दामोदर गणेश जोशी ऊर्फ कृष्णदास

महाराष्ट्र कविचरित्र - लेखक जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर.


महाराष्ट्रांत आजपर्यंत कृष्णदास या नांवाचे तीन-चार कवि होऊन गेले, त्या सर्वांत प्रस्तुत लेखविषयक कृष्णदास हा अर्वाचीन होय. ह्या कवीचा ‘व्रतसार एकादशीमाहात्म्य’ हा ओवीबद्ध ग्रंथ छापून प्रसिद्ध झाला आहे, त्याच्या शेवटीं, शके १७७७, राक्षस नाम संवत्सरे, हा काल दिला आहे, त्यावरुन सुमारें ३०-३५ वर्षांपूर्वी हा कवि विद्यमान होता, असें वाटतें. पुणें येथील जगद्धितेच्छु छापखान्याचे मालक कै० रावजी श्रीधर गोंधळेकर यांनीं कीर्तनतरंगिणी नामक ग्रंथाचे जे चार भाग प्रसिद्ध केले आहेत, त्यांपैकी पहिला भाग याच कवीनें तयार करुन त्यांस दिला होता; यावरुनही, प्रस्तुत कवीस फार वर्षे झालीं नाहींत, हें उघड होतें. रा. गोंधळेकर यांच्या चिरंजिवांपाशीं या कृष्णदास कवीसंबंधानें मला अधिक कांहीएक माहिती मिळाली नाहीं; इतकेंच नव्हे तर हा कवि जातीनें कोण होता, हेंही त्यांस ठाऊक नाहीं. भारतवर्षीय अर्वाचीन कोशांत, "दामोदरदेव या नांवाचा एक कर्‍हाडा ब्राह्मण कवि रत्नागिरी प्रांती, सुमारें ५० वर्षापूर्वी होऊन गेला व त्याचें आडनांव ‘नवाटे’ होतें," अशी माहिती आढळते. परंतु प्रस्तुत लेखविषयक कवीचें आडनांव ‘जोशी’ असल्यामुळें, सदर दामोदरदेव आणि हा कवि, ही एकच व्यक्ति होती, असें म्हणतां येणें शक्य नाहीं. प्रस्तुत कवीनें, आपण गुहागर येथील रहिवासी असल्याचें आपल्या ग्रंथांत लिहिलें आहे; व त्या ठिकाणीं जाऊन चौकशी केल्यास, या कवीसंबंधानें बरीचशी विश्वसनीय माहिती उपलब्ध होण्याचा संभव आहे; परंतु प्रवासाचें मुख्य साधन जें द्रव्य त्याच्या अभावीं, अशा प्रकारचा प्रयत्न करण्यास मी समर्थ झालों नाहीं, याबद्दल मला वाईट वाटतें. प्रस्तुत कवीनें आपल्या एकादशीमाहात्म्य ग्रंथाच्या शेवटीं, स्वत:संबंधानें पुढील माहिती दिली आहे:-

ओव्या.
परशुराम क्षेत्र परम पावन । जेथें नांदे रेणुकानंदन ।
तेथून पश्चिमेस योजनें तीन । गुहागर क्षेत्र विख्यात ॥९४॥
तेथींचा गणेश नामें द्विज । वेदशास्त्रनिपुण सतेज ।
आचारसंपन्न तेज:पुंज । गणकाख्य उपनाम कुळींचे ॥९५॥
तया गुहागर क्षेत्रानिकट । असगोल ग्राम असे धाकट ।
तेथिल पुरोहितपणा वरिष्ठ । वडिलोपार्जित जयाशीं ॥९६॥
त्या गणेश विप्राचा सुत । दामोदर नामें प्रख्यात ।
कृष्णदास नाम संत भक्त । बाहती दुसरें प्रीतीनें ॥९७॥
तो कृष्णदास कर जोडूनी । विनवी संतश्रोतयांलागुनी ।
व्रतसार ग्रंथ प्रीतीकरुनी । श्रवण करा अहर्निशीं ॥९८॥
याव्यतिरिक्त दुसरा ग्रंथ । रचिलासे परोपकारार्थ ।
बोधप्रकाश गाथा प्राकृत । चतुर सज्जनीं विलोकिजे ॥९९॥
आणिक यापूर्वी अनेक । नानाविध चरित्रें रसिक ।
आर्या साख्या पदें श्लोक । दिंडया छंदादि रचिलेंसे ॥१००॥

