बोधलाभजनरंजनोजनिप्रेमगीतरसिक: कवीश्वर ।
ब्रह्मपद्धतिसुतोषभागयं विठठल: स इति को न संवदेत ॥१॥
रघुवीर विठ्ठल बेदरे.
विठोबा अण्णा दफ़्तरदार हे प्रसिद्ध विव्दान कवि सुमारे ४० वर्षापूर्वी कर्हाड येथे होऊन गेले. त्यांचे मूळचे आडनांव बेदरे. मोगलाईत कलबुर्ग्यानजीक, हैदराबाद शहरापासून ७५ मैलावर बेदर नामक शहर आहे, तेथे अण्णांचे पूर्वज रहात असत. अण्णांचे पितामह बाळाजीपंत बेदरे हे शांडिल्यगोत्री देशस्थ ब्राह्मण, सुमारे १३० वर्षांपूर्वी बाळाजीपंतांनी पेशव्यांपासून कर्हाड पेट्यांत दफ़्तरदारीची सनद मिळविली व बेदर सोडून ते कर्हाड येथे येऊन राहिले. बाळाजीपंतांस महादजी बल्लाळ आणि त्र्यंबक बल्लाळ असे दोन पुत्र होते. बाळाजीपंतांचा काळ झाल्यावर, त्यांची दफ़्तरदारीची जागा आपणास मिळावी म्हणून महादजी बल्लाळ यांनी पेशवे सरकारकडे अर्ज केला. त्यावरुन, पेशवेसरकारचे मुख्य कारभारी नाना फ़डनवीस यांनी सदर जागाअ महादजीपंतांस दिली. त्यावेळी पंतांचे वय अवघे पंधरा वर्षाचे होते, तरी त्यांनी आपले काम इतक्या चोख रीतीने बजाविले की, त्यामुळे त्यांचे वरिष्ठ अधिकारी व प्रजानन हे सारखेच खुष झाले. महादजी बल्लाळ यांस लोक ’तात्या’ म्हणत असत. तात्या मोठे धार्मिक आणि सत्वस्थ ब्राह्मण होते. महादजीपंतांस रामचंद्र नावांचा एक मुलगा होता, तो फ़ार हुशार होता; परंतु तो पंधरा वर्षाचा असतांच मरण पावल्यामुळे, तात्यांस फ़ार दु:ख झाले. या मुलाच्या मागे तात्यांस आणखी कांही मुले झाली, पण ती फ़ार दिवस जगली नाहीत. शेवटी, शके १७३५ ( इ.स.१८१३) पौष वद्य अमावस्या या दिवशी त्यांस एक पुत्र झाला; तेच हे विठोबा अण्णा दफ़्तरदार होत. ह्यांचा जन्म अमावास्येस झाल्यामुळे, त्यांच्यासंबंधाने त्यांच्या आईबापांस व इष्टमित्रांस फ़ार काळजी वाटत असे; पण ईश्वरकृपेने त्याच अमावास्येवर जन्मलेल्या विठठलाने उत्तम प्रकारे संसार केला, बुद्धिप्रभावाने गुरुसही लाजविले; कीर्तनातील रंगदेवतेने मुमुक्षुजनांच्या नयनांत प्रेमाश्रु आणले; कवित्वशक्तीने रसिक जनांस आनंदभरांत डोलावयास लाविले; वक्तृत्वशक्तीने विद्याविलासी जनांस तृप्त करुन धन्यधन्य म्हणवून घेतले; याज्ञिकी ज्ञानाने काशीवासी पंडितांस बोट घालावयास लाविले; आणि शेवटी एकनिष्ठ भक्तिने भगवंतास वश करुन घेतले. ह्यावरुन तुकोबांचे एक वाक्य आठवते " तुका म्हणे हरिच्या दासा । शुभसकाळ सर्व दिशा" तेथे अमावास्या नाही आणि व्यातिपातही नाही. असो.
अण्णांची शरीरप्रकृति बालपणापासूनच सुदृढ होती, पण अभ्यासाकडे त्यांचे लक्ष्य मुळीच नव्हते. मुलगा आई-बापांचा लाडका असल्यामुळे, त्यांनीही त्यास शिक्षणाच्या बावतीत फ़ारसा त्रास दिला नाही. अशा स्थितीत, अण्णा दहा वर्षाचे झाले, तरी त्यांस अक्षरओळखही झाली नाही. पुढे, दसर्याच्या दिवशी, विठोबास चांगला नटवून सजवून तात्या आपल्याबरोबर त्यास वाड्यांत घेऊन गेले. त्या वेळी बाबाजीराव लिमये सुभेदार होते, त्यांनी अण्णांस जवळ घेऊन अनेक प्रश्न विचारले, व अण्णांनीही त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. अण्णांची तरतरी पाहून सुभेदारसाहेब म्हणाले ’विठोबा, तुझा अभ्यास कोठपर्यंत झाला आहे? यावर, विकटोपर्यंत अध्ययन झालेले अण्णा काय उत्तर देणार? त्यांनी लज्जेने खाली मान घातली त्या वेळी, तात्यांनी सांगितले की, विठोबास अद्याप अक्षरसंस्कारही झालेला नाही. हे ऐकून सुभेदारांस मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ’विठोबा तुला अद्याप अक्षरओळखही नाही ना? असा अक्षरशत्रु राहून तात्यांचे नांव तूं पुढे कसे चालविणार?’ सुभेदारांचे हे भाषण अण्णांच्या मनांस फ़ार लागले. दसर्यांचे सोने वाटून घरी आल्यावर, अण्णांची चित्तवृत्ति अगदी उदासीन अशी दिसली. दुसर्या दिवशी सकाळी ते मोठ्या पहाटेस उठले व मुखमार्जनादि प्रातर्विधी सारुन, तात्यांस म्हणाले,’ तात्या, मी आजपासून शाळेत जाऊन लिहावयास शिकणार व सुभेदारसाहेबांस परिक्षा देऊन त्यांजकडून शाबासकी मिळवणार. ’ मुलाच्या मनोवृत्तीत हा आकस्मिक फ़ेरफ़ार झालेला पाहून तात्यांस फ़ार समाधान वाटले. तात्यांच्या घराजवळच देशपांडे यांच्या वाड्यांत एका थोट्या पंतोजीची गांवठी शाळा होती, त्या पंतोजीकडून ’ अण्णास बिलकूल शिक्षा करणार नाही’ असे कबूल करुन घेऊन, तात्यांनी आपल्या मुलास त्याच्या शाळेत पाठविले. तेथे अण्णांनी इतका झटून अभ्यास केला की, सहा महिन्यांच्या आंत थोट्या गुरुजींचे बारदान रिकामे पडून त्यांसच उलट अण्णांचे शिष्यत्व करण्यांचा प्रसंग आला !’ सहा महिन्यांत अण्णांचे मोडी अक्षर इतके चांगले वळले की, शाळेतील सगळी मुले त्यांचे हातचे कित्ते घेऊ लागली! अण्णांची अशी प्रगति होत चाललेली पाहून, तात्यांचा आनंद त्रिभुवनांत माईना. पुढे, एके दिवशी, तात्यांबरोबर अण्णा कचेरीत गेले व आपल्या पुस्त्या त्यांनी सुभेदारांस दाखविल्या. सहा महिन्यांत इतका पालट झालेला पाहून सुभेदार आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, ’शाबास विठोबा. तूं फ़ार तैलबुद्धि आहेस, आपल्या घराण्याचे नांव राखशील यांत शंका नाही.’ सुभेदारांचे हे शब्द ऐकून अण्णांस मोठे समाधान वाटले, हे सांगावयास नकोच.
पुढे, कोल्हापुरचे राजगुरु भाऊ महाराज ह्यांचे आश्रित चिमणाजीपंत विरमाडकर हे सदाशिवगडी राहत असत, त्यांची कन्या गयाबाई हिच्याशी अण्णांचा विवाह मोठ्या थाटाने झाला. अण्णांच्या पत्नीस तिच्या घरांतली मंडळीही गयाबाई म्हणत असत. विवाहसमयी अण्णांचे वय अवघे १२ वर्षाचे होते ! असो. अण्णा ह्ळुहळू मोठे होत चालले, तसतसा अभ्यासाबरोबर त्यांस तालमीचाही नाद लागत चालला. राघोपंत आपटे नामक कर्हाडातील एक ब्राह्मण मोठे तालीमबाज होते, त्यांचा स्नेह संपादन करुन अण्णा पोहण्याची कलाही शिकले. राघोपंत व अण्णा नित्यश: श्रीकृष्णा नदीवर स्नानास जात असत. एके दिवशी दोघांच्याही मनांत आले की, नदीच्या तीरी आपल्या हातांनी एक मारुतीचे देऊळ बांधावे; पण नदीच्या कांठी देऊळ बांधावयाचे ते दगडी असले तरच टिकणार, नाहीतर पुराने वाहून जाणार. या विचाराने दोघेही दगड शोधू लागले, पण अलीकडच्या तीरास कोठेही दगड मिळेनात. नदीच्या पलीकडे मात्र मोठी दरड असून दगडही पुष्कळ होते. नदी तुडुंब भरुन चालली होती, उतार नव्हता. तरी तशा स्थितीत दररोज चारपांच मोठाले दगड घेऊन पोहत येऊन आलीकडे टाकण्याचा क्रम त्यांनी सुरु केला; व थोड्याच दिवसात, वाळवंटात देवालय बांधून त्यांत मारुतीची स्थापना केली ह्या मारुतीस आपट्यांचा मारुती असे म्हणत असत. पण ते स्थान स्मशानात असल्यामुळे, ह्ल्ली तो ’मढ्या मारुती’ या नावाने प्रसिद्ध आहे. सांप्रत, रेल्वेस्टेशनावरुन कर्हाडास जातांना वाटेत वाळवंटामध्ये देऊळ दृष्टीस पडते ते हेच होय.
