगत बाळक धावुनि आले महिमा हा नामाचा ।
वेदशास्त्र पुराण वर्णी, कुंठित शेषवाचा ॥१३॥
हे प्रकरण एका जुन्या वहींतून मीं येथें उतरुन घेतलें आहे. यांतील कित्येक पाठ काव्यसंग्रहांतील पाठांहून अगदीं भिन्न आहेत. पुढील धांवा तर प्रसिद्धच आहे; त्यांतील करुणरस किती करुणाजनक आहे, ह्याचें आणखी निराळें वर्णन करण्याची आवश्यकता नाहीं:-
पद.
कृष्णा धांव रे । लवकरी । संकट पडलें भारी ।
हरि । तूम आमुचा कैवारी । आलें विघ्न निवारीं ॥ध्रु०॥
पांडव असतां वनवासी कळले कौरवांसी ।
त्यांनीं पाठविले हे ऋषी । सत्त्व हरायासी ॥१॥
साठी सहस्त्र खंडया अन्न । दुर्वासभोजन ।
सत्त्व जातील घेऊन । अंतर पडतां जाण ॥२॥
रात्र जाहलीसे दोन प्रहर । आले ऋषीश्वर ।
भोजन मागती सत्वर । कैसा करुं विचार ॥३॥
आज कां निष्ठुर जाहलासी । कोठें गुंतलासी ।
माझी होइल बा । गत कैसी । आनाथ मी परदेशी ॥४॥
आतां न लावी उशीर । धर्म चिंतातुर ।
अनर्थ करील तो फार्त । एवढा करिं उपकार ॥५॥
कंठ शोषला अनंता । प्राण जाइल आतां ।
पदर पसरितें तुज ताता । पावें रुक्मिणीकांता ॥६॥
ऐकुनि बहिणीची करुणा । आला यादवराणा ।
द्रौपदी लोळत हरिचरणा । उद्धवचिद्धन जाणा ॥७॥
सुमारें दहा वर्षांपूर्वी हा धांवा एका जुन्या वहींत मीं वाचला होता, तेथें उद्धवचिद्धनाच्या ठिकाणीं ‘चिंतामणि’ हें नांव होतें, असें मला आठवतें.
निवडक पदें.
१
देवा ! तूच खांब सूत्रधारी रे । आम्ही बाहुल्या निर्विकारी रे ॥ध्रु०॥
सकळांची कळा तुझे हाती रे । आपुल्या मतीं वर्तताती रे ॥१॥
एक रंक एक राव रे । एक चोर एक साव रे ॥२॥
उद्धवचिद्धना द्वैत एक रे । एक बाप एक लेंक रे ॥३॥
२
सख्या हरि ! जेवीं रे सजणा ॥ध्रु०॥
साय दुधावरी रायपुरी वरि । कानवला चिमणा ॥१॥
कालविला दधिभात आलें मिरें । मेळविलें लवणा ॥२॥
उद्धवचिद्धन अद्वयमंचकी । गोपाळा सगुणा ॥३॥
३
गोड कथारस रे ! । रसिकजन ! ॥ध्रु०॥
आदि सुधारस षड्रस नवरस । सर्वहि कुरस रे ॥१॥
सुगम सुसेव्य अवीट अमोलिक । न करीं आळस रे ॥२॥
संतमुखें रस सेवित उद्धव - । चिद्धन समरस रे ॥३॥
४
सज्जन यासाठीं यासाठीं । अवतरले या सृष्टीं ॥ध्रु०॥
न बोलणें बोलावें । न दिसे तें दृष्टी दावावें ॥१॥
सद्रूप हें जग माया । ऐसें साधक जन समजाया ॥२॥
भेद लयाप्रति नेला । उद्धवचिद्धन अद्वय केला ॥३॥
५
भाळीं कस्तुरिचा टिळा । वैजयंती माळ गळां ।
रंग आंगीं सांवळा । कृष्णाई माझी ॥१॥
साजिरें सुंदर ठाण । विशाळ डोळे आकर्ण ।
भक्तिभाव परिपूर्ण । कृष्णाई माझी ॥२॥
पायीं पद ऊर्ध्व रेखा । तोडरावरतीं वांकी देखा ॥
कोटी शशि उपमा नखा । कृष्णाई माझी ॥३॥
चैतन्याची चालक सत्ता । चिद्धन विश्वाची माता ।
उद्धवा विश्रांति देता । कृष्णाई माझी ॥४॥
६
पिब रसने रामरसातें । किति भ्रमसी भवविरसातें ॥ध्रु०॥
जड तरले सागरजिवनीं । विषहरणीं शिवसंजीवनीं ॥१॥
जरि अवचट ये वदनासी । तरि कलिकिल्मिष अघ नाशी ॥२॥
कथि चिद्धन कर्णी । धृत उद्धव चिंताहरणी ॥३॥
७
ऐसें जग नाना जग नाना । आत्मा एकचि जाणा ॥ध्रु०॥
उदंड शाखा पानें । परि तो एकचि तरु अभिधानें ॥१॥
नाना प्रतिबिंबींचा । परि तो भानू एकचि साचा ॥२॥
अपार जलधर धारा । उद्धवचिद्धन तोय उबारा ॥३॥
उद्धवचिद्धनाच्या कांही आरत्या एका जुन्या बाडांत मिळाल्या. त्या अद्याप अप्रसिद्ध असाव्या, असें वाटल्यावरुन त्यांचा येथें संग्रह केला आहे: -
आरती.