या ओव्यांवरुन, ‘व्रतसार एकादशीमाहात्म्य’ या ग्रंथाशिवाय ‘बोधप्रकाश’ नामक प्राकृत गाथा व श्लोक, आर्या, इत्यादि छंदांत रचिलेलीं कांहीं आख्यानें, इतके ग्रंथ या कवीनें लिहिले असें सिद्ध होतें. यांपैकीं, ‘एकादशीमाहात्म्य’ हा ग्रंथ शके १७८७ या वर्षी हरी बापू जोशी यांनीं मुंबईत शिळाछापावर छापून प्रसिद्ध केला आहे. ग्रंथाच्या शेवटीं, ‘केळकरोपनाम्नावै पांडुरंगस्यसूनुना भट्ट नारायणाख्येन लिखितं’ असा लेखकानें आपला उल्लेख केला आहे; व यावरुन प्रस्तुत कवि, सदर लेखकाप्रमाणेंच जातीनें कोंकणस्थ ब्राह्मण असावा असा तर्क होतो. उपयुक्तकथासंग्रह भाग २ व कीर्तनतरंगिणी भाग १ ला या ग्रंथांत प्रस्तुत कवीचीं पुढील प्रकरणें प्रसिद्ध झालीं आहेत. -
१  मयूरध्वजाख्यान
२  सिंहध्वजाख्यान
३  उषास्वयंवर
४  बभुवाहनाख्यान
५  चंद्रहासाख्यान
६  सुधन्वाख्यान
७  भानुदासचरित्र
८  वत्सलास्वयंवर
९  सेनान्हावीचरित्र
१०  कमालचरित्र
११  मायाचरित्र
१२  हरिश्चंद्राख्यान
१३  मार्कंडेयाख्यान
१४  गोमाईचरित्र
१५  मुरलीचरित्र
१६  गरुडगर्वपरिहरण
१७  भीमभक्ति
१८  भद्रायुचरित्र

‘बोधप्रकाश’ हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला नाहीं; तो व इतर कांहीं अप्रसिद्ध कविता प्रस्तुत कवीच्या वंशजांपाशीं मिळण्याचा संभव आहे. ह्या कवीचें मूळ नांव ‘दामोदर’ असतां लोक त्यास ‘कृष्णदास’ म्हणत असत. यावरुन तो श्रीकृष्णाचा प्रेमळ भक्त होता, असें वाटतें. या कवीनें लिहिलेला कीर्तनरंगिणीचा पहिला भाग व वरील यादींतील त्यांची आख्यानें पाहिलीं, म्हणजे हा दामोदर कृष्णदास त्या कालीं एक नामांकित हरिदास असला पाहिजे असें वाटल्याशिवाय राहत नाहीं. वर ज्या १८ प्रकरणांची यादी दिली आहे, ती विशेषत: हरिदास लोकांच्याच उपयोगी पडावीं, अशा पद्धतीनें रचिलेली दिसतात. तीं रचतांना आर्या, श्लोक, ओव्या, पदें, हिंदुस्थानी साक्या, दिंडया, कडवीं इत्यादि अनेक वृत्तांचा कवीनें उपयोग केला आहे; व ‘एक समैं श्रीविधिसुत नारद’ इत्यादि शब्दांनीं प्रारंभित होणारीं या कवीचीं आख्यानें हरिदास लोक सांगूं लागले, म्हणजे संगीतास लुब्ध झालेला श्रोतृसमुदाय आनंदानें कसा डोलूं लागतो, याचा अनुभव पुष्कळ वाचकांस आलाच असेल. या कवीस संस्कृत, मराठी व हिंदी या तीन भाषांचें चांगले ज्ञान होतें असें त्याच्या कवितेवरुन दिसतें; तथापि काव्य या दृष्टीनें पाहिल्यास त्याची कविता मध्यम प्रतीची आहे, असें स्पष्ट म्हणावें लागतें. त्याचा ‘एकादशीमाहात्म्य’ हा ग्रंथ ३५ अध्यायांचा असून त्याच्या ओंव्या ५३--७ आहेत. आतां दामोदर कृष्णदासाच्या कवितेंतील कांहीं वेंचे येथें देतों.
रुक्मांगद राजाच्या उपवनाचें पुढील वर्णन पहा:-