त्या काळी कर्हाड येथे केदारपंत नामक एक सत्पुरुष होते त्यांचे चिरंजीव कृष्णा व अण्णा दफ़्तरदार ह्यांनी संस्कृत शिकण्याचा संकल्प करुन, तेथे अप्पा दफ़्तरदार ह्यांनी संस्कृत शिकण्याचा संकल्प करुन, तेथे अप्पा पुराणिक म्हणून एक शास्त्री राहात असत, त्यांच्याकडे हे उभयतांही संस्कृत शिकण्यासाठी गेले व त्यांनी त्यांस हेतु कळविला. ’ठिक आहे’ असे म्हणून शास्त्री बुवांनी त्यांस रुपावळी व समासचक्र आणावयास सांगितले. त्या वेळी ही पुस्तके हल्लीच्यासारखी स्वस्त झाली नव्हती. कोणापाशी तरी विरळा एकादी हस्तलिखित प्रत असावयाची. आणि ती एक किंवा दोन दिवसांच्या बोलीने प्रत करुन घ्यावयास मिळावयाची. त्याप्रमाणे, अण्णांनी एक प्रत मिळवून तिची नक्कल करण्यास सुरुवात केली. पण अण्णांचा भर सगळा मोडी अक्षरावर; बालबोध लिपीचा विशेष अभ्यास त्यांस नव्हता. म्हणून त्यांनी समासचक्राची प्रत मोडी लिपीतच लिहून घेतली; व त्यासाठी र्हस्वदीर्घाचे नियम बसवून ते दोघेही संस्कृत शिकू लागले. ह्या विद्येतही अण्णांच्या बुद्धीची तेजस्विता तत्काल दिसून आली. रघुसर्गाचे दहावीस श्लोक होतात न होतात, तोच ते दुसर्यास समजवून देण्याची शक्ति त्यांच्या अंगी आली. कृष्णा केदार बिचारे तसेच रेंगाळत राहिले ! दफ़्तरदारांच्या घरांतील बायका पुराण ऐकण्यास बाहेर कधी जात नसत. अण्णांचे अध्यापक अप्पा पुराणिक हे एके दिवशी दफ़्तरदारांकडे पुराण सांगण्यास आले असतां, शेवटचे दहावीस श्लोक बाकी ठेवून ते उठले व उरलेले श्लोक अण्णांच्या मुखाने श्रवण करावे, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. हे पाहून तात्यांस मोठे आश्चर्य वाटले. कारण, अण्णांच्या संस्कृताध्ययनासंबंधाने त्यांस मुळीच माहिती नव्हती. गुर्वाज्ञेप्रमाणे अण्णांनी गुरुंस व तीर्थरुपांस वंदन करुन व्यासपीठावर आरोहण केले आणि राहिलेला भाग संपविला. पंतांची रसाळ वाणी व श्लोकार्थ विशद करुन सांगण्याची शैली पाहून तात्यांस जी धन्यता वाटली असेल तिची कल्पनाच केली पाहिजे. त्यांनी शास्त्रीबुवांचे फ़ार आभार मानिले व त्यांच्या शाळेची सगळी व्यवस्था करुन त्यांस आपल्या घरीच ठेवून घेतले. त्यावेळी, शास्त्रीबुवांस जो आनंद झाला, त्याच्या भरांत ते विठ्ठ्लपंतांस हाक मारुन म्हणाले,’ पंत ! तुम्ही आमच्या अन्नास कारण झालां, ह्याकरितां आम्ही तुम्हांस आजपासून ’अण्णा’ म्हणूनच हाक मारणार.’ ह्या दिवसापासून पंतांस सगळे लोक विठोबा अण्णा म्हणूं लागले व ह्याच नांवाने ते महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत.
अण्णांचे गुरु अप्पा पुराणिक फ़ार विव्दान होते, त्यांच्या अध्यापनांत अण्णांचे पंचमहाकाव्यांचे व्युत्पत्तिज्ञान पुरे झाले. गुरुंची शाळा अण्णा स्वत:च चालवू लागले. गुरुजींची बहुतेक सगळी विद्या अण्णांनी संपादन केली. अण्णांस सांगण्यासारखे गुरुजींपाशी काही शिल्लक राहिले नाही. अशा स्थितीत, आपल्या मागचा ’आणखी सांगा’ हा अण्णांचा तगादा चुकविण्यासाठी शास्त्रीबुवा एके दिवशी पहांटेस उठून निघून गेले ! त्यांचा पुढे पत्ता लागला नाही. याबद्दल अण्णा व तात्या यांस पराकाष्ठेचे वाईट वाटले. शास्त्रीबुवांकडून अण्णांस व्युत्पत्तिज्ञान चांगले झाले; व्याकरणाचा अभ्यास मात्र तसाच राहिला.
वामनाचार्य टोणपे इत्यादि कांही मित्रांच्या साहाय्याने अण्णांनी आपल्या घराशेजारीच, चैत्रमासी श्रीकृष्णाबाईचा उत्सव सुरु केला. वर्गणीने थोडासा पैसा जमवून त्यांत हा उत्सव ते करीत असल्यामुळे, हरिदासास बिदागी देण्याचे सामर्थ्य त्यांस नव्हते. यासाठी अण्णांनी कीर्तन करावे व अप्पा परशुराम आपटे, प्रसिद्ध गोविंदबुवा कुरवलीकर व शंकर अण्णा यांनी पाठीमागे साथ करावी असे ठरले; व त्याप्रमाणे पहिला उत्सव साजरा करण्य़ांत आला पहिल्या वर्षी कीर्तनास रंग साधारणच होता; तथापि त्या दिवसापासून , प्रयत्न केल्यास आपण चांगले कीर्तनकार होऊ, अशी भावना अण्णांच्या ठायी उत्पन्न झाली. कीर्तनास रंगदेवतेचा प्रसाद व्हावा, या हेतूने त्यांनी अनुष्ठान सुरु केले; प्रत्यही प्रात:स्नान करुन दोन प्रहरच्या आंत अध्यात्मरामायणाचा पाठ संपवावयाचा, हे व्रत त्यांनी चातुर्मास्य चालविले.
दुसर्या वर्षाचा उत्सव जवळ येत चालला; या वर्षी तरी कीर्तन चांगले व्हावे म्हणून अण्णांनी शक्य तेवढे परिश्रम केले. त्यांनी काही आख्याने पाठ केली होती, त्यांत नवीन पद्ये रचून घातली. शेवटी उत्सवाच्या दिवशी अण्णांचे कीर्तन होऊन ते इतके लोकप्रिय झाले की, ’अण्णा फ़ारच उत्तम किर्तन करितात’ अशी कीर्ति सर्वतोमुखी पसरली. कर्हाडांत बाबा जोशी नामक एक सत्पुरुष होते, त्यांनी सर्पदंश झालेल्या एका माणसाचे विष कालियामर्दनाचे आख्यान लावून उतरविले, अशी प्रसिद्धि होती. कांही लोकांनी बाबांस अण्णाचे किर्तन ऐकण्यास येण्याचा आग्रह केल्यावरुन ते कीर्तनास आले होते. त्यांस ’ध्रुवाख्यान’ फ़ार असल्यामुळे अण्णांनी तेच आख्यान लाविले व ध्रुवास दर्शन देणार्या भगवन्मूर्तीचे ध्यान स्वत: वर्णिले :-
हरि हा आनंदाचा कंद । आनंदाचा कंद ।
उभा पुढें भक्तसखा गोविंद ॥हरि०॥ध्रु०॥
सजल नीरदश्यामतन् नवरत्नखचितसौवर्ण-
मुकुट शिरपेंच तुरा वरि कलगि विराजित
कुटिलालक निटिलासि कस्तुरी विराजित
कुटिलालक निटिलासि कस्तुरी-तिलक
केशरीगंध ॥ हरि हा आनंदाचा कंद ॥१॥
श्रवणिं मनोहर मकरकुंडलें फुल्ल गल्ल
कर्णांत दीर्घ-सुप्रसन्नलोचन इंदुवचन तिल-
पुष्पनासिका कुंदरदन हनु अधरबिंबगत
हास्य मंदमंद ॥ हरि हा आनंदाचा कंद ॥२॥
कंबुकंठ कौस्तुभाभरण शुभपटीरपंक नव-
द्रवरुषितपविरांस केयूरविभूषित कनक-
कटकसह-रत्नतोडर-प्रभानुभासित शंख
सुदर्शन-गदा-सरोरुह लसच्चतुर्भुज
ललितांगुलिधृत रत्नमुद्रिकावृंद ॥हरि०॥३॥
विशाल गक्षस्थलीं रमाकुचकुंभकुंकुमालेप-
लिप्त श्रीवत्सलांछिता सुवर्णयज्ञोपवीत
मध्य वलित्रयबंधुर निम्ननाभि तनु
रोमराजि लुठदुत्तरीयपट परिजातनव-
कुसुम तुलसिकामिश्रहार-पादाप्रचुंबि
नभ भरुनि जयाचा मधुर सूटला गंध ॥हरि०॥४॥
कटीतटीं जरिकांठि पीतकौशेयवासपट
वास सुवासित विचित्र शृंखल अगणित
मणी झणझनित मंजुलकणित किंकेणी
विपुलरोरुद्वंद्व विराजित जानुजंघ सुकुमार
सरलतर कनकवलयुक्त रत्नतोडरे मंजुमंजु
सिंजान हीर मंजीर परिष्कृत सहज रक्त
मृदु वज्र अंकुश ध्वजांबुजांकित वृत्तवृत्त
उत्तुंग-रक्तनखचक्रवाल सत्पुण्यचंद्रिका ध्वस्त
महध्दृदयांघतमस मंदाकिनी माहेर चरणयुग
धृतरणरणिक जयाच्या क्षणिक ध्यानें तुटती
झटिति सर्व भवबंध ॥हरि० ॥५॥
कोटिकोटि कंदर्प रुपलावण्य-दर्पहर ध्यान
मनोहर अनंतजन्म मनोमल पटली निर्मूलनकर ।
भक्तिगम्य तापत्रयभंजन आसेजनक ध्यानिं पाहतां
वाटे जणुं नयनांत भरावें हुंगावें दृढ आलिंगावें
कीं चुंबावें विसरतसे संसार सर्वही संतत
याचा पंत विठठला सहज लागला छंद ॥ हरि०॥६॥