१
‘तत्त्वमसि’ पद ऐसें वाक्य त्रैवाती । अनुभवपात्री विचार आज्येंसी निगुती ।
तेथें संयोजिली आत्मत्व ज्योती । प्रकाशला दीप न दिसे दिनराती ॥१॥
जयदेव जयदेव जय सद्गुरुनाथा । एकीं एकारती अर्पण अद्वैता ॥ध्रु०॥
प्रकाश प्रकाशतां प्रकाशला भाव । स्वप्रकाशें सहजें त्रि --- हे वाव ॥
तेथें उरोनि नुरण्या नुरण्याचा ठाव । वोवाळी उद्धवचिद्धन गुरुदेव ॥२॥
२
नाना शाखा पानें लवणें रुचि आली । वोदन ओंकाराचें वरण वर घाली ।
पूर्ण पूर्णपोळी भक्ति चौघडिली । क्षराक्षरविरहित उत्तम क्षीर केली ॥१॥
जयदेव जयदेव जय स्वसंवेद्या । अंगीकारीं सद्गुरु .... नैवेद्या ॥ध्रु०॥
सारासार मथुनी अनुभव नवनीत । वैराग्याग्निंत कढवुनि सुवास मघमघित ।
ऐसें ठायीं ठेवुनि सत् सद्य: तप्त । उद्धवचिद्धन साखर सद्भावासहित ॥२॥
३
अन्नें प्राणें माया मानस आनंदे । पंचकोश पंचवाती ............ ॥
ज्ञानस्नेहामाजी भिजवुनियां शुद्ध । चैतन्याचा दीप उजळे प्रसिद्ध ॥१॥
जयदेव जयदेव जय स्वप्रकाशा । पंचारति सप्रेम सद्गुरु सर्वेशा ॥ध्रु०॥
ज्याला स्तवितां कोटी शशि कोटी कोटी । पावक पाहतां दिवसा खद्योत सृष्टी ।
दृश्य दृष्टा दर्शन न दिसे त्रिपुटी । उद्धवचिद्धन अद्वय हारपला पोटीं ॥२॥
आणखी एक आरती आहे, पण ती फार अशुद्ध आहे. प्रसिद्ध ध्रुवाख्यानाच्या दिंडया चिंतामणि कवीच्या आहेत. असें नवनीतांतल्या त्या प्रकरणाच्या शेवटल्या दिंडीवरुन दिसतें; परंतु सदर प्रकारणाच्या कांही हस्तलिखित प्रतींतील शेवटचा चरण ‘उद्धवचिद्धन गाउनी गुण त्याचे ।’ असा आढळतो; व त्यावरुन हें ध्रुवाख्यान उद्धवचिद्धनकृतच असावें असें वाटतें. उद्धव स्वामीचे मामा व गुरु चिद्धनस्वामी यांनीं केलेली एक तुळशीची भूपाळी एका जुन्या वहींत मिळाली, तीही पुढें दिली आहे:-
उठोनियां प्रात:काळी । तुळसी वंदावी माउली ।
तुळसीचे किती पवाडे -। वर्णू; कृष्णासी आवडे ।
तुळसी सेविलिया घडे । पुण्य गाढें आपणा ॥२॥
तुळसी असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं ।
आपण स्वयें तो श्रीहरी । क्रीडा करी गोविंद ॥३॥
तुळसीसी मंजुर्या येतां । पळ सुटे यमदूतां ।
अद्वयतुळसी कृष्ण स्मरतां । नाश दुरिता चिद्धनीं ॥४॥