ओंव्या.
तीन योजनें लांब विस्तीर्ण । तशा चारी बाजू समसमान ।
त्यांत सुवासयुक्त पूर्ण । अनेक तरु लाविले ॥४६॥
कडेनें वृक्षांचिया हारी  लाविल्या असंख्य नानापरी ।
नग्रोध शमी अशोक पिंपरी । कदंब बिल्व अश्वत्थ ॥४७॥
कपित्थ जंबु औदुंबर । पलाश विंचिणी देवदार ।
कृष्णागर । पलाश विंचिणी देवदार ।
कृष्णागर आणि मलयागर । चंदन श्वेत रक्तादि ॥४८॥
नागपंचक हेमपंचक । पुन्नाग आमलकी पारिजातक ।
बकुल कांचन सुवासिक । हारोहरी लाविले ॥४९॥
त्यांवरी अनेक वल्ली जाण । वेष्टित दिसती शोभायमान ।
रुद्राक्ष गुंज गरुत्मान । कापूरवेली साजिर्‍या ॥५०॥
दाळिंबी बहुबीज सीताफळी । रामफळी आणि रायकर्दळी ।
पूगी खर्जुरी पनस नारळी । कर्पूरकेळी रातांबिया ॥५१॥
निंबोण्या खिरण्या द्रुम अंजीर । सफळेंशीं डोलती मनोहर ।
द्राक्षीमंडप अतिसुंदर । ठाईं ठाई विराजती ॥५२॥
ऐसा भोंवता परीघ देखा । मधीं लाविली पुष्पवाटिका ।
तेणें सुवासें अलोलिका । कोंदले अंबर अहर्निशी ॥५३॥
जाई जुई चमेली मालती । श्वेत पीत सहस्त्रकडी शेवती ।
बटमोगरे तगर केतकी । कोरांटी पीत कृष्ण पैं ॥५४॥
कुंकुम केसरी पीत आरक्त । धत्तूर द्रुम श्वेत आरक्त ।
करवीर अनंत विष्णुकांत । गुलचनी रक्त मधुमालती ॥५५॥
दवण शेंवती मदनबाण । नवाळी शतपत्र गोकर्ण ।
कल्हार पाटलाब्ज कंचन । श्वेत आरक्त सुवासी ॥५६॥
सोनटके भूमिपंचक । दवणा पाच सुवासिक ।
आणि तुळशीचीं वनें अनेक । स्थळोस्थळीं विराजती ॥५७॥
ऐशी पुष्पवाटिका सुंदर । लाविली अत्यंत मनोहर ।
त्या सुवासेंकरुन अपार । कोंदलें अंबर अहर्निशी ॥५८॥
जेथें वसंत ऋतु परम प्रीति । राहिला सदां घ्यावया विश्रांति ।
उष्णकाळ कीं शीत काळ हे चितीं । पडे भ्रांति त्या ठायां ॥५९॥
जळमंदिरें शोभती बहुत । स्थळोस्थळीं कारंजीं उडत ।
देखता पाहणाराचें चित्त । रमलें जाय अतिशयें ॥६०॥
ठाईं ठाईं तडाग विशाळ । शोभती सागरातुल्य सखोल ।
माजी पद्में आणि कुमदें विपुळ । नानावर्णी विराजती ॥६१॥
महानदीस रखे प्रचंड । अक्षयी पाट वाहती उदंड ।
प्रतिवृक्षातळीं तोय अखंड । नमानुरुप लाविले ॥६२॥
वापी कूप ठाईं ठाईम । शोभती विस्तीर्ण सुंदर पाहीं ।
वरी जळयंत्रें सर्वदाही । आपोआप फिरती कळेनें ॥६३॥
स्थळोस्थळीं विष्णुमंदिरें । विराजित दिसती येकसरें ।
अनेक दामोदर्‍या गोपुरें । झळकती परम साजिरीं ॥६४॥
एकादशीमाहात्म्य, अ.३०

रुक्मागंद राजा मोठा विष्णुभक्त होता; त्याच्या भक्तीनें प्रसन्न होऊन श्रीविष्णु त्यास आपलें इंद्रपद देईल कीं काय, अशी भिति इंद्रास पडली; त्यासंबंधानें कवि म्हणतात:-