ही अण्णांची पहिली कविता होय. ह्यांतील पदलालित्य, यमकप्राचुर्य, अर्थसौष्ठव व प्रसाद हे गुण वाखाणण्यासारखे आहेत. या एकाच पद्यावरुन अण्णांची कवनशक्ति असामान्य होती, असें वाटतें. रसिकता व भगवत्प्रेम हीं वरील पद्यांत जंणूं काय खेळत आहेत, असें दिसते, असें दिसतें. वरील पद्यांत संस्कृत शब्द फार आहेत, ही गोष्ट खरी, पण भगवंताचें संस्कृत स्वरुप वर्णितांना संस्कृत मनाच्या कवीच्या तोंडून संस्कृत शब्दच बाहेर पडावे, हें अगदीं साहाजिक आहे. हें पद्य ऐकून व अण्णांची एकंदर कीर्तनशैली पाहून बाबा जोशी आनंदानें डोलूं लागले. कीर्तन समाप्त झाल्यावर त्यांनीं असे उद्गार काढले कीं, "अण्णावर भगवत्प्रसाद आहे, म्हणूनच असें कवन व असें वक्तृत्व त्यांस साध्य झालें, भगवत्प्रसादावांचून ह्या गोष्टी केवळ अशक्य होत." कीर्तन लोकप्रिय होण्यास गायनाची विशेष आवश्यकता असल्यामुळें, अण्णांनीं त्या कलेचें ज्ञान, उत्तर-हिंदुस्थानांतले एक संन्यासी कर्हाडांतील गोविंदस्वामीच्या मठांत राहत असत, त्यांजपासून संपादन केलें. ह्या संन्याशांनीं ‘आपल्या आश्रमास गायनकला वर्ज्य आहे’ या सबबीवर अण्णांस प्रथमत: गायनाची माहिती करुन देण्याचें नाकारिलें होतें; पण मागाहूण अण्णांनीं गोविंदस्वामीस विनंति केल्यावरुन, त्यांचे आज्ञेनें संन्यासीबुवांनीं अण्णांस रात्रीच्या वेळीं मठांत बोलावून, तेथें त्या कलेचें त्यांस उत्तम प्रकारचें ज्ञान करुन दिलें. पुढें, अण्णांनीं प्रसिद्ध वैयाकरण गुंडाचार्य घळसाशी यांचे वडील आबाचार्य यांजपाशीं कौमुदी म्हणण्यास प्रारंभ केला. पूर्वार्ध संपला तों आचार्य वारले; तेव्हां कौमुदीचा उत्तरार्ध अण्णांनीं स्वत: बसविला. नंतर, भिकू पाध्ये व राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर यांजपाशीं त्यांनीं पूर्वमीमांसेचें अध्ययन केलें. कोणताही संस्कृत ग्रंथ लावण्यांत अण्णांचा अगदीं हातखंडा, अशी त्यांची सर्वत्र प्रख्याति झाली. कांहीं वैद्य लोकही वैद्यक-ग्रंथांतल्या शंकांचें निरसन करुन घेण्यासाठीं अण्णांकडे ऋणानुबंधी होते, त्यांनीं अण्णांपाशीं वैद्यकग्रंथ वाचण्यास प्रारंभ केला. त्यांच्या शंकासमानार्थ अण्णांस त्याही शास्त्राचें अध्ययन करणें भाग पडलें; व त्यासाठीं त्यांनीं प्रसिद्ध वैद्य भाऊ टोणपे यांजपाशीं वैद्यशास्त्राचा अभ्यास केला. पुढें, अण्णांनीं ह्या ज्ञानाचा उपयोग लोकांस धर्मार्थ औषधें देण्याकडे केला. व्युत्पत्ति आणि व्याकरण-शास्त्रांत चांगली पारंगतता संपादन केल्यावर, संस्कृत भाषेंत कविता करण्याकडे अण्णांची प्रवृत्ति झाली. औंध येथील पंतप्रतिनिधींचे आश्रित विनायक बाबुराव बापट हे रसिक गृहस्थ एके दिवशीं अण्णांच्या भेटीस आले असतां, त्यांनी अण्णांस सहज म्हटलें, ‘आम्ही जो मजकूर देऊं, त्याजवर आम्ही सांगूं त्या वृत्तांत आपण कविता कराल काय?’ अण्णा म्हणाले, ‘आपण मजकूर लिहावा, मग आम्ही त्याचा विचार करुं.’ बापट यांनीं एका कागदावर बराच लांबलचक मजकूर लिहून दिला; व हा सगळा मजकूर श्लोकबद्ध लिहून द्या, असें अण्णांस सांगितलें. अण्णांनीं तत्काल तो सगळा मजकूर एका श्लोकांत गोंवून, तो श्लोक बापट यांस उतरुन एका श्लोकांत गोंवून, तो श्लोक बापट यांस उतरुन घेण्यास सांगितलें. ह्या श्लोकांत मूळ लेखांतील यत्किंचित्ही जाऊं न देतां, वृत्ताच्या सर्व अटींची यथायोग्य रीतीनें परिपूर्तता करण्यांत आली होती. हा प्रकार पाहून बापट यांस अण्णाच्या शीघ्र कवित्वासंबंधानें मोठें आश्चर्य वाटलें. त्यावेळीं तेथें जे लोक हजर होते, त्यांतील एकाच्या तोंडून असें ऐकण्यांत आलें कीं, हा श्लोक बापट यांस देतेवेळीं अण्णांनीं असें बोलून दाखविलें कीं, ‘अहोरात्र माझ्या मुखांतून ज्या कविता होऊन जातात, त्या सर्वांचा जर कोणी संग्रह केला असता, तर तो ठेवावयास माझें घर तरी पुरलें कीं नाहीं, याचा संशयच आहे.’ अण्णांनीं आपल्या विसाव्या वर्षी संस्कृतांत शिवस्तुति नामक आर्याबद्ध स्तोत्र रचिलें. त्यानंतर गजेंद्रचंपू लिहिला, त्याच्या शेवटीं असें पद्य आहे: - ‘पंचविंशति वर्षेण महादेवस्य सूनुना । ग्रंथोयं कल्पित: संत: पंत विठठलशर्मणा: ॥’ यावरुन हा चंपू अण्णांनीं आपल्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी लिहिला, हें उघड होतें. गजेंद्रचंपू हा ग्रंथ काव्येतिहाससंग्रहांत प्रसिद्ध झाला आहे. अण्णांनीं आपलें उपास्य दैवत श्रीरामचंद्र याजवर ‘सुश्लोकलाघव’ नामक ग्रंथ लिहिला आहे. ह्या ग्रंथांत श्लेष फार आहे व त्यावरुन अण्णांचें भाषाप्रभुत्व व अप्रतिम बुद्धिमत्ता हे गुण प्रामुख्यानें दृश्यमान होतात. सुश्लोकलाघवाचा कांहीं भाग काव्येतिहाससंग्रहांत प्रसिद्ध झाला आहे. हा ग्रंथ पुरा होण्याच्या पूर्वीच, त्यांतील कांही श्लोकांचा उपयोग हरिदास लोक आपल्या कीर्तनांत करुं लागले. एकदां नाशिकचे एक हरिदास अण्णांस भेटावयास आले होते, त्यांनीं एक सुंदर संस्कृत श्लोक म्हटला व त्याचा अर्थही सांगितला. त्यांस अण्णांनीं विचारलें, ‘हा कोणत्या कवीचा श्लोक ?’ हरिदासबुवांनीं कोणा भलत्याच कवीचें नांव सांगितलें. त्यावर अण्णा हांसून म्हणाले, ‘हा श्लोक माझ्या सुश्लोकलाघवांतला आहे. ’ व लागलीच त्यांनीं सदर ग्रंथ बुवांपुढें ठेवून तो श्लोक त्यांस दाखविला. पुढें आपल्या श्लोकांचें कर्तृत्व भलत्याचकडे जाऊं नये, म्हणून अण्णांनीं अन्योक्तीसारखा एक श्लोक करुन तो आपल्या सुश्लोकलाघवांत ठेवून दिला ! सुप्रसिद्ध जगन्नथापंडित यांच्या भामिनीविलासाचाही असाच प्रकार झाला होता, हें वाचकांस ठाऊक असेलच. अण्णांचा तिसरा संस्कृत ग्रंथ हेतुरामायण हा होय. यांत सीतास्वयंवरापर्य़ंतच रामायणांतील कथाभाग वर्णिला आहे व बाकी भाग आपल्या पुढील जन्मांत पुरा करण्यासाठीं शिल्लक ठेवला आहे. अण्णांला पुनर्जन्मासंबंधानें किती विश्वास होता हें पुढील गोष्टींवरुन वाचकांच्या लक्ष्यांत येईल. एके दिवशी कर्नाटकांतला एक मनुष्य कर्हाड येथें ताडपत्रांवरील कोरींव ग्रंथांचें जुडगे विकण्यासाठी घेऊन आला. हे ग्रंथ ‘विठ्ठल’ नामक कवीनें कानडी भाषेंत लिहिले होते. ‘ह्या माझ्या पूर्वजन्मांतील कविता आहेत’ असें म्हणून अण्णांनीं ते सगळे ग्रंथ विकत घेतले. ‘माझा पूर्वजन्म कर्नाटकांत झाला होता,’ असें अण्णा कधीं कधीं म्हणत असत, असें सांगतात. सुमारें १५० वर्षांपूर्वी कर्नाटकांत विठ्ठल पुरंदर नामक कानडी भाषेचा एक कवि होऊन गेला, ही गोष्ट प्रसिद्धच आहे. अण्णांनीं लिहिलेल्या सगळ्या ग्रंथांचीं नांवें किंवा माहिती मिळत नाहीं. वर दिलेल्या तीन ग्रंथाशिवाय प्रबोधोत्सवलाघव, प्रयोगलाघव, नित्यक्रमलाघव, संकल्प, रामतापिनी, विवाहतत्त्व, साधुपार्षलाघवम् , एकादशीविचार असे अण्णांचे आठ ग्रंथ प्रसिद्ध आहेत. संस्कृत भाषेचें अध्ययन सुलभ व्हावें म्हणून ‘सत्पदार्थलाघव’ या नांवाचा एक कोश ते रचीत होते, तो शेवतीं अपुराच राहिला आहे. हे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेंत आहेत. याशिवाय अण्णांनीं भजनासाठीं पुष्कळच पदें रचिली, त्यांपैकी कांहीं निवडक पदांचा संग्रह ह्या लेखाचें अखेरीस केला आहे.
अण्णांनीं ही सगळी विद्या अगदीं अल्प कालांत संपादन केली, हें पूर्वी सांगितलेंच आहे. आपल्या वयाच्या विसाव्या वर्षापासून ते आपल्या वडिलांचें दफ्तरदारीचें काम स्वत: पाहूं लागले. पुढें त्यांचे वडील साठ वर्षांचे होऊन वारले, तेव्हां अण्णा अठठावीस वर्षांचे होते. दुर्दैवानें, पुढें लवकरच पेशवाई बुडाली, यामुळें अण्णाची वंशपरंपरेची नोकरीही गेली ! परंतु सातारच्या महाराजांनीं त्यांस एक दुय्यम कारकुनाची जागा दिली व त्या जागीं ते लागलेच रुजू झाले. पेशव्यांनीं दिलेली द्फ्तरदारी गेली, तरी अण्णांचा वंश दफ्तरदार याच नांवानें अद्याप प्रसिद्ध आहे. सातारकरांची नोकरी पतकरल्यापासून, अण्णांनीं श्रीकृष्णोत्सवांतून मन काढलें व कीर्तन करण्याचेंही सोडून दिलें. मात्र श्रीकृष्णबाईच्या प्रतिवार्षिक उत्सवांत एक कीर्तन करण्याचा क्रम त्यांनीं चालू ठेविला होता. कीर्तनास मोठमोठे लोक येत असत. एका कीर्तनास शेषगीराव मामलेदार, हरिबा नाना नेवासकर इत्यादि गृहस्थ आले होते, त्यांपैकीं हरिबांसंबंधानें अशी प्रसिद्धि होती कीं, त्यांनीं ज्यास चांगलें म्हटलें, त्यास हटकून दृष्ट लागावयाची ! ह्या गृहस्थांनीं, अण्णांचे कीर्तन श्रवण करुन त्यांस प्रसन्न मनानें शाबासकी दिली; त्याबरोबर अण्णा घेरी येऊन पडले ! पुढें ते सावध झाल्यावर, ‘तुम्ही कीर्तन करण्याचें सोडून द्या’ असें शेषगीररावांनीं त्यांस सांगितलें व तें त्यांनीं मान्य केलें. अण्णांचे तीर्थरुप मृत्यु पावले, त्यास दोन वर्षे लोटलीं नाहींत तोंच त्यांची प्रियपत्नीही त्यांस सोडून परलोकीं गेली ! त्यावेळीं अण्णांस सीतारामपंत ऊर्फ बापूसाहेब व रघुवीरराव ऊर्फ भाऊसाहेब हे दोन पुत्र व भवानीबाई नामक कन्या, अशीं तीन अपत्यें होतीं. भवानीबाई ही पुढें सातारा येथील सुभेदारांच्या घरीं दिली. मातृवियोगसमयीं अण्णांच्या ज्येष्ठ चिरंजीवाचें वय अवघें बारा वर्षांचे होतें, यावरुन धाकटीं दोन मुलें किती लहान असतील, हें वाचकांच्या लक्ष्यांत येईलच. भर तारूण्यांत कुलीन, सुशील व गुणवती अशा पत्नीचा विरह अण्णांसारख्या सहृदय व रसिक कविवरास किती दु:सह झाला असेल, याची कल्पना वाचकांनीच करावी. त्यांतल्या त्यांत अण्णांची मातुश्री त्या वेळीं हयात होती, हें एक सुदैवच म्हणावयाचें असो; पुढें नागेशराव मामलेदार, गोविंदभाऊ गरुड, इत्यादि सदगृहस्थांनीं अण्णास द्वितीय विवाह करण्याविषयीं फार आग्रह केला; परंतु अण्णांनी ती गोष्ट कबूल केली नाहीं. त्यांस उपरति झाल्यामुळें त्यांनीं आपलें चित्त भक्तिमार्गाकडे लाविलें. अण्णांचे विवाहविषयक विचार किती उदात्त होते, हें ह्या गोष्टीवरुन अगदीं स्पष्ट होत आहे. पूर्वी, अण्णांच्या मनांत अग्निहोत्र घेण्याचा फार हेतु होता; परंतु हा अकल्पित प्रसंग गुदरमरल्यामुळें, तो हेतु अर्थातच पूर्ण झाला नाहीं. पत्निवियोगानंतर, थोडयाच दिवसांनीं अण्णांस अर्धांगवायु झाला; तेव्हां ती गोष्ट त्यांस पूर्वीच ज्ञात झाल्यामुळें त्यांनी द्वितीय विवाहास आपली संमति दिली नसावी, असेंही मानण्यास हरकत नाहीं; कां कीं, त्यांच्या अंतर्साक्षित्वाची एक दोन उदाहरणें पूर्वी घडूण आलीं होतीं. असो. अण्णांची पत्नी परलोकवासी झाली, त्यानंतर दोन वर्षांनीं त्यांची मातुश्रीही निवर्तली. ह्या प्रसंगामुळें अण्णांच्या कोमल मनास मोठाच धक्का बसला. मातुश्रीच्या मरणापासूण अण्णांनीं पागोटें घालण्याचें सोडूण दिलें व मस्तकास धोतर, शालजोडी यांसारखें कांहीं तरी वस्त्र गुंडाळण्याचें व्रत आजन्म पाळिलें. पुढें अण्णांच्या मनाची वैराग्याकडे प्रवृत्ति होत चालली. राजगुरु बाबामहाराजांचे वडील चिरंजीव आबामहाराज यांजपाशीं अण्णांनीं वेदांतशास्त्राचा अभ्यास केला; आणि अमृतराय नामक एक सत्पुरुष होते त्यांजपासून त्यांनीं गुरुपदेश घेतला. नंतर त्यांनीं पुराण सांगण्यास प्रारंभ केला. सातारच्या महाराजांकडून अण्णांस जी नोकरी मिळाली होती, ती प्रथमत: कर्हाड येथेंच मिळाली होती, पण पुढें लवकरच त्यांची बदली मसूर येथें होऊन, तेथें त्यांनी तीन वर्षे काम केलें. तेथून ते सातार्यास कागदपत्र समजावून देण्याकरितां गेले असतां, तेथें त्यांस केशवभट माटे हे भेटले, व त्यांजकरितां ‘साधुपार्षदलाघवम्’ हा ग्रंथ अण्णांनीं लिहिला, ही गोष्ट पूर्वी सांगितलीच आहे. त्यांचें अर्धे अंग लटकें पडलें व बोलणेंही बंद झालें ! फक्त राम हा शब्द मात्र ते उच्चारीत असत. नंतर, अनेक औषधोपचा केल्यावर त्यांची प्रकृति थोडीशी सुधारली. ते हिंडूं फिरुं लागले व पुराण सांगूं लागले. अण्णांचे ज्येष्ठ चिरंजीव बापूसाहेब हे अण्णांच्या समागमांत फारसे राहत नसत. अण्णांनीं आपल्या दोन्ही चिरंजिवांकडून व्युत्पत्तिशास्त्राचें अध्ययन करविलें, पण त्या विषयांत बापूसाहेबांची फारशी गति झाली नाही. दुसरे चिरंजीव रघुवीरराव ऊर्फ भाऊसाहेब हे मात्र रात्रंदिवस अण्णांपाशीं असत; व त्यांची बुद्धीही तीक्ष्ण होती; यामुळें थोडयाच वर्षांत ते चांगले विद्वान् झाले. अण्णांनीं भाऊसाहेबांस श्रीमदद्भागवताचें रहस्य उत्तम प्रकारें समजावून दिलें होतें. शरीर परस्वाधीन झाल्यामुळें, अण्णांनीं नोकरी सोडली व राहिलेलें आयुष्य कर्हाड क्षेत्रांत, ईश्वरभजनांत, शास्त्रविचारांत व काव्यरचनेंत घालविलें. शके १७८१ सिद्धार्थी संवत्सरांतील चैत्र महिन्यापासून श्रीरामनवमीचा उत्सव अण्णांनीं आपल्या घरींच सुरु केला. उत्सवांत ते प्रेमानें भजनपूजन करुन पुराण सांगत असत. ‘अहो जातां येतां उठत बसतां कार्य करितां’ ह्या वामनपंडितांच्या श्लोकांतला सदुपदेश अण्णांच्या ठायीं अगदीं पूर्णपणें बाणला होता; रामनामोच्चाराशिवाय त्यांनीं आपली एक घटकाही जाउं दिली नाहीं. श्रौतस्मार्त यज्ञकर्मविधींत अण्णा फार निष्णात होते; त्या कामीं काशींतील पंडितांकडूनही त्यांस आमंत्रणें येत असत. कर्हाड येथें काळे नामक गृहस्थांनीं यज्ञ केला, त्या वेळीं मोठमोठया विद्वान याज्ञिकांनीं होमकुंडें वगैरे यथाशास्त्र तयार केलीं होतीं, ती पाहून अण्णांनीं त्यांतील कांहीं चुका दाखविल्या, तीं शास्त्रनियमाप्रमाणें दुरुस्त केलीं; तेव्हांपासून या विषयाच्या संबंधांनें अण्णांच्या निपुणतेची फारच प्रसिद्धि झाली. पुढें पुढें तर कोणत्याही यज्ञक्रियेसंबंधांनें कांहीं वाद उपस्थित झाला, तर तो निकालासाठीं अण्णांकडे यावयाचा ! श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य हेही तीर्थप्रसाद देतांना प्रथम अण्णांस देऊन त्यांचा बहुमान करीत. अण्णांचे थोरले चिरंजीव बापूसाहेब हे औंध येथें पंतप्रतिनिधींच्या आश्रयास होते. पुढें इ.