ओव्या.
‘जैसें बहुवित्त असतां गांठीं । तों परकी मनुष्य देखिलें दृष्टी ।
कपट नसतां तयाचे पोटीं । तरि धनिक उगाचि भीतसे ॥७०॥
कां लावण्यरुप तरुण योषिता । परपुरुष तिशीं भाषण करितां ।
पापमति तया चित्तीं नसतां । तरी संशयीं भर्ता व्यर्थ पडे ॥७१॥
तेंवी विष्णुप्रीति व्हावयाकारणें । रुक्मांगद निष्कामबुद्धीनें ।
अर्पितां प्रतिदिनीं सुमनें । पावला शक्र भय वायां ॥७२॥
जे विष्णुभक्त प्रेमळ भाविक । सत्क्रियावान आणि सात्विक ।
सत्यसंध नामधारक । नैष्ठिक मति जयांची ॥७३॥
ऐसे कृष्णभजनीं रत अखंड । ते मोक्षाचीही न धरिती चाड ।
तेथें इंद्रपदाचा पाड । कैसेनी गणिती सांग पां? ॥७४॥
जो क्षीराब्धितटीं रात्रंदिवस । तो तक्राची काय करील आस ? ।
कीं जो नित्य सेवी सुधारस । कांजी तयास नावडे ॥७५॥
ज्याचे घरीं कामदुहा गाय । तो अजा प्रतिपाळील काय ? ।
जेणें गभस्तीचा केला आश्रय । तो दीपइच्छा करीना ॥७६॥
ज्यासी प्रसन्न अब्धितनया । तो आगांतुकी करील कासया ।
ज्याची पद्मिनीतुल्य स्वजाया । तो प्रेत काय आलिंगी ? ॥७७॥
तेंवि विष्णुभजनीं जे रंगले । भाविक प्रेमळ सत्त्वागळे ।
ते तुच्छ मानिती मोक्षसोहळे । तेथें कोण पुसे शक्रपदा ? ॥७८॥
कित्ता.

गंधर्वांच्या उपदेशावरुन राजा रुक्मांगद एकादशीव्रत आचरुं लागला; त्यामुळें मृत्युलोकींचे सगळे प्राणी विष्णुलोकास जाऊं लागले. हा प्रकार पाहून यमास मोठी चिंता उत्पन्न झाली व रुक्मांगद राजास एकादशीव्रताचरणापासून कसें परावृत्त करावें, या विचारांत तो पडला. इतक्यांत नारदमुनींची स्वारी त्या ठिकाणीं प्राप्त झाली; त्या वेळीं त्या दोघांचा जो संवाद झाला, तो फार मनोरंजक आहे.