स. १८६८ त मुंबईचे विष्णुशास्त्री पंडित यांनीं विधवाविवाह सशास्त्र आहे, असा वाद उपस्थित केल्यामुळें, त्यांचा पराजय करणें श्रीशंकराचार्य यांस भाग पडलें. आचार्यांनीं व सगळ्या शास्त्री-पंडितांनीं हे महत्कार्य अण्णांकडे सोंपविल्यामुळें ते औंधास जाऊन राहिले व निरनिराळे शास्त्रार्थ पाहण्यांत त्यांनीं कांहीं दिवस घालविले. पुढें ते अष्टें येथील वकील कै० गोविंदराव लिमये यांचे घरीं संस्कृत ग्रंथांचा मोठा संग्रह होता त्याचा उपयोग करुन घेण्यासाठीं, तेथें जाऊन दोन महिने राहिले. श्रुतिस्मृतींतील वचनांचा मोठा संग्रह घेऊन अण्णा पुन: औंधास आले व तेथें त्यांनीं ‘विवाहतत्त्व’ या नांवाचा ग्रंथ तयार केला. ह्या इतक्या खटपटींत त्यांस दीड हजार रुपये कर्ज झालें. पुढें विधवाविवाहसंबंधांने पूणें येथें मोठा वाद झाला; तेव्हां आचार्यांबरोबर अण्णाही पुण्यास गेले होते. आचार्यपक्षाचे मुख्य वाद करणारे नारायणाचार्य गजेंद्रवाडकर यांस अण्णांनीं पुष्कळ साह्य केलें. ह्या वादाचा निकाल कोणत्या प्रकारें झाला, हें बहुतेक महाराष्ट्रीयांस विदितच आहे. अण्णा पुण्यास असतां, तुळशीबागेंत व श्रीमान् लोकांच्या घरीं त्यांचीं पुष्कळ पुराणें झालीं. अण्णांच्या रसाळ वाणीनें पुण्यपत्तनस्थ रसिक जनसमूहास इतकें वेड लाविलें कीं, मुंगीस रीघ नाहीं. अशी लोकांची दाटी होऊं लागली. पुढें अण्णा मुंबईस गेले, तेथेंही त्यांची चांगली वाहवा झाली. तेथून ते कुरुंदवाड, जमखिंडीकडे आमत्रंणावरुन गेले. बहुत आदरसत्कार झाला. ह्या प्रवासांत अण्णांस पुष्कळ द्रव्य मिळालें, त्यामुळें पुनर्विवाहाच्या वादाच्या तयारीसाठीं त्यांस झालेलें कर्ज फिटलें, ही एक मोठया संतोषाची गोष्ट होय. अण्णांस झालेला अर्धांगवायूचा विकार मधून मधून उलट घेत असे; परंतु अण्णा स्वत: वैद्यकशास्त्रपारंगत असल्यामुळें, त्यांनीं स्वत:च्याच उपचारावर त्या विकारास पंचवीस वर्षे दाद दिली नाहीं. मात्र केव्हां तरी एखादा झटका येत असे. एके दिवशीं कर्हाड येथील रा० काळे यांचे घरीं सप्ताह चालला असतां, अण्णास अर्धांगवायूचा झटका आला, आणि त्यामुळे ते निपचित पडले बोलणेंसुद्धां बंद झालें; ‘राम’ येवढा शब्द मात्र तोंडांतून काढीत. अशी स्थिति होतांच बापूसाहेब औंधास होते, त्यां बोलावून आणिलें. औंध येथील नामांकित राजवैद्य बाळशास्त्री बापट यांचे उपचार सुरु होऊन थोडासा गुण पडला. "ते चालूं लागले, रामायण वाचूं लागले, स्वत: जेवूं लागले, रात्रंदिवस रामनाम, रामाचें ध्यान व रामाचें भजन. असें त्यांचे एक वर्ष गेलें." पुढें चैत्रमासीं रामनवमीचा उत्सव आला, तो अण्णांनीं यथासांग व सप्रेम सिद्धीस नेला. वद्य पक्षांतील दशमीच्या दिवशीं, उत्सवासाठीं आलेल्या कित्येक विद्वान् वैदिकांबरोबर अण्णा बोलत बसले होते. गणेश सीताराम शास्त्री गोळवलकर, इंदूरचे सुभे, हे कांही सरकारी कामानिमित्त विलायतेस गेले होते, ते शुद्ध होण्याचा शास्त्रार्थ विचारण्यासाठीं, एकदोन दिवसांपूर्वी येऊन गेले होते. त्यांस शुद्ध होण्यास हरकत नाहीं.म्हणून, अण्णांनीं शास्त्रार्थ विचारण्यासाठी, एकदोन दिवसांपूर्वी येऊन गेले होते. त्यांस शुद्ध होण्यास हरकत नाहीं, म्हणून, अण्णांनीं शास्त्रार्थ काढून देऊन, मुहूर्तही काढून दिला व त्यांची इंदुरास रवानगी केली. दशमीच्या दिवाशीं त्यांच्या पाठींत एकाएकीं कळ निघून ते फार घाबरे झाले त्यांनीं आपले स्नेही विष्णुपंत भागवत यांस बोलावून यांस बोलावून आणून सांगितलें कीं माझा आतां भरवसा नाहीं. मागें रामनवमीचा उत्सव चालू रहावा, मुलांनीं नोकरी करुं नये, इत्यादि आपले हेतु अण्णांनीं विष्णुपंतास कळविले. नंतर नेहमीप्रमाणें त्यांचें प्रेमळ भजन चालू झालें. पाठींतील कळ अंमळ कमी झालीशी वाटली. दुसरे दिवशीं-शके १७९५ चैत्र वद्य एकादशी प्रात:कालींच स्नान, संध्या, पूजा इत्यादि नित्यकर्म आटोपून खारकांच्या क्षीरीचा नैवेद्या श्रीरामचंद्रास समर्पण केला. नंतर ‘अपराधस्तोत्र’ म्हणून तीर्थ घेऊन तुलसीपत्राचा स्वीकार केला व अतिशय तृषा लागली होती म्हणून थोडी क्षीर सेव करुन, उदक प्राशन करण्याकरितां पाण्याचें पंचपात्र हातीं घेतलें. नित्यसंप्रदायाप्रमाणें प्राशनापूर्वी ‘श्रीराम’ असा मोठयानें नामघोष करुन उदक मुखांत घातलें. झालें, संपलें ! त्यांचे प्रंचप्राण श्रीरामनामाबरोबरच चित्स्वरुपीं मिळून त्यांचा नाशवंत देह मात्र अवशेष राहिला. हातांतील पंचपात्र धाडकन खालीं पडलें. जीवास क्लेश न होतां, एकादशीला मुखानें रामनामोच्चार करीत असतां मृत्यु येणें म्हणजे कांहीं सामान्य पुण्याई नव्हे ! असो घरांतील मनुष्यें बाहेर येऊन पाहतात, तों हा शोचनीय प्रकार त्यांच्या दृष्टीस पडला ! अण्णांचे दोन्ही मुलगे औंधास होते, त्यांस ताबडतोब मनुष्य पाठवून आणलें व सर्वांनीं अण्णांचें देहसार्थक केलें. अण्णांच्या मागें, रामनवमीचा उत्सव कर्हाडास अद्याप चालू आहे. अण्णाचे द्वितीय चिरंजीव रघुवीरराव ऊर्फ भाऊसाहेब हे अण्णांच्या सान्निध्यास असून, चांगले व्युत्पन्न व कवि होते, हें पूर्वी सांगितलेंच आहे. अण्णाच्या गजेंद्रचंपु या काव्यावर भाऊसाहेबांनीं टीका केली आहे, ह्यावरुन अण्णाच्या इतर संस्कृत काव्यांवरहीं त्यांनी टीका केली असावी असे वाटतें. एकंदरींत रघुवीररावजींची विद्वत्ता व कवित्वशक्तीही त्यांच्या परमपूज्य तीर्थरुपांच्या सत्कीर्तीस साजेल अशीच होती. अण्णांच्या पश्चात् रघुवीररावही फार दिवस वांचले नाहींत; दोन वर्षांच्या आंतच तेही निवर्तले. असो; येथें विठोबा अण्णांचें संक्षिप्त चरित्र समाप्त झालें. हें चरित्र, अण्णाचे वडील चिरंजीव सीतारामपंत यांनीं दिलेल्या माहितीच्या आधारानें रा०रा० आठल्ये, माजी केरळकोकीळकर्ते यांनी लिहिलें असून, तें स्वतंत्र पुस्तकरुपानें प्रसिद्ध झालें आहे; व त्याच्याच आधारानें प्रस्तुत लेख मी संक्षेपरुपानें लिहिला आहे. मोरोपंतांच्या मागें, जुन्या पद्धतीनें कविता करणारे जे कवि होऊन गेले, त्यांत विद्वत्तेनें, सदाचरणानें व काव्यगुणांनीं युक्त असा कवि विठोबा अण्णासारखा दुसरा झाला नाहीं. अण्णाची विद्वत्ता अवर्णनीय होती. मोरोपंत, सोहिरोबा इत्यादि कवींची कविता त्यांनीं लक्ष्यपूर्वक वाचली होती, हें त्या कवीसंबंधानें त्यांनीं जे उद्गार काढले आहेत, त्यांवरुन उघड होतें. अण्णांच्या सुश्लोकलाघवांतील श्लोकांचा उपयोग करुन, रसिक हरिदास लोक आपल्या कीर्तनास कसा रंग आणितात, याचा अनुभव पुष्कळांस असेल. अण्णांनीं आपल्या संस्कृत काव्यांप्रमाणें, मराठींत एकही मोठें काव्य लिहिलें नाहीं, ही गोष्ट खरी, पण त्यांची जी काय थोडीशी मराठी कविता उपलब्ध आहे, तिचें अवलोकन केलें असतां, कवि या नात्यानें अण्णाची योग्यता फार मोठी आहे, असें म्हटल्याशिवाय राहवत नाहीं. त्यांच्या कवितेंत विद्वत्ता, रसिकता, प्रसाद प्रेम, भक्ति, गायनकला, निपुणता, नम्रता व पवित्रता हे गुण सारख्या प्रमाणांत वसत असल्यामुळें, ती कविता वाचतांना किंवा ऐकतांना रसिकांच्या चित्तवृत्ति क्षणभर वेडावल्याशिवाय राहात नाहींत. अण्णांच्या मराठी कवितेचें पुस्तक प्रसिद्ध झालें आहे. त्याशिवाय त्यांची बरीच कविता अलिबागच्या बाजूस त्यांच्या एका शिष्याच्या घरीं आहे, असें केसरींतील एका पत्रावरुन समजतें. ही सगळी कविता कोणी प्रसिद्ध करील तर महाराष्ट्रावर त्याचे मोठे उपकार होतील. अण्णांच्या संस्कृत कवितेसंबंधानें विवेचन करण्याचें हें स्थल नव्हे व तसें करण्याचा माझा अधिकारही नाहीं. जुना केरळकोकिळ, वर्ष ७ अंक १० यांत अण्णांच्या संस्कृत प्राकृत कवितेसंबंधानें फार उत्कृष्ट व्याख्यान केलें आहे, तें वाचण्याची वाचकांस शिफारस करुन पुढें वळतों. अण्णांची सामाजिक मतें कोणत्या प्रकारची होतीं, हें त्यांच्या चरित्रांतील एक दोन मह्त्त्वाच्या गोष्टींवरुन अगदीं स्पष्ट दिसून येतें. विधवाविवाह त्यांस मान्य नव्हता, हें त्या वादांत त्यांनीं जो भाग घेतला होता, त्यावरुन उघड दिसतें, तथापि हल्लींच्या आधिदैविक संकटांनीं वृद्धिंगत केलेली बालविधवांची भयंकर संख्या अण्णांच्या; अवलोकनांत आली असती, तर त्या थोर, उदार व सहृदय कविवरानें, या विषयासंबंधांनें आपल्या मतांत थोडासा बदल केला असता कीं नसता हें सांगतां येणें शक्य नाहीं. परदेशगमन धर्मशास्त्रास असंमत नाहीं, अशी अण्णांची समजूत होती, हें गणेशशास्त्री गोळवलकरांस त्यांनीं जो शास्त्रार्थ काढून दिला, त्यावरुन स्पष्ट होतें. भर तारूण्यांत प्रथम पत्नीचा विरह झाला असतां, त्यांनीं द्वितीय विवाह केला नाहीं. यावरुन विवाहसंस्कारासंबंधानें त्यांची कल्पना किती उदात्त होती, हें तात्काळ ध्यानांत येतें, व विधवाविवाहास ते प्रतिकूल कां होते, याचाही खुलासा सहज होतो. असो. अण्णांची पदें किती महत्वपूर्ण आणि हृदयंगम आहेत, हें पुढील वेंच्यावरुन वाचकांच्या लक्ष्यांत येईल.
पद (कां मनि धरिली अढी.)
रामकृष्ण नरहरे स्वामिन् । कधिं करिशिल बा दया दयाळा ।
गर्भवास हा पुरे ॥ध्रु०॥
काय करुं मी बरें ! सांगा । कळों येति मज माझे दोषगुण ।
चित्त परी नावरे ॥१॥
विषयीं मन बावरे । सदोदित । कामक्रोध हे चोर लुटति मज ।
प्राण होति घाबरे ।
धांव धांव धाव रे । सत्वर । बुडतो भवसागरीं दीन हा ।
उद्धरिं आपुल्या करें ॥३॥
विचार मज न स्फुरे । कांहीं । केंवी गति होईल म्हणुनियां ।
जिव हा अंतरिं झुरे ॥४॥
प्रार्थितसे आदरें । अतां एक । असें करीं तव नाम निरंतर ।
पंतविठठल स्मरे ॥५॥
स्वात्मनिवेदन.
पद (धुमाळी.)
उत्तम जन्मा येउनि रामा ! गेलों उगा वायां ।
दुष्ट पातकी शरण मि आलो सत्वर तव पाया. ॥ध्रु०॥
आधीं चुकलो मुकलों मी निज वेदस्वाध्याया ।
कर्मे श्रौतस्मार्त न घडलीं सद्गति साधाया ।
पुराण परिसुन सादर झालों यशहि न तव गाया ।
स्वस्थपणें कधिं नाहिं फावलें तुजला पूजाया ॥१॥
आर्जविले बहु लवणभजनें व्याह्या जांवाया ।
क्षुधित अतिथि कधिं नाहिं घेतला प्रेमें जेवाया ।
उदार कर कधिं केला नाहीं पैसा एक द्याया ।
नाम फुकटचें तेंहि न आलें स्वामी वदना या ॥२॥
कपट करुनियां निपट भोंदिल्या बहु आया बाया ।
केलि धनगृह-क्षेत्र-स्त्रीपशु-शिशुवर बहु माया ।
नित्य सजविली वसनभूषणें निंद्या ही काया ।
सिद्ध ठेविली सदाहि रसना सज्जन निंदाया ॥३॥
वटवट निशिदिनिं केलि चहुंकडे मन हें रमवाया ।
केलें स्नान न संध्या जपतप दुष्कृत शमवाया ।
क्षणहि न केला साधुसमागम भवदव निववाया ।
सद्य:कामुक झालों पाहुनि परधन परजाया ॥४॥
नाहीं विद्या कलाकुशलता तुजला रिझवाया ॥
शुद्ध मधुर वाणीही नाहीं तुजला विनवाया ।
बुद्धिहि नाहीं नकळे कांहीं शरणागत व्हाया ।
थकलि मजल सर्वथा दयाळा स्वहित आचराया ॥५॥
हरि कनवाळू करि दीनावरी करुणेची छाया ।
निगम नगारा गर्जे ऐसा निखिलां कळवाया ।
यावरि विश्वासुनियां आलों जवळ तुझ्या पायां ।
शुद्ध दगड हा पंतविठ्ठल स्वामी स्वामी रघुराया ॥६॥
वरील पदांत नमूद केल्याप्रमाणें, अण्णांची स्थिति खरोखरच होती कीं काय, याबद्दल शंका वाटते. अण्णांची वाणी इतकी ‘मधुर व शुद्ध’ असतां, ‘शुद्ध मधुर वाणीही नाहीं’ असे उद्गार त्यांनी काढिले आहेत. यावरुन, वरील पदांतील इतर विधानाच्या सत्यासत्यतेसंबंधांनेंही एखाद्यास शंका येणें साहजिक आहे; तरी पण वर दिलेली दोन पदें अण्णांच्या मनाचा कोमलपणा व पारमार्थिक कळकळ, हे दोन गुण उत्तम प्रकारें व्यक्त करितात, यांत संशय नाहीं. केरळकोकिळकर्त्यांच्या प्रेमळ भाषेनें बोलावयाचें म्हटल्यास, ‘हीं दोन पदें ऐकून एखाद्या पाषाण हृदयाससुद्धां द्रव येईल. मग करुणेचा सागर जो भगवान् तो अण्णांच्या प्रेमळ वाणीनें द्रवला असेल, सुप्रसन्न झाला असेल व त्यानें अण्णांचा उद्धार केला असेल, यांत शंका कशाची ?’ असो.