ओव्या.
‘म्हणे’ आजी वैवस्वता । स्वस्थता न दिसे तुझ्या चित्ता ।
आणि मुखश्री म्लान तत्त्वता । जाली कोणत्या कारणें ? ॥४१॥
ऐशी ऐकोन मुनीची वाणी । येरु बोले जोडूनि पाणी ।
म्हणे ‘माझिया लोकातें कोणी । पातकी प्राणी न येती ॥४२॥
याचें कारण म्हणशी काय । तरि तेहीं सांगतों सत्य पाहीं ।
कोणी मृत्युलोकाचिये ठाया । पुण्य़ात्मा नृप वसतसे ॥४३॥
रुक्मांगद तयाचें नाम । सात्त्विक आणि नैष्ठिक परम ।
महाप्रतापी सार्वभौम । विष्णुभक्त निस्सीम जाण पैं ॥४४॥
तो सर्वपापक्षयकारक । ऐसें एकादशी व्रत अलोलिक ।
स्वकीयांसह प्रीतिपूर्वक । अखंड करीतसे ॥४५॥
आणि महीवरील अवघे जन । आबालवृद्ध सकळ वर्ण ।
निजसत्तेनें तयांकडून । हरिदिन व्रत करवीतसे ॥४६॥
त्या पुण्यप्रभावेंकरुन । पूर्वजांसह लोक संपूर्ण ।
माझ्या नगरीतें त्यजून । जाते जाले वैकुंठा ॥४७॥
ज्यांचे पूर्वज पडले नरकीं । त्यांही व्रत करितां मृत्युलोकीं ।
ते नरक त्यागूनि एकाएकीं । जाते जाले वैकुंठा ॥४८॥
जेंवी उदक घालितां वृक्षामुळीं । तें शाखांस पोंचोन तात्काळीं ॥
तेणें उदक घालितां वृक्षामुळीं । तें शास्त्रांस पोंचोन तात्काळीं ॥
तेणें जीवन होऊन सकळीं । पावती जाण वृद्धीतें ॥४९॥
कां उदरीं पोंचतांचि अन्न । सकळ इंद्रियें तेणेंकरुन ।
म्लानत्वविरहित होऊन । होती पुष्ट तात्काळ ॥५०॥
कीं लोहदंडाप्रीं परिस लागतां । सकळ हेमरुप होय तत्वता ।
तेंवि एकें हरिदिनीं व्रत करितां । पूर्वज अनेक उद्धरती ॥५१॥
ऐसे होतां कितेक दिवस । सकळ नरक पडिले ओस ।
आणि एकही प्राणी यमपुरीस । नये प्रस्तुत मुनींद्रा ! ॥५२॥
आतां मी काय करावें ? । कोणासी हें दु:ख सांगावें ? ।
अथवा कोठें निघोन जावें । केंवी बसावें निरुद्योगी ? ॥५३॥
ऐसा अंतरीं विचार करित । अहोरात्र चिंताक्रांत ।
निरुद्योगी उगाच निश्चित । स्वस्थ बैसता जाहलों" ॥५४॥
ऐसा वृत्तांत विस्मयकारक । ऐकोनि तोषला मुनिनायक ।
म्हणे "जेणें होय करमणूक । तैसेंचि विंदान करावें" ॥५५॥
यापरी विचार आणुनी मनीं । कृतांतास म्हणे नारदमुनी ।
ऐसें वाटे मजलागुनी । की ज्ञान तुजसी असेना ॥५६॥
तूं चिंताक्रांत आपुले जागीं । म्हणशी बैसलों निरुद्योगी ।
तरी महापराक्रम असोनि अंगीं । उपाय तुजलागीं सुचेना ॥५७॥
रुक्मांगद तो मानव प्राकृत । त्यातें काय तूं भितोसि व्यर्थ ? ।
त्याचा पराक्रम अत्यद्भुत । मनुष्यांतचि वर्णावा ॥५८॥
तो तुजसमोर युद्धाशी । कैसा ठरेल, सांग मजशीं ।
जेवीं मृगेंद्रापुढें जंबुकाशीं । तग सर्वथा निघेना ॥५९॥
कीं कुंभोद्भवापुढें सागराचें । न चले बळ लेशही साचें ।
की गरुडासन्मुख पन्नगाचें । आयुष्य उरेल, घडेना ॥६०॥
+  +  + +  +  +
तुझा प्रताप अति प्रचंड । क्षणें जिंकिशील ब्रह्मांड ।
तेथें रुक्मांगद मानव भ्याड । काय पाड तयाचा ? ॥६२॥
ऐसें असतां दंडधरा ! । केवि बैसशी स्वस्थ मंदिरा
तरी आतां शीघ्र करोनि त्वरा । जाय संगरा मृत्युलोकीं" ॥६३॥
कित्ता, अध्याय ३१.
 
यमाच्या विनंतिवरुन ब्रह्मदेवांनीं रुक्मागंद राजाचें सत्त्वहरण करण्याकरितां मोहना नामक एक सुंदर स्त्री पाठविली. तिनें राजास इतकें मोहित करुन टाकलें कीं, तो तिच्या अर्घ्या वचनांत राहूं लागला. पुढें, एकादशीचा दिवस येतांच, त्या दिवशीं अन्नग्रहण करण्याचा राजास तिनें आग्रह केला. राजा व्रत मोडावयास तयार होईना. शेवटीं, आपल्या पुत्राचें शिर मोहनेस द्यावयास तो कबूल झाला, पण एकादशी व्रत मोडण्यास प्रवृत्त झाला नाहीं. मोहनेस दिलेल्या वचनांत गुंतून आपल्या सद्गुणी पुत्राचा वध करण्याचा प्रसंग आपण आपल्यावर ओढवून घेतला, या विचारानें राजा रुक्मांगद मूर्च्छित झाला ! नंतर जो हृदयद्रावक प्रकार घडला, त्याचें वर्णन पहा:-