पद (गडयांनो घ्या हरिच्या नामा.)
मातर्जनकराजतनमें ! त्रिजगज्जननि सदयहृदये ! ।
विनंति करुनि चित्त वळवा । प्रभुला केव माझि कळवा ॥धृ०॥
मारुतिराया बलभीमा ! । द्या मज हरिभजनीं प्रेमा ।
अजि लक्ष्मणजी ! जगजेठी । करा मज रामचरणभेटी ॥१॥
भरतजी ! एवढि करा सवडी । द्या मज रामपदीं आवडी ।
शत्रुघ्नजी ! करा करुणा । दाखवा रामरायचरणा ॥२॥
सुग्रीवजी ! भीड खर्चां । करा मज दास प्रभु घरचा ।
लंकानाथ बिभीषणजी । द्या प्रभुपाशिं दाद माझी ॥३॥
अहो ! अंगदप्रमुख भक्त । घ्या मज आत्ममंडळांत ।
विठठलपंत उभा द्वारीं । भिकारी दीन हाका मारी ॥४॥
वरील पद्यांतील शब्दरचनेपेक्षां त्यांतील अर्थगांभिर्याकडे लक्ष्य दिलें असतां, अण्णांच्या मनाची पारमार्थिक स्थिति किती स्पृहणीय होती, याची स्पष्ट कल्पना झाल्यांवाचून राहत नाहीं. शिवाय, ज्या रसिकांनीं मोरोपंतांचीं काव्यें वाचलीं असतील, त्यांस वरील पद्यावरुन, पंतांच्या ‘महद्विज्ञापना’ काव्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाहीं. विठोबा अण्णा हे अगदीं अर्वाचीन कवि, पण जुन्या मराठी कवितेच्या नित्य परिचयामुळें, त्यांची सगळी कविता प्रेमळ , सरस आणि चित्ताकर्षक उतरली आहे.
पद (माझी विनवणी.)
राघवा ! तुझा लागो छंद । न जडो दुर्मतिचा गंध ॥ध्रु०॥
न रुचो विषय विषय विषावाणी । आवडो संतांची वाणी ॥१॥
अंगिं रोमांच रोमांच नयनपाणी । झिरपो तुझिं गातां गाणीं ॥२॥
विठठलपंतासि पंतासि हेंचि काम । आवडो सदा तुझें नाम ॥३॥
पद (त्रिवट.)
मधुंरिपुमधु विपिनीं मधुकाली ॥ध्रु०॥
सखि मधु मधुतर मंजुल । वाजवितो मुरली ॥१॥
मधुकरनिकरे मधुरवें मधु । माधव कां त्यजिली ॥२॥
मधुनि मधुनि विधुसद्दश मुख । वधूतानलये मुरली ॥३॥
विठठलपदिं स्वर्धुनिशी अधुना । चित्तवृत्ति जडली ॥४॥
वरील पद्य वाचतांना रसिकांस जयदेव कवीच्या गीतगोविंद काव्याची आठवण होणें अपरिहार्य आहे, असें मला वाटतें.
पद (उद्धवा शांतवन कर जा.)
राम राम बोला वाणी, मन लावा राघवचरणीं ॥ध्रु०॥
कर्मतत्त्व गहन कळेना, कळलें तरि सांग घडेना ।
कर्तृताभिमान उडेना, कामाचा दोष झडेना ।
ब्रह्मांर्पणबुद्धि जडेना, पुण्याशीं गांठि पडेना ।
अंधारि निशा उजडेना, हित कोठुनियां आडरानीं ? ॥१॥
साधूचा संग धरावा, नाहीं ज्या आपपरावा ।
स्वकरें तच्चरण चुरावा, हरिमहिमा श्रवण करावा ।
प्रेमभाव हृदयिं धरावा, कीर्तनीं करा सुगरावा ।
भवसिंधु सुखें उतरावा, जन्माची होय शिराणी ॥२॥
विषये हे विषापरि विटती, स्वयमेव क्लेशही सुटती ।
वासना मूळही आटती, चित्ताच्या वृत्ती तुटती ।
ज्ञानांकुर हृदयीं फुटती, सहज सर्व संशय फिटती ।
कर्मबंध सहसा तुटती, स्वानंदसुखाची खाणी ॥३॥
शास्त्रदीप घेऊनि निघतां, निगमागम शोधुनि पाहतां ।
संतासी हितगुज पुसतां, सुगम हाचि दावी पंथा ।
आहेत मतांतर कंथा, ज्या रुचल्या नाहिं अनंता ।
म्हणुनि हाचि विठठलपंता पथ गमला निर्मल वाणी ॥४॥
हिंदु धर्माचे असंख्य ग्रंथ पाहून आणि मतमतांतरें ऐकून ज्यांची मनें परमार्थ-पथाविषयीं भांबावून गेलीं असतील, त्या मुमुक्षु जनांनीं अण्णाच्या वरील उपदेशामृतपापानें स्वत:ची पारमार्थिक अमरता प्राप्त करुन घेण्यास चुकूं नये.
खालील पदांतील अनुप्रास पाहण्यासारखे आहेत:-
पद (दादरा.)
कंजनयन गोपाल । भज भज सर्वकाल ॥ध्रु०॥
पिच्छोच्छलितावतंस गुंजगुच्छ विलसदंश ।
पिच्छिलता पिच्छकंस कंसासुरगिलन काल ॥१॥
हल्लकनव पल्लवपद मंदस्मित फुल्ल गल्ल ।
बल्लवकुल वल्लभ जो मल्लमदन सुभगभाल ॥२॥
हट्ट त्यज धैर्य धरीं घट्ट संतपाय धरीं ।
चटट दुरित गट्ट करिल पंतविठ्ठलाऽधिपाल ॥३॥
पुढील पद तर सुप्रसिद्धच ॥३॥
पुढील पद तर सुप्रसिद्धच आहे:-
पद (दादरा.)
करिं अतित्वरा । घडि घडि घडि पल पल जप ।
अमृतधाम रामनाम करुनि आदरा ॥ध्रु०॥
अति दुर्धर अपरिहरा येइल जंव तुजसि जरा ।
लट लट लट हलल मान धनुसमान तनु पुमान् होत बावरा ॥१॥
अंतसमय परम घोर, दोषत्रय करिति जोर ।
घुरु घुरु घुरु कंठ होय, भरिल भ्रम हरिल स्मृति करिल घाबरा ॥२॥
जो इंद्रियसंघदक्ष तो निजकल्याणदक्ष ।
त्याज वटवट खटपट उगि झटपट करिं कपटरहित भज रमावरा ॥३॥
विनवि पंतविठठल शरम किमपि धरीं विरम विरम विषयिं न रम ।
अमरमहित चरमतनु परम लाभ न करिं मातिरा ॥४॥
विठोबा अण्णांची कीर्तनशैली अत्यंत चित्तवेधक होती. अगाध विद्वत्ता, प्रासादिक कवित्व, अप्रतिम रसिकता व सरस वक्तृत्व यांही करुन त्यांच्या कीर्तनांत मोठा रंग येत असे. आपल्या कीर्तनांत ते जीं आख्यानें लावीत असत, त्या आख्यानांवर त्यांनीं स्वत: कविता केली आहे व ही कविता, त्यांच्या इतर कवितेपेक्षां अधिक रसवती आहे. कित्येक पद्यें तर इतकीं बहारीचीं आहेत कीं, ती वाचून, अण्णांच्या रसिकतेसंबंधानें प्रत्येक रसिकास मोठें कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाहीं. सीतास्वयंवर, रुक्मिणीस्वयंवर व द्रौपदीस्वयंवर हीं अण्णांचीं तीर प्रकरणें केवळ स्त्रियांसाठींच लिहिलीं असून, सगळ्या महाराष्ट्र स्त्रियांनी तीं अवश्य पाठ करावीं. रामजन्मावरचें पुढील पद्य किती सरस आहे, पहा:-
पद (धुमाळी.)