ओव्या.
नेणों काय कडकडोनी अंबर । पडलें अवचित अंगावर ।
तैसें नृपासि भासोनि अपार । दु:खे मूर्च्छित पडियेला ॥५०॥
तदा हें वृत्त धर्मांगदाशीं । कळतां गजबजोन मानसीं ।
धावोनि शीघ्र रायापाशीं । येतां जाला त्या ठायीं ॥५१।
तों पिता देखिला अचेतन । तेणें व्याकुळ झाला पूर्ण ।
मग धैर्ये मोहिनीलागून । पुसत ‘काय झालें वो !’ ॥५२॥
येरी म्हणे ‘आज एकादशी । मी उपवास करुं नेदीं तयासी ।
तेणें खेद पावोन चित्तासी । बैसला उगाचि न बोले’ ॥५३॥
तेव्हां धर्मांगद म्हणे ‘माते ! । सोडून देई दुराग्रहातें ।
आजी सेवन करितां अन्नातें । दुरितें असंख्य जोडती’ ॥५४॥
तंव ते म्हणे ‘मी सर्वथा । उपवास करुं न दें नृपनाथा’ ।
ऐशा निग्रहातें पाहतां । दु:ख पावला धर्मांगद ॥५५॥
मग निज मातेजवळी येऊन । कथिलें साकल्य वर्तमान ।
म्हणे त्वां मोहिनीस बोध करुन । करावें सावध नृपासी ॥५६॥
मग ते पतिव्रता संधावळी । वेगें येऊन मोहिनीजवळी ।
लेहें लागोन चरणकमळीं । म्हणे ‘ऐक साजणी ! वचनातें ॥५७॥
आजि एकादशीचें उपोषण । करिती आबालवृद्ध संपूर्ण ।
आणि नृपास म्हणसी ‘सेवीं अन्न । तरी दोषा कारण त्वां होशी ॥५८॥
यास्तव आग्रह सोडूनी समग्र । रायाचें समाधान करीं सत्वर ।
मी तुज पसरोनी पदर । मागतें साचार दे हेंची’ ॥५९॥
मोहिनी म्हणे ‘बहुतांपरी । कथितां मी नायकेंच निर्धारीं ।
रायें मजशीं सत्योत्तरीं । भाष्यदान दिधलेसे ॥६०॥
‘कीं त्वां जें सांगशी वचन । तसाचि सर्वकाळ वर्तेन ।
यांत अंतर जालिया देईन । शिर कापून पुत्राचें ॥६१॥
ऐशी मज प्रतिज्ञापूर्वक । रायें दिधली असे भाक ।
तरी हरिदिनी व्रत मोडावें एक । कीं द्यावें पुत्रमस्तक छेदुनी’ ॥६२॥
यापरी मोहिनीची वाणी । संध्यावळीनें श्रवण करुनी ।
चिंताग्रस्त दु:खित मनीं । होउनी व्याकुळ पैं जाली ॥६३॥
जेवि प्राणसंकट पाडसाशी । पडतां मृगी दु:खित मानसीं ।
कां गर्तेत पडतां देखोन वत्सासी । धेनु मोहें झळंबत ॥६४॥
कीं निजजनाचें देखोन संकट । कळवळे अंतरीं वैकुंठपीठ ।
तेंवी पुत्रप्राणासी विघ्न अचाट । ऐकतां दु:खित संध्यावळी ॥६५॥
मग मोहिनीच्या लागून चरणीं । म्हणे ‘पुत्रदान देई मजलागुनी ।
याविरहीत तुझिया मनीं । असेल तेंचि मागें कां ॥६६॥
माझा एकुलता एक कुमर । जो वंशसदनाचा स्तंभ थोर ।
तरी तुवां घेउनी भाष्यकुठार । न पाडावाच छेदुनी ॥६७॥
कीं पुत्र माझी आंधळीची काठी । न न्यावी हिरोन उठाउठी ।
कीं ते मज कृपणाची धनगांठी । न अभिलाषावी सर्वथा ॥६८॥
कीं तें मज दुर्बळीचें अन्नपात्र । न ओढावें पुढोनि त्वरित ।
कीं पुत्र माझा प्राणचि निश्चित । नाकळावा भाष्यपाशें ॥६९॥
तुजशीं काकुळती येउन । मागतें पदर पसरोन ।
न वधीं माझें बाळ सगुण । निष्ठुर मानसीं होउनी ॥७०॥
याचे पालटा जें मागशी । तें देईन निश्चयें तुजशी ।
तरी मम तान्हयाचे जिवाशी । न इच्छीं घात सर्वथा’ ॥७१॥
ऐसें बोलोन तिच्या चरणी । लोळण घातली तये क्षणीं ।
तथापि तियेच्या अंत:करणीं । कळवळा नुपजे दयेचा ॥७२॥
सिकता शिजविली बहुकाळ । तथापि ते न होय मवाळ ।
तेवि मोहिनीचें चित्त दयाळ । न होय जाण सर्वथा ॥७३॥
कीं वंध्या धेनुसी उत्तम चारा । घालितां न फुटेचि दुग्धधारा ।
तेंवि मोहिनीचे हृदयांतरा । नये ओलावा दयेचा ॥७४॥
असो, तेव्हां ते संध्यावळी । अश्रु ढाळित नेत्रकमळीं ।
पडोनि थोर चिंतानळीं । पुत्राजवळी पातली ॥७५॥
म्हणे पुत्रराया ! वचन ऐक । वोढवलें संकट दुस्तर देख ।
मोहिनीनें महादु:खदायक । अनर्थ थोर मांडिला ॥७६॥"
++++++++++++
तेव्हां धर्मांगदें तियेतें । संबोखोनि निज हस्तें ।
म्हणे कां दु:ख मानुनी चित्तातें । करिशी शोकातें व्यर्थचि ॥७७॥
जाईल तरि जावा प्राण । परी करावें सत्त्वरक्षण ।
हा नाशवंत नरदेह जाण । काय उपयोग ययाचा ? ॥७८॥
आज अथवा उद्यां साचार । कधीं तरी निश्चयें जाणार ।
तरी सत्त्व रक्षोनी सत्वर । द्यावें शिर मोहिनीतें ॥७९॥
कित्ता अध्याय ३२.

याच्या पुढील कथाभागही फार मनोवेधक आहे, परंतु विस्तारभयास्तव त्याचा समावेश येथें करितां येत नाहीं. कृष्णदास कवीच्या श्लोकबद्ध प्रकरणांपेक्षां, त्याचा ओवीबद्ध ‘एकाद्शीमाहात्म्य’ हा ग्रंथ अधिक सरस आहे व तो वाचकांनीं एकवार अवश्य वाचावा. बळरामाची कन्या वत्सला ही अभिमन्यूस देण्याचा ठराव झाला होता; परंतु बळरामाचा ओढा कौरवांकडे असल्यामुळें, त्यानें दुर्योधनपुत्र लक्ष्मण यास वत्सला देण्याची योजना केली. पांडव वनवासांत आहेत, अशा वेळीं लक्ष्मणाचें लग्न उरकून घ्यावें, या हेतूनें दुर्योधन आपल्या परिवारासह द्वारकेंत जाण्यास निघाला. त्यावेळच्या त्याच्या थाटाचें वर्णन कृष्णदासांनीं केलें आहे:-

कटाव.
कौरवेंद्र दुर्योधन राजा, निघता झाला विवाहकाजा, ज्याचा महिवर थोर अगाजा, संगें चालति असंख्य फौजा, अग्रीं धावति भाट रथाचे दाट गजांचे थवे मागुनी किंकाट तयाचे शब्द ऊठती अचाट उष्ट्रें मागें त्याचे, वाट दिसेना ऐसी दाटी, कोतवाल हय त्याचे पाठीं, थै थै नाचति वाटोवाटीं, तयामागुनी स्वार कचाटी, वाजि तकाटित गाजी धावति, आजि चला हो हाजी म्हणती, डंका नौबति मागुनि येती, ढोल तुतार्‍या अमित वाजती, चौघडे बाजे अनेक गर्जती, ताशे मर्फे मृदंगाचा किलकिलाट बहु वाजंत्रांचा नाद नभीं तो न माय त्यांचा, त्यांचेमागुन पायदळाचा थाट चालला वाट दिसेना, अचाट सेना पाय धसेना, भाट कीर्ति बोभाट करिती, दंडपाणि सन्मूख धांवता, नरयानांची नव्हेच गणती, चोपदार कनकदंड घेउनी, उदंड धांवति मार्ग करोनी, प्रचंड गज हय मानव यांनीं असंख्य कामिनि जात बसोनि । यापरी द्वारकेतें । पातले कौरवजन ते ॥१॥
वत्सलाहरण.
सुभद्रा आणि अभिमन्यु रथांतून द्वारकेस जात असतां वाटेंत घटोत्कज आणि अभिमन्यु यांचें जें युद्ध झालें त्याचें वर्णन:-

श्लोक.
विदूराची आज्ञा त्वरित मग घेवोनि निघती ।
पथीं जातां लागे वन बिकट घोरांदर अती ॥
थवे शार्दूलांचे विचरति मृगेंद्रादिक महा ।
अशा आरण्यातें क्रमितिहि बळें निर्भय पहा ॥१॥
वृक्षांची बहु दाटि मार्ग न चले तैं दिव्य एका शरें ।
नाना वृक्ष समूळ ते उडवुनी केलें सुपंथा त्वरें ॥
फोडोनी नग मार्गणें सरळशा पंथें तदा चालती ।
तों त्या काननिं आस्त्रपीं अडविलें जातां त्वरीता गती ॥२॥
येथें असे स्थान घटोत्कचाचें । सुरासुरांहि भय फार ज्याचें ॥
विध्वंसिलें कानन पाहुनीयां । आले बहू राक्षस धांवुनीयां ॥३॥