पुष्पपसमय मधुमास पुण्यतम शुक्लपक्ष तिथि ते नवमी ।
रवि मंगल गुरु शुक्र शनैश्वर ग्रह होते हे उच्चतमीं ॥
कर्क लग्न नक्षत्र पुनर्वसु मेषराषिगत खररश्मी ।
उदगामिजीवेंदु मध्यदिन असतां संकुल कुसुमीं ॥
हृत्पदीं दृढयोग युड्मुनि चिंतिताति ज्या यमनियमीं ।
चिन्मय निष्कल एक शुद्ध इति विविध गायिला जो निगमीं ॥१॥
भक्तकामकल्पद्रुम तो प्रभु करुणरसें पूर्ण द्रवला ।
श्रीमदयोध्या नगरीं दशरथराजगृहीं हरि अवतरला ॥ध्रु०॥
सांद्रपयोधर श्याममनोहर रुप जया मन्मथ लाजे ।
हिरेजडित शिरपेंच तुरा वरि शिरिं किरीट बरवा साजे ॥
भाळिं तिलक कविजना न वदवे कुटिलालककृत शोभा जे ।
मकराकृति कुंडलें श्रवणयुगिं सुप्रसन्न लोचनजलजें ॥
इंदुवदन नवकुंदरदन शुचि मंदहास अधरीं भ्राजे ।
प्रामत्रय मधुरिमार्थ कंठीं जडला जणुं रेखाव्याजें ॥
मौक्तिकहार उदार सुशोभित मध्यें कौस्तुभमणि रुळला ॥
श्रीमदयोध्या०॥२॥
कटींतटीं उद्दाम पीतपट मंजु किंकिणी गजबजती ।
जानुजंघ सकुमार गुल्फयुग वलयनपरें रुणझुणती ॥
सहज मृदंग आरक्त पद्तल ध्वजादि चिन्हें विराजती ॥
रम्य मनोहर सरळ अंगुली पूर्णचंद्रसी नखकांती ॥
त्रिभुवन कलुषक्षपणनिपुणतर मंदाकिनि झुळझुळ स्त्रवती ।
पादयुगुल यत्क्षणिक चिंतनें कर्मबंध सहसा तुटती ॥
दिव्यरुप पाहतां जननिच्या प्रेमपूर हृदयीं भरला ॥३॥
प्रसन्न दिक्चक्रवाक सुंदर मंद गंधवह संवहती ।
स्वयें हुताशन आयतनात: प्रदक्षिणार्चि: प्रज्वलती ॥
शृंगारुनि गृह रत्नतोरणें नागरिक ध्वज उभारिती ।
द्वारपरिसरीं कुंभदासिका शारतकुंभजल निषिं वती ॥
उजळुनि दीपज्योति कारुजन नीराजनविधि आचरती ।
वारवधू सालंकृति नाचति मंजुल हरिहरगुण गाती ॥
तननं तननं धिगिति धिगिति धिक् थय्य थय्य रव घुंबरला ॥
श्रीमदयोध्या०॥४॥
वरील पद्याच्या शेवटीं अण्णांचें नांव दिसत नाहीं, यावरुन तें अपूर्ण असावें असें वाटतें. सदर पद्य किती सुंदर आणि हृदयंगम आहे, हें रसिकांस सांगावयास पाहिजे असें नाहीं. श्रीरामजन्मासारखा उदात्त मनोहर विषय आणि अण्णांची अत्यंत भक्तिपूर्ण, प्रासादिक सुसंस्कृत वाणी, यांचा संगम खर्या रसिकांस इतका कुतूहलजनक वाटावा, यांत आश्चर्य नाहीं.
श्रीरामरावणयुद्धप्रसंगीं, लक्ष्मण रावणाच्या शक्तीनें मूर्च्छित पडला असतां, त्या अंकावर घेऊन श्रीरामचंद्र शोक करीत आहेत:-
पद (अजुनि कां रे न येसी०)
मंदभाग्य मी ऐसा । सुखि होइय कसा ॥मंद)॥ध्रु०॥
राज्यश्रीच्युत झालों विपिनासि आलों ।
मातातातसुहृत्प्रियस्वजनां मुकलों ।
परि तें मी सीतायोगें नाहीं स्मरलों ।
त्याहि तशा देवीला कैसा मुकलों ॥मंद०॥१॥
या विरहींच भरावें, परि कां चुकलों ।
होते हे डोळयाचे सोहळे उरले ।
होता बंधु सुहृत्प्रिय, मग या विरलों ।
रक्षुनि बहुधा, मजला, बहु धैर्य दिलें ॥मंद०॥१॥
म्हणे मी होतों याच्या भुजशक्तिवरी ।
दुष्टशिरोमणि रावण मारिन समरीं ।
अंकी घेइन पुनरपि क्षितिची कुमरी ।
अप्रिन राज्य बिभीषण निज भक्तकरीं ॥मंद०३॥३॥
बा सखया सुग्रीवा । तुज कष्टविलें ।
तूंही श्रम बहु केले परि नाहिं फळले ।
पाहुनि लक्ष्मणगतिला हृदय चुरलें ।
कैकयिनवस समस्तहि अजि बा ! पुरले ॥४॥
तूं तरि वृथा कां मरसी मम मित्रवरा ! ।
यश कोठुनियां ? हा मी दुर्दैवि पुरा ।
तूं तरि क्षेम असें बा ! जा निजनगरा ।
लक्ष्मणवद्गति माझी हा नेम खरा ॥५॥
सर्वहि पूर्वजकीर्ती म्यां मालविली ।
सून सुमित्रेची उगि अजि नागविली ।
जन्मुनि मी कौसल्या उगि भागविली ।
तत्पदिं विठ्ठलपंतें मति वागविली ॥६॥
भगवद्भक्त ध्रुव हा आपल्या पित्याच्या अंकावर बसावयास गेला असतां, त्याची सापत्न माता सुरुचि त्यास जे कठोर शब्द बोलली, ते कवि वर्णितात:-
पद (घ्या हरिच्या नामा०)
पोरा ! ये माझ्या उदरीं ! मग या बैसें मांडिवरी ।
चल उठ येथुनि जा स्वघरीं । कैंचें हें सुख तव पदरीं ॥ध्रु०॥
केलीस पूर्वि क्रिया खोटी । म्हणुनि जन्म तिच्या पोटीं ।
आतां तुज राज्यसुखासाठीं । लागली आशा बहु मोठी ॥
कैशा घडतिल या गोष्टी ? । पाहिजे पदरिं पुण्य कोटी ।
दुराशा व्यर्थ मनीं न धरीं । कैचें हें सुख तव पदरी ? ॥१॥
जरि तुज अवश्य हें करण । करिं मद्वचना अनुसरण ।
स्वामी त्रैलोक्याऽभरण । नतजनविपदब्ध्युद्धरण ।
त्या श्रीहरिला जा शरण । तयाचे घट्ट धरीं चरण ।
त्याचा प्रसाद होय जरी । मग या बैसें मांडिवरी ॥२॥
असे हे शब्द तिचे कांटे । लागतां हृदय जणूं फाटे ।
चित्तीं खेद फार वाटे । तेणें कंठनाळ दाटे ।
निघाला रडत रडत वाटे । ये निजमाउलिला भेटे ।
ती त्या कवळुनि हृदयिं धरी ॥३॥
तयातें जें जें कां छळलें । सर्वहि जनवदनें कळलें ।
तत्क्षणीं अंतर कळवळलें । अश्रुजळ नयनांतुनि गळलें ।
पळ मन मोहभरें मळलें । विवेकें परि न तिळहि चळलें ।
विठठल तत्पदिं नमन करी ॥४॥
‘गडयांनो घ्या हरिच्या नामा’ हें प्रसिद्ध पदही विठोबा अण्णांचेंच होय; परंतु नवनीतकर्त्यांनीं तें चुकीनें शिवदिनकेसरीचें म्हणून प्रसिद्ध केलें आहे. हें पद बहुतेक सर्वांच्या ऐकण्यांत असल्यामुळें त्याचा येथें समावेश केला नाहीं.
संन्यासी अर्जुन
पद - (चाल वरची).
अर्जुन होउनि संन्यासी । झाला द्वारातिवासी ॥ध्रु०॥
बरवा परिकर लंगोटी । गुलाबी खडखडीत छाटी ।
प्रणवोच्चार स्थिति ओठीं । स्मरणी चालतसे बोटीं ।
अंगीं विभूतिची ऊटी । कपटी वेष कांति मोठी ।
पाहुनि जन भुलले त्यासी । झाला द्वारावतिकासी ॥१॥
लोटली द्वारावति सारी । झाली खेट मठद्वारीं ।
पुजाया नाना उपचारीं । वेळा साधिताति चारी ।
दुर्लभ यतिदर्शन भारी । ढोंग माजविता कंसारी ।
पडल्या भेटीच्या राशी ॥झाला०॥२॥
यतिची सतत मौनवृत्ती । समाधिस्थिति बहु एकांतीं ।
वेदांतस्थ रहस्योक्ती । बोलतां फार सरस युक्ति ।
त्यांतुनि तीव्रतरे विरक्ति । उपजली सर्व जनां भक्ती ।
येउनि बसति तयापाशीं ॥झाला०॥३॥
वर वर वर वियोगमुद्रा । रात्रंदिवस नये निद्रा ।
हें एक ठावें यादवेंद्रा । उजजवी प्रीती बलभद्रा ।
कुतूहल पंत विठ्ठलासी । झाला०॥४॥
अण्णांच्या प्राकृत कवितेप्रमाणें त्यांची संस्कृत कविताही अत्यंत रमणीय आहे; परंतु ‘महाराष्ट्रकविचरित्र’ ग्रंथांत त्या कवितेंतील वेंचे देणें प्रशस्त न वाटल्यावरुन, तसा प्रयत्न केला नाहीं. शेवटीं, अण्णांची जी संस्कृत व प्राकृत कविता अद्याप छापून निघालेलीं नाहीं, ती छापून या सत्कवीच्या काव्याचा कायमचा जीर्णोद्धार करण्याचें श्रेय कोणी तरी उदार व रसिक गृहस्थ लवकरच घेईल, अशी आशा प्रगट करुन, हा लेख येथें पूर्ण करितों.