अस्त्रप लोचनिं पाहति सुरथीं बाळक आणि स्त्रियेतें ।
म्हणती दैवें आमिष धाडुनि दिधलें भक्षण आमुतें ॥४॥
वदती त्यातें वन हें मूर्खा । विध्वंसीलें कायी ।
रक्षक आम्हीं घतोत्कचाचे मारुं तुज या ठायीं ॥५॥
असें ऐकतां अभिमन्यू तैं सुतीक्ष्ण सायक सोडी ।
सकळांचेही सव्य हस्त ते क्षणमात्रेंची तोडी ॥६॥
दशदिशा मयें पळति तेथुनी । पति घतोत्कचा कथिति येउनी ।
पातला महावीर तो अरी । घेउनी पळा प्राण सत्वरीं ॥७॥
हेडंबीचा सुत तैं परिसुनि वृत्तांत क्रुद्ध बहु झाला ।
दशकोटि क्रव्यादां घेउनि संगें तयां स्थळीं आला ॥८॥
देउनि हाक भयंकर, म्हणत ‘उभा प्राण वाचवीं, राहें ।
करिसी अर्भकचेष्टा, न सहे परि मज कदापि वीरा हें’ ॥९॥
ऐसें वाक्य ऐकोनि कृष्णभाचा । सिंहनादें गर्जुनी वदे वाचा ।
म्हणे ‘आतां दुर्जना ! साहिं बाणा । क्षणें तुझ्या घेईन जाण प्राणा ॥१०॥
आला देखोन तीक्ष्ण शर । घाबरला बहु राक्षसेश्वर ।
मग अंबरी उडोन वरचेवर । वर्षाव करी शिळांचा ॥११॥
त्यांचे शरें पिष्ट करुनी । अभिमन्यें प्रेरिली गदा गगनीं
तेणें घटोत्कचा घेरी येउनी । महीवरी आपटला ॥१२॥
मग शस्त्रास्त्रें युद्ध करिती । परी एकमेकां नाटोपती ।
अभिमन्यें सहा कोटि गणती । राक्षस क्षितीं पाडिले ॥१३॥
कितीएक ते बाणवातें उडाले ।
कितीएक ते प्राणधाकें दडाले ॥
असें देखतां नाथ रात्रिंचरांचा ।
अति क्षोभुनी घात इच्छी तयाचा ॥१४॥
गगनिं मग उडोनि टाकिली दिव्यशक्ती ।
क्षणहि न लगतांची आकळी प्राणशक्ती ॥
जननि सुत-अवस्था पाहुनी फार भ्याली ।
धरित हृदयिं वत्सा दु:खडोहीं बुडाली ॥१५॥
रिपू गेला मारुनि बाळकातें ।
करी शोका काननीं सुभद्रा ते ॥
मुखावरी ठेवुनी वदनासी ।
म्हणे ‘बाळा टाकुनी मज जाशी ॥१६॥
करुं कैसी बा गत काय आतां ।
नूठतां तूं करिन रे प्राणघाता ॥
वदुन ऐसें फोडि ती हंबरडे ।
बडवोनी वक्ष तैं बहू रडे ॥१७॥

यापरि विलाप करुनि सुभद्रा दु:खें रोदत भारी ।
कुलदेवीतें स्तवोनि प्रार्थी, अंबे ! दु:ख निवारीं ॥१८॥

पद (बाळा जो जो रे० या० चा०)
येई येई वो जगदंबे ! । माते विश्वकदंबे ! ।
धांवुनि उडि घालीं अविलंबें । दीनाप्रति न विसंबें ॥ध्रु०॥
कौरविं हारविलें राज्यासी । छळिलें द्रौपदीसी ।
दु:ख भोगितसों वनवासी । नयनिं कैसें पहासी ॥१॥
माझें बालक हें एकुलतें । वधिलें राक्षसिं यातें ।
आतां करु कायी, दु:खातें । निरसुन तारीं मातें ॥२॥
तूं तव दीनाची माऊली । जशि वत्सा गाऊली ।
धांवुन उचालत ये पाऊलीं । करिं करुणासाउली ॥३॥
कित्ता.

N/A

References : N/A
Last Updated : January 28, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP